सॉल : ( इ. स. पू. अकरावे शतक ). इझ्राएलचा थोर पण अभागी राजा. त्याच्याविषयी विश्वसनीय अधिकृत माहिती ज्ञात नाही तथापि मौखिक परंपरा, दंतकथा आणि बायबल चा जुना करार ( ओल्ड टेस्टामेंट,सॅम्युएल भाग १–९–३१) यांमधून काही माहिती मिळते. सॉलचा जन्म बेंजामिन जमातीतील किशनामक एका जमातप्रमुखाच्या पोटी गिबीह या गावी झाला. त्यावेळी इझ्राएलमध्ये जुन्या न्यायाधिशांचा ( सॅम्युएल नियुक्त जजीस) अंमल होता आणि इझ्राएल हे एक विभिन्न जमातींचे असंघटित बंधमुक्त संघराज्य होते. त्यामुळे वारंवार फिलिस्टाइन लोक त्यांवर हल्ले करीत असत. सॉलने बालपणी तत्कालीन प्रथेनुसार लष्करी शिक्षण घेतले व काही लढायांमधून पराक्रमही केला. त्यामुळे तेथील प्रमुख बारा जमातींनी हिब्रू प्रतिकार तीव्रतर करण्यासाठी या तडफदार शूर तरुणाची राजा म्हणून निवड केली. या निवडीच्या संदर्भात जुन्या करारांतील दोन लिखित मुद्दे सॅम्युएलच्या पहिल्या भागात (९–१ आणि १०–१६) दिलेले आढळतात. त्यांपैकी परंपरागत दंतकथेनुसार ईश्वराने सॅम्युएल प्रेषिताद्वारे सॉलला राजा करण्याचा आदेश दिला, तर दुसऱ्या मतानुसार सॉलच्या अमोनाईटांवरील विजयानंतर लोकांनीच त्यास नेतेपदी निवडले आणि स्थानिक न्यायाधीश (यहुदी जजीस ) यांच्या जागी राजा म्हणून बसविले. त्याने इ. स. पू. १०२० ते १००० दरम्यान राज्य केले असावे, असा परंपरागत दाखला मिळतो. त्याची राजधानी गिलगाल (प्राचीन पॅलेस्टाइन ) येथे होती आणि फारच थोडा प्रदेश त्याच्या अंमलाखाली होता परंतु त्याने आपला मुलगा जोनाथन आणि स्वयंसेवी तरुणांची फौज यांच्या जोरावर अल्पावधीतच फिलिस्टाइन लोकांवर विजय मिळवून त्यांना मध्यवर्ती पर्वतश्रेणीतून हाकलून लावले. तसेच आपला चुलतभाऊ ॲबनेर यास लष्कराचा प्रमुख सेनापती नेमले. या स्वारीनंतर त्याने दक्षिणेकडील अमॅलेकाईट लोकांविरुद्घ यशस्वी मोहीम केली, त्यामुळे इझ्राएलला परकीय आक्रमणापासूनचा धोका कमी झाला आणि त्याचा एकछत्री अंमल प्रस्थापित झाला मात्र त्याने अंतर्गत प्रशासनव्यवस्थेत फारसे बदल केलेले ज्ञात नाही. सॅम्युएल व डेव्हिड या दोन व्यक्तींचा त्यावर प्रभाव होता. सॅम्युएलने त्यास राजपद दिले आणि डेव्हिड त्याच्या सैनिकी पराक्रमामुळे आणि सारंगीवादनातील कौशल्यामुळे त्याच्या निकटचा झाला. डेव्हिडने दुःखी-कष्टी राजाचे मनोरंजन केले आणि लष्करी मोहिमांत सहकार्य दिले, म्हणून सॉलने आपली कन्या –मिकॅल–देऊन डेव्हिडला जावई केले पण पुढे सॉल अत्यंत लहरी, विक्षिप्त वागू लागला. डेव्हिडबद्दल त्यास असूया निर्माण झाली आणि त्याला तो मारणार होता परंतु डेव्हिड त्याच्यापासून दूर फिलिस्टियाच्या मोहिमेवर गेला होता. राजाने या लहरीपणातून ८५ धर्मगुरुंची नॉब येथे कत्तल केली.

सॉलला फिलिस्टिनी लोकांचा पूर्ण बंदोबस्त वा नायनाट करता आला नाही. अखेरच्या संभ्रम अवस्थेत असताना फिलिस्टिनींनी पुन्हा इझ्राएलवर आक्रमण केले, तेव्हा त्याने मौंट गिल्बोआ येथे लष्कराची जमवाजमव करुन प्रतिकार करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यातील अपयशानंतर त्याने आत्महत्या केली असावी किंवा या युद्घात तो मारला गेला असावा. त्याची दोन्ही मुले मरण पावली. डेव्हिडने गादीवर आल्यानंतर त्यास शोकगीताद्वारे वाहिलेली श्रद्घांजली प्रसिद्घ असून तीतून सॉलच्या अभागी जीवनाचे दर्शन घडते. सॉल हा एक पराक्रमी, दयाशील राजा होता. त्याने पूर्वसूरींच्या कर्तृत्वाचे वा कार्याचे अंधानुकरण केले नाही पण सतत उद्‌भवणाऱ्या संकटांमुळे आणि आक्रमणांमुळे त्याचा मानसिक समतोल ढळून तो लहरी, संशयी आणि विक्षिप्त झाला होता.

देशपांडे, सु. र.