आमापन, जैव : एखाद्या पदार्थाचा अगर पदार्थाच्या गटाचा एखाद्या योग्य अशा प्राण्याच्या, वनस्पतीच्या किंवा सूक्ष्मजीवाच्या वाढीवर नियंत्रित परिस्थितीत होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करून त्याच्या सांद्रतेचे (दिलेल्या घनफळातील पदार्थाच्या रेणूंच्या प्रमाणाचे) परिमाण काढण्याच्या पद्धतीला जैव आमापन असे म्हणतात. असे पदार्थ जीवनसत्त्वांसारखे वाढीला आवश्यक असलेले किंवा पेनिसिलिनासारखे [ प्रतिजैव पदार्थ] वाढीला प्रतिरोध करणारे असून सामान्यत: त्यांचे रासायनिक संघटन माहीत नसते किंवा त्यांची सांद्रता इतकी कमी असते की, साध्या रासायनिक व भौतिक विश्लेषण पद्धती त्यांच्याकरिता वापरता येत नाहीत. सूक्ष्मजंतू, प्राणी किंवा वनस्पती यांच्या वाढीस प्रथिने, ॲमिनो अम्ले, वसामय व पिष्टमय पदार्थ, निरनिराळी जीवनसत्त्वे, लवणे वगैरेंची आवश्यकता असते. यांपैकी कोणत्याही एका आवश्यक घटकाचा योग्य प्रमाणात पुरवठा झाला नाही, तर जीवांच्या वाढीवर दुष्परिणाम होतो किंवा त्यांची वाढ पाहिजे तशी होत नाही. या वस्तुस्थितीचा उपयोग जैव आमापन पद्धतीत केलेला आहे. या आमापन पद्धतीत प्रथम योग्य सूक्ष्मजंतूची अगर प्राण्याची निवड केली जाते. ज्या विशिष्ट घटकाचे मूल्यमापन करावयाचे आहे, तो वगळून इतर सर्व आवश्यक अन्नघटक त्या जीवाला योग्य त्या प्रमाणात नियमितपणे देतात. प्रयोगाच्या वेळी, ऑक्सिजनाचा पुरवठा, तपमान वगैरे गोष्टींचे काटेकोरपणे नियमन केलेले असते. आमापन करावयाचा घटक मात्र वेगवेगळ्या प्रमाणांत, त्या ठराविक जीवाच्या निरनिराळ्या गटांना देतात व नंतर काही काळाने त्या जीवाच्या वाढीचा अभ्यास करतात. त्यावरून त्या विशिष्ट घटकाची सांद्रता, जैव गुणधर्म इ. गुणधर्मांचे मूल्यमापन केले जाते. या पद्धतीत तो विशिष्ट घटक शुद्ध स्थितीतच असला पाहिजे असे नाही. तो मिश्र स्वरूपात असो किंवा निसर्गात सापडणाऱ्या अशुद्ध स्वरूपात असो, तसेच समान जैव क्रिया असलेल्या पण रासायनिक दृष्ट्या थोडा फार फरक असलेला सयुगांचा गट असो, आमापन पद्धतीने त्या विशिष्ट जैव गुणधर्म असलेल्या सर्व प्रकारच्या पदार्थांचे मूल्यमापन संयुक्तरीत्या करता येते. मात्र या अशुद्ध पदार्थात इतर काही विषारी पदार्थ असता कामा नयेत. कारण या विषारी पदार्थाचा जीवाच्या वाढीवर वाईट परिणाम होतो व अशा स्थितीत काढलेले आमापनाचे निष्कर्ष चुकीचे ठरतील.

जीवनास आवश्यक असलेल्या पदार्थांप्रमाणेच पेनिसिलिनासारखे प्रतिजैव पदार्थ, जंतुनाशके इ. निरोधकांचेही या पद्धतीने आमापन करता येते. जैव आमापन पद्धतीचे निरनिराळे प्रकार रूढ झाले आहेत. या अनेक प्रयोगांच्या आधारे मानवासारख्या उच्च जातीतील प्राण्यांची पोषणाची गरज बरीचशी सूक्ष्मजंतूंच्या गरजेप्रमाणेच असते, असे दिसून आले आहे.

कुठलाही जीव घेतला तरी त्याच्या वाढीसंबंधीची तत्त्वे जवळ जवळ सारखीच असतात. थोडाफार फरक आढळतो, तो काही विशिष्ट घटकांच्या बाबतीत. एखादा जीव जो घटक शरीरामध्ये पुरेसा संश्लेषित करतो, त्या प्राण्यांत त्या घटकाची त्रुटी निर्माण होत नाही, तर दुसऱ्या एखाद्या जातीतील जीव त्या अन्नघटकासाठी सर्वस्वी बाहेरील अन्नावर अवलंबून असतो. जर नेहमीच्या अन्नात तो घटक पुरेसा नसेल, तर त्रुटीजन्य रोगाची ठराविक लक्षणे हळूहळू दिसू लागतात. क जीवनसत्त्वाचे उदाहरण घेऊ. माणूस किंवा गिनीपिग या जीवनसत्त्वासाठी सर्वस्वी अन्नावर अवलंबून असतो. इतर प्राण्यांच्या बहुतेक जातींत, क जीवनसत्त्व शरीरात पुरेशा प्रमाणात संश्लेषित होते. या गुणधर्मामुळे, क जीवनसत्त्वाचे प्राणिपद्धतीने आमापन करावयाचे असेल, तर त्यासीठी गिनीपिग प्राण्यांची निवड करणेच रास्त होईल. जैव आमापनासाठी जीवांची निवड करताना तो विशिष्ट घटक त्या जातीच्या जीवाच्या शरीरात संश्लेषित होतो किंवा नाही, ही महत्त्वाची गोष्ट प्रथम लक्षात घेतली पाहिजे.

जैव आमापन पद्धतीत मुख्यत: दोन प्रकार आहेत. पहिला सूक्ष्मजैव आमापन व दुसरा प्राणिपद्धतीने आमापन. प्रयोगाच्या दृष्टीने वेळोवेळी त्यामध्ये थोडाफार फरक होत असेल पण या दोन्ही आमापन पद्धतींची तत्त्वे समानच आहेत. या आमापन पद्धतीत वृद्धिप्रतिक्रिया मोजली जाते. सूक्ष्मजैव आमापनात सूक्ष्मजंतूंच्या वाढीमुळे निर्माण होणारी गढुळता, शुष्क केलेल्या सूक्ष्मजंतुकोशिकांचे (कोशिका म्हणजे सजीवाच्या शरीरातील सूक्ष्म घटक) वजन, कोशिकांतील नायट्रोजन किंवा कोशिका वसाहतींची संख्या या गोष्टींचा आमापन करण्यासाठी उपयोग करतात. प्राणिपद्धतीच्या आमापनात प्राण्यांच्या वजनांत व वाढीत होणारा बदल व त्यांच्या शरीरावर दिसणाऱ्या एकंदर लक्षणांवरून दिलेल्या घटकांचे मूल्यमापन करतात.

