रिबोफ्लाविन: ब गटातील जीवनसत्त्वांपैकी एक जीवनसत्त्व. याचे रेणवीय सूत्र (रेणूतील अणूंचे प्रकार व त्यांची संख्या दर्शविणारे सूत्र) C17H20N4O6 असे आहे. रेणुभार ३७६ . ३६. हे ‘जीवनसत्त्व ब’ या नावानेही ओळखले जाते. 

इतिहास : या पदार्थाचा शोध ए. डब्लू. ब्लीथ यांना दुधामध्ये १८७९ साली लागला. त्याच्या गडद पिवळ्या रंगावरून त्याला लॅक्टोक्रोम असे नाव देण्यात आले होते. त्याची शरीरक्रियात्मक क्रियाशीलता मात्र अनेक वर्षे अज्ञात राहिली.      

इ. स. १९२० मध्ये काही शास्त्रज्ञांनी पाण्यात विरघळणारा व ब जीवनसत्त्व असे नाव देण्यात आलेला पोषणज घटक हा एकापेक्षा अधिक घटकांचा बनला असण्याची शंका प्रदर्शित केली होती. हा पदार्थ ऑटोक्लेव्हमधून (पदार्थातील जंतूंचा नाश करण्यासाठी वा रासायनिक विक्रिया सुलभतेने घडविण्यासाठी बनविलेल्या पात्रामधून) काढल्यानंतर त्यामधील तंत्रिकाशोथ (मज्जातंतूंची दाहयुक्त सूज)−प्रतिरोधक घटक जरी नाश पावला होता, तरी त्यामधील प्राण्यांच्या वाढीस उपयुक्त असणारा घटक कायम असल्याचे लक्षात आले. त्यावरून उष्णतेमुळे नाश पावणारा व उष्णतास्थायी असे दोन घटक असल्याचे सिद्ध झाले. या घटकांना ब्रिटिश शास्त्रज्ञांनी ब जीवनसत्त्व व ब जीवनसत्त्व आणि अमेरिकन शास्त्रज्ञांनी एफ जीवनसत्त्व व जी जीवनसत्त्व अशी नावे दिली. 

इ. स. १९३० मध्ये जर्मनीमध्ये अंड्याच्या पांढऱ्या भागातून पिवळसर हिरव्या रंगाचा अनुस्फुरक (ज्यावर एखाद्या रूपातील ऊर्जा प्रवाह पडला असता विद्युत् चुंबकीय प्रारणाचे उत्सर्जन होते व उत्तेजक ऊर्जा प्रवाह बंद झाल्यावर प्रारणाचे उत्सर्जनही बंद होते असा) पदार्थ अलग करण्यात आला. १९३३ मध्ये रिखार्ट कून व त्यांच्या सहकाऱ्यांनी दुधापासून शुद्ध रिबोफ्लाविन मिळविले व १९३५ मध्ये ते संश्लेषणाने (कृत्रिम रीतीने) बनविता आले. त्यानंतर इतर पदार्थांपासून अशाच प्रकारचे अनुस्फुरक पदार्थ मिळविण्यात यश आले. ते सर्व एकाच रासायनिक गटात मोडत असल्यामुळे त्यांना फ्लाविने असे संबोधण्यात आले. मूळ पदार्थावरून त्यांचा नावे देण्यात आली. उदा., लॅक्टोफ्लाविन (दुधापासून), हेपॅटोफ्लाविन (यकृतापासून), ओव्होफ्लाविन (अंड्यापासून) वगैरे. कालांतराने या जीवनसत्त्वाची ब्रिटिश आणि अमेरिकन नावे काढून टाकण्यात आली. १९३७ साली या पदार्थाच्या संरचनेतील रिबोज घटकावरून अमेरिकन मेडिकल ॲसोसिएशनच्या औषधनिर्मिती व रसायनशास्त्र मंडळाने रिबोफ्लवन असे नाव दिले. 

रिबोफ्लविन

संरचना : रिबोफ्लिविनाची संरचना खालीलप्रमाणे आहे. ही रासायनिक संरचना १९३४ साली कून व त्यांच्या सहकाऱ्यांनी हायडल्बर्ग येथे आणि पॉल करार व त्यांच्या सहकाऱ्यांनी झुरिक येथे निश्चित केली. 

