लेव्ही, सील्व्हँ : (२८ मार्च १८६३-३० ऑक्टोबर १९३५). फ्रेंच प्राच्यविद्याविशारद. जन्म पॅरिस शहरी. शिक्षण पॅरिस येथेच झाले. ‘द इंडियन थीएटर’ (इं.शी.) हा प्रबंध लिहून पॅरिस विद्यापीठाची डी.लिट्. ही पदवी संपादन केली (१८९०). त्याआधीच, म्हणजे १८८९ पासून, सॉरबॉनमध्ये ते संस्कृतचे अध्यापन करीत होते. १८९४ साली ‘कॉलेज ऑफ फ्रान्स’ (इं. अर्थ) मध्ये प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १८९७-९८ ह्या कालखंडात त्यांनी भारत आणि जपान ह्या देशांचा दौरा केला. ‘द डॉक्ट्रिन ऑफ सॅक्रिफाइस इन द ब्राह्मणाज’ (१८९८, इं.शी.) हा त्यांचा ग्रंथ ह्या प्रवासाचेच एक फलित होय. ‘नेपाळ : हिस्टॉरिकल स्टडी ऑफ ए हिंदू किंग्डम’ (३ खंड, १९०५-०८, इं.शी.) आणि ‘इंडिया अँड द वर्ल्ड’ (१९२६, इं. शी.) हे त्यांचे ग्रंथही उल्लेखनीय आहेत. जगातील विविध राष्ट्रांच्या संदर्भांत भारत कोणती भूमिका बजावू शकतो, ह्यासंबंधीची चर्चा त्यांनी ‘इंडिया अँड द वर्ल्ड’ ह्या ग्रंथात केली आहे. १९२१-२३ ह्या कालखंडात त्यांनी अतिपूर्वेकडील देशांचा दौरा केला. त्यांतून त्यांचा ‘होबोजिरिन, डिक्शनरी ऑफ बुद्धिझम बेस्ड ऑन चायनीज अँड जॅपनीज सोअर्सिस’ (१९२९, इं.शी.) हा महत्त्वाचा कोश तयार झाला. बौद्ध धर्माचे जपानी पंडित ताकाकुसू जंजीरो ह्यांचे सहकार्य त्यांना लाभले.
विख्यात फ्रेंच भाषाशास्त्रज्ञ आंत्वान मेये ह्यांच्याबरोबर लेव्हीने आशियातील चिनी तुर्कस्तानच्या प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या तोखारियन भाषेवर काम केले. १९३३ साली ‘तोखारियन बी’ मधील (तोखारियनची पश्चिमेकडील बोली) कूचा येथे सापडलेल्या काही ग्रंथांचे काही अंश त्यांनी प्रसिद्ध केले (इं. शी. फ्रॅगमेंट्स ऑफ टेक्स्ट्स फ्रॉम कूचा). पॅरिस येथे ते निधन पावले.
कोपरकर, द. ग.
“