आंबोली : रत्नागिरी जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण. लोकसंख्या २,१८१ (१९६१). समुद्रसपाटीपासून उंची १,०२३ मी. वार्षिक पर्जन्य सु. २५० सेंमी. पूर्वीच्या सावंतवाडी संस्थानच्या या थंड हवेचे  ठिकाणी आता महाराष्ट्र शासनाने विश्रामधामे बांधलेली आहेत. हिरण्यकेशी नदीच्या धरणाने गावास पाणीपुरवठा होतो. आसपासचा जांभा दगड बांधकामास उपयोगी असून सभोवारच्या मातीत अँल्युमिनीयम धातुकाने समृध्द बॉक्साइटचे साठे आहेत. सृष्टिसौंदर्य पाहण्यासाठी ठिकठिकाणी एकूण ३० ‘पाइंटस’ असून त्यांपैकी नट पॉइंट, खेमराज पॉइंट, महादेवगड, नारायणगड, वाडीदर्शन इ. प्रसिध्द आहेत. बेळगावहून वायव्येस १२३ किमी. किंवा सावंतवाडीहून ईशान्येस २१ किमी. बसमार्गाने आंबोलीस पोहोचता येते.

ओक, शा. नि.