जीवनसत्त्व ड : लहान मुलांत अस्थी तयार होण्याच्या सामान्य प्रक्रियेवर परिणाम करणाऱ्या ⇨मुडदूस  या रोगास प्रतिरोधी अशा काही जीवनावश्यक घटकांना ड जीवनसत्त्व अशी संज्ञा दिली जाते. अशी शक्ती असणारे व संबंधी संरचना बरेच पदार्थ आहेत. त्यांपैकी दोन सेको-स्टेरॉइडे महत्त्वाची आहेत : (१) डजीवनसत्त्व किंवा अरगोकॅल्सिफेरॉल (याला कॅल्सिफेरॉल आणि व्हायोस्टेरॉल अशीही नावे आहेत) आणि (२) डजीवनसत्त्व किंवा कोलेकॅल्सिफेरॉल. मानवामध्ये या दोन्हींची जैव क्रियाशीलता सारखीच असते. कॅल्शियम व फॉस्फरस यांच्या चयापचयावर (शरीरातील रासायनिक-भौतिक घडामोडींवर) या जीवनसत्त्वाचे नियंत्रण असल्यामुळे अस्थी व दात यांची घडण व वाढ यांवर त्याचा परिणाम होतो.

इतिहास : या जीवनसत्त्वाचा मुडदूस या रोगाच्या इतिहासाशी निकटचा संबंध आहे. त्याचे दुसरे नाव मुडदूसप्रतिरोधी जीवनसत्त्व असे आहे. मुडदूस हा रोग मानवाला अनेक शतके ज्ञात होता. मध्य यूरोपात कित्येक वर्षे हा रोग ‘इंग्रज लोकांचा रोग’ म्हणूनच ओळखत, कारण इंग्लंडमध्ये त्याचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. अठराव्या शतकाच्या अखेरीस कॉड माशाचे तेल मुडदूस बरा करण्यासाठी वापरण्यात आले. स्कॉटलंड व उत्तर यूरोपातील शेतकरी या तेलाचा उपयोग मुडदूस व इतर रोगांवर औषध म्हणून करीत असत.

इ. स. १८९० च्या सुमारास पाम नावाच्या इंग्रज वैद्यांनी सूर्यप्रकाश आणि मुडदूस यांचा संबंध दाखवून दिला होता. १९१८ मध्ये मेलँबी यांनी कुत्र्यांच्या पिलांमध्ये प्रयोगान्ती मुडदूस रोग उत्पन्न करण्यात यश मिळविले. त्या पिलांना कॉड माशाच्या यकृताचे तेल देण्यात आले व ती रोगमुक्त झाली. १९१३ मध्ये माकॉलम व इतर शास्त्रज्ञांनी या तेलात मेदविद्राव्य (मेदात विरघळणारे) अ जीवनसत्त्व असल्याचा शोध लावलाच होता. त्यामुळे अ जीवनसत्त्वामुळेच मुडदूसही बरा होतो असा समज प्रथम झाला. पुढे ज्या तेलातील अ जीवनसत्त्व नाश पावलेले आहे, असे तेल दिल्यानंतरही मुडदूस बरा झाल्याचे दिसून येताच अ जीवनसत्त्वाखेरीज आणखी कोणतातरी घटक याला जबाबदार असावा हे लक्षात आले व त्याला मुडदूसप्रतिरोधी घटक असे संबोधण्यात आले. १९१९ मध्ये हॅरिएट चिक या स्त्रीशास्त्रज्ञांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत पहिल्या जागतिक महायुद्धानंतर उद्‌भवलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीत या रोगाविषयी अधिक अभ्यास केला. १९२३ मध्ये त्यांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांतानुसार हा रोग कॉड माशाचे तेल आणि सूर्यप्रकाश किंवा काचेऐवजी क्वॉर्ट्‌झचे आवरण असलेल्या पाऱ्याच्या वाफेच्या दिव्याचा प्रकाश यामुळे बरा होतो. तसेच केवळ स्वच्छताविज्ञानविषयक सुधारणांनी तो बरा होत नाही, हे स्पष्ट झाले. मुडदूस हा रोग त्रुटिजन्य असल्याचे सिद्ध झाले. माकॉलम यांनी उंदरावरील प्रयोगांत कॅल्शियम व फॉस्फरस या खनिजांचा आणि मुडदूस या रोगाचा संबंध दाखवून दिला.

