हार्डेन (हार्डन), सर आर्थर : (१२ ऑक्टोबर १८६५–१७ जून १९४०). इंग्रज जीवरसायनशास्त्रज्ञ. शर्करेचे किण्वन (आंबविण्याची क्रिया) आणि त्यामधील एंझाइमांची (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त पदार्थांची) क्रिया यांसंबंधीच्या बहुमोल कार्याबद्दल त्यांना जर्मन रसायनशास्त्रज्ञ हान्स कार्ल आउगुस्ट सायमन फोन ऑयलर-केल्पिन यांच्याबरोबर १९२९ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले. तसेच या दोघांनी को-एंझाइम–विशेषतः को-झायमेज–याची संरचना व कार्य यांबद्दल विशेष संशोधनकार्य केले.

सर आर्थर हार्डेन

हार्डेन यांचा जन्म मँचेस्टर (इंग्लंड) येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण व्हिक्टोरिया पार्क येथील खाजगी शाळेत (१८७३–७७) आणि महाविद्यालयीन शिक्षण टेटनहॉल कॉलेज, स्टॅफर्डशर (१८७७–८१) येथे झाले. त्यांनी रसायनशास्त्राची पदवी मँचेस्टर विद्यापीठातील ओवेन्स कॉलेजमधून घेतली (१८८५). त्यांना रसायनशास्त्रातील डाल्टन शिष्यवृत्ती मिळाली (१८८६) आणि एर्लांगेन विद्यापीठात ओटो फिशर यांच्याबरोबर संशोधन करून त्यांनी पीएच्.डी. पदवी संपादन केली (१८८८). त्यांनी मँचेस्टर विद्यापीठात प्रपाठक प्रयोगदर्शक म्हणून काम केले (१८८८–९७). ते १८९७ मध्ये लंडनच्या जेन्नर इन्स्टिट्यूट ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसीन या संस्थेमध्ये दाखल झाले आणि तेथे ते जीवरसायनशास्त्र विभागाचे प्रमुख होते (१९०७–३०). ते लंडन विद्यापीठात जीवरसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले (१९१२). निवृत्तीनंतरही (१९३०) त्यांनी संशोधनकार्य सुरूच ठेवले.

हार्डेन यांनी कार्बन डाय-ऑक्साइड व क्लोरीन यांच्या मिश्रणावर होणारी प्रकाशाची क्रिया यांसंबंधी अध्ययन केले. त्यासाठी त्यांनी जेन्नर इन्स्टिट्यूटचे अद्ययावतीकरण केले आणि जैविक आविष्काराच्या अन्वेषणासाठी त्यांच्या पद्धतींचा वापर केला. उदा., सूक्ष्मजंतूंची रासायनिक क्रिया व अल्कोहॉलीय किण्वन. त्यांनी ग्लुकोजाचे विघटन आणि यीस्ट कोशिका याचा अभ्यास केला. यीस्टमुळे होणारे शर्करेचे किण्वन यांविषयी त्यांनी जवळजवळ वीस वर्षे सातत्याने संशोधन केले. त्यांच्या या संशोधनाचा उपयोग सर्व सजीवांतील मध्यस्थ चयापचय प्रक्रियेसंबंधीचे ज्ञान विकसित होण्यात झाला.

हार्डेन यांचे जीवनसत्त्वांच्या क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. त्यांनी स्कर्व्हीरोधक व मज्जातंतुदाहरोधक जीवनसत्त्वे आणि त्यांचा अन्न व पेयांतील आढळ यांवर अनेक प्रबंध लिहिले. तसेच त्यांनी अल्कोहॉलिक फर्मेंटेशन हा ग्रंथ प्रकाशित केला (१९११). त्यांनी एच्. ई. रॉस्को यांच्यासमवेत ए न्यू व्ह्यू ऑफ द ओरिजिन ऑफ डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी (१८९६) हा ग्रंथही प्रकाशित केला. ते द बायोकेमिकल जर्नल या नियतकालिकाचे सहसंपादक होते (१९१३–३०) . हार्डेन यांना रॉयल सोसायटीचे डेव्ही पदक (१९३५) तसेच सर (नाइट) हा किताब (१९३६) यांसारखे अनेक मानसन्मान मिळाले.

हार्डेन यांचे बोर्न (बकिंगहॅमशर, इंग्लंड) येथे निधन झाले.

 मगर, सुरेखा अ.