शापू : स्तनी वर्गातील समखुरी प्राण्यांच्या आर्टिओडॅक्टिला गणातील बोव्हिडी कुलातील प्राणी. शास्त्रीय नाव ओव्हिस ओरिएंटॅलिस. नराला लडाखी भाषेत शा किंवा शापो व मादीला शामो म्हणतात. उरियल हे त्याचे पंजाबी नाव आहे. व्हिग्नेई, ब्लॅन्फोर्डय   पंजाबेन्सिस या त्याच्या प्रजाती भारतात आढळतात. त्याचा प्रसार गिलगिट, लडाख, पूर्वेस व उत्तरेस तिबेटपर्यंत आणि दक्षिणेस व पश्चिमेस पंजाब, सिंध, बलुचिस्तान व दक्षिण इराण येथे आहे.

लडाखी शापूची खांद्यापाशी उंची ९० सेंमी. पर्यंत असते. पंजाबमधील पर्वतावर आढळणाऱ्या या प्राण्यांची उंची ८० सेंमी. असते. शिंगांची सरासरी लांबी ५०– ७५ सेंमी. असते व त्यांचा तळाशी घेर २५ सेंमी. असतो. काहींची शिंगे १०५ सेंमी. लांब असतात.

शापूच्या लहान चणीमुळे तो इतर रानटी जातींच्या मेंढरांपासून निराळा ओळखता येतो. लडाखी शापूच्या केसांचा रंग तपकिरी तांबूस करडा असतो. पंजाबी शापू जास्त तांबूस रंगाचा असतो. प्रौढ मेंढ्याच्या हनुवटीच्या दोन्ही बाजूंना काळे किंवा करडे भरपूर केस असून, ते एकत्र मिळतात व ते खाली नरड्यापर्यंत जातात. वयानुसार मेंढ्यांचे केस पुढच्या बाजूने करडे किंवा पांढरे होतात व पाठीमागे काळे होत जातात तसेच गळ्याभोवतालचे बरेचसे केस गळून जातात. सामान्यत: शिंगे पिळवटलेली व काही जातींत टोकाला आत वळलेली असतात. लडाखमध्ये हा डोंगर उतारावरील गवताळ भागात व पंजाबात खडकाळ, झुडपाच्छादित टेकड्यांवर आढळतो. तो सदैव जागरूक व सावध असतो. पर्वतातील अवघड चढणी तो सहज चढतो. गवत, कोवळी वनस्पती, पाने व फुले हे त्याचे अन्न आहे. उन्हाळ्यात माद्या व तरुण मेंढे लहान कळपांत एकत्र राहतात. ह्या हंगामात मोठे मेंढे कळपापासून दूर राहतात. सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान मेंढ्या माजावर येतात. गर्भावधी साधारणत: १२० – १८० दिवसांचा असतो. मादी एका वेळी एक किंवा दोन पिलांना जन्म देते. अडीच ते साडेतीन वर्षांत पिलाची पूर्ण वाढ होते. शापूचे आयुष्य सुमारे १५ ते २० वर्षांचे असते.     

जमदाडे, ज.वि.