ट्रिप्टोफेन : एक ⇨ॲमिनो अम्ल. यालाच आल्फा ॲमिनो (३–इंडोलील) प्रोपिऑनिक अम्ल असेही म्हणतात. रेणुसूत्र (रेणूमध्ये असलेल्या अणूंचे प्रकार व संख्या दाखविणारे सूत्र) C11H12O2N2. याच्या संरचनेत (अणू एकमेकांस जोडले जाण्याच्या तऱ्हेमध्ये) एक बेंझीन वलय आणि त्याला जोडून

ट्रिप्टोफेन

नायट्रोजनयुक्त पंचपदी वलय आहे (पहा : सूत्र). यामधील एक कार्बन अणू (सूत्रामधील तारांकित) असममित (ज्याला जोडलेले चारही अणू अथवा अणुगट भिन्न आहेत असा) असल्यामुळे याचे L व D असे दोन त्रिमितीय विन्यास संभवतात [→ त्रिमितीय रसायनशास्त्र]. निसर्गात L प्रकार जास्त विस्तृत प्रमाणात आढळतो. निरनिराळ्या प्रथिनांमध्ये हे थोड्या प्रमाणात असते.

इ. स. १८९० मध्ये नॉइमायस्टर यांनी प्रथिनावर ट्रिप्सीन या एंझाइमाची (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त पदार्थाची) विक्रिया करून हे प्रथम मिळविले. एफ्. जी. हॉफकिन्स व सी. डब्ल्यू. कोल यांनी १९०१ मध्ये ते केसिनापासून बनविले. ग्लायॉक्झॅलिक अम्ल व संहत (विद्रावातील प्रमाण जास्त असलेले) सल्फ्यूरिक अम्ल यांच्या मिश्रणाने त्याला निळसर जांभळा रंग येतो हॉफकिन्स-कोल विक्रिया म्हणून ही विक्रिया प्रसिद्ध आहे. ट्रिप्टोफेनाची संरचना एलिंजर व फ्लॅमंड यांनी १९०७ मध्ये निश्चित केली.

गुणधर्म : ट्रिप्टोफेन पाण्यात, तसेच उष्ण अल्कोहॉल आणि ईथर यांमध्ये विरघळते पण क्लोरोफॉर्मात विरघळत नाही. २५° से. तापमानाला त्याचे भौतिक स्थिरांक पुढीलप्रमाणे आहेत.

pK1 (COOH) : २·३८ pk2 (NH3+) : ९·३९

समविद्युत् भारबिंदू : ५·८९

प्रकाशीय वलन : [α]D (पाण्यात) –३३·७º

                      : [α]D (१ सममूल्य हायड्रोक्लोरिक अम्लात) + २·८°,

विद्राव्यता (ग्रॅ./१०० मिली. पाण्यात) : १·१४.

वरील भौतिक स्थिरांकांच्या स्पष्टीकरणासाठी ‘ॲमिनो अम्ले’ या नोंदीवरील ‘भौतिक गुणधर्म’ हा परिच्छेद पहावा.

शरीराच्या निकोप वाढीसाठी हे ॲमिनो अम्ल लागते. शरीरात त्याचे संश्लेषण (घटक अणू अथवा रेणूपासून रासायनिक क्रियेने बनणे) होत नाही, म्हणून याची गणना आवश्यक ॲमिनो अम्ले या गटात केली जाते [→ ॲमिनो अम्ले]. दैनंदिन गरज भागण्यासाठी माणसाच्या आहारात दररोज ०·२५ ग्रॅ. ट्रिप्टोफेन असावे लागते.

चयापचय : (शरीरात होणाऱ्या भौतिक-रासायनिक घडामोडी). ट्रिप्टोफेनापासून फॉर्मिल कायन्यूरेनीनमार्गे कायन्यूरेनीन बनते आणि त्यापासून पुढे ३– हायड्रॉक्सि-कायन्यूरेनीन, ३–हायड्रॉक्सि-अँथ्रॅनिलिक अम्ल, निकोटिनिक अम्ल व निकोटिनामाइड हि संयुगेही बनतात.

त्याचप्रमाणे ५–हायड्रॉक्सि-ट्रिप्टोफेनद्वारा, ५–हायड्रॉक्सि-ट्रिप्टामीन (सिरोटोनीन) होऊन त्याचे ५–हायड्रॉक्सि-इंडोल ॲसिटिक अम्ल बनते.

ट्रिप्टोफेनाच्या पार्श्वशाखेचे ट्रिप्टोफेनेज या एंझाइमाच्या योगाने विघटन होऊन (घटक अलग होऊन) इंडोल पायरूव्हिक अम्ल आणि अमोनिया निर्माण होतात.

आतड्यात ट्रिप्टोफेनावर सूक्ष्मजंतूंची विक्रिया होते व स्कॅटॉल बनते आणि त्यामुळेच विष्ठेला दुर्गंध येतो.

ट्रिप्टोफेनाची प्रतिरोधके (संरचनेत साम्य असल्यामुळे एखाद्या संयुगाच्या अंतिम परिणामात बदल घडवून आणणारी संयुगे) ५–मिथिल ट्रिप्टोफेन, बीटा–१–नॅप्थील ॲलॅनीन, इंडोल ॲक्रिलिक अम्ल व ७–ॲझो ट्रिप्टोफेन इ. संयुगे महत्त्वाची आहेत.

रानडे, अ. चिं.