लूस्युन : (१८८१-१९ ऑक्टोबर १९३६). विसाव्या शतकातील श्रेष्ठ चिनी साहित्यिक. मूळ नाव जो शू-जन. जजिआंग (जज्यांग) प्रांतातील शा अ स्यिंग येथे जन्मला. जपानमध्ये त्याने वैद्यकाचे शिक्षण घेतले. तेथे असतानाच पश्र्चिमी साहित्य आणि तत्त्वज्ञान ह्यांचा त्याने अभ्यास केला. नीतशे, डार्विन ह्यांच्या विचारांचा, तसेच गोगोल, चेकॉव्ह, आंद्रेयेव्ह ह्यांच्या साहित्याचा फार मोठा प्रभाव त्याच्यावर पडला. क्रांतिकारक विचारांचे संस्कार त्याच्यावर त्याच्या जपानमधील वास्तव्यात झाले. चीनमध्ये परतल्यानंतर विविध विद्यापीठांत आणि शिक्षणसंस्थांत त्याने अध्यापन केले. आपल्या देशाची राजकीय परिस्थिती चांगली नाही त्याचप्रमाणे एक आधुनिक राष्ट्र बनण्याच्या दृष्टीने आपल्या देशाच्या पाठीवर त्याच्या संस्कृतिक वारशाचे असलेले ओझे अडचणीचे ठरले आहे, ह्याची जाणीव लू स्युनला झाली होती आणि हे ओझे नाहीसे करण्याच्या कामगिरीत त्याने आपला वाटा उचलला. क्रांतिकारी कल्पना चिनी तरुणांच्या मनांत रुजविण्याचे कार्य त्याने केले.
गोगोलचा आदर्श समोर ठेवून लिहिलेल्या ‘ह्वांग-रन-ॠ-जि’ (१९१८, इं. शी. ए मॅडमन्स डायरी) ह्या त्याच्या पहिल्याच कथेने वाचकांचे लक्ष वेधून घेतले. पश्र्चिमी कथालेखनाच्या प्रभावातून लिहिली गेलेली ही पहिली चिनी कथा. ‘आ-क्यू-जंग-ज्वान’ (१९२१, इं.भा. द बायग्राफी ऑफ आ-क्यू, १९२६) ही त्याची सर्वोत्कृष्ट कथा. कारुण्य आणि विनोद ह्यांचे मनोज्ञ मिश्रण ह्या कथेत आढळते. पारंपरिक चिनी समाजव्यवस्थेवर त्याने आपल्या लेखनातून टीका केली. एक आधुनिक संवेदनस्वभाव त्याच्या लेखनातून प्रत्ययास येतो. ना हान् (१९२३, इं. शी. कॉल टू आर्मस्) ह्या त्याच्या कथासंग्रहाने अग्रगण्य चिनी साहित्यिक म्हणून त्याची प्रतिमा प्रस्थापित केली.
त्याने उत्कृष्ट निबंधलेखनही केले आहे. ‘ब्रिफ हिस्टरी ऑफ चायनीज नॉव्हेल’ (इं. शी.) हा त्याचा ग्रंथही दर्जेदार मानला जातो. काही उत्कृष्ट रशियन साहित्यही अनुवादाच्या रूपाने त्याने चिनी भाषेत आणले. चिनी बोलभाषेचा प्रखर पुरस्कार करणाऱ्यांपैकी तो एक होता. हा पुरस्कार चिनी संस्कृतीच्या-विशेषतः चिनी साहित्याच्या-दृष्टीने अतिशय उपकारक ठरला. चीनमधील आधुनिक शिक्षणाचा विकास होणे तसेच कोट्यवधी चिनी लोकांना आपली भाषा शिकून तिच्यातील साहित्याचा आस्वाद घेणे ह्यामुळे शक्य झाले.
शांघाय येथे तो निधन पावला.
थान जुंग (इं.)कुलकर्णी, अ. र. (म.).