हॉपकिन्स, सर फ्रेडरिक गाउलंड : (२० जून १८६१–१६ मे १९४७). ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ. प्राण्यांचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आहारात आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांच्या म्हणजे जीवनसत्त्वांच्या शोधासाठी त्यांना क्रिस्तीआन आइकमान यांच्यासह १९२९ सालचे शरीरक्रियाविज्ञान अथवा वैद्यकातील नोबेल पारितोषिक विभागून मिळाले.

सर फ्रेडरिक गाउलंड हॉपकिन्स

हॉपकिन्स यांचा जन्म इंग्लंडमधील ईस्ट बोर्न् (ईस्ट ससेक्स) येथे झाला. १९०१ मध्ये हॉपकिन्स यांनी ट्रिप्टोफेन नावाचे ॲमिनो अम्ल शोधून काढले. ते त्यांनी प्रथिनांपासून वेगळे केले होते. १९०६-०७ दरम्यान त्यांनी असे सिद्ध केले की, ट्रिप्टोफेनासह इतर ॲमिनो अम्ले (म्हणजे अत्यावश्यक ॲमिनो अम्ले) विशिष्ट प्राणी इतर पोषक घटकांचा वापर करून निर्माण करीत नाहीत, तर ती योग्य त्या आहाराद्वारेच शरीरास पुरवावी लागतात. हॉपकिन्स यांना असे आढळून आले की, कृत्रिम रीत्या तयार केलेले दूध उंदरांना पुरविल्यावर त्यांची योग्य वाढ होत नाही, मात्र अगदी थोड्या मात्रेत देखील रोजच्या आहारात गायीचे दूध पाजल्यानंतर उंदरांच्या वाढीत परिणामकारक प्रगती होते. यावरून त्यांच्या लक्षात आले की, कोणताही प्राणी फक्त शुद्ध प्रथिने, वसा व कार्बोहायड्रेट यांच्या मिश्रणावर अगदी खनिज लवणे टाकून सुद्धा जगू शकत नाही, तर त्यासाठी आणखी काही अत्यावश्यक घटकांची गरज असते. शरीरात निर्मिती न होणाऱ्या व उणीव असणाऱ्या या अत्यावश्यक पोषक घटकांना त्यांनी साहाय्यक पदार्थ म्हटले. नंतर त्यांना व्हिटॅमिने म्हणजे जीवनसत्त्वे म्हटले जाऊ लागले.

हॉपकिन्स आणि सर वॉल्टर फ्लेचर यांनी १९०७ मध्ये स्नायूंतील आकुंचनाबाबतच्या रसायनशास्त्राच्या आधुनिक आकलनाचा पाया घातला. कार्यरत असणारे स्नायू लॅक्टिक अम्ल साठवितात, असे त्यांनी दाखवून दिले. साधारण पंधरा वर्षांनंतर हॉपकिन्स यांनी ग्लुटाथायोन हे ट्रायपेप्टाइड (एका शृंखलेत बद्ध असलेली तीन ॲमिनो अम्ले) जीवित ऊतकापासून (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या समूहापासून) वेगळे केले आणि ग्लुटाथायोन कोशिकांद्वारा होणाऱ्या ऑक्सिजनाच्या वापरासाठी अत्यावश्यक असते, असे त्यांनी दाखवून दिले.

हॉपकिन्स यांनी आपला बहुतांशी कार्यकाळ (१८९८–१९४३) केंब्रिज विद्यापीठात व्यतीत केला. त्यांना १९२५ मध्ये ‘सर’ या किताबाने सन्मानित करण्यात आले. रॉयल सोसायटीचे अध्यक्षपद (१९३१), ऑर्डर ऑफ मेरिट (१९३५) यांसह त्यांना अनेक मानसन्मान प्राप्त झाले.

हॉपकिन्स यांचे केंब्रिज (इंग्लंड) येथे निधन झाले.

 वाघ, नितिन भरत