व्हर्जिन बेटे : वेस्ट इंडीज बेटांपैकी कॅरिबियन समुद्र व अटलांटिक महासागर या दरम्यानचा सु. शंभरांवर लहानलहान बेटांचा समूह. ग्रेटर अँटिलीसचा अगदी पूर्वेकडील, तर लेसर अँटिलीसचा अगदी पश्चिमेकडील भाग व्हर्जिन बेटांनी व्यापला आहे. प्वेर्त रीकोच्या पूर्वेस सु. ६४ किमी. पासून ९७ किमी. पर्यंत यांचा विस्तार झालेला आहे. राजकीयदृष्ट्या संयुक्त संस्थानांची व्हर्जिन बेटे (पूर्वीची डॅनिश वेस्ट इंडीज बेटे) व ब्रिटिश व्हर्जिन बेटे अशा दोन गटांत ही विभागली आहेत.
या बेटांची निर्मिती प्रामुख्याने ज्वालामुखी क्रियेतून झालेली आहे. भूशास्त्रीयदृष्ट्या ह्या बेटांचे साधर्म्य प्वेर्त रीको व ग्रेटर अँटिलीस बेटांशी दिसते. ही बेटे म्हणजे ग्रेटर अँटिलीस व प्वेर्त रीकोवरील मध्यवर्ती प्रस्तरभंगयुक्त ठोकळ्याच्या पर्वतांचे विस्तारित असे जलमग्न माथे आहेत. ऍनेगाडा खाडीमुळे ही बेटे लेसर अँटिलीसपासून अलग झाली आहेत. घडीयुक्त गाळाचे खडक, रूपांतरित व अग्निजन्य खडक यांपासून यांची भूस्तररचना बनलेली आहे. काही ठिकाणी चुनखडक व गाळाच्या मृदेचे आच्छादन आढळते.
ही बेटे बरीच डोंगराळ व खडबडीत असून अनेक ठिकाणी त्यांची उंची ४९० मी. पर्यंत वाढत गेलेली आहे. टॉर्टोल बेटावरील मौंट सॅग (उंची ५४३ मी.) हे व्हर्जिन बेटांमधील सर्वोच्च ठिकाणी आहे. पर्वत, प्रवाळ खडकयुक्त खाजण, रोधक पुळणी व भूवेष्टित बंदरे अशी विविध प्रकारची भूमिस्वरूपे येथे आढळतात. बेटांवर कधीकधी भूकंपाचे सौम्य धक्के बसतात. सेंट क्रोई बेटाचा अपवाद वगळता कोणत्याही दोन बेटांमधील अंतर पाच किमी.पेक्षा अधिक नाही.
व्हर्जिन बेटांवर अनेक सुंदर पुळणी आहेत. काही ठिकाणी त्या प्रवाळ खडकांनी वेढलेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी अतिशय मनोवेधन खडक-रचना निर्माण झालेली आढळते. उदा., व्हर्जिन गॉर्द बेटावरील बाथ हे ठिकाण. तेथे पाण्याच्या घर्षणाने वाटोळे व सुटे झालेले मोठे दगड असून त्यांत प्रचंड गुहा निर्माण झाल्या आहेत. फॉलन जेरूसलेमवर दगडाच्या मोठमोठ्या चिपा असून त्या पाषाणरूपी शहराचे अवशेष वाटतात. सर फ्रान्सिस ड्रेक चॅनेलमुळे मोठी व्हर्जिन बेटे लहान बेटे व द्वीपकांच्या रांगेपासून अलग झाली आहेत. चॅनेलचा हा भाग खोल वाहतूकयोग्य असून सर फ्रान्सिस ड्रेक याने याचा वापर केला होता. व्हर्जिन बेटांचे हवामान उष्ण कटिबंधीय प्रकारचे आहे. परंतु ईशान्य व्यापारी वाऱ्यांनी तापमानाची तीव्रता कमी केली जात असल्यामुळे वर्षभर हवामान सम, आल्हाददायक व आरोग्यवर्धक राहते. येथील पर्यटन उद्योगाच्या विकासातील हा महत्त्वाचा घटक ठरला आहे. येथील सरासरी तापमान हिवाळ्यात २१ अंश ते २९ अंश सें., तर उन्हाळ्यात २४ अंश ते ३१ अंश से. यांदरम्यान राहते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०० ते १५० सेंमी. असते. पाऊस प्रामुख्याने सप्टेंबर ते डिसेंबर या काळात पडतो. अवर्षणाची स्थिती नेहमीच निर्माण होते. ऑगस्ट ते ऑक्टोबर यांदरम्यान कधीकधी हरिकेन वादळांचा तडाखा या बेटांना बसतो. पाणीपुरवठा पूर्णपणे पावसावर अवलंबून असतो. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा साठा करून ठेवला जातो.
