कोलीन : रासायनिक सूत्र C5H15O2N. बिलीन्यूरीन व बीटा हायड्रॉक्सि- एथिल-ट्रायमिथिल अमोनियम हायड्रॉक्साइड ह्या नावांनी ते ओळेखले जाते. ब गटातील जीवनसत्त्वांबरोबर ते सापडत असल्याने त्याला ब गटातील एक जीवनसत्त्व असे म्हटले जाते. ते प्रथम पित्तापासून वेगळे करण्यात आले व ‘Chole’ (म्हणजे पित्त) या ग्रीक शब्दावरून त्यास कोलीन हे नाव देण्यात आले. १८४९ मध्ये स्ट्रेकर यांनी बैलाच्या पित्तापासून ते वेगळे केले. १८६७ मध्ये वुर्ट्‌झ यांनी त्याचे प्रथम संश्लेषण (कृत्रिम रीत्या तयार) केले. त्याचे पोषणविषयक महत्त्व १९३० मध्ये चार्लस बेस्ट व त्यांचे सहकारी यांनी सिद्ध कले.

मेदाचे (स्निग्ध पदार्थांचे) जास्त प्रमाण असलेल्या आहारावर उंदरांची वाढ केल्यास त्यांच्या यकृतात मेदाचा संचय होतो. अशा आहाराबरोबरच जर कोलीन दिले तर मेदाचा संचय होत नाही, असे बेस्ट यांना आढळून आले. म्हणून कोलीनला ‘मेद-पोषणज घटक’ असेही म्हटले जाते. निसर्गात ते प्राण्यांच्या व काही वनस्पतींच्या ऊतकांत (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांत) आढळते. कोलिनाची त्रूटी भरून काढण्यासाठी सोयाबीन व अंड्याचा बलक यांमधील लेसिथीन या संयुगाचा उपयोग पूरक अन्न म्हणून करण्यात येतो.

गुणधर्म : कोलीन हे प्रभावी क्षारक (अम्लाशी विक्रिया होऊन लवणे देणारा पदार्थ) आहे. कोलीन रंगहीन, चिघळणारा व पाकासारखा द्रव असून त्याला माशासारखा व अमोनियासारखा वास आहे. ते हवेतील कार्बन-डाय ऑक्साइड वायू सहज शोषून घेते. ते पाणी व अल्कोहॉल यांमध्ये जलद विद्राव्य (विरघळणारे) असून ईथर, बेंझीन, टोल्यूइन इत्यादींमध्ये अविद्राव्य आहे. विरल विद्रावात ते स्थिर असून संहत (प्रमाण जास्त असलेल्या) विद्रावात त्याचे १०० से.ला अपघटन (मोठ्या रेणूचे लहान लहान तुकडे होणे) होते. त्याची रेणवीय संरचना (रेणूतील अणूंची मांडणी) पुढीलप्रमाणे आहे.

कोलीन

ते कमी विषारी असल्याने त्याचा औषध म्हणून उपयोग होतो. त्याचे सु. २०० अनुजात (मूळ पदार्थापासून मिळणारे दुसरे पदार्थ) तयार करण्यात आले आहेत.

शरीरक्रियात्मक कार्य : उंदीर, कुत्रा व कुक्कुटवर्गीय (कोंबड्यांच्या वर्गातील) प्राण्यांच्या शारीरिक वाढीसाठी कोलीन आवश्यक असते. उंदरामध्ये ते दूधनिर्मितीसाठीही आवश्यक असते.

कोलीनाच्या शरीरक्रियात्मक कार्याविषयीची निश्चित माहिती मिळालेली नाही. तथापि अन्नातून मिळणाऱ्या कोलिनामुळे यकृतातील फॉस्फोलिपिडामध्ये वाढ होते, त्यामुळे यकृतातील मेदाम्ले शरीरातील इतर ऊतकांकडे वाहून नेण्यास मदत होते किंवा ती यकृतातच वापरली जात असावीत असे मानले जाते.

कोलिनाचे सर्वांत महत्त्वाचे कार्य पोषणात आहे. त्याच्यापासून लेसिथीन व इतर कोलीनयुक्त घटक असणारी फॉस्फोलिपिडे बनतात. लेसिथिनाची संरचना पुढीलप्रमाणे आहे.

 

लेसिथीन हे मेद असून त्यातील एका मेदाम्ल रेणूचे फॉस्फोरिकोलीन या कोलीन अनुजाताचे प्रतिष्ठापन (एक अणू वा अणुगट काढून तेथे दुसरा अणू वा अणुगट बसविणे) होते. त्यामुळे मेदाचे भौतिकीय गुणधर्म बदलतात व ते पाण्यात पसरू शकते आणि रक्तातून सहज वाहून नेले जाते.

कोलिनाच्या त्रुटीमध्ये मेदाचा संचय यकृतात होऊ लागतो. कारण त्याचे लेसिथिनामध्ये रूपांतर होत नाही व ते रक्तात जाऊ शकत नाही. कोलीन दिल्यास मेदाचे रक्तात वहन होऊ शकते. मिथिओनीन आणि बिटेन ह्या मेदवाहक संयुगांमुळे कोलीन शरीरात तयार होते. प्रयोगशाळेतील प्राण्यांना जर कोलीन कमी प्रमाणात दिले, तर मेदाचा यकृतात संचय होऊन त्यांना यकृतसूत्रण रोग [यकृतातील पेशींचा नाश करणारा एक रोग, → यकृत] होतो व त्यांची वाढ खुंटते असे आढळून आले आहे.

