जीवनसत्त्व बी: सर्व प्राण्यांच्या पोषणास आवश्यक असणाऱ्या, मेदाचा चयापचय (शरीरात होणाऱ्या रासायनिक-भौतिक घडामोडी) होण्यास मदत करणाऱ्या  व नैसर्गिक स्वरूपात आढळणाऱ्या ब गटातील जीवनसत्त्वाची क्रियाशीलता असणाऱ्या पिरिडीन अनुजातांना (एका संयुगापासून तयार होणाऱ्या दुसऱ्या संयुगांना) पिरिडॉक्सीन किंवा ब जीवनसत्त्व असे म्हणतात.

इतिहास : १९३४ मध्ये पी. ड्यर्ड्यी यांनी तोपर्यंत ज्ञात असलेल्या जलविद्राव्य (पाण्यात विरघळणाऱ्या) जीवनसत्त्वांशिवाय आणखी काही घटक अस्तित्वात असल्याचा, तसेच त्यांची न्यूनता उंदरांमध्ये त्वचाशोथ (त्वचेची दाहयुक्त सूज) किंवा अग्रपीडा (पंजे, कान, नाक व ओठ यांच्या अग्रांची सूज व त्यांतील पेशींचा मृत्यू होणे) या विकृतीस कारणीभूत असल्याचे दाखविले. त्यांनी या घटकास ब जीवनसत्त्व असे नाव दिले. १९३९ मध्ये अनेक संशोधकांनी हा घटक स्फटिकीय स्वरूपात वेगळा केला. त्याच वर्षी त्याची रासायनिक संरचना ज्ञात झाली. त्याच सुमारास हॅरिस व फोकर्स या अमेरिकन शास्त्राज्ञांना आणि जर्मन शास्त्रज्ञ कून त्यांच्या सहकार्याना तो संश्लेषणाने (कृत्रिम रीत्या) तयार करण्यात यश आले. कून यांनी या जीवनसत्त्वास ‘ॲडरमीन’ असे नाव सुचविले. १९४० मध्ये अमेरिकन वैद्यकीय संस्थेच्या औषधिशास्त्र आणि रसायनशास्त्रविषयक विभागाने ड्यर्ड्यी यांनी सुचविलेले ‘पिरिडॉक्सीन’ (C8H11NO3) हे नाव स्वीकारले. निसर्गात या जीवनसत्त्वासारखीच क्रियाशीलता असणारे पिरिडॉक्सल (C8H9NO3) व पिरिडॉक्सामीन (C8H10NO2NH2) हे पदार्थ आढळल्यानंतर या तिन्ही पदार्थांच्या गटास ब जीवनसत्त्व असे संबोधिण्यात येऊ लागले.

संरचना : वरील तीन पदार्थांपैकी पिरिडॉक्सल व पिरिडॉक्सामीन हे दोन पदार्थ ऊतकांमध्ये (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांमध्ये) कार्‌बॉक्सिलनिरास (कार्‌बॉक्सिल गट-COOH  काढून टाकण्याची क्रिया) व ॲमिनो-अंतरण (एका रेणूतील ॲमिनो गटाचे –NH2 दुसऱ्या रेणूत स्थलांतर करण्याची क्रिया) करणाऱ्या एंझाइमांचा (जीवरासायनिक विक्रिया घडविण्यास मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त पदार्थांचा) भाग म्हणून असतात. अन्नामध्ये हे तिन्ही पदार्थ असतात. त्यांची रासायनिक संरचना पुढीलप्रमाणे आहे.

पिरिडॉक्सीन पिरिडॉक्सल पिरिडॉक्सामीन

गुणधर्म : पिरिडॉक्सिनाचे स्फटिक रंगहीन असून त्याचा वितळबिंदू १६० से. आहे. पाणी व अल्कोहॉल यांमध्ये ते विद्राव्य (विरघळणारे ) असून उष्णता व क्षार (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवणे देणारे पदार्थ) त्यांचा परिणाम होत नाही. जंबुपार (वर्णपटातील जांभळ्या रंगापलीकडील अदृश्य) किरणांचा त्याच्यावर परिणाम होतो. पिरिडॉक्सीन हायड्रोक्लोराइड हा त्याचा अनुजात पांढरा, वासरहित, कडू व स्फटिकीय पदार्थ आहे. त्याचा वितळबिंदू २०५–२१० से. असून या तापमानाला त्याचे विघटन (रेणूचे लहान तुकडे होणे) होते. ते पाणी व प्रोपिलीन ग्लायकॉल यांमध्ये विद्राव्य, ॲसिटोनामध्ये साधारण विद्राव्य आणि ईथर व क्लोरोफॉर्म यांमध्ये अविद्राव्य आहे.

