ल्युसीन : (आल्फा अमिनो आयसोकॅप्रोइक अम्ल २- अमिनो- ४ -मिथिलपेंटानॉइक अम्ल). प्राण्यांच्या सर्वसाधारण वाढीसाठी आवश्यक असणारे ⇨ ॲमिनो अम्ल, सर्वसामान्य प्रथिनांमध्ये हे सांरचनिक एकक स्वरूपात असते. रेणवीय सूत्र (पदार्थाच्या रेणूत असलेले अणूंचे प्रकार व त्यांच्या संख्या दर्शविणारे सूत्र) C₈H₁₃NO₂ रेणुभार १३१.११. त्याची संरचना आणि रासायनिक गुणधर्म बरेचसे ⇨ व्हलीन या ॲमिनो अम्लासारखेच आहेत.

L - ल्युसीन : C* हा असममित कार्बन अणू आहे.

ल्बुसिनामध्ये  फक्त एकच असममित (ज्वाला चार वेगवेगळे अणू अथवा अणुगट जोडलेले आहेत असा) कार्बन अणू असतो. त्यामुळे त्याची प्रकाशतः सक्रिय दोन रूपे (प्रकाशीय समघटक) अस्तित्वात असतात [⟶ त्रिमितीय रसायनशास्त्र]. त्याचा जलीय विद्राव वामवलनी  (ध्रुवित प्रकाशाची पातळी डावीकडे वळविणारा L (विन्यास) आणि त्याचे हायड्रोक्लोराइड दक्षिणवलनी (ध्रुवित प्रकाशाची पातळी उजवीकडे वळविणारे D विन्यास) असते. ते बेरियम हायड्रॉक्साइडाच्या विद्रावाबरोबर उकळले असता त्याचे बहिःपूरण (रॅसेमीकरण) घडून येते [⟶ त्रिमितीय रसायनशास्त्र]. L-ल्युसीन या समघटकाचे संरचना सूत्र (रेणूमधील अणू एकमेकांना कसे जोडले आहेत हे दाखविणारी रचना) आकृतीत दाखविल्याप्रमाणे असते.

L– ल्युसीन समघटकाचे २५° से. तापमानाला भौतिक स्थिरांक खालीप्रमाणे आहेत.

            pK₁ (COOH)  : २.३६

            pK₂(NH+3) :  ९.६०

            समविद्युत् भार बिंदू : ५.९८ 

            प्रकाशीय वलन : (∝)D (पाण्यात) : -११°

                                      (∝)D (५ सममूल्यी हायड्रोक्लोरिक अम्लात) : + १६°

            विद्राव्यता (ग्रॅम/१०० मिलि. पाणी) : २.१९ 

वरील भौतिक स्थिरांकांच्या स्पष्टीकरणाकरिता ‘ॲमिनो अम्ले’ या नोंदीतील भौतिक गुणधर्म हा परिच्छेद पहावा.

इ. स. १८१९ मध्ये झोझेक ल्वी प्रूस्त यांनी चीजपासून अशुद्ध स्वरूपात ल्युसीन वेगळे काढले. १८२० मध्ये एच्. ब्रॅकोनॉट यांनी लोकर व मांस यांचे जलीय विच्छेदन (पाण्याच्या विक्रियेने घटक अलग करण्याची क्रिया) करून ते वेगळे काढले.⇨लसीका ग्रंथी, प्लीहा (पानथरी) आणि विशेषतः अग्निपिंड यांमध्ये ते आढळते. प्रलापक सन्निपात ज्वर (टायफस ज्वर) व काही इतर रोगांमध्ये त्याचे यकृतामध्ये अधिक प्रमाण आढळून येते. अनेक प्रथिनांचे, विशेषतः हीमोग्लोबिन, दुग्ध-ॲल्ब्युमीन व केसीन यांचे जलीय विच्छेदन करून ल्युसिनाचे उत्पादन केले जाते.

