स्टेरॉले व स्टेरॉइडांच्या संरचना : ( अ ) स्टिग्मास्टेरॉल, ( आ )ॲल्डोस्टेरॉन, ( इ ) कॉर्टिसोल.स्टेरॉले व स्टेरॉइडे : सायुज्यित चार वलयांची वैशिष्ट्यपूर्ण रेणवीय संरचना असलेल्या नैसर्गिक किंवा संश्लेषित ( कृत्रिम ) कार्बनी रासायनिक संयुगांचा गट म्हणजे स्टेरॉइड होय. यांतील तीन वलये सहा कार्बन अणूंची व एक वलय पाच कार्बन अणूंचे असते. स्टेरॉइड केंद्राच्या म्हणजे गोनेन नावाच्या जनक संरचनेत एकूण १७ कार्बन अणू असून ते २८ हायड्रोजन अणूंशी बद्ध झालेले असतात. बहुधा स्टेरॉइड वलय संरचनेत कार्बन क्र. ३ ला हायड्रॉक्सिल गट (—OH) जोडलेला असल्यास त्या नैसर्गिक वा कृत्रिम संयुगाला स्टेरॉल म्हणतात. स्टेरॉले निसर्गात विस्तृतपणे विखुरलेली आढळतात. 

प्राणी, वनस्पती, कवक व आदिजीव ( प्रोटोझोआ ) यांमध्ये स्टेरॉइडे आढळतात. सस्तन प्राण्यांत स्टेरॉइडे कोशिका-पटलाचे घटक असून ते विविध प्रकारच्या शरीरक्रियात्मक प्रतिसादांचे नियंत्रक ⇨ हॉर्मोने म्हणून कार्य करतात, तसेच पचनास मदत करतात. शरीरक्रियात्मक प्रक्रियांच्या नियंत्रणासंबंधीच्या कार्यामुळे नैसर्गिक व कृत्रिम स्टेरॉइडे ही वैद्यकामध्ये अगदी भिन्न प्रकारच्या परिस्थितींवर उपचार करण्यासाठी व्यापकपणे वापरतात. त्यांच्यामध्ये लिंग हॉर्मोने, अधिवृक्कबाह्य हॉर्मोने, पित्ताम्ले, स्टेरॉले, उपचयीकारक, तोंडाने घ्यावयाची गर्भधारणारोधी संततिप्रतिबंधक द्रव्ये इत्यादींचा अंतर्भाव होतो.

  स्टेरॉले : स्टेरॉलांच्या असंपृक्त वलयांना विविध प्रकारचे प्रतिष्ठापक जोडलेले असतात. स्टेरॉले आणि त्यांची वसाम्ल एस्टरे पाण्यात विरघळत नाहीत. सस्तन प्राण्यांतील रक्तप्रवाहातून परिवहन होण्यासाठी स्टेरॉले व इतर ⇨ लिपिडे विशिष्ट प्रथिनांशी बद्ध होऊन लिपोप्रथिन कण बनतात. या कणांचे वर्गीकरण त्यांचे संघटन व घनता यांवर आधारलेले असते. लिपोप्रथिनांचा एक वर्ग माणसाच्या रक्तात उच्च प्रमाणात असल्यास तो हृदयविकाराच्या झटक्यांचा प्रवृत्तिदर्शक असतो. विशिष्ट ⇨ एंझाइम प्रणालींमार्फत स्टेरॉइड वलय संरचनेची परिवर्तने होतात आणि स्टेरॉल निर्माण होते ( उदा., यीस्टमधील एर्गोस्टेरॉल ). सामान्य जैव संश्लेषणाचा  मार्ग दोन-कार्बन अणू असलेल्या संयुगांपासून ( ॲसिटेट ) सुरू होतो.नंतर या संयुगाचे परिवर्तन अनेक एंझाइमी टप्प्यांतून सहा-कार्बन अणू संयुगात ( मेव्हॅलोनेट) होते. त्यानंतर मेव्हॅलोनेटाचे परिवर्तन पाच-कार्बन अणू मध्यस्थ द्रव्यात ( आयसोपेंटेनिल पायरोफॉस्फेटात ) होते. यापुढेसहा आयसोपेंटेनिल फॉस्फेटाच्या रेणूंच्या संघननांची मालिका घडून ३०-कार्बन अणू मध्यस्थ द्रव्य ( स्क्वालीन ) तयार होते. तद्नंतर स्क्वालिनाचे वलयी-करण होऊन लॅनोस्टेरॉल हे ३०-कार्बन अणू स्टेरॉल तयार होते. नंतर लॅनोस्टेेरॉलाच्या संरचनेत परिवर्तन घडवून प्रमुख स्टेरॉल मिळवितात. स्टेरॉल जैव संश्लेषणाच्या मार्गातील प्रमुख नियामक टप्पा या प्रक्रियेत आधीच घडतो. माणसाच्या रक्तातील कोलेस्टेरॉलाची पातळी कमी करणारी औषधे या नियामक एंझाइमाला प्रतिबंध करतील अशा प्रकारे तयार करतात. अनेक मध्यस्थ द्रव्यांचे स्टेरॉलांत परिवर्तन होते. शिवाय या मार्गात ती इतर महत्त्वाच्या जैव संयुगांची पूर्वद्रव्ये असतात. उदा., वनस्पतींमधील हरितद्रव्य ( क्लोरोफिल ), ए, डी, ईके ही जीवनसत्त्वे आणि पटल कार्ये व चयापयाचे मार्ग यांचे नियमन करणारी द्रव्ये.

