व्हेंट्‌सपिल्स : जर्मन व्हिंडाऊ. १७२१–१९१८ या काळातील व्हिंडाव्हा. लॅटव्हिया प्रजासत्ताकातील एक शहर व बंदर. लोकसंख्या ४६,५६७ (१९९६). बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावर व्हेंटा नदीच्या मुखावर हे शहर वसले आहे. इ. स. पू. दुसऱ्या सहस्रकात येथे प्रथम मानवी वस्ती झाली. इ. स. दहाव्या शतकात व्हेंड (स्लाव्हिक) लोकांचे येथे वास्तव्य होते. १२४२ मध्ये ट्यूटॉनिक सरदारांनी येथे एक किल्ला बांधला. त्याभोवतीच शहराचा विस्तार झालेला आहे. १३७८ मध्ये शहराला नगराचा दर्जा मिळाला.

व्हेंट्‌सपिल्स येथे १६४२ मध्ये जहाजबांधणी उद्योग सुरू झाला. रीगा आखाताच्या दक्षिणेकडील इतर बाल्टिक बंदरांप्रमाणेच हे बंदरही बर्फमुक्त असते. पहिल्या महायुद्धापूर्वी हे एक प्रमुख रशियन बंदर होते. दुसऱ्या महायुद्धात ते जर्मनांनी घेतले. खनिज तेल व रसायने या प्रमुख निऱ्यातीबरोबरच लाकूड, अंबाडी, ताग व धान्य यांचीही निर्यात या बंदरातून केली जाते. हे मासेमारी–बंदर म्हणूनही प्रसिद्ध असून मासे डबाबंद करण्याचा मोठा कारखाना येथे आहे. १९०४ मध्ये व्हेंट्‌सपिल्सपर्यंत लोहमार्ग-वाहतूक सुरू झाली आहे. व्होल्गा–उरल तेलक्षेत्रापासून येथपर्यंत तेलवाहतुकीचे नळ टाकलेले आहेत.

चौधरी, वसंत