गुणधर्म : हा पिवळसर-नारिंगी रंगाचा सुईच्या आकाराचा स्फटिकीय पदार्थ असून तो २४०से. तापमानास काळपटतो आणि २७५−२८२से. तापमानास वितळून त्याचे अपघटन (रेणूचे तुकडे होण्याची क्रिया) होते. पाण्यात अल्प प्रमाणात विरघळतो. १२ मिग्रँ. पदार्थ २७·५ से तापमानास १०० मिली. पाण्यात विरघळतो. वसा (स्निग्ध पदार्थ) ज्यात विरघळतात अशा कोणत्याही द्रवात तो विरघळत नाही. ट्रिप्टोफेन व निकोटिनामाइड यांच्या उपस्थितीत पाण्यात जलद विरघळतो. क्षारधर्मी (अम्लाशी विक्रीया झाल्यास लवण देण्याचा गुणधर्म असलेल्या) विद्रावात लवकर विरघळतो. प्रबल अम्लधर्मी विद्रावामध्ये तो स्थायी असतो परंतु दृश्य प्रकाशात व जंबूपार (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) प्रकाशात व उन्नत तापमानाला क्षारधर्मी विद्रावात लवकर नाश पावती म्हणून काळा कागद गुंडाळलेल्या काचनलिकेत किंवा अंबर रंगाच्या कुपीत भरून ठेवतात. रिबोफ्लाविन ॲसिटेट व फॉस्फेट हे अधिक विरघळणारे पदार्थ असलेल्यामुळे ते औषधी उपयोगात आणतात. थायोसल्फेट व हायड्रोजन सल्फाइड हे पदार्थ रिबोफ्लाविनाचा व्यत्क्रमी (उलट सुलट अशा दोन्ही दिशांना होणाऱ्या विक्रियेने) ऱ्हास करतात आणि त्यापासून रंगहीन व अनुस्फुरक नसलेले ल्यूकोरिबोफ्लाविन बनते. प्रवल ऑक्सिडीकारक [⟶ ऑक्सिडीभवन ] त्याचे अपटघटन करतात. रिबोफ्लाविनाशी समधर्मी असलेल्या अनेक पदार्थात आणि अनुजातांमध्ये जीवनसत्त्व क्रियाशीलता आढळतो उदा., ६−एथिल −७−मिथिल संयुग व अराबिनोफ्लाविन.

शरीरक्रियात्मक कार्य : कार्बोहायड्रेटांच्या ऑक्सिडीभवनाकरिता लागणाऱ्या फ्लाविन मोनोन्यूक्लिओटाइट (FMN) या को-एंझाइमाचा [⟶ एंझाइमे] रिबोफ्लाविन एक भाग असते. तसेच झँथीन ऑक्सिडेजाना भाग असलेल्या फ्लाविन अँडेनीन डायन्यूक्किओटाइड (FAD) या को-एंझाइमाचाही ते एक भाग असते. ही को-एंझाइमे ऑक्सिडीभवन-क्षपण [⟶ क्षपण] विक्रीयांमध्ये भाग घेतात. या विक्रीया कोशिकीय (पेशीतील) श्वसन, कोशिका वाढ आणि इजा झालेल्या ऊतकांची (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांची) पुनर्रचना याकरिता आवश्यक असतात. डोळ्यामधील दृक्‌पटलातीय (जालपटलातील) रंगद्रव्याशी रिबोफ्लविनाचा संबंध असतो. १४ पेक्षा अधिक रिबोफ्लाविनयुक्त एंझाइमांचा (फ्लॅव्होप्रथिनांचा) अभ्यास करण्यात आला आहे. 

पुरवठा, शोषण, साठा व उत्सर्जन : दूध, मांस, तृणधान्ये व डाळी यामध्ये रिबोफ्लाविन पुरेसे असते. फळे व हिरव्या भाज्या यांमध्ये ते अल्प प्रमाणात असते. नेहमीच्या अन्न शिजविण्याच्या पद्धतीत त्याचा अल्प प्रमाणात नाश होतो. तसेच सूर्यप्रकाशात ठेवलेल्या बाटलीमधील दुधातील निम्मे रिबोफ्लाविन दोन तासांत नाश पावू शकते. 


मानवाच्या आतड्यातील सूक्ष्मजंतू संश्लेषणाने रिबोफ्लाविन तयार करतात व त्यांपैकी काही भाग शोषिला जातो. व जीवनसत्त्व गटातील आणखी काही घटकांचे संश्लेषण हे सूक्ष्मजंतू करतात. अन्नातील रिबोफ्लाविन आतड्यात शोषिले. जाते. रिबोफ्लाविनाचे फॅास्फोरिलीकरण (फॉस्फोरिक अम्लाने एस्टरात रूपांतर) झाल्याशिवाय त्यात जीवनसत्त्व क्रियाशीलता उत्पन्न होत नाही. ही विक्रिया आतड्याच्या श्लेष्मकलास्तरात (बुळबुळीत पातळ अस्तरात), यकृतात वा रक्तातील कोशिकांतही होत असावी. 

क्षयरोगासारख्या रोगात देण्यात येणाऱ्या प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधांचा आतड्यातील सूक्ष्मजंतूवर परिणाम होऊन शरीरात तयार होणाऱ्या रिबोफ्लाविनासारखा व गटातील जीवनसत्त्वाची त्रुटी निर्माण होते. यासाठी प्रतिजैव औषधे देताना व गटातील जीवनसत्त्वे देणे अत्यावश्यक असते.  

