डग्लस : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी ॲरिझोना राज्यातील तांब्याच्या भट्ट्यांकरिता प्रसिद्ध असलेले एक शहर. लोकसंख्या १२,४६२ (१९७०). मेक्सिकोच्या सरहद्दीवर आग्वा प्रीएटापासून ते आंतराष्ट्रीय प्रवेशमार्गांमुळे वेगळे झाले आहे. हे शहर टूसॉनच्या आग्नेयीस २४० किमी.वर समुद्रसपाटीपासून १,२२८ मी. उंचीवर वसले आहे. जेम्स डग्लस या खाणी निगमाच्या अध्यक्षाच्या नावावरून याचे नाव पडले व १९०० मध्ये हे शहर वसविण्यात आले. यांच्या आसपास गुरे पाळण्याचा व्यवसाय असून तांब्याच्या भट्ट्या, जिप्समचे विविध प्रकार, लाकूडसामान, विटा, कपडे तयार करणे वगैरे महत्त्वाचे व्यवसाय या शहरात चालतात. शहराच्या आसपासच चुन्याचा साठा आहे. येथील विमानतळ आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी वापरला जातो.

लिमये, दि. ह.