प्राणिवैज्ञानिकसंस्थावसंघटना: कोणत्याही विज्ञानशाखेच्या अध्ययनात व संशोधनात व्यक्तिगत प्रयत्नांना संघटित प्रयत्नांची मदत आवश्यक असते. आपल्या संशोधनाची माहिती इतर शास्त्रज्ञांना व्हावी व इतर शास्त्रज्ञ काय संशोधन करीत आहेत ते आपणास कळावे म्हणून व्याख्यानमाला, चर्चासत्र, माहितीपत्रके, पुस्तके, नियतकालिके इ. साधनांची आवश्यकता असते. ही साधने उपलब्ध करून देणाऱ्या संघटना आणि संस्था प्रत्येक शास्त्रात व प्रत्येक देशात आढळतात. प्राणिविज्ञानातील अशा प्रकारच्या संस्था व संघटना बऱ्याच देशांत आहेत. इ. स. १८२८ मध्ये लंडन शहरात जगातील पहिली प्राणिवैज्ञानिक संघटना ‘झूलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन’ या नावाने स्थापन झाली. याच संघटनेच्या वतीने ‘इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ झूलॉजी’ या नावाने परिषदा भरविण्यात आल्या. अशी पहिली परिषद १८९५ मध्ये पॅरिस येथे झाली. पुढे या परिषदा अनियमितपणे जगातील निरनिराळ्या देशांत होत असत. या संघटनेची सोळावी बैठक १९६३ मध्ये वॉशिंग्टन येथे झाली. प्राण्यांच्या नवीन जातींचे नामाभिधान काही नियमांप्रमाणे व्हावे लागते. ते नियम व केलेले नामाभिधान बरोबर आहे की नाही हे पाहण्याकरिता इंटरनॅशनल कमिशन ऑन झूलॉजिकल नॉमेन्क्लेचर हा आयोग स्थापन करण्यात आला व हे कार्य इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ झूलॉजी या परिषदेकडे सोपविण्यात आले.

 

झूलॉजिकल सोसायटी ऑफ लंडनच्या वतीने रीजंट पार्क, लंडन व व्हीपस्नेड येथे प्राणिसंग्रहालये उभारली आहेत. रीजंट पार्क येथे एक मत्स्यालयही आहे.

 

प्रादेशिक प्राणिवैज्ञानिक संघटना आता जगभर आढळतात. या संघटनांतर्फे प्राणिसंग्रहोद्यान व मत्स्यालये चालविण्यात येतात. बऱ्याच वेळा अशा संघटनांतील सभासद प्राणिवैज्ञानिक असतीलच असे नाही. ज्यांना प्राण्यांचा अभ्यास करण्याचा छंद आहे असे पुष्कळ लोक अशा संस्थांचे सभासद असतात. प्राणिसंग्रहोद्याने व मत्स्यालये यांचा उपयोग संशोधनात्मक कार्यास निश्चितच होतो. प्राण्यांचे स्वभावविशेष, प्रजोत्पादन, संदेशवहन वगैरे क्षेत्रांत या संग्रहोद्यानांच्या द्वारे बरीच माहिती उपलब्ध होते.

 

द न्यूयॉर्क झूलॉजिकल सोसायटीचे प्राणिसंग्रहोद्यान ब्राँक्स येथे व तिचे मत्स्यालय मॅनहॅटन येथे आहे. झूलॉजिकल सोसायटी ऑफ स्कॉटलंडचे प्राणिसंग्रहोद्यान एडिंबरो येथे तर झूलॉजिकल सोसायटी ऑफ आयर्लंडचे प्राणिसंग्रहोद्यान डब्लिन येथे आहे.

 

स्थानिक संघटना आपल्या स्वतःच्या मालकीच्या इमारतीत आपले कार्य करतात. या कार्यात प्राणिसंग्रहोद्याने, प्रकाशने, ग्रंथालये व स्वतःची शास्त्रीय नियतकालिके यांचा समावेश होतो. झूलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन ही झूलॉजिक रेकॉर्ड हे नियतकालिक प्रकाशित करते. काही संघटना आपल्या विशिष्ट क्षेत्रातील नियतकालिके चालवितात. उदा., AUK हे नियतकालिक अमेरिकन ऑर्निथॉलॉजिस्ट युनियन व IBIS हे नियतकालिक ब्रिटिश ऑर्निथॉलॉजिस्ट युनियन या पक्षिविज्ञानविषयक संघटना चालवितात. जर्मनी, फ्रान्स, बेल्जियम, जपान वगैरे देशांतही अशा संघटना आहेत व त्या राष्ट्रीय संघटना म्हणून प्रतिनिधित्व करतात. या प्रत्येक संघटनेचे निरनिराळे नियतकालिकही प्रसिद्ध होते.