योग्य तो प्राणी अगर सूक्ष्मजंतूची जात मिळाली तर रासायनिक किंवा भौतिक आमापनाऐवजी जैव आमापन पद्धतीचा वापर करण्यास हरकत नसते. पण काही वेळा सूक्ष्मजंतू व प्राणी यांच्यामध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण होते व त्यामुळे त्यांच्या वाढीवर अनपेक्षित परिणाम झालेला दिसतो. उदा., एखादे औषध संसर्गजन्य रोगावर सुरुवातीला हमखास गुणकारी असते पण काही कालानंतर ते त्याच रोगासाठी निरुपयोगी झाल्याचे दिसते. याचे कारण म्हणजे त्या जीवामध्ये हळूहळू निर्माण झालेली प्रतिकारशक्ती हे होय. त्या औषधातील कारकाचा परिणाम होणारी त्या जीवातील एखादी जीवरासायनिक यंत्रणा बदललेली तरी असते, किंवा त्या जीवात अशी काही द्रव्ये जमा झालेली असतात की, कारकांचा त्यामुळे नाश झाल्यामुळे नेहमीचा अपेक्षित परिणाम दिसत नाही. जैव आमापन पद्धत योजताना या सर्व गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत.

रासायनिक आमापन पद्धतीत वजन, आकारमान, सांद्रता, प्रारण वगैरे अनेक घटकांचा परिणाम होत असतो, तर जैव आमापन पद्धतीत जीवांच्या स्वयंविशिष्टतेमुळे प्रयोगाच्या अनिश्चिततेत अधिक भर पडते. जीवांच्या या स्वयंविशिष्टतेच्या गुणधर्मामुळेत जैव आमापन पद्धतीला अत्यंत महत्त्व आले आहे.

तसे पाहिले, तर फार प्राचीन काळापासून जैव आमापन पद्धतीचा उपयोग चालू होता असे दिसून येते. आस्प जातीच्या सर्पाच्या दंशाने चटकन मृत्यू येतो याची खात्री करून घेण्यासाठी क्लिओपात्रा राणीने प्रथम तिच्या गुलामांवर प्रयोग केले. आत्महत्येच्या या हमखास उपायाची तिने मिळविलेली माहिती म्हणजे जैव आमापनाचाच एक प्रकार होता.

अनेक घटकद्रव्ये असलेल्या औषधी वनस्पतींपासून क्रियाशील घटकद्रव्ये आता शुद्ध स्वरूपात नेहमीच मिळवितात. अगदी सुरुवातीला असे क्रियाशील घटक प्रथम अफूच्या बोंडापासून वेगळे करण्यात आले. सेर्टर्नर यांनी त्या बोंडांचा प्रथम प्राण्यावर व स्वत:वर प्रयोग केल्यानंतर दिसणाऱ्या लक्षणांची नोंद केली. त्या बोंडांवर अनेक रासायनिक विक्रिया करून त्यापासून एका विशिष्ट घटकाचे शुद्ध स्फटिक मिळविले. प्राण्यावर प्रयोग केल्यावर या स्फटिकांमध्येही अफूच्या बोंडाप्रमाणेच वेदना दूर करण्याचे सामर्थ्य असते, असे दिसून आले. या स्फटिकांमध्ये ती शक्ती अधिक प्रमाणात असते. जैव आमापन पद्धतीनेच सेर्टर्नर यांनी हे सिद्ध केले व या स्फटिकांना मॉर्फीन असे नाव दिले.


फार पूर्वीपासून वनस्पती व प्राण्यांच्या ग्रंथी औषधे म्हणून वापरात आहेत. औषधी गुणधर्म त्यांपैकी कुठल्या विशिष्ट घटकामुळे आढळतात हे माहीतसुद्धा नसे. अशुद्ध अशा या औषधांपासून औषधी गुणधर्म ज्यामध्ये एकवटले आहेत, असे विशिष्ट घटक हळूहळू शुद्ध स्वरूपात मिळविण्यात आले. या विशिष्ट घटकांत खरोखरीच काही औषधी गुणधर्म आहेत का? असल्यास त्या गुणधर्मांची शक्ती किती? वगैरे प्रश्नांची उत्तरे जैव आमापन पद्धतीने मिळवितात.

ज्या घटकांचा जीवरासायनिक विक्रियांवर परिणाम होतो, त्यांच्यापुरत्याच जैव आमापन पद्धती मर्यादित असतात. या पद्धतींची संवेदनशीलता व अचूकता त्या मानाने कमीच असते. एखाद्या नवीन पदार्थाचे जैव आमापन करावयाचे असेल, तर त्या पदार्थाच्या इतर रासायनिक व भौतिक गुणधर्मांची माहिती पाहिजेच असे नाही. ज्याच्यावर या पदार्थाचा परिणाम होतो अशा जीवाची जात मात्र शोधावी लागते. अशा अनेक नवीन पदार्थांच्या गुणधर्मांची माहिती जैव आमापन पद्धतींनीच मिळविली गेली आहे.

जैव आमापनाचा दुसराही एक फायदा आहे. एखाद्या मिश्रणात समान गुणधर्मांची पण भिन्न संरचना असलेली अनेक संयुगे असतात. अशा प्रत्येक क्रियाशील संयुगाचे वेगवेगळ्या रासायनिक पद्धतीने आमापन करणे अतिशय कष्टाचे व त्रासदायक असते. पण योग्य अशा जैव आमापन पद्धतीने मात्र त्या मिश्रणाचे मूल्यमापन संयुक्तरीत्या अजमाविता येते.

प्राणिपद्धतीने आमापन : प्रतिजैव पदार्थ, जीवनसत्त्वे, ॲमिनो अम्ले, खते, जंतुनाशके, सूक्ष्मजंतुवाढरोधके, परिरक्षके आणि कवकनाशके यांच्या आमापनासाठी सूक्ष्मजंतू, यीस्ट, बुरशी वगैरेंचा वापर मोठ्या प्रमाणात करतात हे जरी खरे असले, तरी अलीकडे आमापनासाठी निरनिराळ्या जातींच्या प्राण्यांचा उपयोग त्याहून अधिक प्रमाणात करतात. हे प्राणी म्हणजे छोटे सफेद उंदीर, मोठे उंदीर, गिनीपिग, माकडे, कुत्री, मांजरे, डुकरे, वासरे, कोंबड्या व त्यांची पिले, हॅमस्टर, सापांच्या निरनिराळ्या जाती इत्यादी. अनेकदा या पद्धतीने काढलेली अनुमाने सोईस्कर सूक्ष्मजैव आमापन पद्धत वापरून नक्की केली जातात.