सुरुवातीच्या काळात पिकांच्या लागवडीसाठी उष्ण कटिबंधीय अरण्ये तोडण्यात आली. प्राणिजीवनही विरळ असून काही प्रमाणात हरणे व रानडुकरे आढळतात. बेटांवर आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची खनिजसंपत्ती नाही. सभोवतालच्या सागरभागात प्रवाळ, स्पंज व तेजस्वी विविधरंगी मासे आढळतात. येथे सु.६५० प्रकारचे शिंपले सापडतात.
व्हर्जिन बेटांवर सुरुवातीला आरावाक या अमेरिकन इंडियानांनी वस्ती केलेली असावी. कोलंबसाने १४९३ मध्ये व्हर्जिन बेटांचा शोध लावला. तो येथील सेंट क्रोई बेटावर उतरला असता, त्याला तेथे शूर कॅरिब इंडियानांची वस्ती आढळली. त्याच्या सफरीतील लोकांचा कॅरिब जमातींशी झगडाही झाला. त्यांनीच आरावाक इंडियानांना हुसकावून लावलेले असावे. या भागात अनेक बेटे असल्यामुळे त्या प्रत्येकाला वेगवेगळे नाव देणे अव्यवहार्य वाटल्याने ‘‘सेंट अर्स्यूल अँड द इलेव्हन थाऊंजड व्हर्जिन्स’’ या दंतकथेनुसार व त्या स्वधर्मवीरांच्या स्मरणार्थ बेटांच्या या समूहाला कोलंबसाने ‘व्हर्जिन’ असे नाव दिले व त्यांवर स्पेनचा हक्क सांगितला. स्पेनचा सम्राट पाचवा चार्ल्स याने १५५५ मध्ये पाठविलेल्या स्पॅनिश सफरीने कॅरिब लोकांचा पाडावा करून या बेटांवर स्पेनचा हक्क प्रस्थापित केला. १५९६ पर्यंत स्पॅनिशांनी बहुतांश कॅरिब लोकांना तेथून पळवून लावले किंवा ठार मारले. सुमारे दोन शतके ही बेटे म्हणजे चाचेगिरी करणाऱ्यांचे केंद्रस्थान होते. त्यामुळे यांतील काही बेटांना चाचांचीच नावे दिलेली आढळतात. उदा., डेड चेस्ट, कूपर आयलंड, नॉर्मन आयलंड, योस्ट व्हॅन डाइक इत्यादी. या बेटांवर फार मोठ्या प्रमाणावर गुप्तधन असल्याचे मानले जाते. १६५० मध्ये स्पॅनिशांनी ब्रिटिश वसाहतकारांना हुसकावून लावले. परंतु त्यानंतर त्याच वर्षी या बेटांचा ताबा फ्रेंचांनी घेतला. त्यांनी १६५३ मध्ये यांतील सेंट क्रोई बेट मॉल्टाच्या सरदाराला स्वेच्छेने प्रदान केले. परंतु त्याने ते बेट फ्रेंच वेस्ट इंडिया कंपनीला विकले. डच चाचांनी टॉर्टोल बेटावर आपले बस्तान बसविले. परंतु इंग्रज मळेवाल्यांनी १६६६ मध्ये त्यांना हुसकावून लावले व ब्रिटिश प्रशासनाखाली असलेल्या लीवर्ड बेटांना टॉर्टोल जोडण्यात आले. तथापि डेन्मार्कने सेंट टॉमस व सेंट जॉन बेटांवर हक्क सांगितला. डेन लोकांनी सुरुवातीला शिक्षा झालेल्या गुन्हेगारांच्या साहाय्याने, तर १६७३ नंतर आफ्रिकन गुलामांच्या साहाय्याने येथे ऊस उत्पादनास सुरुवात केली. आफ्रिकेतून आणले जाणारे गुलाम, युरोपला पाठविली जाणारी रम व मळी आणि युरोपकडून या बेटांकडे आणल्या जाणाऱ्या विविध वस्तू असा तिहेरी व्यापार येथे वाढीस लागला. सेंट टॉमस हे कॅरिबियन समुद्रातील गुलामांच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र बनले. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात साखरउद्योगाचे महत्त्व कमी होऊ लागले. त्याच दरम्यान गुलामांची दोन बंडे झाली. त्यामुळे मळ्यांची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. १८४८ मध्ये येथील गुलामगिरी संपुष्टात आली.
अठराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात व्हर्जिन बेटे दोन गटांत विभागली गेली. त्यांपैकी पूर्वेकडील गट ‘ब्रिटिश व्हर्जिन बेटे’ म्हणून तर पश्चिमेकडील गट ‘अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांची व्हर्जिन बेटे’ म्हणून ओळखला जाऊ लागला. ब्रिटिश चाचांनी डच वसाहतकऱ्यांकडून पूर्वेकडील बेटे बळकावून त्यांवर ग्रेट ब्रिटनचा हक्क सांगितला. ब्रिटिश राजवटीत सुरुवातीपासूनच ‘लीवर्ड आयलंड्स कॉलनी’ चा एक भाग म्हणून ही बेटे राहिली. १९५६ मध्ये मात्र ही कॉलनी संपुष्टात आल्यानंतर व्हर्जिन बेटे हा ग्रेट ब्रिटनचा स्वतंत्र आश्रित प्रदेश म्हणून राहिला.
