वनश्री : (व्हेजिटेशन). कोणत्याही एखाद्या क्षेत्रावर असलेल्या सर्व वनस्पतींच्या समूहाला (वनस्पतिरूप संपत्तीला) वनश्री ही संज्ञा सामुहिक अर्थाने वापरण्यात येते मग ते क्षेत्र लहान असो किंवा मोठे असो. गोड्या पाण्यातील सर्व वनस्पतींच्या समूहाला क्षेत्राच्या प्रकारानुरूप पल्वल (डबक्यातील) वनश्री, तडाग (तळ्यातील) वनश्री, कासार (सरोवरातील) वनश्री अशा नावांनी भेद दर्शविता येतो. समुद्रातील एकूण सर्व वनस्पतींच्या संबंधीचा उल्लेख सागरी वनश्री या संज्ञेने करतात. वनश्री ह्या संज्ञेने अनेक व बहुधा भिन्न जातींच्या किंवा जीव-वृद्धिरूपांच्या [⇨ ओषधी, क्षुप (झुडूप), वृक्ष, वेल, पर्णहीन, मांसल, गुच्छाकृती, केळीसारखे, प्रसर्पी (जमिनीवर वा अन्य पृष्ठभागावर पसरणाऱ्या) इ.] व्यक्तींनी त्या क्षेत्रावर बनविलेल्या नैसर्गिक आच्छादनाचा बोध होतो तसेच त्या क्षेत्रात (जमिनीत किंवा पाण्यात) असलेल्या वनस्पतींचाही अंतर्भाव होतो तथापि तेथील भिन्न जातींचा (स्पीशिजचा) सामुहिक निर्देश ⇨पादपजात (फ्लोरा) या संज्ञेने करतात ह्या विशिष्ट क्षेत्रातील सर्व वनस्पतींच्या जातींच्या नावांची यादी म्हणजेच पादपजात नावाबरोबरच त्यांची शास्त्रीय वर्णने असलेले लहान मोठे ग्रंथ पादपजात (फ्लोरा) म्हणूनच ओळखले जातात. सुमारे ३,५०,००० जातींची वर्णने आज उपलब्ध असून उष्ण कटिबंधातील जातींची संख्या सर्वांत मोठी आहे. वनश्रीरूप इमारतीची बांधणी पादपजातीसारख्या कच्च्या साधनांनी किंवा सुट्ट्या भागांपासून होते यामुळे वनश्रीचे एकूण स्वरूप अशा सुट्या भागांचे परिस्थितीसाक्षेप स्वरूप आकार, संघटना, इत्यादींवर अवलंबून असते. ह्या भागांचा समुदाय सहवास (संगती), समाज इ.एककांच्या नावांनी उल्लेख करतात.

