लोव्हेल, सर (आल्फ्रेड चार्ल्स) बर्नार्ड : (३१ ऑगस्ट १९१३ -). इंग्रज रेडिओ ज्योतिषशास्त्रज्ञ. इंग्लंडमधील जॉड्रेल बँक एक्स्परिमेंटल सेंटरचे संस्थापक आणि संचालक (१९५१-८१). दिवसा होणाऱ्या उल्कावृष्टींचे निरीक्षण व अध्ययन करणे तसचे कृत्रिम उपग्रह व अवकाशयाने यांचे वेध घेणे यांकरिता त्यांनी ⇨रडार तंत्राचा प्रथम वापर केला.
लोव्हेल यांचा जन्म ओल्डलँड कॉमन (ग्लॉस्टरशर) येथे झाला. त्यांनी ब्रिस्टल विद्यापीठातून भौतिकीची पदवी (१९३३) व पीएच्.डी. पदवी (१९३६) संपादन केली. १९३७ साली त्यांची मँचेस्टर विद्यापीठात भौतिकीचे उपव्याख्याते म्हणून नेमणूक झाली. तेथे १९३९ पर्यंत त्यांनी विश्वकिरणांचे संशोधन केले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते हवाई मंत्रालयाच्या आस्थापना विभागात होते. या काळात त्यांनी विमान हुडकून काढण्याकरिता आणि विमानांच्या मार्गनिर्देशनासाठी रडारचा वापर करण्याविषयीचे संशोधन केले. या संशोधनाबद्दल त्यांना ऑर्डर ऑफ ब्रिटिश एंपायर हा किताब देण्यात आला (१९४६). नंतर त्यांनी मँचेस्टर विद्यापीठात भौतिकीचे व्याख्याते (१९४५), ज्येष्ठ व्याख्याते (१९४७), प्रपाठक (१९४९), रेडिओ ज्योतिषशास्त्राचे प्राध्यापक (१९५१-८१) आणि १९८१ पासून गुणश्री प्राध्यापक म्हणून काम केले आहे. अजूनही त्यांचे संशोधन चालू आहे.
नागरी भागात येणाऱ्या निरीक्षणविषयक अडचणींमुळे त्यांनी मँचेस्टरच्या दक्षिणेस सु. ३२ किमी.वरील जॉड्रेल बँक येथे प्रायोगिक रेडिओ वेधशाळा सुरू केली. १९४९-५७ दरम्यान त्यांनी सर्व दिशांत वळविता येणारा ७६ मी. व्यासाचा मोठा रेडिओ दूरदर्शक तयार केला. या व इतर रेडिओ दूरदर्शकांचा वापर करून त्यांनी रेडिओ उद् गम, दीर्घ तरंगलांबीच्या रेडिओ प्रारणाचे (तरंगरूपी ऊर्जेचे) वर्णपट आणि ताऱ्यांच्या उज्ज्वालांद्वारे होणारे तीव्र रेडिओ प्रारणाचे उत्सर्जन या विषयांचे संशोधन केले.
विश्वकिरणांच्या झोतांवरून परावर्तित होणाऱ्या रेडिओ तरंगांचे वेध घेताना त्यांना काही अल्पकाळ टिकणारे संकेत आढळले व ते उल्कांमुळे येतात, असेही त्यांना दिसून आले. यामुळे भरदिवसा अथवा ढग असतानाही उल्कांचे वेध घेता येऊ लागले. अशा प्रकारे १९३१-३२ साली त्यांनी प्रथम लिओनीड (सिंह तारकासमूहात उद्गम असलेल्या) उल्कावृष्टीचा अभ्यास केला. उल्कांच्या अभ्यासात रेडिओ दूरदर्शकाचे तंत्र उपयुक्त आहे, हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी गियाकोबिनी धूमकेतूशी निगडित असलेल्या उल्कावृष्टीचा अभ्यास केला (१९४६). यातूनच उल्कासमूहांच्या कक्षाव उद्गमबिंदू निश्चित करण्यासाठी रडार तंत्र वापरण्यात येऊ लागले. यावरून उल्का सूर्यकुलाच्या घटक असून त्यांचा उगम आंतरतारकीय अवकाशात होत नाही, असे त्यांनी दाखवून दिले. [⟶ उल्का व अशनि].