पटल संरचनांचा भाग म्हणून कार्य करणे हे स्टेरॉलांचे सामान्य कार्य आहे. याशिवाय काही कीटकांना त्यांच्या आहारांत स्टेरॉलांची आवश्यकता असते. कोलेस्टेरॉल हे स्टेरॉइड हॉर्मोने [ स्त्रीमदजने ( इस्ट्रोजेने ), पौरुषजने ( अँड्रोजेने ), ग्लुकोकॉर्टिकॉइडे व मिनरलोकॉर्टिकॉइडे ] आणि पित्ताम्ले यांचे पूर्वद्रव्य म्हणूनही कार्य करते.  

स्टेरॉइडे : स्टेरॉइड केंद्र त्रिमितीय असते. जोडणार्‍या गटांच्या स्वरूपाच्या बाबतीत स्टेरॉइडे एकमेकांपासून भिन्न असतात, तसेच स्टेरॉइड केंद्राचा विन्यास आणि गटांची स्थाने या बाबतींतही स्टेरॉइडे भिन्न असतात. स्टेरॉइडांच्या रेणवीय संरचनेतील छोट्या परिवर्तनाने त्यांच्या कार्यामध्ये ठळक भेद निर्माण होऊ शकतात. वनस्पती व प्राणी यांच्यामधून रसायनशास्त्रज्ञांनी शेकडो स्टेरॉइडे अलग केली आहेत, तसेच नैसर्गिक स्टेरॉइडांवर रासायनिक संस्करण करून किंवा संश्लेषणाद्वारे आणखी हजारो स्टेरॉइडे तयार करण्यात आली आहेत.

  नैसर्गिक स्रोतांपासून स्टेरॉइडे अलग करण्यासाठी कार्बनी विद्रावक ( विरघळविणारे पदार्थ ) वापरतात. स्टेरॉले ही सर्वांत विपुल असलेली स्टेरॉइडे असून त्यांच्यावर क्षाराचे ( अल्कलीचे ) संस्करण करतात आणि नंतर हेक्झेन किंवा ईथर यांसारख्या पाण्यात मिसळू न शकणार्‍या विद्रा-वकामार्फत त्यांचे निष्कर्षण करतात. या पद्धतींनी प्रयोगशाळेत अतिशुद्ध स्टेरॉइडे मिळविता येतात. विद्रावकांमधून पुनःपुन्हा स्फटिकीकरण करून स्टेरॉइडे व्यापारी दृष्ट्या मोठ्या प्रमाणात शुद्ध करतात.