संश्लेषण : पिरिडॉक्सिनाची संरचना ज्ञात झाल्यानंतर त्याच्या संश्लेषणाच्या दोन पद्धती स्वतंत्र्य रीत्या शोधून काढण्यात आल्या. या दोन पद्धतींमध्ये सुधारणा करून अनेक नवीन पद्धती शोधून काढण्यात आल्या. पिरिडॉक्सिनापासूनच पिरिडॉक्सल व पिरिडॉक्सामीन यांचे संश्लेषण करण्यात येते.

शरीरक्रियात्मक कार्य : उंदीर, कोंबडी, कबूतर, कुत्रा, डुक्कर व माकड या प्राण्यांच्या खाद्यामधील हे जीवनसत्त्व एक आवश्यक पोषक पदार्थ आहे. काही सूक्ष्मजंतू, यीस्ट व बुरशी यांच्या वाढीकरिता हे जीवनसत्त्व आवश्यक असते. आतड्यातील सूक्ष्मजंतू आपल्या वाढीकरिता पिरिडॉक्सिनापेक्षा बाकीच्या दोन संयुगांचा सहज उपयोग करतात. म्हणून औषधी उपयोगाकरिता पिरिडॉक्सिन (तोंडाने दिल्यास) अधिक उपयुक्त असते.

पिरिडॉक्सल – ५ – फॉस्फेट या स्वरूपात हे जीवनसत्त्व शरीरात को-एंझाइमाचे (एंझाइमाबरोबर आढळणाऱ्या व त्याच्या क्रियेस आवश्यक असलेल्या पदार्थाचे) कार्य करते. पिरिडॉक्सीन व पिरिडॉक्सामीन यांचे पिरिडॉक्सलामध्ये रूपांतर होते. ॲमिनो संक्रमण क्रियेमध्ये बजीवनसत्त्व असलेली एंझाइमे भाग घेतात. ऊतकामधील ॲमिनो अम्लाच्या उत्पादनात ही क्रिया महत्त्वाची असते. कार्‌बॉक्सिलनिरास क्रियेतही हे जीवनसत्त्व भाग घेते, उदा., हिस्टिडिनाचे हिस्टामिनामध्ये रूपांतर. ट्रिप्टोफेनाच्या चयापचयाकरिता ते आवश्यक असते. या जीवनसत्त्वाच्या न्यूनतेमुळे ट्रिप्टोफेनाच्या चयापचयात बिघाड उत्पन्न होऊन ते झँथ्युरेमिक अम्ल या स्वरूपात मूत्रातून उत्सर्जित होते. ट्रिप्टोफेनापासून निकोटिनिक अम्ल (नियासीन, ब गटातील एक जीवनसत्त्व) तयार होण्याकरिता ब जीवनसत्त्व  आवश्यक असते. गंधकयुक्त ॲमिनो अम्लांच्या चयापचयाकरिताही  ते आवश्यक असते.


पुरवठा व दैनंदिन गरज : हे जीवनसत्त्व बहुतेक सर्व अन्नपदार्थांत विखुरलेले आढळते. यीस्ट, गव्हाचे अंकुर, यकृत, कडधान्ये व तृणधान्ये यांमध्ये ते विपुल प्रमाणात आढळते. भाताचा कोंडा, अंड्याचा पिवळा बलक, हिरव्या भाज्या व दूध यांमध्ये ते भरपूर प्रमाणात असते. केळी व सामन मासे यांतही पुष्कळ असते.

