त्रॉनहेम : नॉर्वेची प्राचीन राजधानी. नॉर्वेच्या सर–त्रनदलाग प्रांताची राजधानी व नॉर्वेतील तिसऱ्या क्रमांकाचे शहर. लोखसंख्या १,३४,०३९ (१९७५). प्राचीन काळी नीडारोस व त्रानयेम नावांनी प्रसिद्ध होते. हे नॉर्वेजियन समुद्राचे आग्‍नेयीस ३७ किमी. व ऑस्लोच्या उत्तरेस ४०० किमी. वर त्रॉनहेम फ्योर्डच्या दक्षिण किनाऱ्यावर नीड नदीमुखाशी वसले आहे. हे ओलाफ त्रिग्वेंसॉनने ९९७ मध्ये वसविले. १६८१ मध्ये त्रॉनहेम आगीने उद्ध्वस्त झाले. त्यावेळेस याची योजनापूर्वक पुन्हा आखणी करण्यात आली.

हे लोहमार्ग व राष्ट्रीय महामार्ग यांचे केंद्र असून येथे विमानतळ आहे. हे व्यापारी केंद्र व बर्फमुक्त बंदर आहे. हे शेतमालाच्या विक्रीचे प्रमुख केंद्र असून मासे, लाकूड व लाकडाचा लगदा, अशुद्ध तांबे, कॉडलिव्हर तेल यांची निर्यात येथून होते. येथे जहाजबांधणी, लोखंडी सामान, कागद, बिअर, चॉकोलेट, साबण इत्यादींचे उद्योग आहेत.

दुसऱ्या ओलाफच्या स्मृत्यर्थ अकराव्या शतकात बांधलेले कॅथीड्रल स्कँडिनेव्हियातील सर्वांगसुंदर गॉथिक कॅथीड्रल मानले जाते. येथील एर्केबिस्वे गार्डन, प्राचीन इतिहास वस्तुसंग्रहालय, स्टिफ्टस् गार्डन ही युरोपातील सर्वांत मोठी लाकडी इमारत, कला अकादमी, शहाराच्या दक्षिण भागातील नॉर्वेचे तांत्रिक विद्यापीठ, रॉयल नॉर्वेजियन सोसायटीचे मुख्यालय ही प्रवाशांची आकर्षणे आहेत.

ओक, द. ह.