तंत्र : बाजारात एखादा नवीन उत्पादित पदार्थ आणावयाचा असेल आणि तो घरात, शेतात किंवा उद्योगधंद्यात कुठेही वापरावयाचा असला तरी तो पदार्थ वापरणे सुरक्षित असणे आवश्यक आहे किंवा एखादे नवीन औषध बाजारात आणावयाचे असल्यास ते औषध क्रियाशील तर असले पाहिजेच पण ते घेण्याने दुष्परिणामही होता कामा नयेत. प्राण्यांच्या आमापन पद्धतीने या सर्व गुणधर्मांची माहिती करून घेता येते. अशा प्रकारच्या नवीन उत्पादित औषधांचा अभ्यास वैद्यकशास्त्राच्या निरनिराळ्या शास्त्रांत केला जातो. विशेषत: औषधिक्रियाविज्ञानात औषधांचा प्राण्यावर कसा व किती परिणाम होतो यासंबंधी तर विषविज्ञानात औषधापासून होणाऱ्या विषारी व इतर वाईट परिणामांचा अभ्यास करतात.

अशा प्रकारच्या आमापनाला प्राण्याचे सर्व शरीर नेहमीच लागते असे नाही. औषधिक्रियाविज्ञानात तर बऱ्याच वेळा प्राण्याच्या शरीरातील योग्य तो भाग काढून घेऊन त्याच्यावर आमापने करतात. ऑक्सिजन, तपमान, पोषक द्रव्ये ही योग्य प्रमाणात दिली तर ऊतकांचे (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांचे) तुकडे, इंद्रिये बराच वेळ सजीव स्थितीत राहू शकतात. त्यामुळे त्यांचा आमापनासाठी उपयोग करता येतो. विषाणुविज्ञानात विषाणूंचा [→ व्हायरस] अभ्यास करण्यासाठी सजीव कोशिकांच्या निलंबनांची (योग्य द्रवात लोंबकळत ठेवण्याची) गरज लागते. ही निलंबने वृक्क (मूत्रपिंड) किंवा तत्सम इंद्रिये, अधिस्तर (एकमेकांना घट्ट बांधलेल्या कोशिकांची पट्ट्याच्या स्वरूपातील एक किंवा अनेक स्तरांमधील रचना) ऊतके, अंडी यांपासून तयार करतात. कर्करोगाचा अभ्यास करण्यासाठी तर कर्करोग झालेल्या माणसाच्या किंवा प्राण्याच्या ऊतकापासूनच निलंबन तयार करतात व त्यावर कर्ककोशिकांची वाढ करतात.

प्राणिपद्धतीचे आमापन हे फार वेळ घेणारे असल्यामुळे जरा कष्टाचे असते. रासायनिक व भौतिक आमापन पद्धती त्या मानाने सुटसुटीत व कमी वेळ लागण्याऱ्या असल्यामुळे बऱ्याच वेळा त्या पद्धतींचाच उपयोग आमापनासाठी करतात. पण जेव्हा नवीन उत्पादित पदार्थाचा माणसाच्या शरीराशी संबंध येतो, तेव्हा त्यापासून माणसाला काहीही धोका नाही, याची खात्री करून घ्यावी लागते. प्राणिपद्धतीच्या आमापनाशिवाय ते शक्य नसते. प्रवर्तके [→ हॉर्मोने], लसी, टॉक्साइडे, अँटिटॉक्साइडे, प्रतिरक्षक रक्तरस वगैरेंसारख्या औषधींच्या गुणधर्मांची पूर्ण खात्री झाल्याशिवाय त्या माणसाकरिता वापरणे अत्यंत धोक्याचे असते.

प्राणिपद्धतीच्या आमापनात अनुमाने काढण्यास जरी वेळ लागत असला, तरी तशा त्या साध्या असतात. समजा, एखादा नवीन अन्नप्रकार, उत्पादित वस्तू किंवा वनस्पतीचा अर्क यांतील वाढीस आवश्यक असणाऱ्या एखाद्या घटकाचे प्राणिपद्धतीने आमापन करावयाचे आहे. ज्या प्राण्याच्या वाढीस तो विशिष्ट घटक अन्नातून मिळणे आवश्यक असतो अशी जात निवडली जाते. प्राण्यामध्ये स्वयंविशिष्टतेचा गुणधर्म असल्यामुळे, त्या जातीतील अगदी मोजके प्राणी आमापनासाठी वापरून काही अनुमाने काढणे बरोबर होणार नाही. त्यासाठी त्या जातीतील अनेक प्राणी घेऊन, त्यांच्यावर प्रयोग करून अनुमाने काढली पाहिजेत. या प्राण्यांची वजने व वये समान असावीत. बहुतेक वेळा बाल्यावस्थेतील प्राणी निवडतात. त्यांचे मुख्यतः दोन गट करतात. पहिल्या गटाचे उपगट करून, त्यातील प्राण्यांना विशिष्ट घटक मोजक्या पण निरनिराळ्या प्रमाणांत नियमितपणे देतात. तर दुसऱ्या गटाच्या उपगटांतील प्राण्यांना तो विशिष्ट घटक असलेला उत्पादित पदार्थ किंवा वनस्पतीचा अर्क वगैरे निरनिराळ्या प्रमाणांत देतात. वाढीस आवश्यक असे उरलेले अन्नघटक मात्र सर्व प्राण्यांना सारख्या प्रमाणात देतात. प्रयोगाची इतर सर्व परिस्थितीही समान राखली जाते. प्राण्यांच्या वाढीची व इतर लक्षणांची नोंद वेळोवेळी ठेवतात. पहिल्या गटातील प्राण्यांच्या वजनातील वाढ व विशिष्ट घटकाचे वापरलेले प्रमाण यांवरून आलेख तयार करतात. दुसऱ्या गटातील प्राण्यांच्या वाढलेल्या वजनांची तुलना या आलेखाबरोबर करून नवीन उत्पादित पदार्थ अगर वनस्पतीचा अर्क यांमधील त्या विशिष्ट घटकांचे प्रमाण शोधून काढतात.

समजा, नवीन तयार केलेल्या डिजिटॅलिसाच्या अर्कातील डिजिटॅलीस या हृदय उत्तेजक द्रव्याचे प्रमाण शोधून काढावयाचे आहे व त्या अर्काचे मानकीकरण (प्रमाणीकरण) करावयाचे आहे. यासाठी योग्य प्राणी म्हणजे कबुतरे होत. यामध्येही वर लिहिल्याप्रमाणे कबुतरांचे दोन गट करून एका गटातील कबुतरांना मोजके डिजिटॅलिस निरनिराळ्या प्रमाणांत शिरेत टोचतात. दुसऱ्या गटातील कबुतरांना डिजिटॅलिसाचा अर्क निरनिराळ्या प्रमाणांत टोचतात.शरीरात ठराविक प्रमाणात डिजिटॅलीस गेले की, कबूतरांची हृदयक्रिया थांबते. या निरीक्षणावरून व नंतर सांख्यिकीय नियमांचा उपयोग करून त्या अर्काची तौलनिक शक्ती काढतात व अर्काचे मानकीकरण करतात.