  व्यापारी व प्रयोगशाळेतील स्टेरॉइडांच्या संश्लेषणाची सुरुवात बहुधा क्विनोनासारख्या एकवलयी आरंभक द्रव्यापासून होते. नंतर त्यावर इतर वलये उभारतात. स्टेरॉइडांचे संपूर्ण संश्लेषण व्यापारी दृष्ट्या शक्य आहे, परंतु निसर्गात विपुलपणे आढळणार्‍या स्टेरॉइडांचे रूपांतर संश्लेषित स्टेरॉइडांत करणे हा पुष्कळदा अधिक व्यावहारिक मार्ग ठरतो. विशिष्ट सूक्ष्मजीव स्टेरॉइड रेणूचे काही भाग रूपांतरित करू शकतात आणि पुष्कळदा रासायनिक व सूक्ष्मजीववैज्ञानिक तंत्रे संयुक्तपणे वापरून औद्योगिक स्टेरॉइडे तयार करतात. 

  वनस्पती व प्राण्यांमध्ये स्टेरॉइडे एकसारख्या विक्रियांनी जैव संश्ले- षणाद्वारे संश्लेषित होतात. याची सुरुवात ॲसिटिक अम्लापासून होते व त्याला एका प्रकारच्या एंझाइमाची मदत होते. स्क्वालीन नावाचे आयसो-प्रिनॉइड हायड्रोकार्बन निसर्गात व्यापकपणे आढळते आणि त्याच्यापासून सर्व स्टेरॉइडे तयार होतात, म्हणून त्याला प्रारंभिक द्रव्य मानतात. स्क्वालिनाच्या एंझाइमी रूपांतराने प्राण्यांमध्ये लॅनोस्टेरॉल तर वनस्पतींत सायक्लोआर्टेनॉल निर्माण होऊन त्यांपासून वनस्पती व प्राणी या दोन्हीं- मध्ये कोलेस्टेरॉल निर्माण होते. नंतर कोलेस्टेरॉलाचे प्राण्यांमध्ये पित्ताम्लेव स्टेरॉइड हॉर्मोने यांच्यामध्ये, तर वनस्पतींमध्ये अल्कलॉइडांसारख्या स्टेरॉइडांमध्ये परिवर्तन होते.

सर्व लिंग हॉर्मोने आणि अधिवृक्कबाह्यकात निर्माण होणारी कॉर्टिको-स्टेरॉइडे ही कोलेस्टेरॉल या सर्वांत व्यापकपणे आढळणार्‍या एका स्टेरॉइडापासून मिळतात. विविध हॉर्मोनविषयक कार्यांमधून जीवन टिकवून ठेवण्याच्या बाबतीत कॉर्टिकोस्टेरॉइडे महत्त्वाचे कार्य करतात. या हॉर्मोनविषयक कार्यांमुळे शरीरातील द्रायूंच्या ( द्रव व वायू यांच्या ) आयनी संघटनाचे संतुलन होण्यास मदत होते. 

  पित्ताम्ले हा सस्तन प्राण्यांत आढळणार्‍या स्टेरॉइडाचा प्रकार असून ती पचन क्रियेत वसांचे पायसीकरण होताना कार्य करतात. कोलेस्टेरॉल हे स्टेरॉइड हॉर्मोनांचे पूर्वद्रव्य आहेच. शिवाय ते कोशिका कलेचा महत्त्वाचा घटकही आहे. दुर्दैवाने काही व्यक्तींमध्ये जादा रक्तरस कोलेस्टेरॉलअसल्याने रोहिण्यांच्या भित्तींवर त्याचा थर साचतो. परिणामी रोहिण्यां-मधील आतील भित्तींमध्ये तंतुमय संयोजी ऊतकांच्या कोशिकांची संख्या विपुल होते. 

