वनस्पतिनामपद्धति : माणसाने आपल्या सोयीसाठी प्रत्येक वनस्पतीला नाव दिले आहे. प्रत्येक भाषेत व बोलीत वनस्पतींची नावे आहेत. प्राचीन संस्कृत, चिनी, ग्रीक व रोमन ग्रंथांतून वनस्पतींची नावे आढळतात. अर्थातच एकाच वनस्पतीची वेगवेगळ्या भाषांत वेगवेगळी नावे आहेत. बोली भाषांतही वेगळी नावे असतात. काही वेळा एकच नाव वेगवेगळ्या वनस्पतींना वापरले जाते. उदा., ब्राह्मी हेच नाव दोन वेगवेगळ्या वनस्पतींना वापरले जाते.

अशी स्थानिक नावांची पद्धती अतिशय गोंधळ करणारी आहे. यासाठी आज वनस्पतींना शास्त्रीय नाव देण्याचा प्रघात आहे. प्रादेशिक भाषेतील नाव त्या प्रदेशातील रहिवाशांनाच कळू शकते. इतरांना त्याचा बोध होत नाही. म्हणून वनस्पतींची शास्त्रीय नावे लॅटिनमध्ये असतात. 

 

या लॅटिन नावांचा प्रारंभ ख्रिस्तपूर्व काळात थीओफ्रॅस्टस ( इ. स. पू. सु. ३७२–२८७ ) या ॲरिस्टॉटल यांच्या शिष्यांनी केला. थोरले प्लिनी ( इ. स. पहिले शतक ) या रोमन अभ्यासकांनीही अशी नावे वापरली. रोमन साम्राज्याच्या ऱ्हासानंतरही लॅटिन ही यूरोपमधील सुशिक्षित व उच्चभ्रू समाजाची भाषा होती. थीओफ्रॅस्टस, प्लिनी आणि इतर रोमन शास्त्रज्ञांनी वनस्पतींना दिलेली लॅटिन नावेच परंपरेने पुढे चालू राहिली. यांतील कित्येक नावे शास्त्रीय नावे म्हणून आजही प्रचलित आहेत. शास्त्रीय दृष्ट्या वनस्पतीविषयक ग्रंथ ( हर्बल्स ) हे प्रथम लॅटिनमधून हीएरोन्यूमुस बोक, लिओनार्ड फुक्स, जॉन जेरार्ड वगैरे शास्त्रज्ञांनी सोळाव्या शतकात लिहिले. त्या काळात लॅटिन हीच भाषा सुशिक्षितांत जास्त वापरात असल्याने वनस्पतींची शास्त्रीय नावे मुख्यतः लॅटिनमधून ठेवली गेली.

पुढील काळात जसजशा अधिकाधिक वनस्पती माहीत होऊ लागल्या तसतशी नामकरणाची पद्धती बदलली. उदा., फायकस हे एक शास्त्रीय नाव आहे. वड, उंबर, पिंपळ, अंजीर ह्या सर्व वनस्पती फायकसच आहेत पण त्यांच्यात भेद आहेत म्हणून त्यांमधील भेद स्पष्ट करण्यासाठी फायकस या नावाबरोबरच काही विशेषणे अस्तित्वात आली. प्रारंभीच्या काळात विशेषणांची संख्या तीन वा चार असे. त्यामुळे शास्त्रीय नाव अतिशय लांबलचक बोजड होऊ लागले. ह्या नावामुळे वनस्पतीच्या गुणधर्माचा बोध होत असे पण असे नाव वापरण्यास व्यावहारिक अडचण असे. नेहमीच्या वापरासाठी सुटसुटीत नावे आवश्यक होती.