तसेच नवीन तयार केलेल्या एखाद्या लशीच्या गुणधर्माची खात्री करून घ्यावयाची असेल, तर ती लस योग्य प्राण्यांना वेळोवेळी टोचतात. नंतर ठराविक दिवसांचा किंवा आठवड्यांचा काळ जाऊ दिला जातो. ज्या सूक्ष्मजंतूपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी ही लस बनविलेली असते, त्या सूक्ष्मजंतूंची तीव्र वाढ नंतर त्या प्राण्यांच्या शरीरांत टोचतात. सूक्ष्मजंतूंच्या वाढत्या माऱ्यापासून रक्षण करण्याच्या त्या प्राण्यांच्या प्रतिकारक शक्तीचे मूल्यमापन करतात व त्यावरून लशीच्या शक्तीचे आमापन करतात.

प्राणी एकाच जातीचे असले तरी स्वयंविशिष्टतेमुळे, प्राण्या-प्राण्यांत दिसून येणारी प्रतिक्रिया, प्रतिकारक शक्ती वगैरे गुणधर्मांत थोडाफार फरक आढळणे स्वाभाविक असते. प्रयोगाची एकंदर रूपरेखा आखताना, तसेच प्रयोगातून काढलेल्या अनुमानांवरून पदार्थाच्या शक्तीचे मूल्यमापन करताना, प्राण्यांच्या या गुणधर्मांची दखल घेणे आवश्यक असते. याकरिता सांख्यिकीय सिद्धांतांची मदत घेऊन प्रयोगाची आखणी करतात. जैव आमापन पद्धतींत साख्यिकीय सिद्धांतांची मदत कशी घ्यावयाची या संबंधीचा अभ्यास हे सांख्यिकीतील एक महत्त्वाचे क्षेत्र आहे [→ जीवसांख्यिकी वैद्यकीय सांख्यिकी].

हेगिष्टे, म. द.


सूक्ष्मजैव आमापन : रासायनिक पदार्थांचा अथवा त्यांच्यातील घटकांचा नियंत्रित परिस्थितीत सूक्ष्मजीवांच्या वाढीवर परिणाम होतो. सूक्ष्मजीवांच्या अशा वाढीचे मापनही करता येते. यावरून रासायनिक पदार्थाचे अथवा त्यांच्यातील घटकांचे परिणामकारी प्रमाण किती असते हे काढण्याच्या पद्धती शोधल्या गेल्या. अशा पद्धतीस सूक्ष्मजैव आमापन म्हणतात.

सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी संवर्धकात (माध्यमात) शर्करा, प्रथिने अथवा इतर नायट्रोजनयुक्त पदार्थ इ. रासायनिक द्रव्ये सर्वसाधारणपणे लागतात. या व्यतिरिक्त विशिष्ट ॲमिनो अम्ले, जीवनसत्त्वे आणि तत्सम पदार्थ यांचीही आवश्यकता काही सूक्ष्मजीवांना असते. हे सूक्ष्मजीव हे पदार्थ स्वतःच तयार करू शकतात. परंतु इतर सूक्ष्मजीव संवर्धकात असे पदार्थ नसल्यास वाढू शकत नाहीत व म्हणून असले संवर्धक त्यांच्या वाढीला अपूर्ण ठरते. ज्या सूक्ष्मजीवांत विशिष्ट पदार्थांचा आपल्या वाढीसाठी उपयोग करून घेण्याचे गुणधर्म आढळतात, अशा सूक्ष्मजीवांचा उपयोग मूळ संवर्धकात अशा पदार्थाचे प्रमाण काढण्यासाठी करतात. हे प्रमाण सूक्ष्मजीवांच्या वाढीवरून काढता येते. उदा., काही सूक्ष्मजीवांना निकोटिनिक अम्ल सूक्ष्म प्रमाणात वाढी करता लागते व संवर्धकात जर ते नसेल तर त्यांची वाढ होत नाही. परंतु सूक्ष्म प्रमाणात निकोटिनिक अम्लाचे प्रमाण ठेवल्यास वाढीस सुरुवात होते. जसजसे निकोटिनिक अम्लाचे प्रमाण वाढत जाईल तसतशी सूक्ष्मजीवांची वाढही अधिक होत जाईल. ही मर्यादा निकोटिनिक अम्लाच्या विवक्षित प्रमाणापर्यंतच होत राहील. सूक्ष्मजीवांची विवक्षित कक्षेपर्यंतची वाढ आणि संवर्धकातील निकोटिनिक अम्लाचे प्रमाण यांचे एकघाती फलन (संबंधदर्शक समीकरण) आढळते. यावरून एखाद्या पदार्थात निकोटिनिक अम्लाचे प्रमाण किती असते हे काढता येते. त्याकरिता निकोटिनिक अम्लरहित संवर्धक घ्यावे. त्यात निरनिराळ्या प्रमाणात निकोटिनिक अम्ल घालावे व त्या प्रत्येक प्रमाणावर सूक्ष्मजीवांची वाढ करावी. वाढीचे मापन व निकोटिनिक अम्लाचे वापरलेले प्रमाण यावरून आलेख काढावा. या आलेखावरून विशिष्ट वाढीस निकोटिनिक अम्लाचे प्रमाण किती असते, याचा निष्कर्ष काढता येतो. त्यानंतर एखाद्या निकोटिनिक अम्लयुक्त संवर्धकात निकोटिनिक अम्लाचे प्रमाण किती असेल हे काढण्याकरिता त्यात त्याच प्रकारच्या सूक्ष्मजीवांची वाढ करावी. त्यांच्या वाढीच्या मापनावरून वरील आलेखाच्या आधारे त्या संवर्धकातील निकोटिनिक अम्लाचे प्रमाण काढता येते.

सूक्ष्मजीवांच्या वाढीचे मापन सूक्ष्मजैव आमापनासाठी निरनिराळ्या तऱ्हेने करतात. द्रव संवर्धके वापरल्यास वाढीमुळे होणारी गढुळता मोजतात. तसेच शुष्क केलेल्या सूक्ष्मजीवकोशिकांचे वजन, कोशिकांतर्गत असलेल्या नायट्रोजनाचे प्रमाण, कोशिकांची संख्या अशा सरळ प्रकारांनी मापन करता येते. या व्यतिरिक्त अप्रत्यक्ष प्रकारानेही हे साध्य होते. सूक्ष्मजैव चयापचयामुळे (शरीरात सतत होणाऱ्या रासायनिक व भौतिक घडामोडींमुळे) कार्बन डाय-ऑक्साइड किंवा अम्लासारख्या पदार्थांचे प्रमाण काढता येते. अशा पद्धतीत संवर्धकात वापरलेल्या रासायनिक पदार्थांची शुद्धता, सूक्ष्मजीवांना पोषक ठरणारे तपमान, ऑक्सिजनाचा पुरवठा इ. बाबींविषयी काटेकोरपणा ठेवावा लागतो.

सूक्ष्मजैव पोषणक्रियेच्या ज्ञानात १९३६ ते १९४५ च्या दरम्यान फारच भर पडल्याने त्याचा उपयोग आमापनासाठी व्हावा म्हणून आमापनाच्या निरनिराळ्या पद्धती, विशेषत:जीवनसत्त्वे व ॲमिनो अम्ले यांचे नैसर्गिक पदार्थातील प्रमाण काढण्याकरिता शोधल्या गेल्या. या पद्धतीत सामान्यत: लागणारी अचूकता आढळत असून अशा पदार्थांचे पृथक्करण सत्वर व सोपे झालेले आहे.