प्राणिशरीरात तयार होणारे ॲसिटिलकोलीन हे संयुग कोलिनापासून बनते. कृत्रिम रीत्या बनविलेल्या ॲसिटिलकोलीन या संयुगाचा उपयोग कोलिनाच्या अभ्यासासाठी करण्यात आला. हे संयुग प्राणी व वनस्पती यांच्या ऊतकांत असल्याचे आढळून आले. तंत्रिकेतून (मज्जातंतूतून) संवेदना वाहून नेण्याच्या कार्यात हे संयुग महत्त्वाचे कार्य करते, तसेच रक्तदाब कमी करणारेही एक प्रभावी संयुग आहे. परानुकंपी तंत्रिकांना [→ तंत्रिका तंत्र] चेतावणी मिळते तेव्हा त्यांच्या शेवटाजवळ ॲसिटिलकोलीन तयार होते. शरीरात कोलीन आणि ॲसिटिलकोलीन यांचे प्रमाण संतुलित ठेवण्यात येते व यासाठी विशिष्ट एंझाइमांचा (जीवरासायनिक विक्रियांस मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त पदार्थांचा) उपयोग होतो. कोलीन ॲसिटिलेज या एंझाइमामुळे कोलिनाचे ॲसिटिलकोलिनामध्ये व कोलीन एस्टरेज यामुळे ॲसिटिलकोलिनाचे कोलिनामध्ये रूपांतर होते.

पुरवठा व दैनंदिन गरज : सोयाबीन, अंड्याचा पिवळा बलक, यकृत, मूत्रपिंड, मेंदू, पालेभाज्या, कडधान्ये व मोड इत्यादींप्रमाणे ते विपुल प्रमाणात आढळते. मानवाच्या रोजच्या आहारातून साधारणपणे ३०० ते ६०० मिग्रॅ. कोलीन शरीरात जाते. त्यापैकी फक्त २ ते ४ मिग्रॅ. शरीराबाहेर टाकले जाते. मिथिओनीन या ॲमिनो अम्लापासून शरीरात कोलीन तयार होते. केसिनासारख्या मिथिओनीन विपुल प्रमाणात असणाऱ्या पदार्थामुळे कोलिनाची गरज भासते. त्यामुळे त्याची दैनंदिन गरज निश्चित करता येत नाही.

अभिज्ञान : (अस्तित्व ओळखणे). पोटॅशियम ट्राय-आयोडाइड, प्लॅटिनम क्लोराइड, गोल्ड क्लोराइड, फॉस्फोटंगस्टिक इ. संयुगांच्या साहाय्याने कोलिनाचे परिमाणात्मक (वजनी) अभिज्ञान केले जाते. वर्णपट प्रकाशमापन व जैव आमापन पद्धतींनीही त्याचे अभिज्ञान केले जाते [→ आमापन, जैव वैश्लेषिक रसायनशास्त्र].

औद्योगिक उत्पादन : ट्रायमिथिल अमाइन व एथिलीन ऑक्साइड यांची सजल किंवा अल्कोहॉल विद्रवकाच्या (विरघळविणाऱ्या पदार्थाच्या) सान्निध्यात विक्रिया करून कोलीन तयार करतात. सर्वसाधारणपणे कोलीन क्लोराइड, कोलीन बाय-टार्टारेट, कोलीन डायहायड्रोजन सायट्रेट आणि ट्रायकोलीन सायट्रेट या कोलिनाच्या लवणांच्या स्वरूपांत ते वापरले जाते. ही लवणे घन व द्रव स्वरूपांत मिळतात.

उपयोग : यकृतसूत्रण रोगात कोलीन क्लोराइड या स्वरूपात ते दररोज १-६ ग्रॅ. या प्रमाणात दिले जाते. जादा दिल्यास पांडुरोगाची (ॲनिमियाची) लक्षणे दिसू लागतात. कावीळ, यकृतशोथ (यकृताची दाहयुक्त सूज), विसर्पिका (त्वचेचा एक रोग, सोरिॲसीस) आणि काही नेत्ररोगांत कोलिनाचा उपयोग होतो. पाक, एलिक्झिर, चपट्या गोळ्या अथवा जिलेटीनवेष्ट (विरघळणारी कॅप्सूल) या स्वरूपात तोंडावाटे कोलीन व त्याची लवणे दिली जातात. ते लहान प्रमाणात इतर खाद्यपदार्थांबरोबरही दिले जाते.

ॲसिटिलकोलीन, ॲसिटिल-बीटा-मिथिल कोलीन आणि कार्बामिल कोलीन हे त्याचे अनुजात औषध म्हणून वापरतात. तसेच कोंबड्यांचे पूरक अन्न म्हणूनही ते वापरले जाते.

संदर्भ : West, E.; Todd, W. R.; Mason, H. S.; Bruggen, J. V., Textbook of Biochemistry, New York, 1967.

लेखक : हेगिष्टे, म. द.