लॅपलँड : लॅप या भटक्या आदिम लोकांचे वास्तव्य असलेला वायव्य यूरोपचा अति-उत्तरेकडील (बहुतेक भाग उत्तर ध्रुववृत्ताच्या उत्तरेस) भूभाग. लॅपलँड या भौगोलिक संज्ञेत सामान्यतः पुढील भूप्रदेश अंतर्भूत होतात : नॉर्वेच्या उत्तरेकडील नॉर्डलँड, ट्रॉम्स आणि फिन्मार्क हे परगणे स्वीडनच्या उत्तरेकडील व्हेस्टरबॉटन आणि नॉर्बॉटन हे परगणे फिनलंडच्या उत्तरेकडील लॅपी परगणा आणि सोव्हिएट रशियातील कोला द्वीपकल्प. लॅपलँडचे एकूण क्षेत्रफळ ५,००,००० चौ.किमी. असून लोकसंख्या १,१८,८१९ (अंदाज १९८४) होती. उत्तरेला आर्क्टिक महासागर, पश्चिमेस नॉर्वेजियन समुद्र, दक्षिणेला बॉथनियाचे आखात, पूर्वेस बॅरेंट्स समुद्र व आग्नेयीस श्वेत समुद्र यांमध्ये हा प्रदेश पसरला आहे. स्वीडनमधील चलन पर्वतश्रेणीतील केब्नकाइस हे सर्वोच्च शिखर (उंची २,१२३ मी.) असून नॉर्वेमधील पर्वतरांगांच्या पूर्वेस फिन्मार्क हे मोठे पठार समुद्रसपाटीपासून सु. ६०० मी. उंचीवर आहे. फिनलंडमधील या प्रदेशाचा दक्षिण भाग नद्या, नाले, लहान सरोवरे आणि दलदलीचा आहे.

लॅपलँड ही सामूहिक संज्ञा (फिनिश-लॅपी आणि स्वीडिश-लॅपलँड) तेथील लॅप लोकांवरून वायव्य यूरोपातील भिन्न भूप्रदेशाला रूढ झाली आहे. या प्रदेशात लॅप लोकांची संख्या जास्त असली, तरी वस्ती मात्र तुरळक आहे. आतापर्यंत हा प्रदेश स्वतंत्र वा स्वायत्त देश म्हणून कधीच विकसित झाला नाही आणि लॅप रहिवाशांनीही तशी कधी आग्रहाची मागणी केली नाही. त्यामुळे त्यांची संघटना आदिम अवस्थेतच राहिली. साहजिकच स्कँडिनेव्हियन किंवा रशियन आधिपत्याखालीच त्यांचे सर्व नित्यनैमित्तिक व्यवहार चालतात. त्यामुळे लॅपलँडच्या भौगोलिक सीमा परिस्थित्यनुसार बदलत राहिल्या आहेत.

येथील मूळ रहिवासी लॅप. त्यांच्या मूलस्थानाविषयी तसेच इतिहासाविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. पुरातत्त्वीय अवशेषांनुसार या भूप्रदेशात अश्मयुगात मानवी वस्ती होती, हे सिद्ध झाले आहे. मध्ययुगात येथे रेनडियरचे कळप पाळणाऱ्या काही आदिम लोकांची वस्ती होती. रानटी टोळ्यांच्या आक्रमणांमुळे हे लोक उत्तरेकडे सरकले. स्कँडिनेव्हियन विस्तारापूर्वी व्हायकिंग काळात (८०० ते १,१००) लॅप लोकांची मुख्यत्वे नॉर्वेच्या आग्नेय भागातील हेडमार्क परगण्यापासून रशियाच्या उत्तर भागातील कोला द्वीपकल्पापर्यंत वस्ती होती. मध्ययुगात ते रानटी टोळ्यांच्या आक्रमणांमुळे नॉर्वे, स्वीडन आणि फिनलंडच्या उत्तर भागात रेटले गेले. मानवशास्त्रज्ञांच्या मते ते मध्य आशियातून या प्रदेशात आले असावेत. सतराव्या शतकात या प्रदेशाचे प्रथमच ‘लॅपलँड’ हे नाव प्रचारात आले. विवक्षित शासनव्यवस्था नसल्यामुळे नॉर्वे, स्वीडन, रशिया या देशांतील शासनव्यवस्थांनुसार त्यांना कर द्यावे लागतात. अनेक वेळा त्यांना दोनदोन शासनांना कर देण्याची वेळ येते. उत्तर ध्रुवाच्या सान्निध्यामुळे येथील हवामान अतिशय थंड व आर्द्र आहे. नऊ महिने हिवाळा आणि तीन महिने उन्हाळा तसेच हिवाळ्यात अनेक दिवस सूर्यदर्शन होत नाही. तर उन्हाळ्यात सूर्य काही दिवस मावळतच नाही. यामुळे लॅपलँड हा प्रदेश सर्द आणि ओसाड झाला आहे. त्यात टंड्रासदृश तुरळक वनस्पती, खुरटे गवत आणि स्प्रूस, पाइन, देवदार, भूर्ज यांसारख्या वृक्षवल्ली आढळतात. शेवाळ आणि दगडफूल या वनस्पतींही काही ठिकाणी उगवतात. येथील वनस्पतींवर रेनडियरचे कळप तसेच गुरेढोरे इ. पशुपालन व्यवसाय चालतात. या पशुसंवर्धनातून मांस, दूध, कातडी व लोकर यांचे व्यवसाय वृद्धिंगत झाले आहेत. लोकरीचे व कातड्याचे कपडे, तेही रंगीबेरंगी, हा येथील लोकांचा सर्वसाधारण पोषाख असतो. जंगल व किनारपट्टीतून शिकार, लाकूडतोड तसेच मच्छीमारी हे व्यवसाय चालतात. नदीकाठचे व किनारपट्ट्यांवरील हवामान सौम्य व काही अंशी उबदार असले, तरी उर्वरित भागात बर्फ पडते. उन्हाळ्यात सौम्य उबदार हवामानात धान्याची पेरणी करून बटाटे, सातू, राई इ. पिके घेतात. नदीकाठी अलीकडे शेती  करण्याचे प्रमाण हळूहळू वाढू लागले आहे. ऋतुमानाप्रमाणे स्थलांतर करणारे काही पक्षी येथे बाहेरून येतात. काहीभागांत दाट जंगले आढळतात, त्यांतून वन्य प्राणी आहेत. वांशिक दृष्ट्या येथील लोक बुटके (सरासरी उंची १५० सेंमी.), लहान डोक्याचे, बळकट व मांसल आहेत. त्यांची चेहरेपट्टी काहीशी चिनी व जपानी लोकांसारखी असून अलीकडे त्यांचे नातेसंबंध स्वीडिश, फिनिश आणि नॉर्वेजियन लोकांशी होत असल्यामुळे या संकरातून त्यांची शारीरिक ठेवण वेगळी होऊ लागली आहे.

