वेल्स, हर्बर्ट जॉर्ज : (२१ सप्टेंबर १८६६–१३ ऑगस्ट १९४६). इंग्रज कादंबरीकार, समाजशास्त्रज्ञ, इतिहासकार. उत्तर केंटमधील ब्रम्ली येथे एका गरीब कुटुंबात जन्म. शिक्षण ब्रम्ली, साउथ केन्झिंग्टन येथे. लंडन विद्यापीठाचा बी. एस्सी. (१८८९). १८९५, मध्ये द टाइम मशीन ही त्याची कादंबरी प्रसिद्ध झाली आणि लेखक म्हणून तो एकदम प्रकाशात आला. एका कालयंत्राच्या आधारे दूरच्या भविष्यकाळात जाऊन तेथील दृश्ये पाहणाऱ्या संशोधकाची ही कथा आहे. ⇨विज्ञानकथेच्या इतिहासात ह्या कादंबरीला महत्त्वाचे स्थान आहे. ह्या कादंबरीच्या यशानंतर त्याने स्वत:ला पूर्णत: लेखनालाच वाहून घेतले. कादंबऱ्या, कथा, सामाजिक – राजकीय विषयांवरील तात्त्विक स्वरूपाचे लेखन, इतिहास, आत्मचरित्र असे विविध प्रकारचे विपुल लेखन त्याने केले त्यातून त्यास आर्थिक संपन्नता आणि सामजिक मानमान्यता मिळाली.
वेल्सने लिहिलेल्या विज्ञानकथांत द आयलंड ऑफ डॉ. मोरो (१८९६), द इन्व्हिजिबल मॅन (१८९७), द वॉर ऑफ द वर्ल्ड्स (१८९८), द फर्स्ट मेन इन द मून (१९०१) अशा काही कादंबऱ्यांचा समावेश होतो. द आयलंड… मध्ये पशूंवर मानवी अवयवांचे कलम करून अर्धमानव तयार करण्याचा प्रयत्न करीत असलेला अनैतिक वृत्तीचा वैज्ञानिक त्याने उभा केला. मनुष्याला अदृश्य होणे शक्य आहे, ह्या कल्पनेचा आधार घेऊन द इन्व्हिजिबल मॅनची रचना केली. द वॉर ऑफ द वर्ल्ड्समध्ये मंगळावरून येणारे काही आक्रमक इंग्लंड – विशेषत: लंडन शहर – उद्ध्वस्त करतात असे दाखवले आहे. द फर्स्ट मेन इन द मूनमध्ये त्याने मानवाचा चंद्रप्रवास दाखवला. मानवाला चंद्रप्रवास शक्य आहे, हे वेल्सचे गृहीतक पुढे प्रत्यक्षात उतरले. द वर्ल्ड सेट फ्री : द स्टोरी ऑफ मॅनकाइंड (१९१४) ह्या कादंबरीत त्याने अणुयुद्धाचे भाकीत केले होते.
वेल्सच्या सामाजिक कादंबऱ्यांमध्ये लव्ह अँड मिस्टर लेविशॅम (१९००), किप्स (१९०५), ॲन व्हेरोनिका (१९०९), टोनो – बंगे (१९०९), द हिस्टरी ऑफ मिस्टर पॉली (१९१०) आणि द न्यू मॅकिआव्हेली (१९११) अशा काही कादंबऱ्यांचा अंतर्भाव होतो. त्यांपैकी किप्स, टोनो-बंगे आणि द हिस्टरी ऑफ मिस्टर पॉली ह्या त्याच्या उत्कृष्ट कादंबऱ्यां समजल्या जातात. वेल्सच्या पूर्वजीवनातील संस्कार त्याच्या सामाजिक कादंबऱ्यांवर झालेले दिसतात. समाजातील कनिष्ठ वर्गांचे चित्रण त्या कादंबऱ्यांतून येते. वेल्स त्या वर्गाचा प्रवक्ता आहे. आपल्या वाट्याला आलेल्या संकुचित परिसरातून बाहेर पडून अधिक खुल्या परिसरात जाण्याची कल्पना त्याच्या कादंबऱ्यांगतून पुन: पुन्हा येते. स्वत: वेल्सनेही तशी धडपड केली होती.
भोवतालच्या सामाजिक परिस्थितीवरही वेल्स भाष्ये करीत होता. भूतकालाची समीक्षा आणि भविष्यकालाची भाकिते करण्यासाठी त्याने लिहिलेल्या पुस्तकांपैकी अँटिसिपेशन्स (१९०१) हे पहिले पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर लंडनमधील विख्यात `फेबिअन सोसायटी’ चे सदस्यत्व त्याला मिळाले. तथापि अनेक कारणांमुळे ह्या संघटनेपासून तो दूर झाला. [→ फेबिअन समाजवाद].
