सिस्टीन : हे गंधकयुक्त ॲमिनो अम्ल असून ⇨ सिस्टाइन या ॲमिनो अम्लाचे दोन रेणू डायसल्फाइड बंधाने जोडले जाऊन सिस्टीन तयार होते. रेणुसूत्र C6H12O4N2 S2. डाय आल्फा-ॲमिनो-बीटा-थायोल-प्रॉपिऑनिक अम्ल हे सिस्टिनाचे रासायनिक नाव आहे. १८१० मध्ये विल्यम हाइड वोलॅस्टन यांनी एल-सिस्टिनाचे संरचना सूत्र मूत्राश्मरींपासून (मुतखड्यांपासून) एल-सिस्टीन वेगळे केले. १८९९ मध्ये मोर्नर यांनी केस व शिंगे यांचे जलीय विच्छेदन करुन एल-सिस्टीन मिळविले. तेव्हा ते प्रथिनांचा एक घटक असल्याचे लक्षात आले. बहुतेक प्रथिनांमध्ये ते असते. तथापि कंकालीय (सांगाड्यातील) व संयोजी ऊतके (समान रचना व कार्य असणारे कोशिकांचे-पेशींचे-जोडणारे समूह), केस व लोकर यांमध्ये त्याचे प्रमाण पुष्कळच असते. मानवी केसांमध्ये ते जवळजवळ १२% असते. प्राण्यांत ते शिंगामध्ये तसेच पिसे, नख्या, नखे, खूर इत्यादींतही असते. इन्शुलीन या ग्रंथिस्रावात सिस्टीन हा एक महत्त्वाचा घटक असून ते ग्लुकोजजनक आहे. त्याचा अत्यावश्यक ॲमिनो अम्लांच्या गटात समावेश होत नाही.

एल-सिस्टीन घनरुप, पांढरे व स्फटिकमय द्रव्य आहे. रेणुभार २४०·३० ग्रॅ./मोल असून हे २४७–२४९ से. तापमानाला वितळते.

एल-सिस्टिनाच्या भौतिक स्थिरांकांची २५ से.ला असणारी मूल्ये पुढीलप्रमाणे आहेत :

pK1(COOH) : १·००

pK2 (COOH) : १·७०

pK3 (NH3+) : ७·४८

pK4 ( NH3+) : ९·०२

समविद्युत् भार बिंदू : ४·६०

प्रकाशीय वलन : [a]D (५ सममूल्यी हायड्रोक्लोरिक अम्लात)

−२३२ जलविद्राव्यता (ग्रॅ./१०० मिलि. पाण्यात) : ०·०११

वरील भौतिक स्थिरांकांच्या स्पष्टीकरणाकरिता मराठी विश्वकोशा तील ‘ॲमिनो अम्ले’ या नोंदीतील ‘भौतिक गुणधर्म’ हा परिच्छेद पहावा.

डायसल्फाइड बंधाने बद्घ असलेल्या सिस्टिनाचे जठरात पचन होत नाही किंवा याचे जास्त प्रमाणात जलीय विच्छेदन होत नाही. ते रक्तप्रवाहाद्वारे शरीरातील ऊतकांकडे नेले जाते. तेथे कोशिकांमध्ये त्याच्यातील दुर्बल डायसल्फाइड बंध तुटून सिस्टाइन तयार होते. त्याच्यापासून ग्लुटाथायोन संश्लेषित होऊ शकते. ग्लुटाथायोन हे ऊतकांतील ⇨ ऑक्सिडीभवन विक्रियांच्या दृष्टीने महत्त्वाचे संयुग आहे.

सिस्टाइनाचे ऑक्सिडीभवन झाल्यास सिस्टीन सहजगत्या मिळते. सिस्टाइनाचे दोन रेणू डायसल्फाइड बंधाने जोडले जाऊन सिस्टीन हे द्विवारिक तयार होते. व्हिन्सेंट द्यू व्हीन्यो यांच्या थॅलिमाइड व मॅलॅनिक एस्टर पद्घतीने सिस्टाइनाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करतात. ⇨ क्षपणा द्वारे (हायड्रोजनाचे समावेशन) सिस्टिनाचे सिस्टाइनात रुपांतर करता येते. सिस्टिनातील डायसल्फाइड बंध १५० से. पेक्षा अधिक तापमानाला, विशेषतः कमी (सु. २०%) आर्द्रता असताना तुटू शकतो. या दोन्ही ॲमिनो अम्लांचे चयापचय (शरीरात सतत घडत असणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींमधील) मार्ग जवळजवळ सारखेच असतात. सिस्टिनाचे ऑक्सिडीकरण केल्यास सिस्टीन डायसल्फॉक्साइड तयार होते. त्याचा कार्‌बॉक्सिलनिरास (कार्‌बॉक्सिल गट काढून टाकण्याची क्रिया) आणि नंतर ऑक्सिडीकरण केल्यास टॉरीन हे महत्त्वाचे संयुग संश्लेषणाद्वारे तयार होते.

सिस्टिनाचे पोषण स्रोतांवर विषारी आनुषंगिक परिणाम जवळजवळ होत नाहीत. मात्र चयापचयात्मक दोषांमुळे बालकात सिस्टिनुरिया व सिस्टिनॉसिस हे जन्मजात रोग होऊ शकतात. सिस्टिनुरिया रोगात मूत्रामध्ये सिस्टिनाचे विपुल खडे आढळतात, तर सिस्टिनॉसिस रोगात विशेषतः यकृत, स्वच्छमंडल, वृक्क, अस्थिमज्जा इ. विविध ऊतकांमध्ये सिस्टिनाचे स्फटिक साचून राहतात. या रोगांमुळे सहा ते नऊ महिन्यांच्या बालकांत भूक मंदावणे, शरीराची वाढ खुंटणे, सतत होणारी लघवी, यकृताची वाढ, मूत्रपिंडीय मुडदूस, वृक्काची अकार्यक्षमता इ. परिणाम झालेले दिसतात. शिवाय चयापचयातील बिघाडाने संधिशोथ होऊ शकतो.

जीवरासायनिक व पोषणविषयक संशोधनाला सिस्टिनाचा उपयोग होतो. कार्‌बोबॅक्टिरियम डिप्थेरिया या सूक्ष्मजंतूपासून डिप्थेरिया विषद्रव्य हे एक महत्त्वाचे औषधी द्रव्य तयार करतात. ज्या पोषक माध्यमात सूक्ष्मजंतूंची वाढ (अभिवृद्घी) करतात, त्या माध्यमासाठी सिस्टिनाची आवश्यकता असते. सिस्टिनामुळे केसांची वाढ व दुग्धस्राव यांमध्ये जोमाने वाढ होते, असे आढळले आहे.

पहा : ॲमिनो अम्ले; केराटिने; सिस्टाइन.

ठाकूर, अ. ना.