या जीवसत्त्वाचा अभ्यास प्राण्यांवरील प्रयोगांवरच आधारित आहे. मानवामध्ये केवळ याच जीवनसत्त्वाची विशिष्ट त्रुटी सहसा आढळत नाही. मानवामध्ये या जीवनसत्त्वाचे संश्लेषण ऊतकांकडून होते, आतड्यातील सूक्ष्मजीवांद्वारे होत नाही, असे मानले जाते. कारण आतडी निर्जंतुक करण्यासाठी सल्फा औषधे दिली, तरीसुद्धा शरीरात घेतलेल्या ब जीवनसत्त्वाच्या प्रमाणापेक्षा उत्सर्जनातील त्याचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले आहे. मानवात या जीवनसत्त्वाचे प्रमाण आहारातील त्याच्या पातळीवर अवलंबून नसते. या कारणाकरिता त्याची दैनंदिन गरज निश्चित ठरविता आलेली नाही. हे प्रौढास २ ते ३ मिग्रॅ. व अर्भकास ०·४ मिग्रॅ. पुरेसे असते. ही गरज प्राण्यांवरील प्रयोगांवरून ठरविलेली आहे.

साठा व उत्सर्जन : मानवी शरीरात सर्वसाधारणपणे आठ आठवडे पुरेल एवढा या जीवनसत्त्वाचा साठा असतो. पचनमार्गातून त्याचे जलद अवशोषण होते. ऊतकांत व यकृतात ते साठविले जाते. या जीवनसत्त्वाची तिन्ही संयुगे मूत्रात सापडतात. रोजच्या आहारातील या जीवनसत्त्वाचा ७५ प्रतिशत भाग पिरिडॉक्सिक अम्ल या रूपाने मूत्रातून उत्सर्जित होत असावा.

प्रतिजीवनसत्त्वे : इतर जीवनसत्त्वांप्रमाणे या जीवनसत्त्वाशी सदृश अशी काही संयुगे त्याची प्रतिजीवनसत्त्वे (जीवनसत्त्वाची क्रियाशीलता नाहीशी करणारी संयुगे) म्हणून कार्य करू शकतात. अशी जवळजवळ आठाहून जास्त संयुगे ज्ञात असून त्यांपैकी डीसॉक्सिपिरिडॉक्सीन हे अधिक प्रभावी आहे. ते प्राण्यांवरील प्रयोगात त्रुटिजन्य विकृती उत्पन्न करण्याकरिता वापरतात. ते एक मिग्रॅ. मात्रेत कोंबडीच्या भ्रूणास मारक ठरते. परंतु त्या बरोबरच ब जीवनसत्त्व त्याच अंड्यात अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) दिल्यास दुष्परिणाम होत नाही. मिथॉक्सिपिरिडॉक्सीन हे संयुग कोंबडीची पिले, कुत्रा व माकड या प्राण्यांमध्ये ब जीवनसत्त्वाची त्रुटी उत्पन्न करण्याकरिता वापरतात.

आयसोनिकोटिनिक अम्ल हायड्राझाइड (INH) नावाचे संयुग क्षयरोग चिकित्सेतील एक प्रभावी औषध असून दररोज ३०० मिग्रॅ. तोंडाने दिले जाते. हे संयुग ब जीवनसत्त्वाचे प्रतिजीवनसत्त्व आहे. बऱ्याच ब प्रतिजीवनसत्त्वांचे संश्लेषण करण्यात आले आहे. काही ब प्रतिजीवनसत्त्वांमध्ये अर्बुदविरोधी (पेशींच्या अत्यधिक वाढीमुळे तयार होणाऱ्या व शरीरास निरुपयोगी असणाऱ्या गाठीच्या वाढीस विरोध करण्याचा) गुणधर्म असल्यामुळे बऱ्याच संशोधकांचे त्यांच्या संश्लेषणाकडे लक्ष वेधले गेले. ४–डीसॉक्सिपिरिडॉक्सीन हे संयुग अत्यल्प प्रमाणात उंदरांना दिल्यास त्यांच्यात विशिष्ट प्रकारचे अबुर्द तयार होत नाही.