वनश्रीचा उगम, तिच्यातील घटकांचे स्थानांतर व तिच्यावरील मानवाचा प्रभाव याही बाबींचा विचार वनश्रींच्या विवेचनात अंतर्भूत होतो. यासंबंधी अधिक तपशील ‘परिस्थितिविज्ञान’ ह्या नोंदीत आला आहे, तो पहावा. कोणत्याही एका क्षेत्रातील नैसर्गिक वनश्रीचा उगम सर्व दिशांकडून पहावा. कोणत्याही एका क्षेत्रातील नैसर्गिक वनश्रींचा उगम सर्व दिशांकडून तेथे येऊन स्थिर झालेल्या वनस्पतींच्या जातींशी संलग्न असतो व अनेकदा पूर्वी झालेल्या त्याच्या स्थानांतरांचा त्या क्षेत्रावर ठसा उमटलेला दिसतो. स्थानिक पादपजातींचे विश्लेषण केले असता विद्यमान वनस्पतींच्या समूहात पूर्वीच्या भिन्न समूहातील काही जाती आढळतात व त्यांचे अस्तित्त्व या संदर्भात महत्त्वाचे ठरते. उदा., स्पेन व पोर्तुगाल येथील ओलसर घळीतील सदापर्णी ⇨चेरी व ⇨ऱ्होडोडेंड्रॉन यांसारख्या अविशिष्ट वनस्पतींवरून तेथील विद्यमान वनश्रींचा उगम भूतकाळी असलेल्या अधिक आर्द्रतायुक्त काळात असल्याचा बोध होतो. आजच्या समशीतोष्ण जलवायुमानातील (दीर्घकालीन सरासरी हवामानातील) क्षेत्रात अवशिष्ट जातींची उपस्थिती लक्षात घेता, त्यांच्या भूतपूर्व स्थानांतराची कल्पना येते तसेच या दोन्ही क्षेत्रांत भूतकाळातील समान जलवायुमानादि परिस्थितीमुळे जातींचे स्थानांतर व स्थिरीकरण (आस्थापना) समजून येते. नैसर्गिक वनश्रीतील लहानमोठे भाग हे, त्या त्या ठिकाणी अनुक्रमणाने (सतत बदल होत जाऊन) बनलेले असतात ही गोष्ट येथे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. भारतातील दक्षिणेच्या पठारावर ज्या ⇨तेरडा ह्या वनस्पतीच्या १०−१२ जाती सापडतात त्या मूळच्या समशीतोष्ण असून हल्ली त्यांपैकी काहींचा प्रसार डोंगरमाथ्यावर, काहींचा घळीत, तर काहींचा सपाट मैदानावर आहे, कारण प्लाइस्टोसीन काळात (सु ६ लाख ते ११ हजार वर्षांपूर्वीच्या काळात) समशीतोष्ण वनांचा प्रसार येथे होता ही गोष्ट कित्येक फुलझाडांच्या व काही शंकुमंतांच्या [⟶ कॉनिफेरेलीझ] परागकमांच्या जीवाश्मांवरून (शिलारूप अवशेषांवरून) कळून आली आहे. नंतरच्या काळात त्यांपैकी कित्येक या प्रदेशातून पूर्ण नाहीसे झाले. [उदा., ⇨पोडोकार्प आणि क्युप्रेसस ⟶ देवदार] व दक्षिणेच्या दक्षिण टोकास त्यांचे स्थानांतरण झालेले आता आढळते, त्यांचे पराग मात्र येथे आढळतात ⇨भुर्ज (वर्च) व ⇨वाळुंज (विलो) यांच्याही बहुतेक जाती आता उत्तरेकडे हिमालयाच्या समशीतोष्ण परिसरात गेलेल्या आढळतात, ते याच कारणामुळे.

वनश्रीची संरचना तिच्यातील भिन्न घटकांच्या संघटनेवर (परस्परसापेक्ष प्रमाणावर) अवलंबून असून तिचे सर्वसाधारण स्वरूप त्यांतील व्यक्तींचे आकार, आकारमान, पोत, पर्णसंभाराची विरलता, शाखांची मांडणी, विस्तार आणि त्यांच्या भिन्न जीवरूपांचे परस्परांशी असलेले प्रमाण, तसेच स्तरण (थरांचे अस्तित्व) इत्यादींवर अवलंबून असते. शिवाय वृद्धी वा विकास आणि सुकणे यांच्या कालमानातील फरक त्यांच्या परिसरातील भौतिक परिस्थितीतील आत्यंतिकतेचे द्योतक असते. उदा., पालझडी जंगलातील सर्व वनस्पतींची पाने एकाच ऋतूत गळून जाऊन खालची जमीन उघडी पडते आणि तिला प्रकाश व ऊन यांचा लाभ होतो अशा वेळी तेथे अनेक लहान रोपट्यांची गर्दी उसळते यामुळे वनश्रीचे दृश्य संपूर्णपणे पालटते. याउलट काही देशांच्या सदापर्णी वनातील झाडे त्याखालच्या वनभूमीवर होणारा बर्फाचा किंवा कडक उन्हाचा ताप व पावसाचा मारा वाचवितात त्यामुळे खालच्या थरांतील वनस्पती भिन्नपणा दर्शवितात. कोणत्याही एका ठिकाणी आढळणाऱ्या वनश्रीची संरचना सर्वत्र सारखी नसते. डोंगराच्या उतरणीवर कधी दाट वन असून माथ्यावर फार विरळ झाडी असते. आणि तळाशी दलदलीसारखा प्रदेश असतो मधून मधून डोके वर काढणारे कठीण खडक किंवा वाळूचे ढीग हे तर बहुधा उघडेच (वनस्पतिहीन) आढळतात. कधीकधी वालुकाराशी, खडक, दलदल, पाणी, नदीकिनारे इ. विविध प्रकारच्या आधारांवर त्या त्या विशिष्ट स्थानानुरूप भिन्न वनस्पतींचे समुदायही आढळतात. इतकेच नव्हे, तर काही जाती चुनामिश्रित जमीन, अम्लीय मृदा, ह्यूमस (वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांच्या अपघटन न झालेल्या कार्बनी अवशेषांनी बनलेले द्रव्य) किंवा लवणयुक्त जमीन इ. प्रकारच्या जमिनीवर वाढतात व त्यांना सूचक जाती म्हणतात. काही जाती फक्त कोरड्या जागेवर, तर काही फक्त ओलसर किंवा अम्लीय जागी वाढतात इतकेच नव्हे, तर अनेक जातींचा गटच कधी कधी असे कायमचे स्थानभिन्नत्व दर्शवितो. दलदलीत केवळ ओषधी व लहान क्षुपे, शेतात गवते व इतर ओषधी आणि दाट जंगलात शेवाळी, ओषधी, झुडपे आणि वृक्ष यांचे थरावर थर असे समुदाय प्रकार आढळतात. [⟶ परिस्थितिविज्ञान].

