हॉर्‌व्हिट्झ, हॉवर्डरॉबर्ट : (८ मे १९४७). अमेरिकन जीवशास्त्रज्ञ. क्रमान्वित कोशिका-मृत्यू या महत्त्वाच्या यंत्रणेद्वारा (ॲपोप्टॉसिस) विशिष्ट जनुके ऊतक आणि अवयव विकासाचे कसे नियंत्रण करतात, यांसंबंधी शोध लावल्याबद्दल हॉर्व्हिट्झ यांना २००२ सालचे शरीर-क्रियाविज्ञान किंवा वैद्यक या विषयाचे नोबेल पारितोषिक सिडनी ब्रेनर आणि जॉन ई. सल्स्टन यांच्यासमवेत विभागून मिळाले. हॉर्व्हिट्झ यांना नोबेल पारितोषिकाची एक-तृतीयांश रक्कम मिळाली. 

 

हॉवर्ड रॉबर्ट हॉर्व्हिट्झ
 

 हॉर्व्हिट्झ यांचा जन्म शिकागो (इलिनॉय, अ. सं. सं.) येथे झाला. त्यांनी बी.ए. (१९७२) आणि पीएच्.डी. (१९७४) या पदव्या हार्व्हर्ड विद्यापीठातून संपादन केल्या. मेडिकल रिसर्च कौन्सिल (इंग्लंड) येथे ब्रेनर यांच्याबरोबर काही काळ काम केल्यानंतर हॉर्व्हिट्झ १९७८ मध्ये मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे जीवशास्त्राचे सहायक प्राध्यापक झाले. नंतर १९८६ मध्ये ते तेथे पूर्णवेळ प्राध्यापक (डेव्हिड एच्. कॉख प्राध्यापक) झाले. 

 

हॉर्व्हिट्झ यांनी १९७० मध्ये क्रमान्वित कोशिका-मृत्यू संबंधीचा अभ्यास सुरू केला. सर्व प्राण्यांमध्ये सामान्य नैसर्गिक वाढीसाठी ही प्रक्रिया आवश्यक असते. मनुष्याचा गर्भ विकसित होत असताना शरीराचा आकार तयार होतेवेळी खूप मोठ्या प्रमाणावर कोशिका नष्ट होतात. उदा., सुरुवातीला दोन बोटांमध्ये असलेली ऊतके क्रमान्वित कोशिका-मृत्यूमुळे नष्ट होऊन बोटे व पादांगुष्ठे तयार होतात. याचप्रमाणे मेंदूचा विकास होत असताना निर्माण होणाऱ्या अतिरिक्त तंत्रिका कोशिका नष्ट होतात. साधारण प्रौढ मनुष्यात दररोज जवळपास एक लक्ष कोटी नवीन कोशिका तयार होतात आणि तेवढ्याच कोशिका आरोग्य टिकून राहण्याकरिता व अतिरिक्त कोशिकांमुळे शरीर अवाजवी वाढू नये यांकरिता त्या नष्ट होणे आवश्यक असते. 

 

हॉर्व्हिट्झ यांनी कोणत्या विशिष्ट जनुकाच्या कार्यक्रमाद्वारे कोशिकांचा मृत्यू नियंत्रित होतो यावर आपले संशोधन केंद्रित केले होते. ब्रेनर यांनी कोशिका-मृत्यूच्या अभ्यासासाठी शोधून काढलेल्या आदर्शवत सूत्रकृमी सीनोरहॅब्डिटिस एलेगन्स यावर हॉर्व्हिट्झ यांनी संशोधन केले. १९८६ मध्ये त्यांनी कोशिका नष्ट करण्याच्या प्रक्रियेत भाग घेणाऱ्या दोन जनु-कांचा (सीईडी-३ व सीईडी-४) शोध लावला. नंतर त्यांनी असे दाखवून दिले की, सीईडी-९ हा जनुक सीईडी-३ व सीईडी-४ या जनुकांच्या कोशिका मारण्याच्या क्रियेत हस्तक्षेप करून कोशिकांचे संरक्षण करतो. मनुष्यामध्ये सीईडी-९ या जनुकासारखा प्रतिरूप जनुक असतो, हे त्यांनी सिद्ध करून दाखविले. नंतर शास्त्रज्ञांच्या असे लक्षात आले की, सी. एलेगन्स मध्ये जी जनुके कोशिका नष्ट करण्याच्या प्रक्रियेचे नियंत्रण करतात त्या बहुतेक जनुकांसारखी प्रतिरूप जनुके मनुष्यात असतात. क्रमान्वित कोशिका-मृत्यूसंबंधीच्या ज्ञानामुळे जीवशास्त्राच्या विकासात भर पडली. तसेच कर्करोगाच्या उपचारासाठीही त्याचा उपयोग होत आहे. 

 

हॉर्व्हिट्झ हे अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस आणि अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ मायक्रोबायॉलॉजी या संस्थांचे सभासद आहेत. त्यांना अनेक पुरस्कार व मानसन्मान मिळाले. त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे : तंत्रिका जीवविज्ञानमधील स्पेन्सर ॲवॉर्ड (१९८६), रेणवीय जीवविज्ञानमधील यू. एस्. स्टील फाउंडेशन ॲवॉर्ड (१९८८), जेनेटिक्स सोसायटी ऑफ अमेरिका ॲवॉर्ड (२००१) इत्यादी. 

भारस्कर, शिल्पा चं.