 

जगात पक्षिवैज्ञानिक संघटना बऱ्याच आहेत. राष्ट्रीय संघटनांबरोबरच काही प्रादेशिक संघटनाही आहेत व त्यांची वैयक्तिक प्रकाशनेही प्रसिद्ध होतात. विल्सन ऑर्निथॉलॉजिकल क्लबचे विल्सनबुलेटीन, कूपर ऑर्निथॉलॉजिकल क्लबचे काँडॉर, ब्रिटिश एव्हिक्युलर सोसायटीचे एव्हिकल्चरलमॅगेझीन ही त्यांची काही उदहारणे होत.

 

कीटकांचा संग्रह करणे आणि त्यांची देवाणघेवाण करणे या उपक्रमातून रॉयल एन्टॉमॉलॉजिकल सोसायटी, लंडन कॅनेडियन एन्टॉमॉलॉजिकल सोसायटी व इतर देशांतील कीटकविज्ञानविषयक संस्थांचा उगम झाला. Entomologischer Verein Zu Stettin (१८३८) ही जर्मनीतील सर्वांत जुनी कीटकवैज्ञानिक संस्था होय.

 

अमेरिकन मॅलॅकॉलॉजिकल युनियन (१९३१), काँकॉलॉजिकल सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंड (१८७६), मॅलॅकॉलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन (१८९३), Deutsche Malacologische Gsellschaff (१८६८), Societe Malacologique de France (१८८४-९०) या संस्था कीटकांखेरीज इतर अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांचे अध्ययन करतात व त्या त्या विषयांवरील आपली नियतकालिके प्रसिद्ध करतात.

 

यांशिवाय प्राणिविज्ञानातील इतर नवीन क्षेत्रांचे अध्ययन करण्यासाठी विसाव्या शतकात जगभर अनेक संघटना व संस्था स्थापन झालेल्या आहेत व त्यांच्या वतीने त्या त्या विषयांवरील नियतकालिके प्रसिद्ध होतात. प्राणिविज्ञानातील विविध विषयांवरील नियतकालिके प्रसिद्ध करणाऱ्या बहुतांश प्राणिवैज्ञानिक संस्थांची व संघटनांची यादी आणि ही नियतकालिके कोणत्या ग्रंथालयांत उपलब्ध आहेत त्यांची यादी युनियनलिस्टऑफसिरीयल्सआणिवर्ल्डऑफलर्निंग (यूरोपा पब्लिकेशन्स लि., लंडन) या प्रकाशनांमध्ये आढळते.

 

भारतातीलसंस्थावसंघटना: भारतात १७८४ मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल ही पहिली संघटना कलकत्ता येथे स्थापन झाली. तिचे कार्यक्षेत्र व्यापक स्वरूपाचे होते व त्या वेळी विज्ञानास या संघटनेत विशेष स्थान नव्हते. प्राण्यांचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने भारतातील पहिली वैज्ञानिक संस्था म्हणजे ⇨ बाँबेनॅचरलहिस्टरीसोसायटी ही होय. हिची स्थापना मुंबई शहरात १८८३ साली झाली. भारतातील प्राण्यांचे संशोधन करणे आणि प्रामुख्याने प्राण्यांच्या निसर्गाशी निगडित असलेल्या संबंधांचे निरीक्षणही करणे, हे या संस्थेचे मुख्य उद्देश होत. ही संस्था जर्नलऑफबाँबेनॅचरलहिस्टरीसोसायटी या नावाचे नियतकालिकही चालविते. ही संस्था महाराष्ट्र राज्य व केंद्र सरकार यांच्या वन्य पशुसंरक्षण संघटनेसही मदत करते. मुंबईच्या प्राणिसंग्रहोद्यानाशी व पुराणवस्तुसंग्रहालयाशीही या संस्थेचा संबंध आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या संस्थेच्या इमारतीत संशोधन करण्याचीही सोय करण्यात आली आहे.