हल्डशिन्स्की यांनी १९१९ साली तीव्र स्वरूपाचा मुडदूस झालेल्या मुलांच्या शरीरावर जुंबपार (वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) किरणांचा उपचार केल्यामुळे लक्षणीय सुधारणा घडून येते, असे दाखवून दिले. जुंबपार किरणांनी प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांत मुडदूस प्रतिबंधकशक्ती येते, हे स्टीनबॉक व हेस यांनी १९२४ मध्ये स्वतंत्र रीत्या सिद्ध केले. १९३१ मध्ये ड जीवनसत्त्व स्फटिकीय स्वरूपात अँगस व त्यांचे सहकारी यांनी वेगळे केले. १९३६ मध्ये व्हिन्डाउस व त्यांचे सहकारी यांनी ड जीवनसत्त्व वेगळे केले. सूर्यप्रकाश वा कृत्रिम प्रकाश यांमधील जुंबपार किरणांमुळे त्वचेत डजीवनसत्त्व तयार होते. १९६८ मध्ये देलूका व त्यांचे सहकारी यांनी २५–डीहायड्रॉक्सिकोले-कॅल्सिफेरॉल या संयुगामुळे डजीवनसत्त्वाचे शरीरातील चयापचयाचे कार्य होते, असे शोधून काढले.

प्राण्यांना जरूर तेवढा मुडदूसप्रतिरोधी घटक ते स्वशरीरात तयार करू शकतात किंवा प्राणिज पदार्थात पूर्वीच तयार असणारा हा घटक सेवन केल्यामुळे त्यांना मुडदूस होत नसावा, हे दिसून आले.

संरचना : मुडदूसप्रतिरोधी शक्ती असणाऱ्या पदार्थांपैकी अरगोकॅल्सिफेरॉल (C28H44O) व कोलेकॅल्सिफेरॉल (C27H44O) हे दोन महत्त्वाचे आहेत. अरगोकॅल्सिफेरॉल नैसर्गिक रीत्या उत्पन्न होत नाही. जंबुपार किरणांमुळे अरगस्टेरॉलापासून कृत्रिम रीत्या अरगोकॅल्सिफेरॉल तयार होते. अरगस्टेरॉलाला पूर्वगामी ड जीवनसत्त्व (ड जीवनसत्त्व ज्यापासून तयार होते असा पदार्थ) असेही म्हणतात. कवकांत (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींत, उदा., अरगट  व यीस्ट) अरगस्टेरॉल भरपूर प्रमाणात असते व त्यापासून त्याचे व्यापारी उत्पादन करतात. ७-डीहायड्रोकोलेस्टेरॉल हा पूर्वगामी  डजीवनसत्त्व पदार्थ मानवासकट सर्व प्राण्यांमध्ये असतो. उच्च दर्जाच्या प्राण्यामध्ये तो त्वचेमध्ये असतो व किरणीयनाने (जंबुपार किरणांच्या परिणामाने) त्यापासून कोलेकॅल्सिफेरॉल तयार होते. ड आणि डजीवनसत्त्व यांची संरचना खाली दिल्याप्रमाणे आहे.

कोलेकॅल्सिफेरॉल (ड३ जीवनसत्त्व)

गुणधर्म : ड जीवनसत्त्व उष्णतेला स्थिर आहे. यामुळे अ जीवनसत्त्व आणि ड जीवनसत्त्व यांच्यातील उष्णतेला टिकण्यामधील फरकामुळे माकॉलम यांना ड जीवनसत्त्वाचे अस्तित्व ओळखता आले. ड जीवनसत्त्वाचे रंगहीन स्फटिक असून ते ११५°–११७° से. ला वितळते. ड जीवनसत्त्वाचे रंगहीन, सुईसारखे स्फटिक असून ते ८४°–८५° से. ला वितळते. पिवळट तपकिरी रंगाच्या बाटलीत हवाबंद स्थितीत भरून प्रशीतकात (थंड करण्याच्या उपकरणात) ठेवल्यास ड जीवनसत्त्व स्थिर राहते. तेलात अथवा प्रोपिलीन ग्लायकॉलात विरघळलेल्या स्थितीत ते स्थिर राहते. १८०°से. ला तापविल्यास त्यातील मुडदूसप्रतिरोधक शक्ती नाहीशी होते.

शुद्ध स्वरूपातील पूर्वगामी पदार्थ हवेत ठेवल्यास त्यांच्यावर प्रकाशाचा परिणाम होऊन त्यांचे ⇨ऑक्सिडीभवन  लवकर होते.

