शिक्षणाचे समाजशास्त्र : औपचारिक शिक्षण ही एक सामाजिक संस्था आहे. तिचे विश्लेषण करून अर्थ लावणारी समाजशास्त्राची एक शाखा म्हणजे शिक्षणाचे समाजशास्त्र. समाजशास्त्रीय ज्ञान, सामाजिक बाबींचा विचार करण्याची तंत्रे आणि सामाजिक माहिती गोळा करण्याच्या पद्धती यांचे शिक्षणसंस्थेच्या संदर्भात केलेले उपयोजन म्हणजे शिक्षणाचे समाजशास्त्र. हे शास्त्र ज्या समूहात व्यक्ती समाविष्ट असते, त्या समूहप्रक्रियांचे वर्णन करते, एका समूहाचा दुसऱ्या समूहावर काय परिणाम होतो हे सांगते आणि ज्या सामाजिक संदर्भात शिक्षणाची उद्दिष्टे साध्य होतात, त्या संदर्भाचे अर्थ स्पष्ट करते.

शैक्षणिक समाजशास्त्राचा उदय विसाव्या शतकारंभी झाला. शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावरील प्रसार आणि त्याची समाजाच्या रचनेतील आणि पुनर्रचनेतील महत्त्वाची भूमिका या गोष्टी या शास्त्राच्या उदयास कारणीभूत ठरल्या. या शास्त्रातील संशोधन आणि शिक्षण यांचा विकास विसाव्या शतकाच्या मध्यास झाला. प्रारंभी शैक्षणिक समाजशास्त्र ही संज्ञा वापरत आता शिक्षणाचे समाजशास्त्र ही संज्ञा रूढ झाली आहे. 

एमील द्यूरकेम यास शिक्षणाच्या समाजशास्त्राचा जनक मानतात. समाजाला वळण लावण्यात शिक्षण महत्त्वाचे आहे, असा त्याचा विश्वास होता. शिक्षण हे जनहिताचे असल्याने समाजशास्त्रज्ञांना शिक्षणाची धोरणे आणि पद्धती यांत रस असतो. समाजशास्त्रातील ज्ञान शैक्षणिक आणि सामाजिक प्रश्न सोडविण्यास उपयोगी पडेल, असा त्यांना विश्वास वाटतो. शिक्षणाचे समाजशास्त्र या शाखेचा समाजशास्त्राच्या इतर शाखांशी, विशेषत: कुटुंबाचे समाजशास्त्र, सामाजिक स्तरीकरण आणि गतिशीलता, संघटनांचे आणि व्यवसायांचे समाजशास्त्र, राजकीय समाजशास्त्र तसेच विविध वयोगटांचे समाजशास्त्र यांच्याशी जवळचा संबंध असतो, तसेच सामाजिक मानवशास्त्र आणि सामाजिक मानसशास्त्र या शाखांशीही त्याचा जवळचा संबंध असतो.

शिक्षणाचे समाजशास्त्र यातील अभ्यासविषय सर्वत्र सारखेच असले, तरी या शास्त्रातील संशोधन त्या त्या देशाच्या सामाजिक प्रश्नांशी संबंधित असते. एखाद्या देशातील शिक्षणाच्या समाजशास्त्रातील मूलभूत प्रश्न हे त्या देशाच्या समाजाच्या मूलभूत प्रश्नांशी निगडीत असतात. त्यामुळे शिक्षणातील वंशभेद आणि शाळांतील हिंसा हे प्रश्न अमेरिकेत महत्त्वाचे असतील, तर जातीभेदावर आधारलेली पारंपरिक समाजरचना हा भारतातील प्रमुख प्रश्न आहे.

शिक्षणाच्या समाजशास्त्रातील उपपत्ती : शिक्षणाच्या समाजशास्त्रामध्ये तीन प्रमुख औपपत्तिक विचारप्रवाह आहेत : रचना-कार्यात्मक पृथक्करण, संघर्ष उपपत्ती आणि रचना नमुना. समाजाच्या स्थैर्यासाठी शैक्षणिक संस्थांचा कसा उपयोग होतो, तसेच शैक्षणिक प्रक्रिया या परिवर्तन कसे घडवून आणू शकतात आणि संघर्षकाळात त्या कशा उपयोगी पडतात, यांचा अभ्यास शिक्षणाचे रचनात्मक कार्यात्मक पृथक्करण उपपत्ती करते. संघर्ष उपपत्ती ही शिक्षण आणि सामाजिक-वर्गपद्धती यांच्या परस्परसंबंधांवर चिकित्सक प्रकाश टाकते. या उपपत्तीनुसार आधुनिक शिक्षणपद्धत समाजातील केवळ अभिजनांचे हित असून शिक्षण हे भांडवलदारांचे हत्यार आहे. रचना नमुना ही उपपत्ती शिक्षणामुळे मिळणारे फलित हे शिक्षणात केलेली गुंतवणूक आणि शैक्षणिक संस्थांतील वातावरण यांवर कसे अवलंबून असते, यांवर प्रकाश टाकते.

