थ्रिओनीन : ॲलिफॅटिक गटाचे एक आवश्यक ⇨ ॲमिनो अम्ल, रेणवीय सूत्र (रेणूतील अणूंचे प्रकार व त्यांच्या संख्या दाखविणारे सूत्र) C4H9NO3. आल्फा ॲमिनो बीटा हायड्रॉक्सिब्युटिरिक अम्ल या नावानेही हे ओळखले जाते. फायब्रिनाचे (रक्तद्रवातील फायब्रिनोजेन या प्रथिनावरील थ्राँबिन या किण्वाच्या–विघटन करणाऱ्या द्रव्याच्या–क्रियेमुळे तयार होणाऱ्या आणि न विरघळणाऱ्या पांढरटसर प्रथिनाचे) जलीय विच्छेदन करून (पाण्याच्या विक्रियेने रेणूचे तुकडे करून) डब्ल्यू. सी. रोझ व त्यांचे सहकारी यांनी १९३५ मध्ये थ्रिओनीन वेगळे केले. १९६५ मध्ये एच्. ई. कार्टर यांनी त्याचे प्रथम संश्लेषण केले (घटक द्रव्ये एकत्र आणून कृत्रिम रीतीने तयार केले) व त्यानंतर एच्. डी. वेस्ट आणि कार्टर यांनी थ्रिओनिनाचे चार समघटक (सारखे रेणवीय सूत्र असलेली पण निरनिराळे गुणधर्म आणि संरचना म्हणजे रेणूतील अणूंची मांडणी असलेली संयुगे) शोधून काढले. केसीन (दुधातील प्रमुख प्रथिन) व फायब्रीन यांत तसेच केस, रेशीम इत्यादींमधील प्रथिनांत हे आढळते.

थ्रिओनिनात दोन असममित (ज्याला चार वेगवेगळे अणू अथवा गट जोडलेले आहेत असे) कार्बन अणू आहेत. त्यामुळे त्याचे D–व L– थ्रिओनीन आणि D–व L– ॲलोथ्रिओनीन असे चार समघटक होतात (D व L या चिन्हांच्या स्पष्टीकरणासाठी ‘ॲमिनो अम्ले’ ही नोंद पहावी). ज्याप्रमाणे L–सेरिनामधील संरचनेत असममित कार्बन अणू ॲमिनो गटाला जोडलेला असतो, त्याचप्रमाणे तो नैसर्गिक रीत्या आढळणाऱ्या थ्रिओनिनाच्या संरचनेत आढळतो म्हणून त्याला L–थ्रिओनीन असे म्हणतात.

थ्रिओनिनाचे स्फटिक पांढरे असून ते पाण्यात विरघळतात. थ्रिओनिनाच्या चारही समघटकांची संरचना पुढीलप्रमाणे आहे. 

L– थ्रिओनिनाचा वितळबिंदू २५५°–२५७° से. असून या तापमानाला त्याचे अपघटन (रेणूचे लहान तुकडे होणे) होते. परआयोडेटाबरोबर त्याची विक्रिया होऊन ग्लायॉक्झॅलेट, अमोनिया आणि ॲसिटाल्डिहाइड मिळतात. प्रथिनाच्या अम्लीय जलीय विच्छेदनाने त्याचा अंशतः पण क्षारीय (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवणे देणाऱ्या पदार्थांच्या साहाय्याने अल्कलाइन ) जलीय विच्छेदनाने त्याचा पूर्णपणे नाश होतो. २५° से. ला त्याचे भौतिक स्थिरांक पुढीलप्रमाणे आहेत.

pK1 (COOH) : २·७१ pK2 (NH3+) : ९·६२

समविद्युत् भारबिंदू : ६·१६

प्रकाश परिवलन : [α] D (पाणी) : –२८·५

                            [α] D (५ सममूल्यी हायड्रोक्लोरिक अम्ल) : –१५

विद्राव्यता (ग्रॅ./ १०० मिलि. पाणी) : २०·५

वरील भौतिक स्थिरांकांच्या स्पष्टीकरणाकरिता ‘ॲमिनो अम्ले’ या नोंदीतील ‘भौतिक गुणधर्म’ हा परिच्छेद पहावा.

प्राण्यांच्या वाढीसाठी अत्यावश्यक असलेले हे एक ॲमिनो अम्ल आहे. सस्तन प्राण्यांत ते तयार होत नाही, पण सूक्ष्मजीवांमध्ये ते विविध तऱ्हांनी ॲस्पार्टिक अम्लापासून तयार होते. लहान मुलाच्या वाढीसाठी थ्रिओनिनाची ८७ मिग्रॅ/किग्रॅ. इतकी दैनंदिन गरज असते, तर प्रौढाला शरीरातील नायट्रोजनाचा समतोल राखण्यासाठी १४ मिग्रॅ./किग्रॅ. इतकी दैनंदिन गरज असते. हे प्रमाण कमी झाल्यास लहान मुलांची वाढ खुंटते व प्रौढांचा नायट्रोजन समतोल बिघडतो.

थ्रिओनिनाचा शरीरातील चयापचय (रासायनिक–भौतिक बदल) पुढीलप्रमाणे होतो.

     थ्रिओनीन  ↔ ग्लायसीन + ॲसिटाल्डिहाइड 

↓ 

↕ 

ऊतकातील प्रथिने  

 आल्फा–किटो–ब्युटिरिक अम्ल → प्रोपिऑनिक अम्ल → ग्लुकोज  

   ↓ 

आल्फा ॲमिनो ब्युटिरिक अम्ल.  

(ऊतक म्हणजे रचना व कार्य समान असणारा पेशींचा समूह).

ठाकूर, अ. ना.