पिंगल : (इ. स. पू. दुसरे शतक). छंद:शास्त्राचा एक आचार्य. पिंगलनाग या नावानेही तो ओळखला जातो. छंद:शास्त्र हे पाचवे वेदांग होय. ह्या वेदांगाचा छंद:सुत्र हा एक महत्त्वाचा ग्रंथ पिंगलने रचिला. पिंगल आणि पतंजली एकच होत, अशी एक पारंपरिक समजूत आहे. सर्वानुक्रमावरिल आपल्या भाष्यात षडगुरूशिष्याने पिंगल हा पाणिनीचा धाकटा बंधू होता, असे म्हटले आहे. पिंगल हा पतंजलिच्या काळाच्या (इ. स. पू. सु. १५०) आसपासच केव्हा तरी होऊन गेला असण्याचा संभव आहे, असे विंटरनिट्ससारख्या विद्वानाचे मत आहे.

पिंगलाच्या छंद:सूत्रात  वैदिक छंद कमीच आहेत, ही बाब लक्षणीय आहे. हा ग्रंथ अस्तित्वात येण्यापूर्वीच्या काळात लौकिक स्वरूपाची बरीचशी कविता रचली गेली असली पाहिजे कारण त्यातील बरेचसे छंद तशा प्रकारच्या काव्यांतून आलेले दिसतात.विशेषत: शृंगारिक कविता वेगवेगळ्या छंदांत लिहिण्याचे प्रयोग ह्या काळात झालेले दिसतात. चंचलाक्षी, चारूहासनी, वसंततिलका, कुटिलगती ही काही छंदांची नावे ह्या संदर्भात पाहण्यासारखी आहेत. हे शब्द मुळात प्रेम विषय झालेल्या स्त्रियांचे वर्णन करण्यासाठी वापरले गेले असावेत. ‘मंदाक्रांता’ आणि ‘द्रुतमध्या’ ही छंदनामे संबंधीत छंदाच्या स्वरूपावरून देण्यात आलेली आहेत. छंदांचे स्पष्टीकरण देताना पिंगलाने अनेकदा बीजगणितातील चिन्हांसारखी चिन्हे वापरली आहेत. पिंगलाने क्रौष्टीकी, यास्क, सैतव, काश्यप आसा आपल्या काही पूर्वसूरींची नावे छंद:सूत्रात निर्देशिलेली आहेत. भारतीय छंद:शास्त्राची परंपरा पिंगलाच्याही पूर्वीची असल्याचे दिसून येते.

कुलकर्णी, अ.र.