या भागात लष्करी तळ उभारण्याचा जर्मनीचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी संयुक्त संस्थानांनी डेन्मार्ककडून पश्चिमेकडील व्हर्जिन बेटे खरेदी करण्याची बोलणी सुरू केली (१८६७). ऍनेगाडा खाडीवर या बेटांचा हक्क येत असल्याने आणि या खाडीमार्गे अटलांटिकमधून कॅरिबियनमध्ये येऊन पुढे पनामा कालव्याकडे जाता येत असल्यामुळे ही मोक्याची बेटे संयुक्त संस्थानांनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला. १९१७ मध्ये २५ लक्ष डॉलरला संयुक्त संस्थानांनी ही बेटे खरेदी केली. तीच अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांची व्हर्जिन बेटे होत.
व्हर्जिन बेटांवरील लोक प्रामुख्याने कृष्णवर्णीय असून पळून आलेल्या व मुक्त झालेल्या गुलामांचे ते वंशज आहेत. गरीब, श्वेतवर्णीय समाजातीलही काही लोक येथे आढळतात. सेंट टॉमस बेटावर फ्रेंचांचे वंशज अधिक आहेत. अलीकडच्या काळात विश्राम करण्यासाठी तसेच पर्यटन उद्योगाशी निगडित व्यवसाय चालविण्यासाठी अनेक सधन गोरे लोकही येथे वास्तव्यास आलेले आहेत. व्हर्जिन बेटांवरील लोकांची प्रमुख भाषा इंग्रजी आहे. ब्रिटिश व्हर्जिन बेटे अधिकृतरीत्या स्टर्लिंग प्रदेशात येत असली, तरी दोन्ही समूहांतील बेटांवर अमेरिकी डॉलर हे चलन वापरले जाते.
संयुक्त संस्थानांची व्हर्जिन बेटे : ग्रेटर अँटिलीसच्या पूर्व टोकाशी व प्वेर्त रीकोपासून पूर्वेस ६४ किमी. वर असलेल्या संयुक्त संस्थानांच्या व्हर्जिन बेटांमध्ये सेंट टॉमस, सेंट जॉन व सेंट क्रोई या प्रमुख तीन बेटांचा व सु. ५० लहान बेटांचा व द्वीपकांचा समावेश होतो. यांतील सेंट टॉमस व सेंट जॉन ही बेटे खूपच ओबडधोबड आहेत. वेस्ट इंडीजमधील लेसर अँटिलीस या एका मोठ्या द्वीपमालिकेचा अगदी पश्चिमेकडील काही भाग संयुक्त संस्थानांच्या व्हर्जिन बेटांनी व्यापला आहे. नॅरोझ या चॅनेलमुळे ही बेटे ब्रिटिश व्हर्जिन बेटांपासून अलग झालेली आहेत. यांतील काही बेटांवर फारच कमी वस्ती आहे, तर काही बेटांवर वस्तीच नाही. या बेटांचे एकूण क्षेत्रफळ १,९१० चौ. किमी, असून त्यांपैकी ३५२ चौ. किमी. कोरडी भूमी आहे. येथील एकूण लोकसंख्या १,०१,८०९ (१९९०) होती. सेंट टॉमस बेटावरील शार्लट अमाल्य (लोकसंख्या १२,३३१ – १९९०) हे या बेटांच्या राजधानीचे ठिकाण आहे.
सेंट टॉमस बेट : संयुक्त संस्थानांच्या व्हर्जिन बेटांमधील हे सर्वांत पश्चिमेकडील बेट आहे. याचे क्षेत्रफळ ८३ चौ. किमी. व लोकसंख्या ४८,१६६ (१९९०) होती. १६६५ मध्ये डेन लोकांनी यावर वस्ती केली. तत्पूर्वी ब्रिटिश व फ्रेंच वसाहतकार येथे शेती करीत होते. शार्लट अमाल्य ही येथील एक सुंदर जुनी नगरी तसेच एक प्रमुख नैसर्गिक सागरी बंदर आहे. एके काळी हे एक प्रमुख कॅरिबियन बंदर होते. पर्यटकांसाठीच्या विविध सुविधा येथे आहेत.
सेंट क्रोई बेट : मुख्य द्वीपसमूहाच्या दक्षिणेस सु. ४८ किमी. वर हे बेट आहे. हे या समूहातील सर्वांत मोठे बेट असून त्याचे क्षेत्रफळ २१८ चौ. किमी. व लोकसंख्या ५०,१३९ (१९९०) होती. बेटाची कमाल उंची मौंट ईगल (३५५ मी.) येथे आहे. फ्रेंच मॉल्टाचा सरदार, डच, ब्रिटिश व डेन यांच्या सत्ता यावर होऊन गेल्या. क्रिश्चनस्टेड (लोकसंख्या २,५५५ –१९९०) हे या बेटावरील प्रमुख गाव आहे. त्याच्या किनारी भागात डॅनिश वास्तुशिल्प व दगडी इमारती असून राष्ट्रीय स्मारक म्हणून त्यांचे जतन केलेले आहे. फ्रेडरिकस्टेड (लोकसंख्या १,०६४ – १९९०) हे दुसरे महत्त्वाचे बंदर आहे.
