शृंगेरी : कर्नाटक राज्यातील एक तीर्थक्षेत्र आणि आद्य शंकराचार्यांनी (इ. स. ७८८–८२०) स्थापन केलेल्या प्रमुख चार मठांपैकी प्रारंभीच्या मठाचे स्थान. ते चिकमगळूर जिल्ह्यात चिकमगळूरच्या वायव्येस सु. ८८ किमी.वर तुंग (तुंगभद्रेचा शीर्षप्रवाह) नदीकाठी वसले आहे. शृंगेरी हे नाव विभांडक ऋषींचा मुलगा ऋष्यशृंग आणि पर्वत यांच्या जोडनावातून आले असावे. विभांडक ऋषींनी याच परिसरात तपश्चर्या केली व राजा दशरथाने पुत्रकामेष्टी यज्ञासाठी शृंग ऋषींना येथून अयोध्येत पाचारण केले होते असे मानतात. शृंगेरीच्या नैर्ऋत्येस वराह (शृंगगिरी) नावाचा पर्वत असून त्यातून तुंग, भद्रा, वेत्रावती व वाराही या नद्यांचा उगम झाला आहे.

दक्षिण हिंदुस्थानात भ्रमंती करताना आद्य शंकराचार्य शृंगेरी येथील निसर्गसौंदर्याने आकृष्ट झाले. एका वदंतेनुसार साप व बेडूक यांमधील निर्वैर याच ठिकाणी आचार्यांच्या निदर्शनास आले. हा स्थानमहिमा लक्षात घेऊन त्यांनी येथे मठस्थापनेचा निर्णय घेतला. शंकराचार्यांनी स्थापन केलेला हा पहिला मठ होय. तुंगेच्या घाटालगतचा हा मठ म्हणजे एक प्रशस्त वाडा आहे.     या मठात शंकराचार्यांनी श्रीचक्रयुक्त शारदेची चंदनमूर्ती बनवून तिची प्रतिष्ठापना केली. तिला शारदाम्बा म्हणतात. ती शृंगेरीच्या शारदा मठाची उपास्य देवता आहे. शृंगेरीच्या पीठावर शंकराचार्यांनी आचार्य सुरेश्वर यांना बसविले आणि स्वतः केरळमधील जन्मगावी गेले. हे पहिले आचार्य होत. त्यानंतर या पीठावर जे आचार्य आले, त्या सर्वांच्या समाध्या वाड्यातच आहेत. या आचार्यांना भारती ही उपाधी असून भारती संप्रदाय शृंगेरीतूनच प्रवर्तित झाला आहे. चौदाव्या शतकातील पूर्णयोगी, सच्चरित्र आणि वेदान्त पारंगत विद्याशंकर हे आचार्य प्रसिद्ध असून विद्यारण्य स्वामी हे त्यांचे उत्तराधिकारी होत. विद्यारण्यांनी [→ माधवाचार्य] शारदा मंदिर बांधले. त्या वेळी त्यांनी काष्ठमूर्तीच्या जागी पंचलोह विग्रह धातूची मूर्ती प्रतिष्ठित केली. हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्यात गर्भगृह, सभामंडप आहे. मंदिर द्राविड वास्तुशैलीचा उत्तम नमुना असून त्याला प्राकार व तीन द्वारे आहेत. याच्या स्तंभांवर देव-देवतांच्या मूर्तींचे नक्षीकाम असून प्राकारातील देवळ्यांत गणपती व भुवनेश्वरी यांच्या सुरेख मूर्ती आहेत. गणपतीची मूर्ती स्फटिक व माणकांची बनविलेली असून त्याला रत्नगर्भ म्हणतात. आश्विन महिन्यातील शारदोत्सव हा शृंगेरीतील एक भव्य सोहळा असतो.

विद्यारण्य स्वामी इ. स. १३६१ मध्ये पीठावर आरूढ झाले व इ. स. १३६८ मध्ये त्यांनी समाधी घेतली. विजयानगरच्या साम्राज्यस्थापनेची प्रेरणा विद्यारण्यांचीच होती. त्यामुळे विजयानगरचा पहिला राजा हरिहर याने मठाच्या व्यवस्थेसाठी, तसेच पूजेअर्चेसाठी मठाला जहागिरी दिली. म्हैसूरचा हैदर अली आणि त्याचा मुलगा टिपू सुलतान, तसेच दक्षिण हिंदुस्थानातील अनेक राजांनी या मठाला अनेक नजराणे, अग्रहार देऊन आदर व्यक्त केला आहे. पेशव्यांच्या पत्रव्यवहारांतही मठाविषयी आदरभाव दिसतो. मठातर्फे एक अन्नछत्र तसेच ‘संजीवनी पाठशाळा’ हे संस्कृत विद्यालय चालविण्यात येते. मठात स्थापनेपासूनच्या घडामोडींचा वृत्तांत ताम्रपटावर नोंदविला आहे.

शारदाम्बा मंदिराव्यतिरिक्त शृंगेरी गावात अनेक मंदिरे असून त्यांपैकी विद्याशंकर मंदिर प्रसिद्ध आहे. हे विद्यारण्य स्वामींनी आपल्या गुरूंच्या प्रीत्यर्थ विजयानगरच्या राजाकडून बांधून घेतले. हे अष्टकोनी, काळ्या कातीव पाषाणात बांधले असून त्याचे गोपुर प्रेक्षणीय आहे. त्यात शंकराची पिंड आहे. वेणुगोपाळ आणि श्रीनिवास या मंदिरांतील मूर्ती माणकांच्या घडविलेल्या आहेत. येथील नवग्रह मंदिरही प्रेक्षणीय आहे. बारा राशींचे प्रतीक असलेल्या त्याच्या बारा स्तंभांवर सिंह आणि सैनिकांचे शिल्पांकन आहे. सिंहाच्या जबड्यात गुळगुळीत गोट्या अशा पद्धतीने खोदल्या आहेत की, त्या तेथून बाहेर तर पडत नाहीत, पण आत बोटाने हलविता येतात. या गोट्यांवर नवग्रहांच्या प्रतीकात्मक प्रतिमा खोदल्या आहेत. ह्या शिल्पाकृती म्हणजे कलाकाराच्या प्रतिभेचा व कौशल्याचा चमत्कार होय.    

शपांडे, सु. र.