स्टेरॉइडांचा पहिला चिकित्सावैज्ञानिक ( रोगोपचारासाठी ) उपयोग अठराव्या शतकात झाला. तेव्हा काही हृद्विषयक तक्रारींवर तिळपुष्पी वनस्पतीचा अर्क लाभदायक ठरल्याचे आढळले होते. या अर्कातील डिजिटॅलिस हे कार्यप्रवण द्रव्य सांप्रत वापरले जात आहे. हे स्टेरॉइड ग्लायकोसाइड असून या रेणूत स्टेरॉइडे एका शर्करा अवशेषाला संलग्न झालेले असते. अनेक वनस्पती स्टेरॉइडे ही हृदयसंबंधी ग्लायकोसाइडे आहेत. त्यांची मोठी मात्रा प्राणघातक ठरू शकते आणि वनस्पती परभक्षी कीटक दूर ठेवण्यासाठी त्यांचा वापर करीत असाव्यात. काही भेक स्टेरॉइड ग्लायकोसाइडे स्रवतात आणि त्यांचाही उपयोग संरक्षण यंत्रणा म्हणून होत असावा.

  कॉर्टिकोस्टेरॉइडे आणि त्यांची संश्लेषित अनुरूपे प्रेड्निसोन व डेक्सॅमेथॅसोन यांचा उपयोग संधिवात व इतर शोथकारक ( दाहयुक्त सुजेचे ) विकार यांच्या नियंत्रणासाठी करतात. उपचयी स्टेरॉइडे म्हणजे विधायक चयापचय वाढविणारी स्टेरॉइडे असून ती कधीकधी स्नायुवृद्धीला पुष्टी देण्यासाठी व ऊतकांच्या पुनर्जननासाठी शस्त्रक्रियेनंतर वृद्ध रुग्णांना देतात. हौशी व व्यावसायिक खेळाडूंनी वाढत्या प्रमाणात स्नायूंच्या वाढीला गती देण्यासाठी व बल वाढविण्यासाठी टेस्टोस्टेरॉनाच्या संश्लेषित अनु-रूपांचा उपयोग करून घेतला आहे. विशेषतः शारीरिक वाढ होत असलेल्या तरुण मंडळींमध्ये उपचयी स्टेरॉइडांचे घातक परिणाम होऊ शकतात, असे वैद्यकीय संशोधकांनी निर्णायकपणे म्हटले आहे.

तथापि, सर्वाधिक व्यापकपणे वापरली जाणारी स्टेरॉइड औषधे म्हणजे तोंडाने घ्यावयाची संततिप्रतिबंधक औषधे होत. त्यांचा वापर १९६२-६३ मध्ये सुरू झाला. ही औषधे अंडमोचनक्रियेचे दमन करतात. ही संश्लेषित द्रव्ये रानटी सुरण ( गोराडू ) वनस्पतीपासून मिळणार्‍या डायोसजेनीन या स्टेरॉइडापासून मुख्यतः तयार करतात.

  काही महत्त्वाच्या प्रमुख स्टेरॉइडांची माहिती पुढे दिली आहे :


कोलेस्टेरॉल : प्राण्यांत आढळणारे हे सर्वांत विपुल स्टेरॉइड आहे. हे मुख्यत्वे कोशिकांच्या रक्तद्रव ( प्लाविका ) पटलात आढळते. तेथे ते लिपीड द्विस्तराचे ( दोन रेणूंच्या जाडीच्या थराचे ) मुख्य घटक असते. बहुधा कमी प्रमाणात ते मायटोकाँड्रिऑनासारख्या ( कलकणूसारख्या ) कोशिकेपेक्षा लहान कोशिकांगाच्या पटलांमध्येही आढळते. कोलेस्टेरॉला-मध्ये सायुज्यित वलय संरचना असल्याने या स्तरांमधील इतर लिपीड घटकांपेक्षा याची दृढता जास्त असते आणि त्यामुळे अधिक लवचिक   लिपीड घटकांच्या हालचालींवर मर्यादा येऊन पटलांची तरलता घटण्याची प्रवृत्ती असते. अशा रीतीने जैव पटलांची भौतिकीय गुणवैशिष्ट्ये निश्चित होण्यामध्ये कोलेस्टेरॉलाचे कार्य महत्त्वाचे असते. शिवाय कोलेस्टेरॉल लिपीड तराफ्यांचा ( रॅफ्टचा ) एक प्रमुख घटक आहे. हे तराफे म्हणजे रक्तद्रव पटलातील स्थानिक क्षेत्रे असून ते सभोवतालच्या द्रव्यापेक्षा अधिक नियमित व दृढ असतात. लिपीड तराफे विशिष्ट प्रथिनांशी निगडित असतात आणि त्यांचे संदेश स्थानांतरणातील कार्य महत्त्वाचे असल्याचे मानतात. वनस्पतींमध्ये कोलेस्टेरॉल अत्यल्प असून स्टिग्मास्टेरॉल नावाचे   स्टेरॉल हे वनस्पतींच्या कोशिकापटलांत कोलेस्टेरॉलासारखे कार्य करते [⟶ कोलेस्टेरॉल ].