शिक्षणाच्या समाजशास्त्रातील सध्याच्या संशोधनात आदर्शवाद आणि अन्वयवाद यांतील संघर्ष हा प्रमुख मुद्दा आहे. तसेच मूल्य निरपेक्ष समाज आणि मूल्याधिष्टित समाज हा संघर्षही महत्त्वाचा आहे. पूर्वीच्या प्रभावी प्रत्यक्षार्थवादी विचारांनी अनेक नवे अन्वयवादी विचार प्रसृत केले. या संप्रदायात मानवी आंतरक्रियांमधील सत्ये रूपविवेचनवादी मानवशास्त्रज्ञांनी व इतर परावर्तनवादी उपपत्तीकारांनी उजेडात आणली.

शिक्षणाच्या समाजशास्त्रातील संशोधन : या विषयातील संशोधन सूक्ष्म आणि स्थूल अशा दोन पातळ्यांवर चालते. सूक्ष्म पातळीवरील संशोधनात शिक्षण ही समाजाची उपयंत्रणा आहे, असे मानतात. स्थूल पातळीवर शिक्षण हीच एक सामाजिक यंत्रणा आहे, असे मानतात. शिक्षणसंस्थांमधील सामाजिक वातावरणास यामध्ये महत्त्व असते. त्याचप्रमाणे व्यक्तीव्यक्तीमधील संबंध व त्यांचा सामाजिक यंत्रणेवर होणारा परिणाम हा अभ्यासविषय असतो. व्यक्ती व्यक्तीतील सामाजिक आंतरक्रिया सामाजिक पार्श्वभूमीवर कशा अवलंबून असतात, यांचाही अभ्यास होतो.

मात्र या क्षेत्रातील संशोधनाचा भर शाळा ही समाजाची उपयंत्रणा आहे, यावर असतो. शिक्षणाच्या दोन भूमिका असतात : एक म्हणजे, प्रचलित सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीकडे संक्रमित करणे आणि दुसरी म्हणजे सध्याच्या सांस्कृतिक वातावरणात परिवर्तन घडविणे. या संशोधनातील महत्त्वाचे विषय पुढीलप्रमाणे : सामाजिकीकरणातील शिक्षणाची भूमिका, सामाजिक विस्तारीकरण, सामाजिक गतिशीलता, सामाजिक बदल, विकास आणि आधुनिकीकरण, शैक्षणिक प्रगतीतील सामाजिक घटक, शैक्षणिक आकांक्षा, सामाजिक रचनेचा शिक्षणावर होणारा परिणाम, संस्कृतिरक्षणातील शिक्षणाची भूमिका, सामाजिक निकषांची भूमिका, शिक्षणाच्या अभ्यासक्रमातील सुप्त अभिवृत्ती आणि मूल्ये यांचा प्रभाव, दुर्लक्षितांच्या सक्षमीकरणातील शिक्षणाची भूमिका, ज्ञान आणि अभ्यासक्रम यांची सामाजिक बांधणी.

सामाजिक संशोधनातील प्रमुख पद्धती म्हणजे ऐतिहासिक पृथक्करण, तुलनात्मक अभ्यास आणि कार्यात्मक पृथक्करण. अशा संशोधनात पारंपरिक पद्धतींऐवजी रचनात्मक, घटनात्मक आणि स्त्रीकेंद्रित पद्धती वापरण्याकडे कल आहे.

