शिआंगतान : चीनच्या हूनान प्रांतातील शिआंगतान विभागाचे (प्रीफेक्ट) प्रशासकीय केंद्र. लोकसंख्या ५, ७४,००० (१९८०). चांगशा या प्रांतिक राजधानीपासून नैर्ऋत्येस ३० किमी. अंतरावर शिआंग नदीतीरावर हे शहर वसले आहे. जुने शिआंगतान शहर या नदीच्या पश्चिम तीरावर होते. १९४९ नंतर शहराची औद्योगिक वाढ नदीच्या पूर्वतीरावर होत गेली. सुती वस्त्रोद्योग, विद्युत्‌साहित्य व विद्युत्‌निर्मिती, लोह-पोलाद, सिमेंट, यांत्रिक हत्यारे, ट्रकनिर्मिती, अभियांत्रिकी उद्योग, भातसडीच्या गिरण्या, खाद्यपदार्थ-प्रक्रिया इ. उद्योगधंदे शहरात चालतात. पूर्वीपासूनच हे कृषिमालाच्या साठवणीचे, वितरणाचे व व्यापाराचे केंद्र आहे. याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर तांदळाचे उत्पादन होते. एक नदीबंदर म्हणूनही हे महत्त्वाचे आहे. पूर्वी शिआंगतान औषधनिर्मितीसाठी प्रसिद्ध होते. आधुनिक चीनचा शिल्पकार माओत्से-तुंग याचे जन्मगाव शाव-शान हे शिआंगतानपासून पश्चिमेस सु. ४५ किमी. अंतरावर आहे. 

चौधरी, वसंत

Close Menu
Skip to content