मिसूरी नदी : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील मिसिसिपी नदीची सर्वांत लांब प्रमुख उपनदी. नदीपात्रातील रेतीचे प्रमाण जास्त असल्याने ती ‘बिग मडी’ या टोपणनावानेही ओळखली जाते. ४,१३० किमा. लांबीच्या या नदीचे जेफर्सन (रेडरॉक), मॅडिसन व गॅलटिन हे प्रमुख शीर्षप्रवाह असून ते माँटॅना राज्याच्या नैर्ऋत्य भागात रॉकी पर्वतरांगेत सस. पासून सु. १,२१५ मी. उंचीवर उगम पावतात. याच राज्यातील थ्रि फोर्क्स शहरापासून त्यांचा संयुक्त प्रवाह मिसूरी या नावाने ओळखला जातो. मिसूरी व तिच्या उपनद्या यांनी एकूण १५,०२,२०० चौ. किमी. क्षेत्राचे (कॅनडा व अ. सं. सं. मिळून) जलवाहन केले आहे.

उगमाकडील अगदी सुरूवातीच्या भागात मिसूरी नदी सु. १६० किमी. पर्यंत पाइन वृक्षांच्या गर्द झाडीतून व डोंगराळ प्रदेशातून ईशान्य दिशेने बिग बेल्ट रांगेतून वाहत जाते. या भागात तिने ‘गेट ऑफ द मौंटन्स’ ही प्रसिद्ध दरी तयार केली आहे. तिच्या सुरुवातीच्या प्रदेशात अनेक धबधबे (विशेषतः ग्रेट फॉल्स) व तीव्र उतार आहेत. या भागात ३० मी. उंचीचे ४ टप्पे घेऊन नदी सु. १५० मी. खाली येते. या धबधब्यांचा उपयोग वीजनिर्मितीसाठी करण्यात आला आहे. नंतर फोर्ट बेंटन शहराजवळ ही नदी वळण घेऊन नॉर्थ डकोटा राज्याच्या सरहद्दीपर्यंत पूर्व दिशेने वाहते. माँटॅना राज्यात तिने अनेक ठिकाणी निदऱ्या तयार केल्या आहेत. या राज्यात तिला उत्तरेकडून (डाव्या बाजूने) स्यून, टेटॉन, मारायअझ, मिल्क इ., तर दक्षिणेकडून स्मिथ, ज्यूडिथ, मसलशेल व यलोस्टोन (मुख्य उपनदी) या नद्या मिळतात. यात भागात या नदीवर फोर्ट पेक हे जगातील महत्त्वाचे धरण बांधले असून त्याच्या परिसरात अमेरिकन इंडियन पशुपालनाचा व्यवसाय करतात. पुढे नॉर्थ डकोटा व साउथ डकोटा राज्यांत ही नदी आग्नेय दिशेने वाहत जाते. हिमनद्यांनी वाहून आणलेल्या निक्षेपांच्या या प्रदेशातून जाताना मिसूरी व तिच्या उपनद्या जमिनीची धूप करतात. या प्रक्रियेमुळे रंगीत गाळथरांची अनेक टेकाडे बनली आहेत. त्या भागाला ‘उत्खातभूमी’ म्हणतात. या राज्यांत मिसूरीला डावीकडून जेम्स, बिग सू तर उजवीकडून ग्रँड, मॉरो, शायेन, व्हाइट इ. नद्या मिळातात. या दोन राज्यांत या नदीवर अनेक धरणे बांधण्यात आली असून, मानवनिर्मित मोठी सरोवरे बनलेली आहेत. साउथ डकोटा व नेब्रॅस्का या राज्यांची सु. १६० किमी. लांबीची सरहद्द या नदीमुळे बनली आहे. त्यानंतर नेब्रॅस्का-आयोवा, कॅनझस तसेच मिसूरी-कॅनझस यांच्या सरहद्दींवरून ही नदी कॅनझस सिटीपर्यंत जाते. येथे तिला उजवीकडून कॅनझस नदी मिळते. नेब्रॅस्का राज्यात तिला नायब्रारा व प्लेट या नद्या मिळतात. कॅनझस सिटीनंतर ही नदी पूर्ववाहिनी बनते व मिसूरी राज्याच्या मध्यातून वाहत जाऊन सेंट लूइस शहराच्या उत्तरेला २७ किमी. वर मिसिसिपी नदीला मिळते. या राज्यात तिला लिटल प्लेट, ग्रँड व शॅरिटन या डावीकडून, तर ब्लॅकवॉटर, ओसेज व गॅस्कनेड या उजवीकडून मिळणाऱ्या नद्या आहेत.