भारतातील शिक्षणाच्या समाजशास्त्रातील संशोधन : एन् सीईआर् टी आणि आय् सीएस् एस् आर् या संस्थांनी प्रकाशित केलेल्या अहवालांवरून भारतातील या विषयातील संशोधनाचे स्वरूप कळते. या संशोधनाचे दोन प्रकारांत वर्गीकरण करतात. एक म्हणजे शिक्षण ही एक सामाजिक संस्था या प्रकारचे व दुसरे म्हणजे शैक्षणिक यंत्रणेची रचना आणि व्यवस्थापन यांचे. एन् सीईआर् टी या संस्थेने प्रकाशित केलेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या अहवालांत संशोधनाचे पुढीलप्रमाणे पाच विभागांत वर्गीकरण करण्यात आले आहे : शिक्षण आणि समाज, शिक्षण व्यवस्थेचा इतर सामाजिक व्यवस्थांशी संबंध, साक्षरतेमागचे सामाजिक घटक, मुले आणि तरुण यांचा व्यक्तिमत्त्वविकास, शैक्षणिक संस्थांचे समाजशास्त्र यांशिवाय बालगुन्हेगारी, विद्यार्थ्यांमधील असंतोष आणि अपंगांचे शिक्षण यांसारखे इतर प्रश्न. चौथ्या सर्वेक्षण अहवालात संशोधनाची सात क्षेत्रांत, तर पाचव्या अहवालात चार क्षेत्रांत विभागणी केली आहे. ती क्षेत्रे अशी : शिक्षण ही एक सामाजिक व्यवस्था, शाळा ही एक सामाजिक व्यवस्था, शिक्षण आणि समाज आणि शिक्षण व राजकारण.

एक जनसंस्था या दृष्टीने शिक्षण ही संस्था भारतात केवळ शंभर वर्षांची आहे. मात्र भारतातील सामाजिक रचना हजारो वर्षांच्या परंपरेवर आधारलेली आहे. शिक्षण ही समाजाची उपसंस्था असल्याने एकाधिकारवादी आणि परंपरावादी समाजरचनेचा आधुनिक शिक्षणातील लोकशाहीवादी आणि समतावादी प्रवृत्तींशी संघर्ष होतो. सामाजिक पद्धतीचा शिक्षणाच्या आशयावर आणि रचनेवर परिणाम होत असून, ही पद्धती सुप्त अभ्यासक्रम ठरविते आणि सामाजिक पद्धतीला सोयीची अशी सामाजिक रचना निर्माण करते. विविध सामाजिक गटांच्या प्रभावातून शिक्षणाची सुटका करण्यासाठी शिक्षणाच्या समाजशास्त्राचा अभ्यास करणे आवश्यक असते. त्यामुळे सामाजिक परिवर्तन घडवू शकेल, अशा प्रकारच्या शिक्षणाची आखणी करणे शक्य होते.

भारतातील शिक्षणाच्या समाजशास्त्रातील प्रमुख अभ्यासविषय पुढीलप्रमाणे : एखाद्या गटाच्या समाजशास्त्राचा शिक्षणावर कसा परिणाम होतो सामाजिक दुर्लक्षितपणाचा शाळेतील नोंदणी, गळती, नापासी, प्रगती यांवर काय परिणाम होतो दुर्लक्षितांना शिक्षणाने कसे साहाय्य केले आहे जात, वंश, धर्म, शहरी-ग्रामीण स्त्री-पुरुष यांतील भेद शिक्षणामुळे किती कमी झाले आहेत इत्यादी. अनुसूचित जाती, जमाती आणि स्त्रिया यांच्या प्रश्नांकडे शिक्षणामुळे विशेष लक्ष देण्यात आले. शैक्षणिक संशोधनाच्या सर्वेक्षण अहवालात या गटांसाठी स्वतंत्र प्रकरणे लिहिलेली आहेत, यावरून ही गोष्ट स्पष्ट होते.

संदर्भ : 1. Durkheim, E. Education and Society, Chicago, 1956.

           2. Gore, M. S. Educationand Modernization in India, Jaipur, 1982.

           3. Halsey, A. H. Lauder, H. Brown, P. and Wells, A. S. Ed. Education : Culture, Economy and Society, New York, 1997.

           4. Naik, J. P. Equity,Quality and Quantity : the Elusive Triangle in Education, Bombay, 1975.

           5. Robinson, P. Perspectives on the Sociology of Education : An Introduction, London, 1981.

           6. Ruhela, S. P. A Comprehensive Bibliography on Sociological Foundations of Indian Education, New Delhi, 1969.

कुड्लू, चित्‌प्रभा