येल्लाप्रगडा

सुब्बराव, येल्लप्रगडा : (१२ जानेवारी १८९५– ९ ऑगस्ट १९४८). भारतात जन्मलेले अमेरिकन जीवरसायन शास्त्रज्ञ. त्यांनी फॉस्फरसाची उष्णतामापन पद्घती विकसित केली. तसेच त्यांनी फॉस्फोक्रिॲटीन व ॲडिनोसीन ट्रायफॉस्फेट (एटीपी) हे स्नायूंतील द्रव्य, ⇨वल्कचर्म (पेलाग्रा) या रोगावर रामबाण उपाय ठरणारे निकोटिनिक अम्ल [⟶ निॲसीन], मुळ्याच्या भाजीतील फॉलिक अम्लासारखी रसायने, कृत्रिम फॉलिक अम्ल व त्याचे औषधी गुणधर्म, ऑरिओमायसीन आणि ऑप्टिसीन यांविषयीसंशोधन केले. तसेच त्यांनी आपले गुरू सायरस एच्. फिस्क यांच्याबरोबर न्यूक्लिओटाइडांची मालिका प्रकाशात आणली. त्यांनी कर्करोगावरील उपचारासाठीही महत्त्वाचे योगदान दिले.

सुब्बराव यांचा जन्म भीमावरम् (आंध्र प्रदेश) येथे झाला. त्यांनी मद्रास विद्यापीठातून पदव्या मिळविल्या ते १९२२ मध्ये शिक्षण व संशोधनासाठी बॉस्टन (अमेरिका) येथे गेले. त्यांना १९२४ मध्ये हार्व्हर्ड विद्यापीठाची संशोधन शिष्यवृत्ती मिळाली. तसेच नंतर त्यांना रॉकफेलर फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळाल्याने त्यांचे संशोधन चालू राहिले. रोगोपचारासाठी जीवरसायनशास्त्राचा अभ्यास करणे गरजेचे असल्याने ते जीवरसायनशास्त्रातील संशोधनाकडे वळले. फिस्क यांच्या मार्गदर्शनाखाली ते उच्च प्रतीचे संशोधक झाले. संशोधनाद्वारे त्यांनी वैद्यकात मोलाची भर घातली आणि जीवरसायनशास्त्रातील पीएच्.डी. पदवी संपादन केली (१९३०).

फॉस्फरसाची उष्णतामापन पद्घती सुब्बरावांनी शोधून काढली व तिचा वैद्यकात उपयोग होऊ लागला. त्यांनी स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणामध्ये फॉस्फोक्रिॲटीन व ॲडिनोसीन ट्रायफॉस्फेट यांचा असणारा महत्त्वाचा सहभाग संशोधनाद्वारे शोधून काढला. स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणाविषयी त्यांनी दोन लेख लिहिले (१९२७). यकृत व स्नायू यांतील फॉस्फरस संयुगांचे परीक्षण करताना यकृताच्या स्रावातील रासायनिक द्रव्यांकडे त्यांचे लक्ष गेले (१९२९). ही द्रव्ये रक्तक्षयावर रामबाण उपाय ठरु शकतील असे वाटल्याने त्यांनी १९३० मध्ये संशोधन सुरु केले. १९३८ मध्ये त्यांनी ही द्रव्ये शुद्घ रुपात वेगळी केली. ही द्रव्ये प्राणी व जंतू यांच्या पोषणाच्या दृष्टीने उपयुक्त असल्याचे त्यांनी अनेक प्रयोगांद्वारे सिद्घ केले. यामुळे ते हार्व्हर्ड विद्यापीठात अध्यापक झाले.

सुब्बराव यांना संशोधनासाठी प्रॉक्टर फंड (१९३५–३७), एल्ला-ससाच प्लाझ फाउंडेशन (१९३८) व मार्कले फाउंडेशन (१९३९-४०) या संस्थांनी अर्थसहाय्य केले. १९३५–३८ या काळात त्यांनी वेगवेगळ्या सहकाऱ्यांसह ११ संशोधनपर लेख लिहिले. त्यांनी निकोटिनिक अम्लावर संशोधन केले होते. हे अम्ल पुढे वल्कचर्म या रोगांवर उपयुक्त ठरले कारण त्याच्या न्यूनतेमुळे हा रोग होतो.