आमापन : या जीवनसत्त्वाच्या आमापनाकरिता जैव आणि सूक्ष्मजैव पद्धतींचा उपयोग करतात. याकरिता उंदीर, कोंबडीची पिले किंवा विशिष्ट सूक्ष्मजंतू यांच्या वाढीचा अभ्यास करतात. शुद्ध स्वरूपातील रासायनिक पदार्थाच्या मायक्रोग्रॅम (१ मायक्रोग्रॅम = १०–६ ग्रॅ. ) वजनामध्ये या जीवनसत्त्वाची क्रियाशीलता उल्लेखिली जाते.

औषधी उपयोग : पिरिडॉक्सीन हा मानवी अन्नातील एक आवश्यक पोषण घटक असल्याचे निश्चित झाले आहे. तथापि केवळ याचा जीवनसत्त्वाच्या त्रुटीमुळे होणारी विकृती मानवात आढळून येत नाही. दुधाच्या वाळलेल्या भुकटीवर वाढविलेल्या काही अर्भकांना तंत्रिका (मज्जा) विकार व आकडी झाल्याचे स्निडरमान आणि इतर शास्त्रज्ञांना १९५३ मध्ये आढळून आले. या बालकांना पिरिडॉक्सीन देताच हे विकार बरे झाले. ब जीवनसत्त्व गटातील इतर काही जीवनसत्त्वांच्या त्रुटीबरोबरच याही जीवनसत्त्वाची न्यूनता असणे शक्य असते. ⇨वल्कचर्म  या रोगामध्ये निकोटिनिक अम्ल, थायामीन आणि रिबोफ्लाविन ही जीवनसत्त्वे दिल्यानंतरही पिरिडॉक्सीन देताच अधिक सुधारणा होते. प्रारण विकारामध्ये (क्ष-किरण वा इतर भेदक किरणांमुळे होणाऱ्या विकारामध्ये), तसेच गरोदरपणात होणाऱ्या उलट्यांवर हे जीवनसत्त्व उपयुक्त ठरले आहे. रक्तातील लाल कोशिकांच्या (पेशींच्या) उत्पादनाकरिता हे जीवनसत्त्व आवश्यक असावे, कारण अल्परागिक (हीमोग्लोबिन कमी असलेल्या लाल कोशिका असलेला) पांडुरोग (ॲनिमिया) लोह देऊनही बरा न झाल्यास या जीवनसत्त्वामुळे बरा होतो. आयसोनिकोटिनिक अम्ल हायड्राझाइड हे औषध क्षयरोगात बराच काळपर्यंत दररोज घ्यावे लागते. त्यामुळे परिघीय तंत्रिका [→ तंत्रिका तंत्र] शोथ (दाहयुक्त सूज) उत्पन्न होण्याचा धोका असतो. या औषधाबरोबरच ब जीवनसत्त्व दिल्यास तो धोका टळतो. त्वक्‌स्नेहिक (तेलकट खपल्या पडणाऱ्या) त्वचाशोथासारख्या त्वचारोगामध्ये हे जीवनसत्त्व गुणकारी ठरले आहे. हे जीवनसत्त्व तोंडाने, अंतःक्षेपणाने किंवा मलम या स्वरूपात वापरता येते. पिरिडॉक्सीन हायड्रोक्लोराइड (C8H11O3N·HCl) या स्वरूपात हे जीवनसत्त्व बाजारात उपलब्ध आहे. आदिजीव (प्रोटोझोआ), कीटक, मासे, कोंबड्यांची पिले, टर्की पक्षी, बदक, उंदीर, ससे, मांजर, कुत्रा, डुक्कर, माकड इ. प्राण्यांनाही या जीवनसत्त्वाच्या त्रुटीमुळे विकार होतात, असे आढळले आहे.

पहा : जीवनसत्त्वे.

संदर्भ : 1. Bicknell, F. Prescott, F. The Vitamins in Medicine, London, 1953.

2. Sebrell, W. H. (Jr.) Harris, R. S., Eds. The Vitamins, Vol. III, New York and London,  1967.

3. West, E. S. Todd, W. R. Textbook of Biochemistry, New York, 1961.

हेगिष्टे, म. द.