सर्व ऊतकांत रिबोफ्लाविन विखुरलेले असते. मूत्रपिंड, यकृत व हृदय या अवयवांत ते अधिक असते. मल, मूत्र व दूध यांमधून ते उत्सर्जित होते. प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्यास ते जसेच्या तसे मूत्रातून बाहेर टाकले जाते. अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) दिल्यास त्यास शोषण होते. 

आमापन, एकक व दैनंदिन गरज : रिबोफ्लाविनाच्या आमापनाकरिता दोन पद्धती वापरतात (१) रासायनिक आमापन : यामध्ये त्याच्या अनुस्फुरक गुणधर्माचा उपयोग करतात. [⟶ वैश्लेषिक रसायनशास्त्र]. (२) सूक्ष्मजैव आमापन : यामध्ये लॅक्टिक अम्ल तयार करणाऱ्या लॅक्टोबॅसिलय केसिआय या सूक्ष्मजंतूंचा वापर करतात.[⟶ आमापन, जैव]. 

रिबोफ्लाविनाच्या आंतरराष्ट्रीय एकक अस्तित्वात नाही. भौतिकीय-रासायनिक पद्धती वापरून पदार्थामधील रिबोफ्लाविनाच्या प्रमाण काढता येते. अमेरिकन औषधिकोशाप्रमाणे रिबोफ्लाविन मिगॅ. वजनात उल्लेखितात. रिबोफ्लाविनाची दैनंदिन गरज निश्चित ठरलेली नाही. सर्वसाधारणपणे ते २−२·५ मिगॅ. पुरते. गर्भीणी, बाळंतिणी व तरूणांना यापेक्षा ते थोडे अधिक लागते. रिबोफ्लाविनाची गरज ही शरीराची ऊर्जा गरज व स्नांयूची क्रियाशीलता यांवर अवलंबून असून तीवर आनुवंशिकता, वृद्धी, परिसर, वय व आरोग्य यांचा परिणाम होतो, असे आढळून आले आहे. 

रिबोफ्लाविन विरोधके : (प्रतिजीवनसत्त्वे). गॅलॅक्टोफ्लाविन हे रिबोफ्लाविनाचे प्रभावी विरोधक आहे. हायड्रॉक्सिएथिल हा समधर्मी पदार्थही विरोधक आहे.  

त्रुटिजन्य विकृती व औषधी उपयोग : उंदरावर या जीवनसत्त्वाबद्दलचे संशोधन प्रयोग पुष्कळ झाले आहेत. या प्राण्यामध्ये वाढ, त्वचा व डोळे यांवर त्रुटिजन्य परिणाम आढळतात. सर्व प्राण्यांना वाढ तसेच शरीरांच्या संवर्धनाकरिता त्याची जरूरी असते. 

मानवामध्ये रिबोफ्लाविनाच्या कमतरतेशी पुढील विकार संबंधित असतात : तोंडाच्या कडांना चिरा पडणे (कायलोसीस) जिभेचा दाह होणे व ती लाल दिसणे (ग्लॉसिटीस) स्वच्छ मंडलाचे (बुबळाच्या पुढच्या पारदर्शक भागाचे) विकार आणि नाक, डोळे कान यांच्या कडांभोवती खवलेल्या व चरबीयुक्त त्वचाशोथ (त्वचेची दाहयुक्त सूज). ⇨वल्कचर्म या रोगात रिबोफ्लाविनाची त्रुटी बहुधा असते व या रोगाच्या प्रमुख लक्षणांमागे रिवोफ्लाविनाची त्रुटिजन्य लक्षणे दडण्याचा संभव असतो. 

अमेरिकेच्या दक्षिण भागातील राज्ये, न्यू फाउंडलंड, चीन, उत्तर आफ्रिका व भारत या देशांत रिबोफ्लाविन त्रुटिजन्य विकृती आढळते. तीमधील लक्षणसमूहाला अरिबोल्फाविनोसीस म्हणतात. ओठ, जीभ, त्वचा, डोळे व तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था) यांवर त्रुटिजन्य परिणाम होतात. रिबोफ्लाविन त्रुटिबरोबरच बहुधा प्रथिन त्रुटीही असते.  

रिबोफ्लाविन तोंडाने तसेच अंतःक्षेपणाने देता येते. 

संदर्भ : 1. Bicknell, F. Grescott, F. The Vitamins in Medicine, London, 1953.

           2. Sebrell, W. H. (Jr) Harris, R. S. Ed., The Vitamins, Vol. V, New York, 1967.

           3. West, E. S. Todd, W. R. Textbook of Biochemistry, New York, 1961.

 हेगिष्टे, म. द. भलेराव, य, त्र्यं.