वेंट, फ्रिडरिक ऑगस्ट फर्दिनांद ख्रिस्तिअन : (१८ जून १८६२-२४ जुलै १९३५). डच वनस्पतिवैज्ञानिक. त्यांनी वनस्पतींमधील हॉर्मोनांच्या (उत्तेजक स्रावांच्या) अध्ययनास चालना दिली. वेंट यांचा जन्म ॲम्स्टरडॅम येथे झाला व त्यांचे शिक्षण ॲम्स्टरडॅम विद्यापीठात ह्यूगो द व्ह्‌रीस यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. १८८६ साली त्यांनी पीएच्‌.डी. पदवी संपादन केली. त्यांनी वनस्पतींतील रिक्तिकांवरील [पटलाने बंदिस्त असलेल्या कोशिकांतील मोकळ्या जागांवरील → कोशिका] आपल्या पीएच्‌.डी. च्या प्रबंधाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या मते पूर्वी अस्तित्वात असलेल्या रिक्तिकांपासून नव्या रिक्तिका तयार होतात. जावामधील कागोक येथे ऊस संशोधन केंद्राचे संचालक असताना (१८९१-९६) सेरे या उसावरील व्हायरसजन्य रोगावर त्यांनी संशोधन केले व उसाचे पीक वाचविण्यात यश मिळविले. त्यांनी उसाच्या शरीरक्रियाविज्ञानावरही संशोधन केले. ⇨प्रकाशसंश्लेषणामध्ये  सुक्रोज प्रथम तयार होते असे त्यांनी दाखवून दिले आणि पानांतील व उसातील साखरेचे प्रमाण निश्चित केले. त्यावरुन त्यांनी शेतातील उसाची पक्वता ठरविण्याची पध्दती बसविली. ही पध्दती अद्यापही वापरात आहे.

     नेदर्लंड्‌सला परतल्यावर वेंट उत्रेक्त विद्यापीठात वनस्पतिविज्ञानाचे प्राध्यापक होते (१८९६-१९३४). शरीरक्रियावैज्ञानिक क्रियाशीलतेचे (उदा., वाढ) नियंत्रक म्हणून त्यांनी वनस्पतींतील हॉर्मोनांचे अस्तित्व दाखवून दिले आणि ह्या हॉर्मोनांवर अधिक संशोधन करुन चेतनांना वनस्पतींचा प्रतिसाद कसा मिळतो, हेही स्पष्ट केले [उदा., प्रकाशाच्या दिशेला वनस्पतीचे वळणे → वृद्धि, वनस्पतींची]. त्यांच्या न्यूरोस्पोरा या कवकावरील [हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतीवरील → कवक] हॉर्मोनाच्या परिणामाच्या संशोधनामुळे या कवकाच्या जीवरासायनिक संशोधनाचा पाया घातला गेला. त्यांचे हे कार्य त्यांचे पुत्र ⇨फ्रिट्‌स वारमोल्ट वेंट यांनी पुढे चालू ठेवले. त्यामुळे उत्रेक्त हे यूरोपातील वनस्पती अध्ययनाचे अग्रेसर केंद्र झाले. फ्रिडरिक वेंट रॉयल नेदर्लंड्स ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे (ॲम्स्टरडॅम) अध्यक्ष असताना त्यांनी शास्त्रज्ञांमध्ये आंतराष्ट्रीय पातळीवर सामंजस्य साधण्यासाठी बहुमोल कार्य केले. हेगजवळील व्हासन्नार येथे त्यांचे निधन झाले.               

जमदाडे, ज. वि.