लोव्हेल यांनी रडार तंत्र वापरून सौर रेडिओ स्फोट (१९४६) आणि ध्रुवीय प्रकाशदायी स्तरांकडून परावर्तित होणारे रेडिओ संकेत (१९४७-४८) यांचे वेध घेतले. अवकाशातून येणारे रेडिओ प्रारण आंतरतारकीय अवकाशातील आयनीभूत (विद्युत् भारित अणूंनी युक्त) हायड्रोजन वायूपासून येते व त्याच्यात चढउतार होताना आढळतात. यामागील कारण शोधून काढण्यासाठी त्यांनी प्रयोग केले. पृथ्वीभोवती ८० ते ५०० किमी.पर्यंत पसरलेल्या ⇨आयनांबरातून येताना त्यातील असमानतेमुळे या प्रारणाची तीव्रता कमीजास्त होते, असे त्यांना दिसून आले. नंतर त्यांनी आयनांबराचेही अधिक संशोधन केले.
ताऱ्यांच्या उज्जवालेकडून येणारे रेडिओ प्रारण व ताऱ्यांच्या वातावरणातील प्रक्रिया यांचा अभ्यास त्यांनी १९४८ सालानंतर केला. यासाठी त्यांनी जॉड्रेल बँक येथे व तेथून दूर अंतरावर ठेवलेल्या दोन रेडिओ दूरदर्शकांची जोडणी करून एक व्यतिकरणमापक बनविला होता. या पद्धतीमुळे उज्ज्वालेतील मंद ऊर्जेचेही मापन करणे शक्य झाले. १२२ मी. व्यासाच्या मोठ्या आकाशकाऐवजी त्यांनी २५ मी. व्यासाचे चार आकाशक ७६ मी. व्यासाच्या मूळ रेडिओ दूरदर्शकाला जोडले. यामुळे अगदी मंद अशा रेडिओ उद्गमांचा अभ्यास करणे शक्य झाले. कृत्रिम उपग्रह आणि अवकाशयाने यांच्या अध्ययनासाठीही लोव्हेल यांच्या रेडिओ दूरदर्शकांचा प्रथम पुष्कळ उपयोग झाला. उदा., स्पुटनिक हा रशियाचा उपग्रह वाहून नेणाऱ्या रॉकेटाचे निरीक्षण करणे, अवकाशयानांशी संपर्क राखणे वगैरे.
लोव्हेल यांनी ज्योतिषशास्त्र व इतर विषयांवरही पुस्तके लिहिली असून त्यांच्या पत्नी जॉयसी ह्या यांपैकी काही पुस्तकांच्या सहलेखिका आहेत. लोव्हेल यांची महत्त्वाची काही पुस्तके पुढील होत : सायन्स अँड सिव्हिलायझेशन (१९३९), रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी (१९५२), मिटिऑर ॲस्ट्रॉनॉमी (१९५४), वर्ल्ड पॉवर रिसोर्सेस अँड सोशल डेव्हलपमेंट (१९४५), द एक्स्प्लोरेशन ऑफ स्पेस वुइथ रेडिओ (१९५७), द इंडिव्हिजुअल अँड द युनिव्हर्स (१९५८), द एक्स्प्लोरेशन ऑफ आउटर स्पेस (१९६२), डिस्कव्हरिंग द युनिव्हर्स (१९६३), अवर प्रेझेंट नॉलेज ऑफ द युनिव्हर्स (१९६७), द एक्स्प्लोरेशन ऑफ सायन्स, द फिजिकल युनिव्हर्स (१९६७), द स्टडी ऑफ जॉड्रेल बँक (१९६८), द ओरिजिन्स अँड इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स ऑफ स्पेस एक्स्प्लोरेशन (१९७३), आउट ऑफ द झेनिथ :जॉड्रेल बँक (१९५७-७० , १९७३), मॅन्स रिलेशन टू द युनिव्हर्स (१९७५), इमर्जिंग कॉस्मॉलॉजी (१९८१), द जॉड्रेल बँक टेलिस्कोप (१९८५), व्हॉइस ऑफ युनिव्हर्स (१९८७).
लोव्हेल यांना अनेक बहुमान मिळाले असून त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे आहेत : रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे फेलो (१९५५), अध्यक्ष (१९६९-७१) व सुवर्णपदक (१९८१), रॉयल पदक (१९६०), नाइट किताब (१९६१), चर्चिल सुवर्णपदक (१९६४), इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनचे उपाध्यक्ष (१९७०-७६), पोलंडचा कंपॅनिअन्स ऑर्डर ऑफ मेरिट हा बहुमान, मँचेस्टर शहराचे नागरिकत्व (१९७७), बेंजामिन फ्रँक्लिन पदक (१९८१) वगैरे. यांशिवाय त्यांना अनेक विद्यापीठे, संस्था व संघटना यांच्या सन्माननीय पदव्या व सदस्यत्व हे मानसन्मानही मिळाले आहेत.
फडके, ना. ह. नेने, य. रा.
“