  कोलेस्टेरॉल अध्रुवीय स्वरूपाचे असल्याने ते पाण्यात कमी विरघळते. परिणामी रक्तप्रवाहापासून कोलेस्टेरॉल लिपोप्रथिन नावाच्या वाहक प्रथिनांशी जोडून वाहून नेणे क्रमप्राप्त होते. कमी घनतेची लिपोप्रथिने ( एलडीएल ) कोलेस्टेरॉल यकृतापासून शरीरातील विविध ऊतकांपर्यंत वाहून नेतात. उच्च घनता लिपोप्रथिने ( एचडीएल ) कोलेस्टेरॉल शरीरातील विविध ऊतकांपासून यकृतापर्यंत वाहून नेतात. म्हणून उच्च घनता लिपोप्रथिनाला कोलेस्टेरॉल अपमार्जक ( स्कॅव्हेंजर ) असे मानतात. कारण ते जादा कोलेस्टेरॉल थेट कोशिकापटलांमधून घेऊ शकते. 

  कोलेस्टेरॉलामधील कमी घनतेच्या लिपोप्रथिनांच्या रक्तप्रवाहातील उच्च पातळ्यांचा संबंध रोहिणीविलेपी विकाराशी जोडला जातो. या विकारात रोहिण्यांच्या भित्ती जाड व कठीण होतात. परिणामी रोहिण्या अवरुद्ध होण्याची व हृदयविकाराचा झटका येण्याची जोखीम वाढते. रोहिण्यांच्या आतील भित्तीच्या मऊ स्नायुकोशिकांमध्ये जादा कोलेस्टेरॉल साचल्याने अशी परिस्थिती उद्भवते. काही काळानंतर साचलेल्या या थराचे कॅल्सिभवन होते आणि शेवटी रोहिणी बंद होते. उच्च घनता लिपोप्रथिनांच्या उच्च पातळ्या हृदयविकाराच्या कमी झालेल्या जोखमीच्या निदर्शक आहेत.

  स्टेरॉइड हॉर्मोने : कोलेस्टेरॉल विविध प्रकारच्या महत्त्वाच्या स्टेरॉइड हॉर्मोनांचे पूर्वद्रव्य आहे. ग्लुकोकॉर्टिकॉइडे, पौरुषजने, स्त्रीमदजने, प्रोजेस्टिने व मिनरलोकॉर्टिकॉइडे ही स्टेरॉइड हॉर्मोने आहेत. स्टेरॉइड हॉर्मोनांचे प्रत्येक कुल भिन्न शरीरक्रियावैज्ञानिक प्रतिसाद उघडकीस आणते.