सेंट जॉन बेट : सेंट टॉमस बेटाच्या पूर्वेस पाच किमी. वर सेंट जॉन बेट आहे. त्याचे क्षेत्रफळ ५२ चौ. किमी. व लोकसंख्या ३,५०४ (१९९०) आहे. बेटाची कमाल उंची बॉर्दो मौंटन (३८९ मी.) येथे आहे. बेटाचा सु. तीन-चतुर्थांश भाग राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केलेला आहे. तसेच किनारी भागातील विस्तृत सागरी प्रदेशाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. बेटावरील नैसर्गिक सृष्टिसौंदर्य, वन्यजीवन, सागरी सृष्टिसौंदर्य, ऐतिहासिकदृष्ट्या प्रेक्षणीय स्थळे इत्यादींचे संवर्धन करणे, हा त्यामागील उद्देश आहे. संघीय शासनाकडून त्याचे प्रशासन पाहिले जाते. आग्नेय किनाऱ्यावरील कोरल हार्बर हे या विभागातील अतिशय सुरक्षित असे बंदर आहे. किनाऱ्यावर आकर्षक अशी प्रवाळ खडकरचना निर्माण झालेली आढळते.
या बेटांवर विकसनशील मुक्त अर्थव्यवस्था असून ती पर्यटन व निर्मिती उद्योगांवर आधारित आहे. उष्ण कटिबंधीय आल्हाददायक हवामान, आकर्षक सृष्टिसौंदर्य, मासेमारीच्या चांगल्या जागा, संयुक्त संस्थानांच्या मुख्य भूमीची समीपता व खुल्या बंदरांमुळे पर्यटन हा येथील प्रमुख उद्योग बनला आहे. सेंट क्रोई बेटाजवळील द्वीपकांच्या प्रवाळशैलभित्तींवर ‘बक आयलंड’ हे राष्ट्रीय स्मारक उभारले आहे. पर्यटन व्यवसायामुळे बेटांवरील लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे. दुकानदारी व्यवसायावर कराचे प्रमाण कमी ठेवलेले आहे. हंगामी तत्त्वावर इतर वेस्ट इंडीज बेटांवरून मजूर आणले जातात. १९९० मध्ये २८,२०७ लक्ष डॉलर किमतीची निर्यात व ३२,९४६ लक्ष डॉलर किमतीची आयात करण्यात आली. प्रमुख आयात अशोधित खनिज तेल, खाद्य पदार्थ, अर्ध-उत्पादित व पूरक वस्तू यांची तर निर्यात खनिज तेल उत्पादने, ऍल्युमिना, कपडे, घड्याळे, रम यांची असते. निर्यात प्रामुख्याने संयुक्त संस्थाने, प्वेर्त रीको व ब्रिटिश व्हर्जिन बेटांकडे होते. कॅरिबियन प्रदेशामध्ये येथील स्थूल राष्ट्रीय उत्पादन सर्वाधिक आहे.
रम निर्मिती, खनिज तेलशुद्धीकरण, घड्याळांची जुळणी, रसायने, औषधे, सुगंधी द्रव्ये, आफ्रिकेतून आयात केलेल्या बॉक्साइटवरील प्रक्रिया, विणकाम, तापमापक निर्मिती व वस्त्रनिर्माण हे येथील प्रमुख उद्योग आहेत. सेंट क्रोई बेटावर खनिज तेलशुद्धीकरण, घड्याळांची जुळणी, रसायने, औषधे, सुगंधी द्रव्ये, आफ्रिकेतून आयात केलेल्या बॉक्साइटवरील प्रक्रिया, विणकाम, तापमापक निर्मिती व वस्त्रनिर्माण हे येथील प्रमुख उद्योग आहेत. सेंट क्रोई बेटावर खनिज तेलशुद्धीकरण केले जाते. बेटांवर औष्णिक वीज निर्मिती होते.
