ग्लायसीन : एक ⇨ॲमिनो अम्ल. रेणवीय सूत्र (रेणूत असलेले अणूंचे प्रकार व त्यांच्या संख्या दर्शविणारे सूत्र) C2H5O2N. संरचना सूत्र (रेणूतील अणूंची मांडणी दर्शविणारे सूत्र) खालीलप्रमाणे आहे.

ग्लायसिनाची संरचना

ग्लायकोकॉल व ॲमिनो ॲसिटीक अम्ल या इतर दोन नावांनीही हे संयुग ओळखले जाते. जिलेटिनाचे जलीय विच्छेदन (पाण्याच्या विक्रियेने संयुगाच्या रेणूचे तुकडे करणे) केल्याने मिळणाऱ्या पदार्थापासून ब्रॅकोनॉट यांनी १८२० मध्ये हे संयुग मिळविले. त्याची चव गोड असल्यामुळे बर्झीलियस यांनी ग्लायसीन हे नाव दिले. इतर सर्व ॲमिनो अम्लांपेक्षा त्याचा रेणुभार कमी आहे. याची संरचना १८५७ मध्ये सिद्ध करण्यात आली. बहुतेक प्रथिनांत ते असते. उसातील ॲमिनो अम्लांमध्ये ग्लायसीन प्रमुख असते. त्याच्या पाण्यातील विद्रावापासून मिळणारे स्फटिक पट्टीसारखे पण अल्कोहॉलातील विद्रावापासून मिळणारे सुईसारखे असतात. त्याचे भौतिक स्थिरांक पुढीलप्रमाणे आहेत. वितळबिंदू २३२° से. (विघटनासह म्हणजे संयुगाचे तुकडे पडण्याच्या क्रियेसह).

pK1 ( COO ) : २·३४

pK2 ( NH3+) : ९·६०

पाण्यातील विद्राव्यता : २४·९९

समविद्युत्‌ भार बिंदू : ५·९७

वरील भौतिक स्थिरांकांच्या स्पष्टीकरणाकरिता ‘ॲमिनो अम्ले’ या नोंदीतील ‘भौतिक गुणधर्म’ हा परिच्छेद पहावा.

ग्लायसीन निर्जल अल्कोहॉलामध्ये विरघळत नाही. त्याचे हायड्रिआयोडिक अम्लाने ⇨क्षपण  केल्यास त्यापासून अमोनिया आणि ॲसिटिक अम्ल ही संयुगे मिळतात. हायड्रोजन पेरॉक्साइडाने त्याचे ⇨ऑक्सिडीभवन  होऊन ग्लायॉक्झिलिक अम्ल व फॉर्माल्डिहाइड बनते.

शरीरातील अनेक प्रक्रियांकरिता ग्लायसीन आवश्यक असते. रक्तातील ग्लुटाथायोन प्रथिने, स्नायूतील क्रिॲटीन, प्युरीन वलय, ग्लायकोजेन, सेरीन, पित्ताम्ले वगैरे महत्त्वाच्या संयुगांचे संश्लेषण (रासायनिक क्रियांनी बनणे) ग्लायसिनापासून होते. बेंझॉइक अम्ल, ग्वानिडीन, हिस्टामीन, टोल्यूइन वगैरे संयुगांचे विषारी परिणाम टाळण्याच्या कार्यात ग्लायसीन महत्त्वाचे कार्य करते. बेंझॉइक अम्ल, व ग्लायसीन यांच्या संयुग्मनाने (रासायनिक क्रिया होऊन जोडले जाण्याचे) हिप्पुरिक अम्ल तयार होऊन शरीराबाहेर टाकले जाते.

ग्लायसीन हे ग्लुकोजेनिक (कार्बोहायड्रेटाशिवाय इतर घटकांपासून ग्लुकोजाचे उत्पादन करणारे संयुग) ॲमिनो अम्ल आहे. ग्लायसिनाचे सेरिनामध्ये आणि सेरिनाचे पायरूव्हिक अम्लात रूपांतर होऊ शकते. ग्लायसीन चयापचयामुळे (सजीवाच्या शरीरातील रासायनिक आणि भौतिक घडामोडींमुळे) इतर पदार्थांपासून ग्लायकोजेन उत्पादनाच्या क्रियेला चालना मिळते. ग्लायसिनाच्या चयापचयात्मक विघटनापासून प्रथम ग्लायॉक्झिलिक अम्ल बनते. आणि नंतर फॉर्मेट व कार्बन डायऑक्साइड तयार होतात. ग्लायॉक्झिलिक अम्लापासून ऑक्झॅलिक अम्लही बनते. हायपरऑक्झाल यूरिया या जन्मजात रोगात ऑक्झॅलिक अम्लाचे संश्लेषण प्रमाणापेक्षा जास्त होते. त्यामुळे मूत्रातून टाकल्या जाणाऱ्या कॅल्शियम ऑक्झॅलेटाचे प्रमाण वाढते. अशा वेळी मुतखडे तयार होण्याची अधिक शक्यता असते.

आल्फा ॲमिनो मिथिल सल्फॉनिक अम्ल हे ग्लायसिनाचे प्रतिरोधक आहे.

स्नायूंना होणाऱ्या काही रोगांत ग्लायसिनाचा औषधी उपयोग करीत. किरणोत्सर्गी (कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या) नायट्रोजनाचा उपयोग करून संश्लेषित केलेले ग्लायसीन वापरून रक्तातील तांबड्या कोशिकांची (पेशींची) आयुर्मर्यादा १२० दिवसांची असते हे ठरविता आले. ग्लायसीन व त्याचे अनुजात (एका संयुगापासून बनविलेली दुसरी संयुगे) यांचा छायाचित्रणात फिल्म धुण्याचे रसायन म्हणून उपयोग करतात.

ग्लायसिनाच्या उत्पादनाकरिता निरनिराळ्या रासायनिक पद्धती वापरतात.

हेगिष्टे, म. द.