शर्मा, नरेंद्र : (२८ फेब्रुवारी १९१३ – ११ फेब्रुवारी १९८९). हिंदी कवितेच्या छायावादी प्रवृत्तीनंतर प्रतिष्ठित कवींपैकी एक कवी. छायावादी कवींमध्ये निराला, जयशंकर प्रसाद, सुमित्रानंदन पंत, महादेवी वर्मा यांसारखे ख्यातकीर्त प्रतिभावंत होते. त्यांच्यानंतर (१९३५ नंतर) काव्याची दिशा बदलण्याचे कार्य हरिवंशयराय बच्चन, दिनकर आणि नरेंद्र शर्मा या तिघांनी केले. छायावादी कविता अनुभवाच्या सूक्ष्मतेत वावरू लागल्यावर तिला ऐंद्रिय संवेदना, सामान्य जनजीवनाचे लौकिक अनुभव, रोजच्या जीवनाशी बांधिलकी या दृष्टीनी पुष्ट करून लोकाभिमुख करण्याच्या कार्यात या तिघांचा मोठा वाटा होता. नरेंद्र शर्मांनी सौष्ठवयुक्त गीतकाव्याची परंपरा जोमदारपणॆ चालविली. त्यांची अधिकांश कविता दैनंदिन जीवनातील रागलोभ, प्रेम, विरहव्यथा, सौंदर्याचे आवाहन, गार्हस्थ्य जीवनातील सुखदुःखे, करुणा यांनी भारलेली आहे. भारतीय माणसांत परंपरेने आलेली आध्यात्मिक अनुभवाची, आस्तिक्यभावाची अभिव्यक्ती त्यांनी केलीच पण त्याबरोबर समाजजीवनातील संकटे, आघात, सुखदुःखाचे राष्ट्रीय प्रसंग, सामाजिक व राष्ट्रीय समस्या यांनाही त्यांची कविता सामोरी गेली. त्यांच्या कवितेत समंजस, समन्वयवादी दृष्टीने निर्माण झालेली संस्कारशीलता आणि संतुलितपणा असल्यामुळे तिला वजन आले आहे. आजच्या जीवनात अपरिहार्य असलेली निराशा, कंटाळवाणेपणा, पराजित होण्याची वेदना या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत. पण त्यांचा मूळ पिंड जीवनावर निष्ठा असणाऱ्या आस्थाशील कवीचा आहे. त्यांच्या कवितांमधून त्यांचे मन अतिशय कोमल, हळवे असल्याचे जाणवते. असे मन क्षणिक भावनांचा उत्कटतेने आविष्कार करते पण त्यात चिंतनातून आलेला सखोलपणा असतो, असे नाही. नरेंद्र शर्मांच्या व्यक्तीमत्त्वात हिंदीतील सुकुमार कवी सुमित्रानंदन पंत यांचा प्रभाव अधिक होता. पंतांप्रमाणेच नरेंद्र शर्माही निसर्गाच्या सुखद संवेदना अधिक आत्मीयतेने व्यक्त करतात. सुखद रंग आणि गंध यांनी ते भारावून जातात. गीतकार नरेंद्र शर्मांनी हिंदी चित्रसृष्टीसाठी काही अभिजात गीते लिहिली. हिंदीतील मार्क्सवादी (प्रगतिवादी) काव्याचाही प्रभाव नरेंद्र शर्मांवर पडला परंतु त्यात कोणत्याही प्रकारची अतिरेकी भावना व्यक्त झाली नाही. त्यांचे ‘द्रोपदी’ खंड-काव्य उल्लेखनीय आहे. त्यांचा एक कथासंग्रह कडवी-मीठी बातें प्रसिद्ध झाला असला, तरी त्यांची प्रतिभा मुख्यतः कवीची प्रतिभा होती. त्यांचे एकूण सतरा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले असून त्यांत प्रभात फेरी (१९३८), प्रवासी के गीत (१९३९), पलाशवन (१९४१), अग्निशस्त्र (१९५०), कदलीवन (१९५३) इ. काव्यसंग्रहांचा समावेश आहे.
नरेंद्र शर्मा आकाशवाणीचे निवेशक म्हणूनही काही वर्षे कार्यरत होते. मुंबई येथे त्यांचे निधन झाले.
२. मिश्र, दुर्गाशंकर, नरेंद्र शर्मा का काव्य : एक विश्लेषण, लखनौ, १९७७.
३. शर्मा, लक्ष्मीनारायण, नरेंद्र शर्मा और उनका काव्य, दिल्ली, १९६७
बांदिवडेकर, चंद्रकांत