गरीबदास -१ : (? १७१७–१२ सप्टेंबर १७७९). कबीराचा शिष्य व ‘गरीब पंथा’चा संस्थापक. त्याचा जन्म पंजाबात छुडानी (रोहटक जिल्हा) नावाच्या गावी एका जाट कुटुंबात झाला. तो बारा वर्षांचा असताना त्याला कबीराने दर्शन दिले आणि तेव्हापासून तो कबीराचा शिष्य झाला, अशी आख्यायिका आहे. त्याने अद्‌भुत चमत्कार केल्याच्याही आख्यायिका रूढ आहेत. शेवटपर्यंत संसारात राहूनच त्याने परमार्थसाधना केली. ‘गरीब पंथ’ नावाचा एक स्वतंत्र पंथ त्याने स्थापन केला. ह्या पंथाचा प्रभाव व लोकप्रियता पूर्व पंजाबात विशेष आहे. सर्वच जाती, वर्ण आणि धर्मांचे लोक या पंथाचे अनुयायी आहेत. अनुयायांत हिंदूंप्रमाणेच मुसलमानांचाही अंतर्भाव आहे. गरीबदास स्वभावाने भावनाशील, श्रद्धाळू व सज्‍जन होता. सगुण-निर्गुणातीत व शब्दातीत ब्रह्माचा तो उपासक होता. २४ हजार सारख्या (मराठीतील ‘साकी’ ह्या जातिवृत्तासारखी रचना) व पदे असलेला त्याचा हिंखर बोध  नावाचा ग्रंथ उपलब्ध आहे. त्यातील त्याची रचना १७ हजार असून उर्वरित कबीराची आहे. गरीबदासाच्या निवडक साख्या-पदांचा संग्रह अलाहाबाद येथून गरीबदासजी की बानी  (१९१०) नावाने प्रसिद्ध झाला आहे. कबीराच्या शैलीचे अनुकरण करून त्याने एक बीजक  नावाचा ग्रंथही लिहिला आहे. छुडानी येथे त्याचे निधन झाले. त्याच्यानंतर त्याचा पट्टशिष्य सलोत हा पंथाच्या गादीवर आला. गरीबदासाने छुडानी येथे सुरू केलेली यात्रा अजूनही दरवर्षी तेथे भरते.  

बांदिवडेकर, चंद्रकांत