आढळ : सर्व प्राण्यांमध्ये अल्प प्रमाणात ड जीवनसत्त्व असते. यकृतात व इतर अंतस्त्यांत (छाती व पोट यांतील इंद्रियांत) ते जास्त प्रमाणात आढळते. दूध आणि अंडी यांतही ते आढळते. माशांमध्ये ते जास्त प्रमाणात असते. माशांच्या जातीनुसार व ऋतुमानाप्रमाणे हे प्रमाण वेगवेगळे असते. वनस्पतींमध्ये ते अत्यल्प प्रमाणात आढळते, तर ताज्या पालेभाज्यांत ते अजिबात आढळत नाही.


पूर्वगामी ड जीवनसत्त्व : पूर्वगामी ड जीवनसत्त्व या संयुगांपासून ड जीवनसत्त्व तयार होते. रासायनिक दृष्ट्या ती ३- हायड्रॉक्सिस्टेरॉइडे आहेत. पूर्वगामी ड जीवनसत्त्वांना स्वतःचे शरीरक्रियात्मक कार्य असते की नाही, हे अद्यापि समजलेले नाही. बहुतेक प्राण्यांत व वनस्पतींत ती संश्लेषित होतात (शरीरात तयार होतात). बहुतेक प्राण्यांत ती त्वचेखाली साचतात आणि सू्र्यप्रकाशामुळे त्यांचे ड जीवनसत्त्वात रूपांतर होते. निसर्गात बरीच पूर्वगामी ड जीवनसत्त्वे आढळतात. तसेच नैसर्गिक स्टेरॉलांपासून बऱ्याच पूर्वगामींचे संश्लेषण करण्यात (कृत्रिम रीत्या तयार करण्यात) आले आहे.

पूर्वगामी ड जीवनसत्त्वापासून किरणीयनाने ड जीवनसत्त्व कसे तयार होते, हे व्हिन्डाउस यांनी प्रथमच पुढीलप्रमाणे दाखवून दिले.

अरगस्टेरॉल ⇌ लुमिस्टेरॉल ⇌ ( प्रोटॅकिस्टेरॉल) →

टॅकिस्टेरॉल ⇌ विपक्ष ड जीवनसत्त्व → ड जीवनसत्त्व. (विपक्ष म्हणजे अणू अथवा अणुगट एकमेकांच्या विरुद्ध दिशांना असणारे). यानंतर २० वर्षांनी वरील विक्रियेत प्रीअरगोकॅल्सिफेरॉल हे मध्यभागी ड जीवनसत्त्व तयार होते, असे व्हेलुझ यांनी सिद्ध केले. हे मध्यभागी थोडे तापविल्यास ड जीवनसत्त्व तयार होते, त्यासाठी किरणीयनाची गरज लागत नाही. व्हेलुझ यांनी प्रीकोलेकॅल्सिफेरॉल हेही मध्यभागी शोधून काढले.

संश्लेषण : कोलेकॅल्सिफेरॉल या ड जीवनसत्त्वाच्या प्रकारचे पहिल्यांदा संश्लेषण करण्यात आले. कोलेकॅल्सिफेरॉलाचे संश्लेषण नैसर्गिक कोलेस्टेरॉलापासून करण्यात येते. अरगोकॅल्सिफेरॉलाचे आंशिक संश्लेषण आल्डिहाइडावर विविध विक्रिया करून करण्यात येते. अमेरिकेत ड आणि ड जीवनसत्त्वांचे संश्लेषण शुद्ध पूर्वगामी जीवनसत्त्वांच्या विद्रावांचे किरणीयन करून करण्यात येते.

अवशोषण व उत्सर्जन : या जीवनसत्त्वाचे अवशोषण आतड्यामध्ये मेदाबरोबरच होते. पित्तामुळे मेदाचे पायसीकरण (एकमेकांत न मिसळणाऱ्या दोन द्रवांचे विशिष्ट मिश्रण होण्याची क्रिया) होते आणि त्यामुळे अवशोषणास मदत होते. मेदाच्या अवशोषणात बिघाड उत्पन्न झाल्यास ड जीवनसत्त्वाच्या अवशोषणात बिघाड होतो. द्रव पॅराफिनासारखी तेले मेद विद्राव्य जीवनसत्त्वांच्या अवशोषणात अडथळा आणतात. मातेच्या दुधातून या जीवनसत्त्वाचे उत्सर्जन होते हे निश्चित. मात्र इतर उत्सर्जनमार्गांविषयी निश्चित माहिती नाही. मातेच्या रक्तातून गर्भास या जीवनसत्त्वाचा भरपूर पुरवठा होतो.