वेल्सने वैचारिक स्वरूपाचे लेखनही विपुल केले. त्यात उपर्युक्त अँटिसिपेशन्स खेरीज मॅनकाइंड इन द मेकिंग (१९०३), ए मॉडर्न युटोपिआ (१९०५), न्यू वर्ल्ड्स फॉर ओल्ड (१९०८), द ओपन कॉन्स्पिरसी (१९२८), द वर्क, वेल्थ अँड हॅपिनेस ऑफ मॅनकाइंड (१९३२) आणि माइंड ॲट द एंड ऑफ इट्स टेदर (१९४५) असे काही ग्रंथ समाविष्ट आहेत.
वेल्सच्या विज्ञानकथांतून मनुष्यजातीच्या भवितव्यासंबंधीचा उमटणारा सूर निराशेचा आहे. तथापि टप्प्याटप्प्याने मनुष्यजात एका आदर्श व्यवस्थेकडे जाऊ शकेल, असा आशावाद त्याने अँटिसिपेशन्समध्ये व्यक्त केला आहे. जग बदलता येईल आणि ते बदलण्याचे काम स्त्री-पुरुषांचा एक गट पार पाडू शकेल जगाची सूत्रे हाती घेऊन येथे एक विवेकाधिष्ठित, शहाणी व्यवस्था ही माणसे निर्माण करतील असे त्याने ए मॉडर्न युटोपिआमध्ये म्हटले. वेल्स अभिजनवादी होता. सर्वांच्या योग्य शिक्षणाची व्यवस्था अभिजन करतील, ते शिक्षण घेतलेले लोक मानवी नात्यांमध्ये विवेकशीलता आणतील. जगातील माणसांची एकच महान जमात होइल. वांशिक, प्रादेशिक, राष्ट्रीय संघर्ष नाहीसे होऊन युद्धे संपतील असे विचार त्याने मांडले. मार्क्सबद्दलचा त्याचा दृष्टिकोन बदलत राहिला. न्यू वर्ल्ड्स फॉर ओल्डमध्ये त्याने मार्क्सचा गौरव केला, तर द ओपन कॉन्स्पिरसीमध्ये त्याने मार्क्सवादाला विध्वंसक ठरवले.
पहिल्या महायुद्धाने वेल्सला निराशेचा धक्का दिला. जगातील अस्थिरता पाहून मानवजातीने जागृत व्हावे म्हणून त्याने द आउटलाइन ऑफ हिस्टरी (१९२०) हा इतिहासग्रंथ लिहिला. `लीग ऑफ नेशन्स’ च्या कल्पनेत त्याचे मन गुंतले. द ॲनॅटोमी ऑफ फ्रस्ट्रेशन (१९ मध्ये मृत्यू हे मानवजातीचे मूलभूत वैफल्य असल्याचे त्याने सांगितले, तर माइंड ॲट द एंड ऑफ इट्स टेदरमध्ये ज्याला आपण जीवन म्हणतो, त्याची अखेर जवळ आल्याचे भाकीत त्याने केले. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर वर्षभरानेच त्याचे लंडनमध्ये निधन झाले. एक्सपेरिमेंट इन ऑटोबायॉग्रफी (१९३४) हे त्याचे आत्मचरित्र उत्कृष्ट गणले जाते.
वेल्सचा त्याच्या समकालीनांवर-विशेषत: १९०० ते १९२० ह्या कालखंडातील तरुणांवर-फार मोठा प्रभाव होता. लोकप्रिय लेखकांपैकी सर्वांत गंभीर प्रकृतीचा आणि गंभीर प्रकृतीच्या लेखकांमध्ये सर्वांत लोकप्रिय लेखक, असे त्याचे वर्णन केले जाते. त्याचे ग्रंथ संकलित स्वरूपात – द वर्क्स ऑफ एच्. जी. वेल्स (२८ खंड, १९२४ – २७) प्रसिद्ध झालेले आहेत.
संदर्भ : 1. Brome, Vincent, H. G. Wells : A Biography, London, 1979.
2. Huntington, John, The Logic of Fantasy : H. G. Wells and Science Fiction, New York, 1982.
3. Kagarlitski, J. Trans. Budberg, M. The Life and Thought of H. G. Wells, London, 1966.
4. Parrinder, Patrick, H. G. Wells, Edinburgh, 1970.
5. West, Anthony, H. G. Wells : Aspects of a Life, New York, 1984.
कुलकर्णी, अ. र.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..