ग्लुकोकॉर्टिकॉइडे : कॉर्टिसोल ( याला हायड्रोकॉर्टिसोन असेही म्हणतात ) हे ग्लुकोकॉर्टिकॉइडाचे उदाहरण आहे. अधिवृक्क ग्रंथी हे हॉर्मोन निर्माण करते आणि ते कार्बोहायड्रेटाच्या चयापचयाच्या नियंत्रणात सहभागी असते. कॉर्टिसोलामुळे यकृतातून ग्लुकोज मुक्त होण्याचे प्रमाण वाढते आणि शरीराच्या इतर ऊतकांकडून ग्लुकोज घेण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी कॉर्टिसोल प्रभावीपणे रक्तातील शर्करेची ( ग्लुकोजाची ) पातळी वाढविते आणि ते इन्शुलिनाच्या विरुद्ध कार्य करते. कॉर्टिसोलाचा परिणाम शोथ व ⇨ ॲलर्जी यांच्याही विरुद्ध होतो. दमा, ॲलर्जी व विविध त्वचाविकार यांच्यावर उपचार करण्यासाठीही वैद्यकात कॉर्टिसोल वापरतात [⟶ कॉर्टिसोन ].

  पौरुषजने : ( अँड्रोजेने ). टेस्टोस्टेरॉन हे प्राथमिक पौरुषजन हॉर्मोन आहे. हे जनन ग्रंथीत निर्माण होते व ते नर ( पुरुष ) लिंग हॉर्मोन आहे. टेस्टोस्टेरॉन नर जननेंद्रियाच्या भू्रणविकासासाठी आवश्यक असते. यौवना-वस्थेत चेहर्‍यावरील व जननेंद्रियालगतचे केस, आवाज फुटणे यांसारख्या लैंगिक उपलक्षणांच्या विकासासाठी टेस्टोस्टेरॉन आवश्यक असते. टेस्टो-स्टेरॉन प्रथिनाचे संश्लेषण वाढविते व पर्यायाने स्नायुनिर्मितीलाही मदत करते. विशिष्ट क्षयकारी ( झीज घडविणार्‍या ) रोगांबरोबर वजनात मोठी घट होते. तिच्यावर उपचार करण्यासाठी टेस्टोस्टेरॉनाची नक्कल करणारी संश्लेषित पौरुषजन स्टेरॉइडे वापरतात. स्नायुद्रव्य व बल वाढविण्या-साठी अनेक खेळाडू संश्लेषित पौरुषजन स्टेरॉइडांचा गैरवापर करतात [⟶ पौरुषजर्नें].

  स्त्रीमदजने : ( इस्ट्रोजेने ). इस्ट्राडिऑल हे मुख्य स्त्रीमदजन हॉर्मोन आहे. हे अंडकोश व वार यांच्यामध्ये निर्माण होते आणि हे स्त्रीलिंग हॉर्मोन आहे. यौवनावस्थेत जननेंद्रियालगतचे केस व वाढणारे स्तन या लैंगिक उपलक्षणांच्या वाढीसाठी इस्ट्राडिऑल आवश्यक असते. इस्ट्राडिऑलामुळे गर्भाशयाचे अस्तर जाड होते व हे ऋतुचक्राच्या ( आर्तवचक्राच्या) आधीच्या अवस्थेत घडते. यामुळे ⇨ पोष ग्रंथीमार्फत होणारा पुटक-उद्दीपक हॉर्मोनाचा स्रावसुद्धा रोखला जातो व परिणामी अंडमोचनाला प्रतिबंध होतो. अंडमोचन रोखण्याची क्षमता असल्यामुळे इस्ट्राडिऑल हा तोंडाने घ्यावयाच्या संततिप्रतिबंधक औषधांचा मुख्य घटक असतो [⟶ स्त्रीमदजने ].  

प्रगर्भरक्षी : ( प्रोजेस्टिने ). प्रोजेस्टेरॉन हे प्रमुख प्रोजेस्टीन आहे. हे हॉर्मोन ⇨ अधिवृक्क ग्रंथी व कॉर्पस ल्युटेअम यांच्यामार्फत निर्माण होते ( अंडमोचनानंतर भंग पावलेल्या गर्भाशय पुटकाला कॉर्पस ल्युटेअम म्हणतात ). हे स्त्री लिंग हॉर्मोन आहे. याच्यामुळे गर्भाशयाच्या अस्तरात बदल घडून येतात व त्यामुळे निषेचित अंड्याचे रोपण शक्य होते. जर गर्भधारणा झाली तर वार ( अपरा ) प्रगर्भरक्षी निर्माण करू लागते. यामुळे उत्स्फूर्त गर्भपातास प्रतिबंध होतो आणि दुग्धनिर्मितीसाठी स्तन ग्रंथी तयार होतात. संश्लेषित प्रोजेस्टिनेही तोंडाने घ्यावयाच्या संततिप्रतिबंधक औषधांचे मुख्य घटक असतात [⟶ प्रगर्भरक्षी]. 