सुब्बराव लेडर्ले लॅबोरेटरीचे प्रथम सहसंचालक व नंतर संशोधन संचालक झाले. तेथे त्यांनी सात वर्षे संशोधन केले. ⇨ संग्रहणी (स्प्रू) रोगात लहान आतड्यामध्ये अन्न, पाणी व खनिज द्रव्ये शोषली जात नाहीत. यामुळे या रोगात पोषणातील न्यूनता दर्शविणारी लक्षणे आढळतात. संग्रहणी रोगाने सुब्बराव यांच्या भावाचे निधन झाले होते. त्यामुळे या रोगलक्षणांतून मानवाला मुक्त करण्यासाठी संशोधन करण्याचे सुब्बराव यांनी ठरविले. त्यांनी रक्तपरीक्षा करुन रक्तातील तांबड्या व पांढऱ्या कोशिकांचे (पेशींचे) विशिष्ट प्रमाण हे आरोग्यसंपन्नतेचे निदर्शक असते, असे दाखविले. तांबड्या कोशिकांची निर्मिती मंदावली की, शरीर निरोगी राहत नाही, असे त्यांना आढळले. फॉलिक अम्लाने तांबड्या कोशिकांची झपाट्याने वाढ होते, हेही त्यांच्या लक्षात आले. यावरून फॉलिक अम्लाच्या न्यूनतेमुळे संग्रहणी रोगाला अनुकूल परिस्थिती निर्माण होते, हे लक्षात आल्यावर फॉलिक अम्लातील घटक द्रव्यांचा त्यांनी शोध घेतला. यकृताच्या अर्कातून फॉलिक अम्ल मिळविणे हे खर्चिक काम असल्याने त्यांनी कृत्रिम रीतीने हे अम्ल तयार करण्याचा निर्णय घेतला. २० जुलै १९४५ रोजी त्यांनी कृत्रिम फॉलिक अम्ल तयार केले. ते यकृत अर्कापासून मिळणाऱ्या सदर अम्लापेक्षा दशसहस्रांश एवढ्या कमी खर्चात मिळविले होते. [⟶ फॉलिक अम्ल].

महाकोशिका रक्तात असताना होणाऱ्या पांडुरोगाच्या प्रकारात (मॅक्रोसायटिक ॲनिमियात) रुग्णाला फॉलिक अम्ल दिले असता तांबड्या कोशिकांच्या निर्मितीत वाढ झाल्याचे सुब्बराव यांना दिसून आले. या अम्लाचा संग्रहणी रोगावरही त्यांनी यशस्वीपणे वापर केला. त्यांनी फॉलिक अम्लापासून ऑप्टिसिनासारखी द्रव्ये मिळविली आणि रक्तार्बुद (ल्यूकेमिया) व कर्करोगाचे काही प्रकार यांच्याबाबतीत ही द्रव्ये चांगली गुणकारी असल्याचे दिसून आले. ऑरिओमायसीन (क्लोरोटेट्रासायक्लीन) हे प्रतिजैव (अँटिबायॉटिक) द्रव्य त्यांनी शोधून काढले. ते रक्तविषयक रोगांवर गुणकारी औषध ठरले. ते प्रभावी जंतुनाशकही आहे. फॉलिक अम्लावरील संशोधनानंतर त्यांनी डॉ. सिडने फर्बर यांच्याबरोबर कर्करोगावरील उपचारासाठी सर्वत्र वापरात असणारे महत्त्वाचे औषध मेथोट्रेक्झेट शोधून काढले. तसेच त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेमार्फत वापरले जाणारे हत्तीरोगावरील हेट्राझन या औषधाचाही शोध लावला.

हृद्‌रोहिणीक्लथनामुळे सुब्बराव यांचे निधन झाले. निधनाआधी त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले होते. लेडर्ले प्रयोगशाळेतील संशोधन विभागाने सुब्बराव मेमोरियल लायब्ररी स्थापन केली आहे. बलसाड (गुजरात) येथील प्रयोगशाळेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच सुब्बराव यांच्या सन्मानार्थ नवीन शोधलेल्या कवकाच्या प्रजातीस सुब्बरोमायसीज असे नाव देण्यात आले आहे. त्यांच्या स्मृतिशिलेवर पुढील वाक्य कोरले आहे, ‘आयुष्याचा मार्ग विज्ञानातील संशोधनाने प्रशस्त होईल परंतु धर्म या मार्गाच्या चाकोऱ्या इतक्या खोलवर नेईल की, त्या कधीच बुजणार नाहीत’.

ठाकूर, अ. ना.