कार्ल लिनीकस या स्वीडिश निसर्गशास्त्रज्ञांनी १७५३ साली Species Plantarum या आपल्या ग्रंथात वनस्पतींच्या नामकरणाची एक पद्धती वापरली. या पद्धतीनुसार प्रत्येक वनस्पतीचे नाव दोन पदांचे बनलेले होते. त्यांतील पहिले पद प्रजातिवाचक होते, तर दुसरे प्रजातीचे विशेषण असून त्याला जातीविषयक संज्ञा असे म्हटले होते. याच पद्धतीला द्विपद नामपद्धती असे म्हणतात. जातीविषयक संज्ञा म्हणजे विशेषण हे प्रजातीतील फरक दर्शविणारे असते. उदा., फायकस या प्रजातीतील वड म्हणजे फायकस बेंगालेन्सिस याचा अर्थ बंगालमधील फायकस, फायकस रिलिजिओजा म्हणजे धर्माशी निगडित असलेला पिंपळ, फायकस ग्लोजमेराटा म्हणजे फळांचे एकत्रित झुबके असलेला उंबर.

लिनीअस यांनी वापरलेली द्विपद नामपद्धती व्यवहारात वापरण्यात अतिशय सुटसुटीत होती. म्हणून सार्वत्रिक नियम या स्वरूपात शास्त्रीय जगात तिचा स्वीकार केला गेला. १७५३ सालापासून ही नामपद्धती प्रस्थापित झाली, असे म्हणता येईल.

वनस्पतीला शास्त्रीय नाव देण्याच्या पद्धती : रोमन साम्राज्याबाहेरच्या वनस्पती रोमन लोकांना माहीत नव्हत्या. त्यामुळे त्यांना लॅटिन नावे नव्हती. अशा वनस्पती सापडल्यावर त्यांनाही नावे देण्यात आली. ती अर्थातच नव्याने तयार केली. ही नावे तयार करण्याच्या पद्धती खालीलप्रमाणे आहेत. 

प्रजातिवाचक नावे : (अ) थोर वनस्पतिवैज्ञानिकांच्या स्मरणार्थ देण्यात आलेली नावे उदा., बौहिनिया हे नाव गास्पार व झां बौहिन (बोअँ) या स्वीस वनस्पतिवैज्ञानिक बंधूंसाठी, मॅग्नोलिया हे नाव प्येर मॅग्नोल (मान्योल) या फ्रेंच वनस्पतिवैज्ञानिकांच्या स्मरणार्थ (आ) दोन ग्रीक वा लॅटिन नावांच्या एकत्रीकरणाने उदा., झँथोझायलम म्हणजे पिवळे लाकूड कॅलिकार्पा म्हणजे सुंदर फळ (इ) काही वेळा स्थानिक नावे लॅटिनीकरण करून वापरतात, उदा., पुत्रंजीवा हे भारतीय नावाचे लॅटिनीकरण आहे, पँडॅनस म्हणजे केवडा हे मलेशिया देशातील मले भाषेतील निलंबो म्हणजे कमळ हे सिंहली नाव आहे (ई) काही नावे प्रादेशिक दंतकथांवरून वा पौराणिक संदर्भावरून तयार होतात, उदा., थिओब्रोमा म्हणजे कोको हे देवांचे खाद्य समजले जाते, निंफिया म्हणजे लाल कमळ ही अप्सरा मानली जाते.

जातीविषयक नावे : हे विशेषण असते, अर्थात ते नावाचे वैशिष्ट्य सांगते. ही विशेषणे कालीलप्रमाणे बनतात.

             (अ) रंग : रूब्रा म्हणजे लाल, आल्बा–श्वेत, नायग्रा–काळा

             (आ) वनस्पतीची ठेवण : नना–बुटका, जायगॅन्शिया–महाकाय

             (इ) इतर वैशिष्ट्ये : फ्रँगरान्स–सुगंधी, स्पायनोजा–काटेरी, एड्युलिस–खाद्योपयोगी, ॲक्वॅटिका–पाण्यातील

             (ई) मूळ देश : इंडिका–भारतीय, चायनेन्सिस–चिनी, झेलॅनिका–श्रीलंकेतील, ब्राझीलिएन्सिस–ब्राझीलचा इत्यादी.