प्राणिशरीरात ल्युसिनाचे संश्लेषण (मूळ घटकांचा संयोग होऊन तयार होण्याची क्रिया) होत नाही. वनस्पतींत व सूक्ष्मजीवांमध्ये पायरूव्हिक अम्लापासून त्याचे संश्लेषण केले जाते. मानवामध्ये प्रथिन संश्लेषणाकरिता ल्युसीन आवश्यक असते. शरीरातील नायट्रोजन समतोल राखण्यासाठी आवश्यक असलेल्या आठ ॲमिनो अम्लांपैकी ते एक आहे. आहारामधून ते द्यावे लागते. दररोजच्या आहारात ल्युसिनाची प्रौढांना ३१ मिग्रॅ./किग्रॅ. व मुलांना ४२५ मिग्रॅ./किग्रॅ. आवश्यकता असते. काही प्रथिनांमध्ये असणारे ल्युसिनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे असते (ग्रॅम ल्युसीन/१०० ग्रॅम प्रथिन) : जिलेटीन ३.३, कोलॅजेन ३,९, हीमोग्लोबिन (मानव) १४.९, हीमोग्लोबीन (घोडा) १५.४, इन्शुलीन (गोमांस) १३.७, बीटा लॅक्टोग्लोब्युलीन १५.५, अंड्यातील ॲल्ब्युमीन ९.२, पेपेन ५.३.

ल्युसिनाचे चकाकणाऱ्या पट्टिकांच्या स्वरूपात स्फटिक बनतात. ते २९३° से. तापमानाला वितळते. ते पाण्यामध्ये अतिशय कमी प्रमाणात विरघळते. काळजीपूर्वक तापविले असता काहीही बदल न होता त्याचे संप्लवन (घन अवस्थेतून एकदम बाष्परूप अवस्थेत रूपांतरण) होते परंतु जलद रीत्या तापविले असता त्याचे आयसोॲमिल अमाइन व कार्बन डाय-ऑक्साइड यांमध्ये अपघटन होते. लोणारी कोळशाबरोबर ल्युसिनाच्या जलीय  विद्रावाचे वातावरणात ऑक्सिडीभवन होऊन आयसोव्हेलेरिक अम्ल, कार्बन डाय-ऑक्साइड व अमोनिया तयार होतात.

 

नॉरल्युसीन हे अशाख ॲमिनो अम्ल (आल्फा-अमिनो-n-कॅप्रोइक अम्ल) ल्युसिनाचे समघटक असून अद्याप प्रथिनांमध्ये आढळलेले नाही.


जैव संश्लेषण : आल्फा-कीटोआयसोव्हॅलेरिक अम्लाबरोबर असिटिल कोएंझाइम-ए (ॲसिटिल-CoA) चे संघनन होऊन समघटकीकरण, हायड्रोजननिरास, कार्बॉक्सिलनिरास यांच्यासारख्या अनेक विक्रिया घडून आल्फा-कीटो-आयसो-कॅप्रोइक अम्ल तयार होते. या संयुगाचे ॲमिनो-अंतरण होऊन ल्युसीन तयार होते. स्ट्रासमान, व्हाइनहाउस व त्यांचे सहकारी यांनी सुचविलेली विक्रिया मालिका खालीलप्रमाणे आहे.

चयापचय : (शरीरात सतत होणाऱ्या रासायनिक व भौतिक (घडामोडी). प्राणिशरीरामध्ये ल्युसिनाच्या चयापचयात्मक अपघटन क्रियेत ॲमिनोनिरास आणि ऑक्सिडीकारक कार्बॉक्सिलनिरास होऊन आयसोव्हॅलेरिल कोएंझाइम-ए तयार होते. या संयुगाचे शेवटी ॲसिटोॲसिटिक अम्ल व ॲसिटिल कोएंझाइम-एमध्ये रूपांतर होते. ॲसिटिल कोएंझाइम-ए चे कीटोन पदार्थात रूपांतर होते. ल्युसीन हे सर्व ॲमिनो अम्लांमध्ये सर्वांत जास्त कीटोजनक आहे. प्रायोगिक निरीक्षणावरून एक मोल ल्युसिनाचा चयापचय होऊन १.५ मोल  ॲसिटोअसिटिक अम्लाची निर्मिती होऊ  शकते, असे सिद्ध झाले आहे.

क्लोरोॲसिटिल ल्युसीन तयार करण्यासाठी क्लोरोॲसिटिल क्लोराइडाचे क्षारीय (अल्कलाइन) विद्रावामध्ये ल्युसिनाबरोबर संघनन केले जाते. पेप्टाइड मिळविण्याकरिता या संयुगाची संहत जलीय अमोनिया बरोबर विक्रिया केली जाते.  

ग्लायसिलल्युसीन (पेप्टाइड) 

  

डी-ल्युसीन, नॉरल्युसीन, आयसोल्युसीन, व्हॅलीन, आल्फा ॲमिनो आयसोॲमिल सल्फॉनिक अम्ल व सायक्लोपेंटीन ॲलॅनीन ही संयुगे ल्युसिनाची प्रतिरोधके (परस्पर विरोध करणारी) आहेत.

हेगिष्टे, म. द.  सूर्यवंशी, वि. ल.