मिथिओनीन: प्राण्यांच्या सर्वसाधारण वाढीस अत्यावश्यक असलेले एक गंधकयुक्त ⇨ ॲमिनो अम्ल. रेणवीय सूत्र (पदार्थाच्या रेणूत असलेले अणुप्रकार व त्यांच्या संख्या दर्शविणारे सूत्र) C5H11NSO2·२ ॲमिनो-४ मिथिल थायोब्युटिरिक अम्ल या नावानेही ते ओळखले जाते. रेणुभार १४९·१५.रेणवीय संरचना

(रेणूमध्ये अणू एकमेकांना कसे जोडले आहेत हे दाखविणारी रचना) सोबतच्या प्रमाणे आहे.

२५ से.ला L- मिथिओनीन या समघटकाचे [→ समघटकता] भौतिक स्थिरांक पुढीलप्रमाणे आहेत :

Pk1(COOH) : २·२८,

pK2 (NH3+) : ९·२१.

समविद्युत् भार बिंदू : ५·७४

प्रकाशीय वलन :[ α]D (पाण्यात) – १०º

                          [∝]D (५ – सममूल्यी हायड्रोक्लोरिक अम्लात) + २३°·२.

विद्रवाव्यता (ग्रॅ. /१०० मिलि. पाण्यात) : ३·३५. 

वरील भौतिक स्थिरांकांच्या स्पष्टीकरणासाठी ‘ॲमिनो अम्ले’ या नोंदीतील भौतिक गुणधर्म हा परिच्छेद पहावा.

जे.एच्. म्यूलर यांनी १९२२ मध्ये मिथिओनिनाचा प्रथम शोध लावला. जी. बर्जर व एफ्‌.पी.कॉयन यांनी १९२८ मध्ये त्याची संरचना निश्चित केली. ते बेचव आहे. अम्लीय माध्यमात मिथिओनीन हे सोडियम नायट्रोप्रसाइडाशी लालसर जांभळा रंग देते. निरनिराळ्या प्रथिनांत ते असते. केसिनामध्ये त्यांचे प्रमाण १·५ % असते. शरीराची गरज भागविण्यासाठी ते आहारातून घेतले पाहिजे, त्यामुळे त्याचा समावेश अत्यावश्यक ॲमिनो अम्ल गटात केला जातो. मनुष्याची दैनंदिन गरज साधारणपणे १·१ ग्रॅ. असते.

चयापचय: (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक-रासायनिक घडामोडी). चयापचयातील मिथिल-अंतरणाच्या [एका संयुगाकडून दुसऱ्या संयुगाकडे मिथिल गटाचे (-CH3) संक्रमण होण्याच्या] विक्रियेमध्ये मिथिओनिनाचे महत्त्व आहे. त्याच्या परिवर्ती मिथिल गटाद्वारे मिथिओनिनाचे कार्य चालते. प्रथम एटीपी (ॲडिनोसीन ट्रायफॉस्फेट) रेणूच्या साहाय्याने मिथिओनिनाचे सक्रियण (अधिक क्रियाशील होण्याची क्रिया) होते व नंतर योग्य त्या स्वीकारकाला मिथिल गट दिला जातो. मिथिओनिनाचे होमोसिस्टाइनामध्ये रूपांतर होते. मिथिल-अंतरणाच्या विक्रियांमुळे शरीरात क्रिॲटीन, कोलीन, फॉस्फोलिपिडे इ. महत्त्वाची संयुगे संश्लेषित (घटक एकत्र आणून तयार करण्याच्या क्रियेद्वारे) होतात. या विक्रियांमध्ये काही अडचण आली, तर यकृतात वसा साठणे, वृक्कातून (मूत्रपिंडातून) रक्त येणे, ऊतकमृत्यू (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या -पेशींच्या समूहाचा इजा,रोग वा अन्य कारणाने होणारा मृत्यू ) वगैरे रोग उद्‌भवतात. मिथिओनीन शरीरात निर्विषीकरणाचेही काम करते. सिस्टीन व सिस्टाइन ही गंधकयुक्त ॲमिनोअम्ले जरी मिथिओनिनापासून शरीरात मिळाली, तरी त्या दोघांपासून मात्र मिथिओनिनाचे शरीरात संश्लेषण होत नाही.

मिथिओनिनापासून तयार झालेल्या होमोसिस्टाइनाचे नंतर ऑक्सि डीकरणाने [→ ऑक्सि डीभवन] होमोसिस्टिइक अम्ल होते किंवा आल्फा की टो ब्युटिरेट, हायड्रोजन सल्फाईड आणि अमोनिया यांमध्ये अपघटन किंवा ग्लुकोजामध्येही रूपांतर होऊ शकते.

मिथिओनिनाची प्रतिरोधके (परस्पर विरोध करणारी संयुगे) म्हणून क्रोटिल ॲलॅनीन, क्रोटिल ग्लायसीन, मिथॉक्सि नीन,नॉरल्युसीन, एथिओनीन, मिथिओनीन सल्फॉक्सि नीन,सेलेनोमिथिओनीन इ. संयुगे माहीत आहेत.

रानडे, अ.चिं.