पेपर मलबेरी : (लॅ. ब्रॉस्सोनेशिया पॅपिरिफेरा, मोरस पॅपिरिफेरा कुल-मोरेसी) ð वडð तुती यांच्या कुलातील [वट कुल मोरेसी] सु. ९-१५ मी. उंच, जलद वाढणारा, मध्यम आकाराचा हा पानझडी वृक्ष मूळचा चीन व जपान येथील असून थायलंड व ब्रह्मदेशातील टेकड्या येथेही आढळतो. हल्ली चीन व जपानात याची लागवड आहे. ब्रह्मदेश, मलेशिया व पॅसिफिक बेटे येथेही तो लागवडीत आहे. भारतात बागेत लावतात. डेहराडूनमध्ये व आसपास हे वृक्ष लावलेले आढळतात. ह्याच्या शाखा जाड व लवदार असतात पाने साधी, मोठी (७-२० सेंमी. लांब), एकाआड एक, पातळ, लांब देठाची, अखंड किंवा दातेरी अथवा काहीशी खंडित (विभागलेली) फुले एकलिंगी असून भिन्न झाडांवर येतात ती प्रदलहीन व हिरवट असून पुं-कणिशे लांबट व स्त्री-पुष्पांचे झुबके गोलसर असतात. संदले व केसरदले प्रत्येकी चारचार असतात [→ फूल ]. संयुक्त फळ (१.८ सेंमी. व्यास) मासंल, लाल व चकचकीत असते.

सालीपासून मिळणारा धागा तलम, मऊ, बळकट, पांढरा व चमकदार असून चीन व जपानमध्ये कागद व कापड (टापा किंवा कापा या नावाने ओळखण्यात येणारे) आणि ब्रह्मदेशात विशिष्ट कागद लगद्याच्या वस्तू (पेपरमशे), लिहिण्याच्या पाट्या, कंदील, छत्र्या इ. वस्तू बनवितात. टापा कापडाची वस्त्रे पॅसिफिक बेटांवरचे लोक एके काळी वापरीत असत. दोर बनविण्यास, वस्त्रनिर्मितीत व कागदाच्या उत्पादनात ह्या धाग्यांचा उपयोग महत्त्वाचा असल्याने भारतात त्यासंबंधी अधिक लक्ष देणे उपयुक्त ठरेल, नवीन लागवड बीया, कलमे किंवा मुळांचे तुकडे लावून करतात. पंजाबातील पाणभरत्या भागांत बियांनी व मूलयुक्त (भूमिगत) शाखांनी (मुनव्यांनी) त्याचा प्रसार झाला आहे. ह्या वृक्षांना थंड हवामान व ओलसर जमीन आवश्यक असते.

जमदाडे, ज. वि.