शास्त्री, चतुरसेन : ( २६ ऑगस्ट १८९१–२ फेब्रुवारी १९६०). एक ख्यातनाम हिंदी सहित्यिक. उत्तर प्रदेशातील अनुप जिल्ह्यात जन्म. शास्त्रींनी १९०६ पासून लेखनास सुरुवात केली. १९१४ पर्यंत कथाकार म्हणून त्यांना मान्यता लाभली. इतर साहित्यप्रकार तसेच इतिहास, धर्म, राजकारण, रोगचिकित्सा, कामशास्त्र, पाकशास्त्र इ. विषयांवरदेखील त्यांनी विपुल लेखन केले. त्यांची सु. १८६ पुस्तके प्रकाशित झाली असून, अद्याप ५२ पुस्तके अप्रकाशित आहेत. असे म्हटले जाते. शास्त्रींनी  दीर्घकाळ दिल्ली, अजमेर, सिकंदराबाद, मुंबई इ. शहरांत वैद्यकी केली (१९०९–१९३५).

चतुरसेन शास्त्री यांनी संपादित केलेला चाँद मासिकाचा फाँसी विशेषांक फारच गाजला. या अंकासाठी थोर क्रांतिवीर भगतसिंग यांनी शास्त्री यांना सत्तरहून अधिक क्रांतिकारकांची अधिकृत माहिती व चित्रे पुरवली होती. हा अंक क्रांतिकारकांविषयीच्या इतिहासलेखनाचा आद्य प्रयत्न मानला जातो.

चतुरसेन शास्त्री यांनी सु. ४५० कथा लिहिल्या. त्यांतील अनेक कथा बौद्धकालीन, राजपूतकालीन तसेच मोगलकालीन समाज व संस्कृती यांच्या पार्श्वभूमीवर आधारित आहेत. काही कथा आधुनिक सामाजिक समस्यांशी निगडित आहेत. त्यांचे समग्र कथासाहित्य १९६१ मध्ये पुढील पाच भागांत प्रकाशित झाले : (१) बाहर-भीतर,  (२) दुखवा मैं कासे कहूँ,   (३) धरती और आसमान,  (४) सोया हुआ शहर आणि  (५) कहानी खत्म हो गयी.

 

त्यांनी सु. ३२ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांतील वैशालीकी नगरवधू (दोन भाग, १९४९) आणि वयं रक्षाम: या दोन कादंबऱ्या खूप लोकप्रिय झाल्या. त्यांच्या सामाजिक कादंबऱ्यांमध्ये काही ठिकाणी वास्तवाच्या अट्टाहासापायी अश्लीलताही निर्माण झालेली आहे. उदा., अमर अभिलाशा (१९३२). त्यांच्या इतर काही उल्लेखनीय कादंबऱ्या : हृदयकी परख (१९१८), व्यभिचार (१९२४), हृदयकी प्यास (१९३२), आत्मदाह (१९३७), नरमेध (१९५०), अपराजिता (१९५२), बगुलाके पंख (१९५८), उदयास्त (१९५९), सोना और खून (दोन भाग, १९६०), सह्याद्रीकी चट्टाने (१९६०), खग्रास (१९६०).

वैशालीकी नगरवधू ही त्यांची सर्वश्रेष्ठ ऐतिहासिक कादंबरी होय. वैशालीची नगरवधू आम्रपाली हिचे चरित्र व व्यक्तिचित्र या कादंबरीत रेखाटले आहे. वयं रक्षामः या कादंबरीचा विषय महापुरुष राम व राक्षसराज रावण यांच्यावर आधारित आहे. त्यांची चार गद्यकाव्येही असून अन्तस्तल हा गद्यकाव्यात्मक प्रबंधांचा संग्रह आहे. अमर राठौर, मेघनाद (१९३६), उत्सर्ग ही नाटके तसेच काही एकांकिकाही त्यांनी लिहिल्या. अन्य गद्य साहित्यात हिंदी साहित्यका इतिहासआत्मकहानी (१९६३) या पुस्तकांचा उल्लेख करता येईल.

चतुरसेन शास्त्रींनी विपुल लेखन केले असले, तरी त्यांची काही मोजकी पुस्तकेच वाङ्‌मयीनदृष्ट्या उच्च दर्जाची आहेत. दिल्ली येथे त्यांचे निधन झाले. 

सारडा, निर्मला