या प्रदेशात लोहधातुक (लोह) आणि निकेल हे दोन मूल्यवान धातू विपुल प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. स्वीडिश दक्षिण लॅपलँडमध्ये लोहधातुकाच्या खाणी असून रशियाव्याप्त लॅपलँडमधील खाणींतून निकेल मिळते. लॅपलँडमधील एकूण लोहधातुकाचा साठा हा जगातील एक मोठा साठा असून येलिव्हार, कीरूना, माम्बेर्यट येथील खाणी लोहसाठ्यांसाठी जगप्रसिद्ध आहेत. रेल्वेने या खाणी बॉथनियाच्या आखातावरील ल्युलेए (स्वीडन) आणि नॉर्व्हिक (नॉर्वे) या आंतरराष्ट्रीय बंदरांशी व्यापाराच्या सोयीसाठी जोडल्या आहेत. तेथून कच्च्या लोखंडाची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते.

शिकार, मोलमजुरी, मच्छीमारी आणि पशुपालन या प्रमुख व्यावसायांव्यतिरिक्त रेनडियरचे कळप पाळणे हा येथील आदिम लोकांचा मोठा व्यवसाय आहे. सतराव्या शतकात तो लॅपलँडमध्ये प्रविष्ट झाला. लॅप लोकांनी स्कँडिनेव्हियन चालीरीतींबरोबर रेनडियरचे मांस, दूध, कातडी, लोकर यांचा क्रय-विक्रय करणे आत्मसात कले. तत्पूर्वी लॅप हे भटक्या अवस्थेत शिकार व मच्छीमारी हेच उद्योग करीत असत. सांख्यिकीय दृष्टीने सांप्रत केवळ दहा टक्केच लोक रेनडियरच्या सवंर्धनावर अवलंबून आहेत.

लॅप हे सकृतदर्शनी ख्रिस्ती धर्माचे अनुयायी असले आणि त्यांपैकी बहुसंख्य ल्यूथरन किंवा ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चचे अनुयायी असले तरी जुन्या जडप्राणवादी धर्मकल्पना त्यांच्यात अद्यापि मूळ धरून आहेत व शामानचे महत्त्व अनन्यसाधारण मानले जाते. लॅपलँडच्या औद्यागिकीकरणास दुसऱ्या महायुद्धानंतर धीम्या गतीने सुरुवात झाली. पॉर्यस व हार्स्प्राँगट येथील जलविद्युत केंद्रांमुळे उद्योगधंद्यांना चालना मिळाली असून कीरूना, येलिव्हार, माम्बेर्यट इ. लोहखाणींतून आधुनिक तंत्रज्ञानानुसार प्रक्रियांची व सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. करमणुकीसाठी सारेक, स्टोरा, जॉकॉलेट्स इ. ठिकाणी राष्ट्रीय उद्याने बांधण्यात आली असून आबीस्कू, जॉर्कलिडन, रीक्सग्रेन्सन इ. गावे हिवाळी खेळांच्या क्रिडांगणांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे लॅपलँड हे प्रवाशांचे आकर्षण बनू पहात आहे. लोहमार्ग, हवाईमार्ग आणि रस्ते यांनी हे शेजारील प्रदेशांशी जोडलेले आहे.

संदर्भ : 1. Bosi Roberto, The Lapps, Westport, 1976.

           2. Crottet, Roberto Mendez, Enrique, Lapland, London, 1968.

           3. Spencer, A. The Lapps, Milton, 1978.

           4. Stalder, Valerie, Lapland, Tokyo, 1972.

           5. Vorren, Ornulvr, Lapp Life and Customs, Oxford, 1962.

देशपांडे, सु. र.