कॉडिसेक व देलूका यांनी १९६७–६९ मध्ये क्रियाशील ड जीवनसत्त्वासंबंधी आणखी माहिती शोधून काढली. ड जीवनसत्त्वाचे प्रथम यकृतात २५–हायडॉक्सिकोलेकॅल्सिफेरॉलामध्ये रूपांतर होऊन नंतर वृक्कामध्ये (मूत्रपिंडामध्ये) त्यापासून १,२५–डायहायड्रॉक्सिकोलेकॅल्सिफेरॉल तयार होते. फक्त हाच पदार्थ क्रियाशील असतो.

साठा : हे जीवनसत्त्व मुख्येत्वेकरून यकृतात साठविले जाते. त्याशिवाय मस्तिष्क (मेंदूची) त्वचा व अस्थी यांमध्ये ते असते.

आंतरराष्ट्रीय एकक : १९४९–५१ या काळामध्ये शुद्ध स्वरुपातील डजीवनसत्त्व आंतरराष्ट्रीय तसेच युनायटेड स्टेट्स फार्माकोपियाकरिता (यू. एस. पी. करिता) एकक म्हणून मानण्यास सुरुवात करण्यात आली. यापूर्वी ऑलिव्ह तेलात विरघळलेले ड जीवनसत्त्व वापरात होते.

एक आंतरराष्ट्रीय ड जीवनसत्त्व एकक म्हणजे ०·०२५ मायक्रोग्रॅम (१ मायक्रोग्रॅम = १०-६ ग्रॅम ड जीवनसत्त्वाची क्रियाशीलता होय.

पुरवठा व दैनंदिन गरज : रोजच्या आहारातून या जीवनसत्त्वाचा पुरेसा पुरवठा होत नाही. दूध व दुधापासून बनविलेल्या पदार्थांत ते पुरेसे असते. नेहमीच्या अन्न शिजविण्याच्या पद्धतीने ते नाश पावत नाही. हवाबंद डब्यातील दूध किंवा दूध पावडर यामध्ये नैसर्गिक दुधात असते तेवढेच ड जीवनसत्त्व असते.

प्राणी या जीवनसत्त्वाची गरज दोन प्रकारांनी भागवतात : (१) जीवनसत्त्वयुक्त असे इतर प्राण्यांचे शरीरभाग भक्षण करून आणि (२) स्वतःच्या त्वचेतील पूर्वगामी पदार्थापासून किरणीयनाने तयार होणारे जीवनसत्त्व वापरून. जंबुपार किरण सर्वच प्राण्यांच्या त्वचेमध्ये ०·१ मिमी. ते १·२ मिमी.पर्यंतच शिरू शकतात. ड जीवनसत्त्व त्वचेमध्ये तयार होणारे असे म्हणण्यापेक्षा ते त्वचेवर तयार होते, असे म्हणणे अधिक योग्य होईल. पक्षी आपल्या त्वचेतील ग्रंथींमधील तेल पंखांवर चोचीने पसरवितात. किरणीयनाने ड जीवनसत्त्व तयार होऊन काही चोचीतून व काही त्वचेतून अवशोषिले जात असावे. प्राण्यांच्या मृदुलोमांवर (मऊ केसांवर) अशाच प्रकारे हे जीवनसत्त्व तयार होते असावे. गवत किंवा गवतावरील कवकापासून गवत खाणाऱ्या प्राण्यांना या जीवनसत्त्वाचा पुरवठा होतो.

उष्ण कटिबंधातील रहिवाशांना अमेरिका किंवा इंग्लंडमधील रहिवाशांपेक्षा या जीवनसत्त्वाची गरज कमी असते कारण त्यांना भरपूर सूर्यप्रकाशाचा फायदा मिळतो. ड जीवनसत्त्वाने संपन्न केलेल्या अन्नपदार्थांचा पुरवठा पाश्चात्त्य देशांत केला जातो. इंग्लंडमध्ये मार्गारीन (कृत्रिम लोणी) प्रत्येक औंसात ९० आं. ए. ड जीवनसत्त्वाने संपन्न असलेलेच विकले पाहिजे असा दंडक आहे. अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर दूध या जीवनसत्त्वाने संपन्न बनवितात. त्याकरिता पुढीलपैकी कोणत्याही  एका पद्धतीचा अवलंब करतात : (१) गायींचे किरणीयन, (२) दुधाचे किरणीयन, (३) गायीच्या खाद्यपदार्थांमध्ये जीवनसत्त्व मिसळणे किंवा (४) दुधामध्ये जीवनसत्त्व मिसळणे.