प्रजातीविषयक नाव हे व्याकरणदृष्ट्या नाम असते, त्यामुळे त्याला लिंग असते. जातीविषयक नाव हे विशेषण असते, त्यामुळे ते नावाप्रमाणेच असावे लागते. प्रजातिनामाचे लिंग त्याच्या अंत्याक्षरावरून ठरविता येते. अस या अंत्याक्षराची प्रजाती पुल्लिंगी (उदा., ॲकँथस), अम या अंत्याक्षराची प्रजाती नपुसकलिंगी (उदा., सोलॅनम) तर आ या अंत्याक्षराची प्रजाती स्त्रीलिंगी (उदा., मॅग्नोलिया) समजली जाते.


 द्विनाम पद्धतीचे विधिनियम : लिनीअस यांच्या Species plantarum ग्रंथानुसाराची द्विनाम पद्धती प्रारंभी अगदी सोपी वाटली पण जगाच्या अज्ञात भूप्रदेशांचा शोध लागून जसजशा अनेक वनस्पती नव्याने उजेडात येऊ लागल्या तसतशा नामकरणात अडचणी भासू लागल्या. १८१३ मध्ये ⇨ऑगस्टीन पीराम दे कांदॉल या स्विस वनस्पतिवैज्ञानिकांनी या संदर्भात काही सूचना केल्या व त्यानुसार काही निश्चित नियम असावेत असा विचार मांडला. त्यांचे पुत्र आल्फोन्स लूइस प्येअर पीराम दे कांदॉल यांनी पॅरिस येथे १८६७ मध्ये वनस्पतींच्या नामकरणविषयक एक आंतरराष्ट्रीय परिषद भरवली व तीत वनस्पतींच्या नामकरणविषयक एक आंतरराष्ट्रीय परिषद भरवली व तीत नामकरणासंबंधी काही नियम ठरविण्यात आले.

यात द्विनाम पद्धतीच्या पुनरूच्चाराबरोबरच नाव सुचविणाऱ्याचा (ऑथॉरिटीचा) अंतर्भाव करण्यात आला. त्यानुसार ज्या व्यक्तीने एखाद्या वनस्पतीचे नामकरण सर्वप्रथम केले त्या व्यक्तीला ऑथॉरिटी किंवा ऑथर म्हणतात आणि ऑथॉरिटीच्या नावाचा जो उल्लेख वनस्पतीच्या शास्त्रीय नावानंतर येतो त्याला उल्लेखन (सायटेशन) म्हणतात. सामान्यतः ऑथॉरिटीचे संपूर्ण नाव लिहिले जात नाही, तर त्याचे संक्षिप्त रूप दिले जाते उदा., लिनीअस यांनी प्रथम नामकरण केले असेल, तर L. जसे Mangifera indica L. मराठी विश्वकोशात मात्र हे नाव मँजिफेरा इंडिका असे दिले आहे कारण देवनागरी लिपीत उल्लेखनातील संक्षिप्त रूपे देणे अडचणीचे आहे.

आल्फोन्स दे कांदॉल यांच्यानंतर इंग्लंडमधील क्यू येथील सुप्रसिद्ध उद्यानातील वनस्पतिवैज्ञानिकांनी ‘क्यू नियम’ मांडले. न्यूयॉर्कच्या नाथानिएल लॉर्ड ब्रिटन यांनी रॉचेस्टर येते १८९२ मध्ये एक परिषद बोलावून पॅरिस नियमांवर आधारित रॉचेस्टर संहिता तयार केली. तीत ‘नमुना’ तत्त्व नव्याने स्वीकारले गेले. यानुसार वनस्पतीचे नाव ज्या नमुन्यावरून ठरते तो नमुना वनस्पतिसंग्रहात दाखल केला जावा, त्याचे लॅटिनमध्ये वर्णनही नमुन्यासमवेत दिलेले असावे, असा विधिनियम संमत झाला.