सूक्ष्मजैव आमापनाच्या पद्धती प्रत्येक प्रकारच्या जीवनसत्त्वाचे पृथक्करण करण्यासाठीही अस्तित्वात आहेत. याकरिता मिश्रणामधून जीवनसत्त्वे अलग करावी लागतात. हे जरी खरे असले, तरी त्यामुळेच निरनिराळ्या जीवनसत्त्वांचा शोध लागला हे नाकारता येणार नाही. ज्या पदार्थाचे रासायनिक पृथक्करण अशक्यप्राय असते अशा व प्रतिजैव पदार्थ, जंतुनाशके, जीवनसत्त्वे, ॲमिनो अम्ले इत्यादींसारख्या पदार्थांचे परिमाणात्मक प्रमाण सूक्ष्मजैव आमापनामुळेच शक्य झालेले आहे. बरेचदा ॲमिनो अम्ले, जीवनसत्त्वे व तत्सम पदार्थ अत्यल्प प्रमाणातच क्रियाशील असतात. त्यामुळे त्यांचे रासायनिक पृथक्करण सहजगत्या शक्य होत नाही. परंतु सूक्ष्मजैव आमापनामुळे त्यांचे प्रमाण काढणे शक्य होते व सुलभ होते. म्हणून सूक्ष्मजैव आमापनाच्या पद्धतींना अनन्यसाधारण महत्त्व आलेले आहे. प्रतिजैव पदार्थांचा शोध लागल्यापासून या पद्धतीत अनेक सुधारणा झाल्या व होत आहेत. त्याकरिता नवीन उपकरणांचा शोधही लागलेला आहे.

दुग्ध पदार्थांत नेहमी आढळणाऱ्या लॅक्टोबॅसिलस वंशीय लॅ. केसिआय, लॅ. ॲरॅबिनोसस, लॅ. लॅक्टिस, लॅ. फर्मेन्टाय  लॅ. लाईचमनाय या जातींचा रिबोफ्लाविन, पायरीडॉक्सल, थायामीन, जीवनसत्त्व ब१२, बायोटीन तसेच पँटोथेनिक, फॉलिक, लिपोइक आणि निकोटिनिक अम्ले या पदार्थांच्या आमापनाकरिता उपयोग केला जातो. याशिवाय थायामीन, बायोटीन व इनॉसिटॉल यांसाठी यीस्टचा आणि न्यूरोस्पोरा सिटोफिलान्यू. क्रासा  या बुरशींचा काही जीवनसत्त्वांच्या आमापनसाठी उपयोग होतो.

सूक्ष्मजैव आमापनाच्या प्रमुख पद्धती: जीवनसत्त्वाचे आमापन : काही कवकांच्या वाढीसाठी ब वर्गीय जीवनसत्त्वांची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे यीस्टच्या अर्कात ब वर्गीय जीवनसत्त्वे असतात. हाही शोध १९३३च्या सुमारास लागला. या शोधांच्या अनुषंगाने फायकोमायसीस बुरशी वापरून ब जीवनसत्त्वाचे आमापन बहुधा प्रथमच करण्यात यश आले. याच सुमारास लॅक्टोबॅसिलस वंशातील सूक्ष्मजंतूंना वाढीसाठी ९ जीवनसत्त्वांची आणि १८ ॲमिनो अम्लांची आवश्यकता असते, असे आढळून आले. त्या पदार्थांच्या आमापनासाठी या सूक्ष्मजंतूंचा उपयोग होऊ लागला. १९४० पर्यंत ब, ब, ब ही जीवनसत्त्वे, पँटोथेनिक व निकोटिनिक अम्ले, बायोटीन आणि पॅराॲमिनोबेंझॉइक अम्ल ही शुद्ध स्वरूपात उपलब्ध झाली. त्या सर्वांचे आमापन सूक्ष्मजैव पद्धतीनेच शक्य झाले. साधी ८ जीवनसत्त्वे, अनेक तत्सम पदार्थ व १८ ॲमिनो अम्ले यांचे आमापन सूक्ष्मजैव पद्धतीने केले जाते. त्याकरिता मुख्यत्वे लॅक्टोबॅसिलस वंशातील सूक्ष्मजंतू उपयुक्त ठरलेले आहेत.


बायोटिनाचे सूक्ष्मजैव आमापन : लॅक्टोबॅसिलस प्लँटेरम या जातीचे सूक्ष्मजंतू या आमापनाकरिता वापरतात. कारण बायोटिनाविरहीत संवर्धकात त्यांची वाढ होत नाही. जंतू वाढविण्यासाठी विशिष्ट प्रकारचे संवर्धक वापरतात. या संवर्धकात बायोटिनाशिवाय सूक्ष्मजंतूंच्या वाढीसाठी शर्करा, केसीन हायड्रॉलिसेट, पोटॅशियम फॉस्फेट, सिस्टीन, ट्रिप्टोफेन, जीवनसत्त्वे, लवण वगैरे असतात. या द्रव संवर्धकाचे ५ मिलि. भागांश प्रत्येक परीक्षा-नलिकेत समाविष्ट करतात. अशा परीक्षा-नलिकांचे दोन गट ठेवतात. एका गटातील नलिकांत शुद्ध बायोटिनाचे अत्यल्प प्रमाणापासून अधिक प्रमाणापर्यंतचे अंश मोजून ठाकतात. दुसऱ्या गटातील नलिकांत ज्या ज्या चाचणीनमुन्याच्या पदार्थातील बायोटिनाचे प्रमाण काढावयाचे त्याचा विद्राव करून त्याचे निरनिराळे भागांश करून घालतात. निर्जंतुकीकरणानंतर सर्व नलिकांत लॅ. प्लँटेरम जंतूंच्या द्रव संवर्धकावरील वाढीचा १-१ थेंब पुन्हा वाढीच्या मापनाकरिता टाकतात. या सर्व परीक्षा-नलिका त्यानंतर पोषक तपमानावर ठेवतात. चाळीस तासांनंतर सूक्ष्मजंतूंची कमी अधिक प्रमाणात सर्व नलिकांत वाढ दिसते. त्यामुळे संवर्धकात गढुळता येते. तिचे मापन प्रकाशमापन पद्धतीनुसार गढुळतामापकाच्या साहाय्याने करतात. या दोन गटांपैकी एका गटात मोजलेले बायोटीन समाविष्ट केलेले असल्याने जंतूंची वाढ व त्याकरिता लागणारे बायोटिनाचे प्रमाण, यांचे एकघाती फलन झालेले आढळते. त्यावरून ‘प्रमाण आलेख’ तयार केला जातो. या आलेखाच्या आधारे चाचणीकरिता वापरलेल्या नमुन्यातील बायोटिनाचे प्रमाण काढता येते. या पद्धतीशिवाय संवर्धकात जंतूंच्या वाढीमुळे तयार झालेल्या अम्लाचे मापन रासायनिक पद्धतीने करून त्यावरूनही बायोटिनाचे प्रमाण काढता येते. अर्थात या पद्धतीतही प्रमाण आलेख तयार करावा लागतोच.

