वुडवर्ड, रॉबर्ट बर्न्स : (१० एप्रिल १९१७–८ जुलै १९७९). अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ. क्विनीन (१९४५), कोलेस्टेरॉल आणि कॉर्टिसोन (१९५१), जीवनसत्त्व ब१२ (१९७१) इ. जटिल कार्बनी संयुगांचे संश्लेषण (कृत्रिम रीतीने तयार) केल्यामुळे त्यांना आधुनिक कार्बनी संश्लेषणाचे जनक मानतात. केवळ सजीवच निर्माण करू शकतात अशी एकेकाळी समजूत असलेल्या हरितद्रव्य, स्टेरॉल वगैरे द्रव्यांचे संश्लेषण केल्याबद्दल त्यांना १९६५ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

वुडवर्ड यांचा जन्म बॉस्टन (अमेरिका) येथे झाला. त्यांनी बी.एस. (१९३६) आणि पीएच्.डी. (१९३७) या पदव्या संपादन केल्या. विविध विद्यापीठांत त्यांनी अध्यापन व संशोधन कार्य केले.

संयुगाची सांरचनिक वैशिष्ट्ये रासायनिक विक्रियांपेक्षा भौतिकीय मापन पध्दतीने अधिक चांगल्या प्रकारे दाखविता येतात ह्या त्यांच्या संशोधनातून त्यासंबंधीचे वुडवर्ड नियम विकसित झाले. वुडवर्ड यांनी पेनिसिलीन (१९४५), पॅटुलीन (१९४८), स्ट्रिक्नीन (१९४७), ऑक्सिटेट्रासायक्लीन (१९५२), सेव्हिन (१९५४), कार्बोमायसीन (१९५६), ग्लायोटॉक्सीन (१९५८), एलिप्टीसीन (१९५९), कॅलिकँथीन (१९६०), ओलिॲंडोमायसीन (१९६०), स्ट्रेप्टोनिग्रीन (१९६३) आणि टेट्रोडोटॉक्सीन (१९६४) या जटिल नैसर्गिक पदार्थांच्या संरचनांविषयी तर्क केला. त्यांनी आलेखित केलेल्या मॅग्नामायसिनच्या संरचनेमुळे मॅक्रोलिड ॲंटिबायॉटिक हा तोपर्यंत ज्ञात नसलेला नैसर्गिक उत्पादसमूह माहित झाला व निसर्गामध्ये त्याच्या तयार होणाऱ्या संरचनेची पध्दतीही त्यांनी सुचविली. त्यांनी सजीवांमधील स्टेरॉइडल हॉर्मोनांची (उत्तेजक अंतःस्रावांची) जैवसंश्लेषण पध्दत सर्वप्रथम सुचविली.

वुडवर्ड हे जटिल रेणूंचे संश्लेषण करणारे सर्वांत निष्णात संशोधक होते. त्यांनी क्विनीन (हिवतापावरील उपचाराकरिता वापरण्यात येणारे अल्कलॉइड १९४५, डोअरिंग यांच्याबरोबर), कोलेस्टेरॉल आणि कॉर्टिसोन (१९५१), टर्पिन लॅनोस्टेरॉल (१९५४), स्ट्रिक्नीन (वनस्पतीपासून मिळणारे व नायट्रोजन असलेले गुणकारी विषारी द्रव्य १९५४), हरितद्रव्य (पाने, सूक्ष्मजंतू आणि जीव यांमध्ये आढळणारे व प्रकाशसंश्लेषण करणारे हिरवे रंगद्रव्य १९६०), लायसर्जिक अम्ल (१९५४), टेट्रासायक्लीन (१९६२), कॉल्चिसीन (१९६३) आणि सेफॅलोस्पोरीन-सी (१९६५) यांचे संश्लेषण केले.

वुडवर्ड यांनी झुरिक येथील फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील आल्बर्ट एशेनमोझर यांच्या सहकार्याने क्रमाक्रमाने १०० पेक्षा अधिक विक्रिया करून जीवनसत्त्व ब१२ (सायनोकोबालामीन) या क्लिष्ट को-एंझाइमाचे [→ एंझाइमे] संश्लेषण केले (१९७१). त्यांच्या अखेरच्या दिवसांत ते एरिथ्रोमायसिनाच्या संश्लेषणाचे काम करीत होते.

इ. स. १९६३ मध्ये सीबा या औषधनिर्मात्या कंपनीने बाझेल येथे वुडवर्ड यांच्या नावाने ‘वुडवर्ड रिसर्च इन्स्टिट्यूट’ या संस्थेची स्थापना करून त्यांचा असाधारण स्वरूपाचा गौरव केला.

वुडवर्ड यांचे केंब्रिज (मॅसॅचूसेट्स, अमेरिका) येथे निधन झाले.

जमदाडे, ज. वि.