एकूण भूक्षेत्रापैकी एक पंचमांश भूक्षेत्र लागवडीखाली आहे. सेंट क्रोई बेटावर असे सर्वाधिक क्षेत्र आहे. १९७० व १९८० च्या दशकांत केवळ परंपरागत ऊस उत्पादनच न घेता विविध प्रकारची पिके घेण्याकडे कल वाढला आहे. त्यांत लिंबू जातीची फळे, चिंच, आंबा, केळी, ज्वारी व भाजीपाला यांचा समावेश होतो. कृषिउत्पादने प्रामुख्याने स्थानिक वापरासाठीच घेतली जातात. नद्या व प्रवाह यांचा अभाव व डोंगराळ भूमी यांमुळे मोठ्या प्रमाणावरील शेती शक्य होत नाही. बहुतांश खाद्यपदार्थ आयात करावे लागतात. मांस व दुग्धोत्पादनासाठी बेटांवर काही प्रमाणात गुरे पाळली जातात. तसेच येथे अंडी उत्पादनही महत्त्वाचे आहे. बेटांवर १९९७ मधील पशुधन पुढीलप्रमाणे होते : गुरे ८,००० शेळ्या ४,००० मेंढ्या ३,००० डुकरे ३,००० कोंबड्या ९,०८७ (१९९२). सेंट क्रोई बेटावरील दूध उत्पादन महत्त्वाचे आहे. जलसिंचन सुविधांसाठी शासनाने सेंट क्रोई व सेंट टॉमस बेटांवर धरणे बांधली आहेत. या बेटांवर सहा निर्लवणीकरण प्रकल्प असून, गोडे पाणी मिळविण्याची त्यांची दैनिक कमाल क्षमता ८७ लक्ष गॅलन एवढी आहे. मात्र पावसाचे पाणी हाच खातरीचा मार्ग असल्याने ते हौदामध्ये साठविले जाते. केवळ सहा टक्के भूक्षेत्रावर अरण्ये आहेत. सेंट जॉनवरील बे प्रकारच्या वनस्पतींच्या पानांचा उपयोग रम उत्पादनासाठी होतो. स्थानिक गरजांची पूर्तता व खेळ म्हणून पकडले जाणारे मासे एवढ्यापुरतीच मासेमारी मर्यादित ठेवली आहे. सेंट जॉन बेटावर सागरी जीवविज्ञान प्रयोगशाळा आहे.
येथील रस्त्यांची एकूण लांबी ८५६ किमी. (१९९६) व मोटार वाहनांची संख्या ६३,३३२ (१९९३) होती. मोठे रस्ते फरसबंदी आहेत. सेंट क्रोई बेटाच्या दक्षिण किनाऱ्यावर नव्याने निर्माण केलेल्या बंदरांतून जास्तीत जास्त मालवाहतूक केली जाते. येथील प्रमुख तीन बेटांदरम्यान तसेच ब्रिटिश व्हर्जिन बेटे यांदरम्यान ‘तर’ प्रकारची वाहतूकसुविधा उपलब्ध आहे. सेंट टॉमस बेटावर सिरल ई. किंग व सेंट क्रोई बेटावर अलेक्झांडर हॅमिल्टन हे विमानतळ आहेत. येथे ८ नभोवाणी केंद्रे, १ सार्वजनिक व १ व्यापारी दूरचित्रवाणी केंद्र (१९९३) १,०७,००० रेडिओ संच व ६८,००० दूरचित्रवाणी संच (१९९७) होते. येथून ३ दैनिक वृत्तपत्रे, १ पाक्षिक व १ मासिक निघत होते (१९९६).
राजकीय स्थिती : संयुक्त संस्थानांनी ही बेटे १९१७ मध्ये खरेदी केली. १९२७ मध्ये बेटवासी संयुक्त संस्थानांचे नागरिक बनले. संयुक्त संस्थानांच्या कॉंग्रेसने १९३६ मध्ये मंजूर केलेल्या व १९५४ मध्ये दुरुस्त केलेल्या कायद्यानुसार या बेटांना अंतर्गत स्वायत्तता देण्यात आली. १९६८ मध्ये बेटवासीयांना आपल्या प्रदेशाचा गव्हर्नर निवडण्याचा हक्क प्रदान करण्यात आला. बेटांवर राहणाऱ्या अठरा वर्षे वयावरील लोकांनी चार वर्षांसाठी निवडून दिलेल्या गव्हर्नरकडे बेटांचे कार्यकारी अधिकार असतात. एकसदनी विधिमंडळाला काही मर्यादित वैधानिक अधिकार आहेत. या विधिमंडळात दोन वर्षांसाठी निवडून आलेले पंधरा सदस्य असतात. सेंट क्रोई व सेंट टॉमस-सेंट जॉन असे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. बेटावरील रहिवासी संयुक्त संस्थानांचे नागरिक असले, तरी संयुक्त संस्थानांच्या सार्वत्रिक अध्यक्षीय निवडणुकीत त्यांना मतदानाचा अधिकार नाही किंवा संयुक्त संस्थानांच्या कॉंग्रेसमध्ये प्रतिनिधित्व करणारांना मतदानाचा अधिकारही नाही. मात्र याला प्रतिनिधी सभागृहाचा अपवाद आहे. संयुक्त संस्थानांतील पक्षांशी संलग्न असलेले डेमॉक्रॅटिक व रिपब्लिकन पक्ष आणि इंडिपेंडन्ट मूव्हमेंट असे तीन राजकीय पक्ष येथे आहेत. या बेटांना अधिक स्वायत्तता मिळविण्याची दृष्टीने १९५४ पासून संविधानाचा मसुदा नव्याने तयार करण्याचे चार वेळा प्रयत्न झाले, परंतु प्रत्येक वेळी तो मसुदा नाकारण्यात आला.