दैनंदिन गरज 

मुले 

ब्रिटिश मेडिकल ॲसोसिएशन प्रमाणित आं. ए. 

फूड अँड न्यूट्रिशन बोर्ड, अमेरिका, प्रमाणित आं. ए. 

उष्ण कटिबंधीय रहिवासी आं. ए. 

 

१ वर्षाखालील 

८०० 

४०० 

४०० 

१ ते ३ वर्षे 

४००–८०० 

४०० 

४०० 

३ वर्षांवरील 

४०० 

४०० 

४०० 

कुमारावस्था 

४०० 

४०० 

४०० 

गर्भारपणा 

६०० 

४०० 

४०० 

दुग्धकाल 

८०० 

४०० 

४०० 

प्रौढ स्त्री-पुरुष 

– 

– 

– 

दुधाबरोबर ह्या जीवनसत्त्वाचे सेवन करण्याने फायदा होतो. हे जीवनसत्त्व दुधातून दिल्याने त्याची मुडदूसप्रतिरोधक शक्ती वाढते, असे आढळले आहे. मासे खाणाऱ्यांना हे जीवनसत्त्व स्वस्त व भरपूर प्रमाणात मिळते. मासा हा एकच प्राणी असा आहे की, जो स्वशरीरात हे जीवनसत्त्व सूर्यप्रकाशाशिवाय संश्लेषणाने तयार करू शकतो.


शरीरक्रियात्मक कार्ये : (१) ड जीवनसत्त्वामुळे कॅल्शियम व फॉस्फरस या खनिजांच्या आतड्यातील अवशोषणाची वाढ होते. (२) ते या दोन्ही खनिज पदार्थांच्या अस्थींमध्ये असणाऱ्या संचयावर नियंत्रण ठेवते आणि त्यामुळे सामान्य अस्थिभवनाचेही नियंत्रण होते. (३) मुडदूस झालेल्या रोग्यांच्या आतड्यांमधून होणारे या खजिनांचे उत्सर्जन हे जीवनसत्त्व रोखते. (४) रक्तरसातील (रक्त गोठल्यावर उरणाऱ्या पेशीरहित निवळ द्रवातील) फॉस्फेटाची पातळी हे जीवनसत्त्व नियंत्रित करते. ⇨परावटू ग्रंथीं चे हॉर्मोन [वाहिनीविहीन ग्रंथींतून स्त्रवणारा उत्तेजक स्त्राव, → हॉर्मोने] व ड जीवनसत्त्व यांचे कार्य एकमेकांपासून भिन्न आहे. या हॉर्मोनामुळे रक्तरसातील कॅल्शियमाची पातळी वाढते, फॉस्फेटामध्ये घट होते, अस्थीमधील कॅल्शियम संचय कमी करून कॅल्शियमाचे उत्सर्जन वाढविते. परावटू ग्रंथी काढून टाकल्यास ड जीवनसत्त्वाच्या कार्यशीलतेवर परिणाम होत नाही. याउलट मुडदूस या रोगामध्ये या ग्रंथींची अतिवृद्धी झाल्याचे आढळते.

त्रुटिजन्य रोग : ड जीवनसत्त्वाच्या त्रुटीमुळे कंकलामध्ये (हाडांच्या सांगाड्यात), विशेषतः बरगड्या, प्रबाहू (मनगट व कोपर यांमधील भाग), मनगट व पाय यांच्या हाडांत बदल होतात. लहान मुलाच्या कवटीच्या हाडांचे कॅल्सीभवन (कॅल्शियम कार्बोनेटाचा साठा होण्याची क्रिया) ड जीवनसत्त्वाच्या अभावी होत नाही. काही वेळा हाडांचे कॅल्सीभवन न होता लांब हाडांच्या टोकांशी कूर्चा तयार होते आणि सांध्यांची वाढ होते. रोगग्रस्त हाडाचा वाकडेपणा रोगाच्या शेवटच्या टप्प्यात दिसून येतो [→ मुडदूस]. या जीवनसत्त्वाच्या अभावी दात किडतात, तसेच लहान मुलांमध्ये फॉस्फरसाचा चयापचय होतो पण कॅल्शियमाचा होत नाही व परिणामतः त्यांना ⇨आकडी  येते. मोठ्या माणसांमध्ये हाडांमधील कॅल्शियमाचे प्रमाण कमी होते व ती ठिसूळ होतात. त्याला ⇨अस्थिमार्दव  असे म्हणतात.

