झगलूल पाशा, साद : (? जुलै १८५७–२३ ऑगस्ट १९२७). ईजिप्तचा स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रभावी नेता आणि वफ्द पक्षाचा पुढारी. एल् गार्बीया प्रांतातील इब्यान गावी जन्म. कैरोच्या अल्-अझार विद्यापीठात विधी व धर्मविद्या यांचे शिक्षण घेऊन सैन्यात अधिकारी म्हणून भरती झाला. ब्रिटिशांनी ईजिप्त घेतल्यानंतर अरबी पाशाने केलेल्या उठावात भाग घेतल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली (१८८२). तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने काही दिवस वकिली केली. पुढे १८९३ मध्ये त्याची न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली.  यानंतरच्या काळात स्वातंत्र्य व लोकशाहीकरिता आपल्या पक्षाची संघटना त्याने वाढविण्याचा प्रयत्न केला. १९०९ मध्ये त्याची शिक्षणमंत्री व १९१० मध्ये न्यायमंत्री म्हणून नियुक्ती झाली. थोड्याच काळात ईजिप्शियन नॅशनॅलिस्ट पक्षाचा (वफ्दचा) तो प्रमुख नेता झाला.

पहिल्या महायुद्धानंतर वुड्रो विल्सनच्या चौदा तत्त्वांप्रमाणे ईजिप्तला पूर्ण स्वातंत्र्य व जास्तीत जास्त सुधारणा मिळविण्यासाठी त्याने हरएक प्रकारे प्रयत्न केले. परंतु ब्रिटिशांनी त्यास दाद दिली नाही, तेव्हा ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्यास त्याने सुरुवात केली. त्याबद्दल १९१९ मध्ये त्याला हद्दपार करण्यात आले. १९२३ मध्ये तुरुंगातून सुटताच १९२४ च्या निवडणुकीत त्याने निर्विवाद बहुमत मिळवून पंतप्रधानपद मिळविले व मंत्रिमंडळाची स्थापना केली. ईजिप्तला पूर्ण स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ब्रिटिश पंतप्रधान मॅकडॉनल्डबरोबर चर्चा केली तथापि ही चर्चा निष्फळ ठरली. या अपयशामुळे ईजिप्तमध्ये इंग्रजांच्या हत्याकांडास सुरुवात झाली. सूदानचा गव्हर्नर जनरल सर ली स्टक याचा कैरोत खून झाला. ब्रिटिशांनी कडक धोरण स्वीकारले. त्यामुळे झगलूल पाशास १९२४ मध्ये पंतप्रधानपदाचा राजीनामा देणे भाग पडले. तरीही उर्वरित आयुष्यात ईजिप्तच्या राजकारणातील त्याचे नेतृत्व अखेरपर्यंत कायम राहिले.                            

भिडे, ग. ल.