लाकूड कापण्याचे काम, नांगरणी, बांधबंदिस्ती, आगी लावणे इ. मानवी कृत्यांमुळे वनस्पतींकरिती व प्राण्यांकरिता नवीन वसतिस्थाने व साधने प्राप्त होतात. मनुष्यांनी एखादे क्षेत्र सुधारून व वापरून नंतरच्या तसेच सोडून दिले, तर नैसर्गिक रीत्या ते पुन्हा पूर्वस्थितीवर येते परंतु कधी कधी असेही अनुभवास आले आहे की, मनुष्याच्या वापरण्यात त्या स्थानाची कायमची हानी झालेली आहे आत्यंतिक बदल झाला आहे किंवा परिसरातील एक किंवा अनेक घटक संपूर्णपणे बदलले आहेत, अशा बाबतीत ते क्षेत्र पूर्वस्थितीवर कधीच येत नाही. तर वर दिलेल्या विवेचनावरून वनश्री या संज्ञेमध्ये वनस्पतीवैज्ञानिक भूदृश्यातील अनेक वानस्पतिक समुदाय व त्यांच्याशी संबंधित असलेले परिस्थितीवैज्ञानिक घटक यांचा निकट परस्पर संबंधाचा व आंतरक्रियांचा विचार अभिप्रेत आहे, ही गोष्ट लक्षात येणे कठीण नाही. वनश्रीत जे अनेक भिन्न दर्जाचे समुदाय आढळतात त्यांचा परिस्थितीच्या संदर्भात केला जाणारा अभ्यास हा ‘समुदाय परिस्थितिविज्ञान’ या नावाने ओळखले जातो त्यामुळे परिस्थितिविज्ञानात वनश्रीचा अभ्यास हा प्रमुख विषय ठरतो. पृथ्वीवरील भिन्न भिन्न भौगोलिक परिस्थितींनुसार जे भाग पाडले जातात तेथील वनश्रींची माहिती ⇨वनस्पतिभूगोल या वनस्पतिविज्ञानाच्या शाखेत समाविष्ट केली जाते. त्या भागांना वनश्रीचे भूक्षेत्र विभाग म्हणतात. भिन्न प्रकारची वने [⟶ वनविद्या], ⇨गवताळ प्रदेश, अती थंड किंवा उष्ण व रूक्ष प्रदेशातील खुरट्या झाडांचे समुदाय हे वनश्रीचेच प्रकार आहेत, हे स्पष्ट आहे.

भारतातील वनश्रीसंबंधीची माहिती ‘भारत’ या नोंदित दिलेली आहे.

पहा : परिस्थितिविज्ञान सहजीवन.

परांडेकर, शं. आ.