मिनरलोकॉर्टिकॉइडे : ॲल्डोस्टेरॉन हे या हॉर्मोनांचे एक उदाहरण आहे. ॲल्डोस्टेरॉन अधिवृक्क ग्रंथीद्वारे निर्माण होते व त्याच्यामुळे विद्युत् विच्छेद्य समतोलाचे नियमन होते. पोटॅशियम आयनाचे ( विद्युत् भारित अणूचे ) उत्सर्जन उत्तेजित करण्यासाठी व सोडियम आयनाचे उत्सर्जन निरोधित करण्यासाठी ॲल्डोस्टेरॉन वृक्कांवर क्रिया करते [⟶ अधिवृक्क ग्रंथि].

पित्ताम्ले : कोलेस्टेरॉल हे कोलिक अम्ल व ग्लायकोकोलिक अम्ल यांसारख्या पित्ताम्लांचे ( म्हणजे पित्त लवणांचे ) पूर्वद्रव्य आहे. यकृतात कोलेस्टेरॉलाचे पित्ताम्लांत परिवर्तन होते आणि पित्ताम्ले पित्ताशयांद्वारे लहान आतड्यात स्रवतात. वसांचे पचन व शोषण होण्यास मदत करण्या-साठी लहान आतड्यात पित्ताम्ले पायसीकारक म्हणून कार्य करतात. लहान आतड्यातील बहुतेक पित्ताम्ल परत शोषले जाऊन पुन्हा वापरले जाते आणि थोडे असे वापरले वा शोषले जात नाही. असे पित्ताम्ल न शोषले जाणे हे शरीराकडून जादा कोलेस्टेरॉल उत्सर्जित होण्यामागील प्रमुख इंगीत आहे.

  स्टेरॉइड हॉर्मोनांच्या क्रियेची यंत्रणा : विविध जनुकांची [⟶ जीन] अभिव्यक्ती बदलून स्टेरॉइड हॉर्मोने वर वर्णन केलेले शरीरक्रियात्मक प्रतिसाद उघड करतात. स्टेरॉइडे अध्रुवीय असल्याने ती कोशिका-पटलातून सहजपणे पलीकडे जातात. कोशिकेत आलेले स्टेरॉइड रेणू कोशिकाद्रव्यात विशिष्ट प्रथिनग्राहींना ( आकलकांना ) बद्ध होतात. नंतर हॉर्मोन प्रथिनग्राही जटिले केंद्रकात प्रविष्ट होतात व प्रतिसाद मूलघटक म्हणून डीएनएच्या ( डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्लाच्या ) विशिष्ट भागाला बद्ध होतात. अनेक बाबतींत हॉर्मोन प्रथिनग्राहीचे जटिल डीएनएतील प्रतिसाद मूलघटकाशी होणारे बंधन प्रतिसाद मूलघटकाच्या निकटवर्ती जनुकांची अभिव्यक्ती घडवून आणते. इतर बाबतींत हे बंधन प्रतिसाद मूलघटकाच्या निकटवर्ती जनुकांच्या अभिव्यक्तीला प्रतिसाद देते.

 पहा : अधिवृक्क ग्रंथि कोलेस्टेरॉल पोषग्रंथि पौरुषजन प्रगर्भरक्षी लिपिडे स्त्रीमदजने.

 संदर्भ : 1. Devlin, T. M., Ed., Textbook of Biochemistry with Clinical Correlation, New York, 2002. 

           2. Patterson, G. W. Nes, W. D. Eds., Physiology and Biochemistry of Sterols, 1992. 

           3. Voet, D. Voet, J. G. Biochemistry, New York, 2004.

ठाकूर, अ. ना.