लोक व समाजजीवन : येथील लोकसंख्या प्रामुख्याने ख्रिश्चन धर्मीय आहे. लोकसंख्येत ७०% कृष्णवर्णीय, १८% गौरवर्णीय व उर्वरित मिश्र किंवा इतर गटांतील लोक आहेत. १९६० ते १९७५ या काळात संयुक्त संस्थाने, पूर्व कॅरिबियन व प्वेर्त रीको येथून मोठ्या प्रमाणावर लोकांनी या बेटांकडे स्थलांतर केले. त्यामुळे येथील लोकसंख्या अतिशय वेगाने वाढली. परिणामत: मूळ द्वीपवासी व नवीन वसाहतकार यांच्यात तणाव निर्माण झाला. त्यानंतर मात्र वेस्ट इंडीजमधील सरासरीपेक्षा येथील लोकसंख्या वाढीचा वेग कमी राहिला. याचे प्रमुख कारण म्हणजे तुलनेने कमी जन्मदर, बालमृत्यूप्रमाण व एकूण मृत्युदराचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे सरासरी आयुर्मान ६९ वर्षे असून ते या प्रदेशातील सर्वाधिक आहे. सेंट टॉमस व सेंट क्रोइ येथे रुग्णालये असून फिरती आरोग्यसेवाही पुरविली जाते.
साडेपाच ते सोळा वर्षे वयोगटातील मुलांना प्राथमिक, माध्यमिक व व्यावसायिक शाळांमधील शिक्षण सक्तीचे व मोफत आहे. सेंट टॉमस व सेंट क्रोई येथील संस्थांमधून उच्च शिक्षण व शिक्षक प्रशिक्षण मिळते. मुख्य सार्वजनिक ग्रंथालय सेंट टॉमस बेटावर असून त्याच्या शाखा सेंट क्रोई व सेंट जॉन येथे आहेत. १९९७ मध्ये येथील प्राथमिक शाळांत ११,९२६ विद्यार्थी व ७७७ शिक्षक, माध्यमिक शाळांत ९,९८२ विद्यार्थी आणि ७८२ शिक्षक तर १९९० मध्ये ४४ खाजगी शाळांत ७,०१६ विद्यार्थी होते. इंग्रजी ही अधिकृत भाषा असली, तरी सेंट टॉमस बेटावरील काही लोक फ्रेंच भाषा बोलतात. सेंट क्रोई बेटावर काही प्रमाणात स्पॅनिश भाषा बोलली जाते.
ब्रिटिश व्हर्जिन बेटे : संयुक्त संस्थानांच्या व्हर्जिन बेटांच्या उत्तरेस व पूर्वेस तसेच कॅरिबियन समुद्र व ग्रेटर अँटिलीस बेटांच्या पूर्व भागात ही बेटे आहेत. यांमध्ये प्रमुख चार आणि ३२ लहान बेटांचा व द्वीपकांचा समावेश होत असून त्यांतील १६ बेटांवर वस्ती आहे. बेटांचे एकूण क्षेत्रफळ १५३ चौ. किमी. व लोकसंख्या १६,७४९ (१९९१) होती. टॉर्टोल –क्षेत्रफळ ५४ चौ. किमी. –लोकसंख्या १३,५६८, व्हर्जिन गॉर्द –क्षेत्रफळ २१ चौ. किमी. लोकसंख्या २,४९५, –ऍनेगाडा –लोकसंख्या १५६ व योस्ट व्हॅन डाइक-क्षेत्रफळ ८ चौ. किमी. – लोकसंख्या १४१ (१९९१) ही यांमधील मुख्य चार बेटे आहेत. पैकी टॉर्टेल हे सर्वांत मोठे बेट आहे. टॉर्टोल बेटावरील रोड टाउन (लोकसंख्या ६,३३० –१९९१) हे ब्रिटिश व्हर्जिन बेटांच्या राजधानीचे ठिकाण, तसेच प्रमुख बंदर आहे. येथील बीफ बेटावर छोटा विमानतळ असून ते बेट पुलाने टॉर्टोलशी जोडले आहे. व्हर्जिन गॉर्द हे लांबट व अरुंद बेट असून त्याची उंची ४१४ मी. पर्यंत वाढत गेलेली आहे. योस्ट व्हॅन डाइक बेट बरेच ओबडधोबड आहे. ऍनेगाडा हे यातील सर्वांत उत्तरेकडील बेट आहे. ते सपाट माथ्याचे प्रवाळद्वीप असून त्याच्या सभोवती धोकादायक अशा शैलमाला आहेत. या बेटांवर नद्या नाहीत.