मिसूरी नदीच्या पाण्यात रेती व गाळ यांचे प्रमाण बरेच असल्याने ते तपकिरी रंगाचे दिसते. त्यामुळे मिसूरी-मिसिसिपी संगमानंतरही सु. १६० किमी. पर्यंत या दोन नद्यांचे प्रवाह वेगवेगळे (तपकिरी व करड्या रंगांचे) ओळखता येतात. पुरांपासून वारंवार उद्‌भवणारे धोके, तसेच विद्युत्‌निर्मिती, जलसिंचन, पर्यटन यांसाठी या नदीवर व तिच्या उपनद्यांवर अनेक धरणे बांधण्यात आली आहेत. त्यांपैकी गॅरिसन, ओवाही, पिअर, फोर्ट रँडॉल, गॅव्हिन्स पॉइंट, फोर्ट पेक इ. महत्त्वाची असून उपनद्यांवर सु. ८० धरणे आहेत. या नदीतून सू सिटीपासून मिसिसिपी नदीपर्यंत सलग जलवाहतूक होऊ शकते मात्र डिसेंबर ते मार्च या काळात वरच्या भागात पाणी गोठल्याने वाहतुकीत थोडे अडथळे येतात. उन्हाळ्यात पाण्याची पातळी कमी होते परंतु धरणांमधील पाणी पात्रात सोडून पाण्याची पातळी कायम राखली जाते. नदीखोऱ्यात बहुतेक सर्व प्रकारची पिके घेतली जातात. तसेच पशुपालन, जलाशयांमध्ये मासेमारी हेही व्यवसाय चालतात. नदीकाठावर कॅनझस सिटी, सेंट झोझेफ, ओमाहा, सू सिटी, बिस्मार्क, विलिस्टन, फोर्ट बेंटन इ. व्यापारी व औद्योगिक शहरे आहेत.

या नदीचा वापर पूर्वीपासून अमेरिकन इंडियन लोक वाहतुकीसाठी करत होते. १६७३ मध्ये ल्वी झॉल्ये व झाक मार्केत हे फ्रेंच समन्वेषक मिसिसिपीचे समन्वेषण करताना या नदीमुखाशी आले. पुढे अठराव्या शतकात काही फ्रेंच व्यापाऱ्यांनी या नदीच्या मुखाकडील प्रदेशाचे समन्वेषण केले, त्यावेळी ही नदी ‘पेकिटानॉई’ या नावाने ओळखली जात होती. मिसूरी हे नाव तिच्या काठी राहणाऱ्या इंडियनांच्या नावावरून अथवा ‘मडी वॉटर’ या अर्थाच्या ‘सू’ या शब्दावरून पडले असावे. १८०४–०६ या काळात मेरिवेदर ल्यूइस व विल्यम क्लार्क यांनी एक धाडसी मोहीम काढून या नदीतून वरच्या भागात जाऊन रॉकी पर्वतरांगा ओलांडल्या व कोलंबिया राज्यातून पॅसिफिक महासागरापर्यंतचा प्रवास करून ते परतले. फर उद्योगाचे व्यापारी आणि स्थानिक वाटाडे यांनीही या नदीतून एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात प्रवास केला. मिसूरी नदीतून वाफेच्या बोटीचा उपयोग १८१९ साली प्रथम करण्यात आला. लोहमार्गाच्या प्रगतीबरोबर, विशेषतः अमेरिकन यादवी युद्धकाळात, नदीतील वाहतूक कमी झाली तथापि विसाव्या शतकाच्या मध्यापासून जलवाहतुकीबरोबरच बहुद्देशी जलप्रकल्पांसाठी या नदीचा विशेषत्वाने उपयोग होत आहे.

चौंडे, मा. ल.