निसर्गात बायोटीन मुक्त स्वरूपात क्वचितच आढळते, बहुधा ते बद्ध स्वरूपात असते. ते मुक्त स्वरूपात आणण्यासाठी त्यावर सल्फ्यूरिक अम्लाची विक्रिया करावी लागते. त्यामुळे बद्ध व मुक्त अशा दोन्ही प्रकारच्या बायोटिनांच्या आमापनासाठी पाण्यातील विद्रावात असे चाचणी नमुन्याचे दोन्ही प्रकार घ्यावे लागतात.

लॅ. प्लँटेरम व्यतिरिक्त लॅ. केसिआय आणि न्यूरोस्पोरा क्रासा हे कवक, यांचाही बायोटिनाच्या आमापनासाठी उपयोग होतो. इतर जीवनसत्त्वे आणि त्यांच्या आमापनासाठी वापरण्यात येणाऱ्या सूक्ष्मजीवांची यादी अशी:

जीवनसत्वे व तत्सम पदार्थ आमापनाकरिता वापरण्यात येणाऱ्या सूक्ष्मजीवांची नावे.
(अ) फॉलिक अम्लवर्गीय पदार्थ (१)स्ट्रेप्टोकॉकस फीकॅलिस, (२)लॅ. केसिआय,(३)टेट्राहायमेना गेलेआय (४)बॅसिलस को-अग्युलन्स, (५)पेडियोकॉकस सेरेव्हिसिया
(आ) पँटोथेनिक अम्ल, इनॉसिटॉल, पायरिडॉक्सीन (१)लॅ. अरॅबिनोसस,(२)सॅकरोमायसिस कार्लसवर्गोन्सिस
(इ) थायामीन (१)लॅ. व्हिरिडिसेन्स,(२)लॅ. फर्मेन्टाय
(ई) जीवनसत्व ब१२ (१)ऑक्रोमोनस माल्टामेन्सिस,(२)लॅ. लाईचमनाय
(उ) लिपॉइक अम्ल लॅ. लॅक्टिस
(ऊ) कोलीन न्यूरोस्पोरा क्रासा
(ए) रिबोफ्लाविन पायरिडॉक्सॉल लॅ. केसिआय

ॲमिनो अम्लांचे आमापन : ॲमिनो अम्लांच्या आमापनासाठीही जीवनसत्त्व आमापनाच्याच पद्धती वापरतात. लॅ. ॲरॅबिनोसस सूक्ष्मजंतूंचा आमापनासाठी उपयोग केला जातो. त्यांच्या वाढीकरिता ९ ॲमिनो अम्लांची आवश्यकता असते. या जंतूंव्यतिरिक्त स्ट्रेप्टोकॉकस आणि ल्यूकॉनोस्टॉक वंशांतील सूक्ष्मजंतूंचाही आमापनासाठी वापर केला जातो. स्ट्रे. पिल्कॅलिस सूक्ष्मजंतू वापरून आर्जिनीन, ग्लुटामिक अम्ल, हिस्टिडीन, आयसोल्युसीन, लायसीन, मिथिओनीन, थ्रिओनीन, व्हॅलीन व ट्रिप्टोफेन या ९ प्रकारच्या ॲमिनो अम्लांचे आमापन करता येते. ल्यूकॉनोस्टॉक मेसेटेरिकस सूक्ष्मजंतू ॲलॅनीनव्यतिरिक्त सर्व ॲमिनो अम्लांच्या आमापनासाठी वापरतात. ल्यू. सिट्रोव्होरम जातीचे सूक्ष्मजंतू मात्र ॲलॅनिनाकरिता उपयुक्त आहेत. याशिवाय लॅक्टोबॅसिलस ॲरॅबिनोससमुळे ग्लुटामिक अम्ल, ल्युसीन, आयसोल्युसीन, व्हॅलीन, ट्रिप्टोफेन व फिनिल ॲलॅनीन या ॲमिनो अम्लांचे आमापन करता येते. तसेच लॅ. डेलब्रुकायमुळेही फिनिल ॲलॅनीन, टायरोसीन व सेरीन यांचेही आमापन करता येते.

जीवनसत्त्वांच्या आमापनासाठी उपयुक्त ठरलेल्या दोन्ही पद्धती (अम्लतामापन आणि वाढीचे मापन) ॲमिनो अम्लांकरिता वापरता येतात. या पद्धतीतील फरक फक्त संवर्धक, तपमान इत्यादींच्या बाबतीतच असतो.

प्रतिजैव पदार्थांचे आमापन :  प्रतिजैव पदार्थांचे मुख्य कार्य सूक्ष्मजीवांची वाढ थांबविणे हे असल्याने त्यांच्या आमापनात त्यांच्यातील सूक्ष्मजंतुनिरोधक शक्तीचे मापन करणे हे मूलतत्त्व ठरते. त्या अनुरोधानेच आमापनाच्या पद्धती योजिल्या गेल्या. या पद्धतीत सूक्ष्मजंतू संवर्धकावर प्रतिजैव पदार्थांच्या सान्निध्यात वाढविले जातात व प्रतिजैव पदार्थांमुळे वाढीत होणारे निरोधन निरनिराळ्या पद्धतींनी मोजले जाते. याकरिता द्रव संवर्धकात सूक्ष्मजंतूंच्या वाढीमुळे आढळणारी गढुळता मोजण्याची प्रकाशमापन पद्धती वापरतात. याशिवाय घन संवर्धकावर सूक्ष्मजंतूंच्या वाढीभोवती प्रतिजैव पदार्थामुळे निर्माण होणाऱ्या निरोधक वलयांचा व्यास मोजूनही आमापन करता येते. या पद्धती अशा :

(अ) प्रकाशमापन पद्धत : या पद्धतीनुसार प्रथम ज्ञात शक्तीच्या प्रतिजैव पदार्थांचे (उदा., पेनिसिलिनाचे) निरनिराळे विद्राव करून प्रत्येकाचा ठराविक भागांश (०·५ मिलि.) परीक्षा-नलिकेतील १० मिलि. संवर्धकात समाविष्ट केला जातो. नंतर प्रत्येक परीक्षा-नलिकेत स्टॅफिलोकॉकस ऑरियस या सूक्ष्मजंतूंच्या वाढीचा एक थेंब टाकतात. ३६-३८ से. तपमानावर तीन तास वाढ झाल्यानंतर प्रत्येक नलिकेतील सूक्ष्मजंतूंची वाढ, संवर्धकात आलेली गढुळता मोजून अजमाविली जाते. त्यावरून प्रतिजैव पदार्थांची सांद्रता व त्यामुळे झालेली वाढ यांचा प्रमाण आलेख तयार केला जातो.

