सवाला : ( गु. जल सरपोलियां इं. टेप ग्रास, ईल-ग्रास, वाइल्ड सेलरी लॅ. व्हॅलिस्नेरिया स्पायरॅलिस कुल-हायड्रोकॅरिटेसी ). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] ही लहान व नाजूक ⇨ जलवनस्पती गोडया, उथळ व संथ पाण्यात सदैव बुडलेली असते. तिच्या व्हॅलिस्नेरिया ह्या प्रजातीत एकूण ६-१० जाती असून त्यांचा प्रसार उष्ण व उपोष्ण कटिबंधांत आहे. भारतात फक्त दोन जाती आढळतात. हिचे खोड अत्यंत सूक्ष्म असून त्यापासून खाली जमिनीत मुळे, जमिनीवर आडव्या वाढणाऱ्या फांद्या ( तिरश्चर, धावते ) व पाण्यात उभ्या वाढणाऱ्या कमी-जास्त लांब (०.१५ ते १.८ मी.पर्यंत ) बिनदेठाच्या, पातळ फितीसारख्या ( त्यावरून पडलेले इंग्रजी नाव ), अरूंद रेषाकृती व मूलज पानांचा झुबका येतो. तसेच या झुबक्यातून येणाऱ्या बारीक दांडयावर ( पुष्पबंधाक्षावर ) एकलिंगी त्रिभागी फुले स्वतंत्र वनस्पतीवर येतात. ती एकसमात्र असतात [⟶ फूल]. पुं-पुष्पे बारीक व पुष्कळ असून फुलोरे आखूड देठाच्या व त्रिखंडी महाछदाने वेढलेले असतात. फुलांना पाकळ्या नसतात, त्याखालची दले तीन, तीन केसरदलांपैकी एक वंध्य, स्त्री-पुष्प फक्त एकच व स्वतंत्र, ते सर्पिल व आकुंचनशील लांब दांडयावर असून पाण्याच्या पातळीवर चिकटल्यासारखे असते, त्याचा महाछद नळीसारखा व तीन दातांचा असतो वंध्य केसरदले तीन, किंजपुट अध:स्थ, अरूंद किंजल्के तीन व बीजके अनेक, मृदुफळ गोलसर व अनेकबीजी.
लहान व मोठया जलजीवपात्रात लावण्यास ही वनस्पती उपयुक्त असून काही जलवनस्पतींत पाण्याव्दारे ⇨ परागण ( परागसिंचन ) कसे घडून येते, ह्या दृष्टीनेही अभ्यासास उपयुक्त आहे. पुं-पुष्पे एकेक स्वतंत्र होऊन जलपृष्ठावर प्रथम येतात व पाण्याच्या पातळीवर असलेल्या एकेकट्या स्त्री-पुष्पाभोवती उमलून तरंगत राहतात, नंतर पुं-पुष्पाच्या केसरदलातील ( पुं-केसरातील ) पराग स्त्री-पुष्पातील किंजदल्कांवर ( स्त्री केसराच्या अग्रभागी ) पडून परागण घडून येते, त्यानंतर स्त्री-पुष्पबंधाक्ष आकसून स्त्री-पुष्प पाण्याखाली येते व फळ पक्व होते. ही वनस्पती खाणाऱ्या जंगली बदकांना सेलरीसारखा वास येतो, म्हणून हिला वाइल्ड सेलरी म्हणतात. ह्या वनस्पतीमुळे जलजीवपात्रास शोभा येते व त्यातील प्राण्यांस ऑक्सिजनाचा पुरवठा होतो. नैसर्गिक जलाशयात त्याची फार वाढ झाल्यास तेथील मत्स्यकृत्यात गैरसोय होते. अशा वेळी पाण्यात डायकोटॉक्स (३.३८ ग्रॅ. प्रति चौ. मी.) टाकल्यास सु. २० दिवसांत फक्त वनस्पतींचा नाश होतो ( मासे जगतात ).
ही वनस्पती दीपक ( भूक वाढविणारी ) असून श्वेतप्रदरावर ( पांढऱ्या धुपणीवर ) देतात. ती शोथशामक ( दाह कमी करणारी ) व प्रशीतक ( थंडावा देणारी ) असते. हिची कोवळी पाने कोशिंबिरीत घालतात. व्हॅलिस्नेरिया जायगॅन्शिया ही काहीशी मोठी जाती आसामातील सपाट प्रदेशात आढळते. तिचा उपयोग सवालाप्रमाणे शोभेकरिता होतो, तसेच तिची शिजवून भाजीही करतात, त्यांत फॉस्फरस, कॅल्शियम व लोह विपुल प्रमाणात असतात.
पहा: जलवनस्पति परागण हायड्रोकॅरिटेसी.
संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. X, New Delhi, 1976.
2. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Vol. I, Cambridge, 1963.
जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.