पाळीव प्राण्यांमध्येही या जीवनसत्त्वाच्या अभावी रोग होतात [→ जीवनसत्त्वे].

विषाक्तता : (विषबाधा). ड आणि ड जीवनसत्त्वांचे तसेच माशांच्या यकृतांची संहत (जास्त प्रमाण असलेली) तेले यांचे अतिसेवन झाल्यास विपरीत परिणाम होतात. मुलांना कॅल्शियम व ड जीवनसत्त्व भरपूर दिल्याने त्यांची हाडे उत्तम वाढतात, असा अनेक मातांचा गैरसमज आहे तथापि या जीवनसत्त्वाच्या अतिसेवनाने अन्नातील सर्वच्या सर्व कॅल्शियम अवशोषिले जाऊन रक्तरसातील कॅल्शियमाची भरमसाट वाढ होते. परावटू ग्रंथी फॉस्फरसाच्या मूत्रातून होणाऱ्या उत्सर्जनावर नियंत्रण ठेवून त्याची रक्तरसातील पातळी ठराविक ठेवण्याचे कार्य करतात. कॅल्शियमाच्या वाढीमुळे परावटू ग्रंथींच्या कार्यात बिघाड निर्माण होतो त्यामुळे रक्तरसातील फॉस्फरसही वाढतो. या दोन्ही खनिजांच्या वाढीमुळे वृक्क, रक्तवाहिन्यांच्या भित्ती तसेच इतर भागांतून कॅल्शियम संचय वाढून त्यांचे कॅल्सीभवन होते.

ड जीवनसत्त्वाचे अतिसेवन चालू असताना प्रथम उत्तम भूक लागते व सर्वसाधारणपणे प्रकृती सुधारत आहे असे वाटते. नेमकी हीच स्थिती अतिसेवन चालू ठेवण्यास मदत करते. परिणामतः प्रथम भूक मंदावते व प्रमाणापेक्षा जादा वजन कमी होते. मळमळ, उलट्या, बुद्धकोष्ठ किंवा अतिसार ही लक्षणे होतात. पोटदुखी कधीकधी एवढी जोराची असते की, काही वेळा जरूर नसताना शस्त्रक्रिया केली जाते. तहान लागून वारंवार मूत्रोत्सर्जन होते. अत्यंत थकवा येतो आणि कधीकधी मानसिक दौर्बल्यही जाणवते. कधीकधी डोकेदुखी हे सर्वप्रथम लक्षण असते. शेवटी मूत्रविषरक्तता (मूत्रातून बाहेर पडणारे घातुक पदार्थ बाहेर न पडल्यामुळे होणारा विकार) होऊन मृत्यूही ओढवतो.

ड जीवनसत्त्वाचे सेवन बंद केल्यास लक्षणे हळूहळू दिसेनाशी होऊन आराम पडतो. लहान मुलांना अनेक वेळा नीलेद्वारे लवणमय विद्राव (सलाइन) द्यावा लागतो. कॉर्टिसोन औषधे या विषबाधेवर गुणकारी आहेत.

वापर : ड जीवनसत्त्व विविध स्वरूपांत मिळते. कॉड माशाचे तेल फार लोकप्रिय आहे. औषधी स्वरूपातील ड जीवनसत्त्व हे संश्लेषित असते. पाश्चरीकृत (६२·५°—६५·५° से. तापमानाला सु. अर्धा तास ठेवून सूक्ष्मजंतूंची संख्या कमी केलेले) दूध, ‘वनस्पती’ (कृत्रिम तूप), पशुखाद्ये इत्यादींमध्ये ड जीवनसत्त्व मिळतात. अ आणि ड जीवनसत्त्वांचे मिश्रण मानवासाठी आणि अ, ड व ई जीवनसत्त्वांचे मिश्रण प्राण्यांसाठी वापरतात.

संदर्भ : 1. Bicknell, F. Prescott, F. The Vitamins in Medicine, London, 1953.

        2. Sebrell, W. H. (Jr.) Harris, R. S., Eds. The Vitamins, Vol. III, New York and London, 1967.

        3. West, E. S. Todd, W. R. Textbook of Biochemistry, New York, 1961.  

                        

नागले, सु. कृ.