आमापन करावयाच्या पेनिसिलिनाच्या चाचणीच्या (शुद्ध स्वरूपात, मलम, गोळ्या, इंजेक्शने वगैरे) नमुन्याचे असेच विद्राव तयार करून वर उल्लेखिल्याप्रमाणेच सर्व क्रिया केली जाते. सूक्ष्मजंतूंच्या वाढीमुळे होणाऱ्या गढुळतेचे मापन केल्यानंतर त्याची वर नमूद केलेल्या प्रमाण आलेखाशी तुलना करतात. त्यावरून चाचणी नमुन्यातील पेनिसिलिनाचे प्रमाण ठरविता येते.

पेनिसिलिने ही एफ, जी आणि के अशा विविध प्रकारांत आढळतात. आमापनासाठी पेनिसिलीन-जीचा वापर होत असल्याने चाचणी नमुन्यातील पेनिसिलिनचे प्रमाण जी-प्रकार गृहीत धरून ठरविले जाते. कारण प्रमाण आलेख पेनिसिलीन-जी करताच काढला जातो. त्यामुळे चाचणी नमुन्यात पेनिसिलिनाचा इतर प्रकार असला, तरी त्याचे प्रमाण पेनिसिलीन-जी प्रकारावरच आधारलेले असते.

(आ) आगर प्लेट पद्धत : या पद्धतीत पेट्री बशा (उथळ, वर्तुळाकार व विविध व्यासांच्या काचेच्या झाकणासहित बशा पेट्री या जंतुशास्त्रज्ञांच्या नावावरून हे नाव पडले आहे.) घन संवर्धकासाठी वापरतात. आगर [विशिष्ट सागरी शैवलांपासून मिळणारा जेलीसारखा पदार्थ, → आगर] घालून सवर्धक घन केला जातो. सवर्धक घन होण्यापूर्वींच (४५ से.) पेट्री बशांत ओततात व त्यात सूक्ष्मजंतूंच्या वाढीचा थोडा भाग समाविष्ट करून नीट मिळविला जातो. घन झाल्यानंतर संवर्धकाच्या पृष्टभागावर काचेच्या नळीचे पेल्यासारखे लहान तुकडे (दोन्ही बाजूस उघडे असलेले) ठेवतात. थोडा दाब दिल्याने ते सवर्धकास चिकटतात. अशा पेल्यांऐवजी कित्येकदा सवर्धकातच कॉर्क बोअररासारख्या (बुचाला भोक पाडण्याऱ्या साधनासारख्या) उपकरणाने पेल्यासारखे खळगे करतात. नंतर या पेल्यांमध्ये पेनिसिलिनाच्या ज्ञात सांद्रतेचे वेगवेगळे विद्राव अल्पांशाने (०·१ मिलि.) टाकतात. दहा सेंमी. व्यासाच्या बशीत असे ५-६ पेले बसविता येतात. विशिष्ट तपमानावर ठेवल्यानंतर सवर्धकावर जंतूंची वाढ होते. परंतु पेल्याभोवती सवर्धकात पेनिसिलिनाचा शिरकाव झाल्याने वाढ झालेली आढळत नाही. त्यामुळे पेल्याभोवती निर्जंतुक गोल पट्टे अथवा वलये आढळतात. या पट्ट्यांचे क्षेत्रफल पेनिसिलिनाच्या सांद्रतेवर अवलंबून असल्याने अधिक सांद्रतेचा विद्राव असलेल्या पेल्याभोवती मोठा पट्टा अथवा मोठे वलय आढळते. प्रत्येक वलयाचा व्यास मोजून नोंद केली जाते. पेनिसिलिनाच्या विद्रावाची सांद्रताही ज्ञात असते. यावरून प्रमाण आलेख तयार केला जातो. प्रतिजैव पदार्थांच्या चाचणी नमुन्याचे आमापन करण्याकरिता अशाच पद्धतीने या नमुन्याचे अनेक विद्राव करून त्यांच्यामुळे निर्माण होणारी निरोधक वलये मोजावी लागतात व त्यांची प्रमाण आलेखाशी तुलना केल्यानंतर त्यावरून चाचणी नमुन्यातील पेनिसिलिनाचे प्रमाण किती होते हे ठरविता येते.


काही प्रयोगशाळांत फार मोठ्या आकाराच्या बशा वापरतात. काचेच्या पेल्याऐवजी गाळणकागदाचे निर्जंतुक केलेले लहान गोल तुकडे पेनिसिलिनाच्या विद्रावात बुडवून वापरण्याची प्रथाही आहे. असे ज्ञात सांद्रतेचे तयार तुकडे उपलब्ध असतात.

प्रतिजैव आमापनासाठी तपमान साधारणतः३० – ३२ से. इतके ठेवावे लागते. आमापनाचा निष्कर्ष १६-१८ तासांनंतर मिळू शकतो. या प्रकारच्या आमापन पद्धतीचे वर्णन येथे अगदी त्रोटक स्वरूपात केलेले आहे. प्रत्यक्षात इतर अनेक बाबींची तपशीलवार काळजी घ्यावी लागते. हल्ली अनेक नवीन उपकरणे व यांत्रिक सोयी उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे शेकडो नमुन्यांचे आमापन प्रतिदिनी करता येते.

स्ट्रेप्टोमायसीन, क्लोरोमायसेटीन वगैरे प्रतिजैव पदार्थांचे आमापन अशाच पद्धतींनी करता येते. याकरिता मात्र सूक्ष्मजंतू, तपमान, सवर्धके वेगवेगळी वापरावी लागतात. फरक फक्त तपशीलात आढळतो.

काही रोगोपचारात रुग्णावर प्रतिजैव पदार्थांची औषधयोजना चालू असता रुग्णाच्या शरीराबाहेर प्रतिजैव पदार्थांचा किती अंश टाकला जातो, तसेच रक्तातही प्रतिजैव पदार्थांचा किती अंश आढळतो, हे कळणे आवश्यक ठरते. त्याकरिता रक्त, मूत्र वगैरे पदार्थांतील प्रतिजैव पदार्थांचे आमापन करणे क्रमप्राप्त ठरते. परंतु अशा प्रतिजैव पदार्थांचे प्रमाण किती असू शकेल याची काहीच कल्पना करता येत नसल्याने, आमापनासाठी योजिलेल्या सूक्ष्मजंतूंवर त्या प्रतिजैव पदार्थाच्या वेगवेगळ्या सांद्रतांचा प्रभाव कसा पडतो हे माहीत असणे इष्ट ठरते. त्याकरिता अशा प्रकारची माहिती आमापनापूर्वी उपलब्ध असावी लागते.

जंतुनाशकांचे आमापन: जंतुनाशकांचे कार्य सूक्ष्मजीवांचा नाश करणे, हे असल्याने त्यांच्या आमापनासाठीही सूक्ष्मजीवांचा उपयोग आवश्यक ठरतो. जंतुनाशकांचे मूल्यमापन करण्याकरता त्यांची तुलना फिनॉल अथवा कारबॉलिक अम्लाशी केली जाते. कारण ते एक जुने व अधिक उपयोगात असलेले जंतुनाशक आहे. जंतुनाशकांच्या मूल्यमापनाकरिता त्यांचा ‘फिनॉल गुणांक’ आमापनाने ठरविला जातो. फिनॉलाची सांद्रता एक असे मानून त्यानुसार इतर जंतुनाशकांची सांद्रता अजमावली जाते. अर्थात फिनॉल गुणांक कमी असलेली जंतुनाशके फिनॉलापेक्षा प्रभावाने कमी व एकाहून फिनॉल गुणांक अधिक असलेली जंतुनाशके फिनॉलापेक्षा अधिक प्रभावी असतात.