आर्थिक स्थिती : ब्रिटिशांनी १६६६ मध्ये या बेटांवर वसाहत केल्यानंतर येथून ऊस व कापूस उत्पादनास सुरुवात केली. १९६३ पर्यंत येथील अर्थव्यवस्थेत विशेष बदल झाला नाही. परंतु त्यानंतर करांचे प्रमाण कमी ठेवून व वाहतूक दळणवळण सुविधांत सुधारणा करून पर्यटन व्यवसायाच्या विकासास चालना देण्यात आली. पर्यटन हा ब्रिटिश व्हर्जिन बेटांच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार असून, वसाहतीचे निम्मे उत्पन्न त्यातून मिळते. ७५ टक्के लोकांचा हाच प्रमुख व्यवसाय आहे. या व्यवसायामुळे इतर पूरक उद्योगांनाही चालना मिळाली आहे. १९९५ मध्ये ३,६४,१४७ पर्यटकांनी या बेटांना भेटी दिल्या. १९९४ मध्ये पर्यटकांपासून १,९७७ लक्ष अमेरिकी डॉलर उत्पन्न मिळाले. जलक्रीडा व याट बोटींच्या शर्यतींसाठी हा प्रदेश विशेष प्रसिद्ध आहे. याट व इतर बोटींची दुरुस्ती, रम, रंग, बर्फ व बांधकामाचे साहित्य-निर्मिती इत्यादींचे छोटेछोटे कारखाने येथे आहेत. कुटिरोद्योगांतर्गत विणलेल्या टोपल्या तसेच पर्यटकांकडून खरेदी होणाऱ्या विविध वस्तूंची निर्मिती येथे केली जाते.
कृषियोग्य क्षेत्र २,१५४ हे. असून त्यांपैकी ७१५ हे. पिकांखाली व १,४३९ हे. चराऊ क्षेत्र होते (१९९४). केळी, ऊस, लिंबूजातीची फळे, नारळ, आंबा व विविध कंदमुळे ही कृषिउपादने मुख्यत: स्थानिक वापरासाठी घेतली जातात. काही फळे व भाजीपाल्यांची निर्यात केली जाते. पशुपालन हा येथील महत्त्वाचा व्यवसाय असून १९९४ मध्ये या बेटांवर ३,५०० गुरे २,८०० डुकरे ५,००० मेंढ्या ६००० शेळ्या इतके पशुधन होते. मासेमारी व्यवसायात वाढ होत असून ताज्या माशांची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते.
ब्रिटिश व्हर्जिन बेटांवर बेरोजगारीचा प्रश्न नाही. वेतन व राहणीमान उच्च असून ते वेस्ट इंडीज बेटांच्या बरोबरीचे आहे. विदेश-व्यापार प्रामुख्याने संयुक्त संस्थाने व त्यांची व्हर्जिन बेटे, प्वेर्त रीको, नेदर्लंड्स अँटिलीस व ग्रेट ब्रिटन यांच्याशी चालतो. बांधकामाचे साहित्य, खाद्यपदार्थ, यंत्रे, खनिज तेलउत्पादने, मोटारी व मद्ये यांची आयात केली जाते. १९९३ मध्ये एकूण आयात-मूल्य १,२२९ लक्ष अमेरिकी डॉलर व निर्यात – मूल्य ५५ लक्ष डॉलर एवढे होते. ग्रेट ब्रिटनकडून आर्थिक मदत मिळते. आयकर व निगमकरांचे प्रमाण कमी आहे. येथील दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पादन १६,७५५ अमेरिकी डॉलर होते (१९९४). अमेरिकी डॉलर हे चलन येथे वापरले जाते. बेटांवर एकूण ११ बँका आणि इतर ६७ विश्वस्त वित्तसंस्था होत्या (१९९६). वित्तसेवा पुरविणे हा पर्यटनानंतरचा दुसरा प्रमुख व्यवसाय आहे.
ब्रिटिश व्हर्जिन बेटांवरील मोटार – रस्त्यांची लांबी १०७ किमी. होती (१९९४). एका पुलाद्वारे टॉर्टोल बेट पूर्वेकडील बीफ बेटाशी जोडले आहे. नोंदणीकृत वाहने टॉर्टोल बेटावर ६,२६५ व व्हर्जिन गॉर्द बेटावर ७६० होती (१९९४). रोड टाउनपासून १६ किमी. वर असलेल्या बीफ बेटावर मुख्य विमानतळ आहे. टॉर्टोल बेटावरील रोड टाउन तसेच पोर्ट पर्सेल ही दोन खोल सागरी बंदरे आहेत.