 

स्वातंत्र्यपूर्व काळात भारताच्या केंद्र सरकारने काही संस्था व संघटना स्थापण्यास बरीच मदत केली. भारतातील निरनिराळ्या संघांच्या प्राण्यांचे सर्वेक्षण करून सरकारने फॉनाऑफब्रिटिशइंडिया नावाचा एक मोठा ग्रंथ संच प्रकाशित केला. यामुळे संशोधकांची खूपच सोय झाली. पुढे १९१६ साली आपल्या अधिपत्याखाली केंद्र सरकारने ⇨ भारतीयप्राणिवैज्ञानिकसर्वेक्षणसंस्था कलकत्ता येथे स्थापन केली व यथाकाल या संस्थेच्या शाखा भारतातील महत्त्वाच्या शहरांत उघडण्यात आल्या. भारतातील प्राण्यांच्या जाती, त्यांचे निवासस्थान, प्राणिभूगोल, प्राणिसंख्या वगैरे क्षेत्रांत संशोधन करणे आणि भारत सरकारला वन्य पशुसंरक्षणासंबंधी मार्गदर्शन करणे व प्राणिसंशोधकांना प्राण्यांसंबंधी उपलब्ध माहिती पुरविणे हे या संस्थेचे उद्देश आहेत. या संस्थेचा प्राणिसंग्रह व ग्रंथसंग्रह आग्नेय आशियात सर्वांत मोठा समजला जातो. संस्थेतर्फे कलकत्त्यातील भारतीय संग्रहातील प्राणिविभागाची देखभाल केली जाते. संस्थेत पदव्युत्तर अभ्यासाचीही सोय आहे. या संस्थेतर्फे मेम्वार्सऑफइंडियनम्युझियमरेकॉर्ड्ऑफइंडियनम्युझियम ही दोन नियतकालिके प्रसिद्ध केली जातात.

 


भारतीय प्राणिविज्ञान मंडळ या संघटनेची स्थापना १९३९ साली भारतीय प्राणिविज्ञान सर्वेक्षण संस्थेच्या वास्तूत झाली. प्राणिविज्ञान संशोधनास मदत करणे व प्राणिविज्ञान ग्रंथमाला (इंडियन झूलॉजिकल मेम्वार्स) प्रसिद्ध करणे, हे या मंडळाचे उद्देश होत.

 

द एन्टॉमॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया या कीटकविज्ञानविषयक संस्थेची स्थापना दिल्ली येथे १९३८ साली भारतीय कृषि संशोधन संस्थेच्या कार्यालयात झाली. या संस्थेचा उद्देश कीटकविज्ञानात संशोधन करणे व इंडियनजर्नलऑफएन्टॉमॉलॉजी हे नियतकालिक प्रकाशित करणे, हे होत.

 

द हेल्मिंथॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया या कृमिविज्ञानविषयक संस्थेची स्थापना १९४८ साली भारतीय प्राणिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या वास्तूत झाली. या संस्थेचे उद्देश कृमिसंशोधन करणे व इंडियनजर्नलऑफहेल्मिंथॉलॉजी या नियतकालिकाचे प्रकाशन करणे, हे आहेत.

 

ॲक्वारीस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही संस्था १९५४ साली तारापोरवाला जलजीवालय, मुंबई येथे स्थापन झाली. तारापोरवाला जलजीवालय हे देशातील सर्वांत मोठे व सुंदर मत्स्यालय आहे. लोकांत जलचर प्राण्यांचे संगोपन करण्याची आवड निर्माण व्हावी हा या संस्थेचा उद्देश आहे. [⟶ जलजीवालय].

 

ॲकॅडेमी ऑफ झूलॉजी ही संस्था आग्रा येथे १९५५ साली स्थापन झाली. या संस्थेतर्फे ॲनल्सऑफझूलॉजी हे नियतकालिक प्रसिद्ध केले जाते.

 

द मरीन बायॉलॉजिकल ॲसोसिएशन ऑफ इंडिया ही सागरी जीवविज्ञानविषयक संस्था १९५७ साली मंडपम्‌, मद्रास येथे स्थापन झाली. या संस्थेचे उद्देश सागरी प्राण्यांविषयी संशोधन करणे व जर्नलऑफमरीनबायॉलॉजिकलॲसोसिएशनऑफइंडिया हे नियतकालिक प्रसिद्ध करणे, हे आहेत.

 

यांशिवाय झूलॉजिकल सोसायटी ऑफ बेंगॉल, कलकत्ता आणि सोसायटी ऑफ ॲनिमल मॉर्‌फॉलॉजिस्ट्स अँड फिजिऑलॉजिस्ट्स, बडोदा वगैरे लहान लहान संस्थाही पुष्कळ आहेत व त्या आपापल्या विशिष्ट क्षेत्रविषयक नियतकालिके प्रसिद्ध करतात.

 

भारतात प्राणिसंग्रहोद्याने बरीच असून त्यांची व्यवस्था सरकारकडे अगर संबंधित नगरपालिकेकडे आहे. [⟶ प्राणिसंग्रहोद्याने].

 

केतकर, श. म. इनामदार, ना. भा.