वनस्पतिनामपद्धतीच्या पॅरिस संहिता व रॉचेस्टर संहिता यांत समझोता घडवून आणण्याच्या दृष्टीने वनस्पतिवैज्ञानिकांची खऱ्या अर्थाने पहिली आंतरराष्ट्रीय परिषद व्हिएन्ना येथे भरली व तीत या दोन्ही पद्धतींवर चर्चा झाली परंतु तडजोडीचा प्रयत्न असफल ठरला. १९३० मध्ये केंब्रिज येथे भरलेल्या पाचव्या परिषदेत दोन्ही पद्धतींत तडजोड होऊन आंतरराष्ट्रीय नामपद्धती निश्चित करण्यात आली व सर्व राष्ट्रांनी तिचे काटेकोरपणे पालन करावे, असे ठरविण्यात आले. १९५० च्या स्टॉकहोम येथे भरलेल्या परिषदेत १९३० मधील ठरवांवर चर्चा होऊन बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या व त्यामुळे वनस्पतिनामकरणाच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय सलोखा निर्माण झाला

बदलत्या काळानुसार नामकरणाच्या नियमात वेळोवेळी बदल होत गेले आहेत आणि पुढील काळात होतही राहतील. सध्या आंतरराष्ट्रीय मान्यतेची नामकरणाची जी संहिता आहे तीतील महत्त्वाचे नियम पुढीलप्रमाणे आहेत : (१) प्रत्येक वनस्पतीचे नाव हे जेव्हा प्रजाती नाम व जातिवाचक नाम यांचे बनलेले असते, तेव्हाच ते परिपूर्ण, अचूक नाव समजले जावे. (२) जातीविषयक नामामुळे एकाच प्रजातीच्या दोन जातींतील भेद समजण्यास मदत व्हावी. (३) आकारमान हे लक्षण जातीविषयक भेद म्हणून ग्राह्य धरले जाऊ नये. तसेच वनस्पतीचा आढळ हा जातीविषयक भेद मानला जाऊ नये. वनस्पतीचा रंग हादेखील जातिनिर्देशक भेद मानू नये. (४) रोमन लिपीत नाव देताना प्रजातीचे आद्याक्षर मोठे (कॅपिटल), तर जातीचे आद्याक्षर लहान लिपीत छापावे. वनस्पतीचे शास्त्रीय नाव मुद्रणात असताना इटॅलिक्समध्ये म्हणजे तिरपे असावे, तर लिहिलेले असल्यास अधोरेखित करावे. (५) प्रत्येक नवीन वनस्पतीचे नाव प्रसिद्ध करताना त्या नावास आधारभूत वर्णन लॅटिन भाषेमध्ये दिले जावे. तसेच हे वर्णन नावासहित एखाद्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नियतकालिकात प्रसिद्ध झालेले असावे. (६) ज्या नमुन्यावरून हे वर्णन दिलेले असेल तो नमुना मान्यताप्राप्त वनस्पतिसंग्रहात दाखल झालेला असावा. (७) प्रत्येक वनस्पतीच्या शास्त्रीय नावाच्या शेवटी तिचा सर्वप्रथम शोध लावणाऱ्या व वर्णन देणाऱ्या शास्त्रज्ञाचे नाव संक्षिप्त स्वरूपात असावे. (८) शास्त्रीय नावाचा घोटाळा टाळ्यासाठी एकाच वनस्पतीला दोन शास्त्रीय नावे दिलेली असल्यास अग्रक्रमाने येणारे नाव ग्राह्य धरावे. यासाठी १ मे १७५३ हा दिनांक प्रारंभ म्हणून धरलेला आहे. यानंतरची नावे ग्राह्य व साधार आहेत. (९) वनस्पतिनामपद्धती ही ⇨ प्राणिनामपद्धतीपासून भिन्न असून क्वचित एखाद्या वनस्पतीच्या व प्राण्याच्या शास्त्रीय नावांत साम्य असू शकते.

पहा : वनस्पतींचे वर्गीकरण वर्गीकरणविज्ञान.

संदर्भ : 1. Core, E. L. Plant Taxonomy, Englewood Cliffs, N. J., 1955.

           2. Datta, S. C. A Handbook of Systematic Botany, Bombay, 1965.

           3. Lawrence, G. H. M. An Introduction to Plant Taxonomy, New York, 1958.

           4. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1951.

साने, हेमा द. सप्रे, अ. ब.