राजकीय स्थिती : ग्रेट ब्रिटनचा हा अवलंबी प्रदेश आहे. १६४८ मध्ये डचांनी येथे वस्ती केली होती. १६६६ मध्ये ब्रिटिश मळेवाल्यांनी त्यांवर ताबा मिळविला. १७७३ मध्ये इंग्रज मळेवाल्यांना घटनात्मक प्रातिनिधिक नागरी शासन मान्य करण्यात आले. १८६७ मध्ये येथील प्रातिनिधिक शासन बरखास्त करण्यात आले. १८७१ ते १९५६ या काळात राजकीयदृष्ट्या ही बेटे ‘कॉलनी ऑफ दी लीवर्ड आयलंड्स फेडरेशन’ चा सभासद प्रदेश होती. त्यानंतर ब्रिटिश व्हर्जिन बेटांची स्वतंत्र वसाहत बनली. वेस्ट इंडीज फेडरेशनच्या काळात (१९५८ – ६२) लंडनमधील वसाहन कार्यालयाकडून या बेटांचा कारभार चालत असे. १९६७ मध्ये या बेटांना अंतर्गत स्वयंशासनाचा अधिकार मिळाला व तो ग्रेट ब्रिटनचा अवलंबी प्रदेश बनला. १९७७ मध्ये अमलात आलेल्या संविधानानुसार येथील राज्यकारभार चालतो. ब्रिटिश राजसत्तेकडून नियुक्त केलेला गव्हर्नर हा येथील प्रमुख कार्यकारी अधिकारी असतो. परराष्ट्रीय व्यवहार, संरक्षण व काही अंतर्गत गोष्टींना तो जबाबदार असतो व त्याने कार्यकारी परिषदेच्या सूचनांचे पालन करावे अशी अपेक्षा असते. कार्यकारी परिषदेत गव्हर्नर, मुख्यमंत्री, ऍटर्नी जनरल (पदसिद्ध सदस्य) आणि तीन मंत्री असतात. मंत्र्यांची नेमणूक गव्हर्नरकडून होते. येथे विधान परिषदही असून तीत सभापती, ऍटर्नी जनरल हे पदसिद्ध सदस्य व लोकांनी निवडून दिलेले नऊ सदस्य असतात. सभापतींची निवड परिषदेच्या बाहेरून होते. वयाच्या अठराव्या वर्षी मतदानाचा हक्क प्राप्त होतो. येथे व्हर्जिन आयलंड्स पार्टी व नॅशनल पार्टी असे दोन प्रभावी राजकीय पक्ष आहेत.
लोक व समाजजीवन : ब्रिटिश व्हर्जिन बेटांवर प्रामुख्याने कृष्णवर्णीय व मलॅटो लोकांचे आधिक्य असून ते आफ्रिकन गुलामांचे वंशज आहेत. गोऱ्या लोकांचे प्रमाण अल्पच राहिले आहे. सर्वाधिक लोकसंख्या टॉर्टोल बेटावर असून ती एकूण लोकसंख्येच्या तीन चतुर्थांश आहे. तसेच टॉर्टोल बेटावरील एकूण लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश लोक रोड टाउन नगरात राहतात. इंग्रजी ही येथील अधिकृत भाषा आहे. येथील लोक प्रॉटेस्टंट पंथाशी निगडित असून त्यांपैकी मेथडिस्ट हा मोठा गट आहे. प्रदेशातील सरासरी जन्मदरापेक्षा येथील जन्मदर कमी आहे. बालमृत्युप्रमाण व सरासरी मृत्युमानसुद्धा तुलनेने कमीच आहे. टॉर्टेलवरील ५० खाटांची सोय असलेल्या सार्वजनिक रुग्णालयाखेरीज वेगवेगळ्या ठिकाणी चिकित्सालये आहेत. गोड्या पाण्याचा मात्र तुटवडा असून काही प्रमाणावर त्याची आयात करावी लागते.
ब्रिटिश व्हर्जिन बेटांमधील साक्षरतेचे प्रमाण ९५ टक्के होते (१९९५). पंधरा वर्षे वयापर्यंतच्या मुलांना शिक्षण मोफत व सक्तीचे आहे. शासनामार्फत चालविल्या जाणाऱ्या येथे १६ शाळा असून त्यांपैकी तीनमध्ये माध्यमिक वर्ग आहेत. यांशिवाय १६ खाजगी शाळा होत्या (१९९५). येथे उच्च शिक्षणाची सोय नाही परंतु काही विद्यार्थी संयुक्त संस्थानांच्या व्हर्जिन बेटांवरील विद्यापीठात किंवा इतर समुद्रपार शिक्षण संस्थांत दाखल होतात. रोड टाउन येथे एक ग्रंथालय आहे. प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळांतील एकूण विद्यार्थिसंख्या २,८५५ व माध्यमिक शाळांतील १,३६३ होती (१९९४). इंग्लंडच्या हल विद्यापीठाची शिक्षणशास्त्रविषयक शाखा १९८६ पासून येथे सुरू झाली आहे. येथून दोन साप्ताहिके व एक द्विसाप्ताहिक निघते. टॉर्टोल बेटावरील बाउहर्स बे येथे नभोवाणी केंद्र आहे. येथे ९,२८२ दूरध्वनीसंच, २१ टेलेक्स सेवाकेंद्रे व ५८२ फॅक्स सेवाकेंद्रे होती (१९९५).
चौधरी, वसंत