सूक्ष्मजैव आमापनानेच फिनॉल गुणांक काढता येतो. ही आमापनाची कार्यपद्धती सर्वसाधारणत: वर केलेल्या विवेचनासारखीच आहे. फिनॉलाच्या निरनिराळ्या सांद्रतेचे विद्राव आणि चाचणी नमुन्याच्या जंतुनाशकाचे तसेच विद्राव परीक्षा-नलिकांत ठेवतात. त्यात टायफॉइड ज्वरोत्पादक सूक्ष्मजंतू घालतात. प्रत्येक नलिकेत ५ मिलि. विद्राव ठेवतात व त्यात ०·५ मिलि. टायफॉइड जंतूंची वाढ मिसळतात. यासाठी टायफॉइड जंतूंची जात वापरण्यातही वैशिष्ट्ये ठेवतात. जी जात फिनॉलाच्या १ : ८० विद्रावात व २० से. तपमानावर ठेवल्याने १० मिनिटांत नाश पावेल, अशीच जात निवडतात. अशा तऱ्हेने सर्व परीक्षा-नलिका २० से. तपमानावर ठेवतात. त्यानंतर ५, १०, १५ मिनिटांच्या अवधीने प्रत्येक नलिकेतील विद्रावाचा अंश दुसऱ्या परीक्षा-नलिकेत जंतुनाशकविरहित सवर्धकात मिसळला जातो. या नलिकांत सूक्ष्मजंतूंची वाढ होते किंवा नाही हे पाहिले जाते. फिनॉल गुणांक पुढील समीकरणावरून काढता येतो.

जंतुनाशकाचा विद्राव (१० मिनिटांत जंतूंचा नाश व्हावा पण ५ मिनिटांत होऊ नये)

फिनॉल गुणांक =     ————————

फिनॉलाचा विद्राव (”)

उदा., जंतुनाशकाचा १ : ५०० विद्राव व फिनॉलाचा १ : १०० विद्राव असल्यास फिनॉल गुणांक = ५००/१०० = ५ येईल. यावरून आमापन केलेले जंतुनाशक फिनॉलापेक्षा ५ पटीने अधिक कार्यक्षम आहे असा निष्कर्ष काढता येतो.

फिनॉल गुणकावरून जंतुनाशकाची सर्वच माहिती मिळू शकते असे नाही. एकतर या आमापन पद्धतीत विद्राव करण्याकरता पाण्याचा उपयोग होत असल्याने पाण्यात न मिसळणाऱ्या जंतुनाशकांच्या बाबतीत या पद्धतीचा उपयोग होत नाही. त्याशिवाय फिनॉलाची कार्यपद्धती तुलना केल्या जाणाऱ्या जंतुनाशकाच्या कार्यपद्धतीसारखीच असू शकत नाही. तसेच या आमापन पद्धतीत जंतुनाशकाची कार्यक्षमता टायफॉइड ज्वरोत्पादक सूक्ष्मजंतू वापरूनच ठरविली जाते, त्यामुळे इतर सूक्ष्मजंतूंच्या बाबतीत काय फरक पडतो हे कळू शकत नाही. यासाठी जंतुनाशकाच्या फिनॉल गुणांकाच्या वीसपट विद्राव तयार करून त्याचा वेगवेगळ्या जंतूंवर काय परिणाम होतो ते सामान्यत: पाहण्याची प्रथा असते. यास ‘उपयुक्त विरलता’ अशी संज्ञा देतात.

कवकनाशकांचे आमापन : कवकनाशके ही जंतुनाशकेच असल्याने त्यांचे आमापन वरील पद्धतीनेच केले जाते. फरक फक्त जंतूंच्या जातीत व इतर तपशीलात आढळतो. कवकनाशके प्रामुख्याने तांबे, गंधक, पारा, जस्त इ. घटकांपासून तयार केली जातात. त्याशिवाय संपूर्णतया कार्बनी कवकनाशकेही उपलब्ध आहेत. त्यांचे अंतिम कार्य वनस्पतीचे रोगनिर्मूलन असल्याने त्यांची कार्यक्षमता प्रत्यक्ष पिकावर प्रयोग करूनच पाहणे सयुक्तिक ठरते. हे करण्यापूर्वी अर्थातच कवकनाशकांचे प्रमाण व क्रियाशीलता प्रयोगशाळेत आमापनामुळे अगोदर काढणे आवश्यक ठरते. कवकनाशकांचे निरनिराळे विद्राव करून प्रत्येक विद्रावाची कवकनाशक शक्ती काढावी लागते. त्यासाठी विशिष्ट कवकाचे बीजाणू (वनस्पतीचा लाक्षणिक प्रजोत्पादक भाग) व कवकनाशकांचे निरनिराळे विद्राव यांचा काचपट्टीवर संयोग करून काही अवधी दिल्यानंतर बीजाणूंच्या अंकुरण्याचे (रुजण्याचे) प्रमाण सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करून मोजले जाते. ज्या विद्रावामुळे ५० टक्के बीजाणूंचे अंकुरण होत नाही तो विद्राव प्रभावी समजावा. यास परिणामकारक प्रमाण ५० असे म्हणतात.

वनस्पती रोगनिर्मूलनाव्यतिरिक्त कवकनाशकांचा उपयोग अनेक वस्तूंचा कवकांमुळे होणारा नाश टाळण्याकडे करतात. लाकडी खांब, लोहमार्गाखालील लाकडी आडवे ओंडके, तंबूचे कापड, सैनिकी कपडे इत्यादींचे कवकांमुळे नुकसान होते. अशा वस्तूंवर उपयोगात येणाऱ्या कवकनाशकांचेही आमापन सूक्ष्मजैव पद्धतीनेच केले जाते. फरक फक्त तपशीलात असतो.

सारांश, ज्या पदार्थांचे आमापन रासायनिक पद्धतींनी शक्य नसते त्यांच्या आमापनासाठी सूक्ष्मजीवांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे, हे या विवेचनावरून स्पष्ट होईल.

भिडे, वि. प.

पहा: जीवनसत्त्वे ॲमिनो अम्ले प्रतिजैव पदार्थ जंतुनाशके कवकनाशके.

संदर्भ : 1. Barton-Wright, E. C. The Microbiological Assay of theVitamin B-Complex and Amino Acids, New York,

1952.

2. Burn, J. H. Biological Standardization, New York, 1950.

3. Colawick, S. P. Kaplan, N. O. Methods in Enzymology, Vol. 3, New York, 1957.

4. Emmens, C. W. Principles of Biological Assay, London, 1948.

5. Munch, J. C. Bioassays : A Handbook of Quantitative Phearmacology, Baltimore, 1931.