हर्षचरित :बाणभट्टाने रचिलेला अभिजात संस्कृत वाङ्मयातील प्राचीनतम आणि प्रसिद्ध आख्यायिका-प्रबंध. संस्कृत वाङ्मयात गद्य- काव्याचे कथा आणि आख्यायिका असे दोन प्रकार आहेत. कथा ही कल्पितावर आणि आख्यायिका ही सत्यांशयुक्त वृत्तान्तावर आधारलेली असते. हर्षचरिता च्या प्रास्ताविक श्लोकात बाणभट्टाने सुबंधू , भट्टार, हरिचंद्र, सातवाहन, प्रवरसेन, भास, कालिदास, गुणाढ्य, आद्यराज अशा अनेक पूर्वगामी लोकांना गौरवांजली वाहिलेली आहे. त्यावरून त्या-त्या लेखकाच्या कालाची उत्तरमऱ्यादा स्पष्ट होते.

कनौजचा (कान्यकुब्ज) सुप्रसिद्ध सम्राट हर्षवर्धन (कार. ६०६– सु. ६४७) हा बाणभट्टाचा आश्रयदाता होता. हर्षचरिता त बाणभट्टाने आपले आणि आपल्या आश्रयदात्याचे चरित्र गोवलेले आहे. हर्षचरिता चे आठ उच्छ्वास आहेत : पहिल्या उच्छ्वासात बाणाने आपल्या कुलाची प्रथम काहीशी पौराणिक स्वरूपाची माहिती देऊन आपला जन्म, विद्या-साधना आणि आईवडिलांच्या मृत्यूनंतर मित्रपरिवारासह आनंदानुभवां-साठी केलेला दीर्घ प्रवास यांचे वर्णन केल्यावर शोण नदीकाठच्या प्रीतिकूटग्रामी आपण कसे परत राहावयास आलो, ते सांगितले आहे. दुसऱ्या उच्छ्वासात हर्षवर्धनाने बाणाला त्याच्या स्वैर वर्तनाचा जाब विचारण्यासाठी अजिरावती नदीच्या तीरावरील मणितारा गावच्या आपल्या शिबिरात कसे बोलविले, त्याचे वर्णन आहे. येथेच हर्षाने पुढे आपला गौरव कसा केला, तेही सांगितले आहे. तिसऱ्या उच्छ्वासात आपल्या नातेवाईकांनी विचारल्यावरून बाणाने हर्षवर्धनाच्या आणि त्याच्या राज्याच्या वर्णनाला आरंभ केलेला आहे. उरलेल्या सर्व उच्छ्वासांत हर्षवर्धनाच्या चरित्रातील राजकीय आणि वैयक्तिक घडामोडी वर्णिलेल्या आहेत.

वर्धनकुलातील आदित्यभक्त प्रभाकरवर्धन याला यशोमती या पत्नी-पासून दोन मुलगे – राज्यवर्धन आणि हर्षवर्धन – व एक मुलगी – राज्यश्री –– अशी तीन अपत्ये झाली. राज्यश्रीचा मौखरी कुलातील ग्रहवर्मन् किंवा ग्रहवर्मा याच्याशी विवाह झाला. राज्यवर्धन हूणांशी युद्ध करण्यात गुंतला असताना त्याचा पिता प्रभाकरवर्धन मृत्यू पावला. दुःखाने व्याकूळ होऊन राज्यवर्धनाने संन्यास घेण्याचा निश्चय केला पण त्याच वेळी मालव राजाने ग्रहवर्म्याला ठार मारून राज्यश्रीला बंदिवान केले. याचा सूड घेण्याच्या हेतूने राज्यवर्धन ताबडतोब आपला मामेभाऊ भण्डी याच्या-बरोबर निघाला. राज्यवर्धनाने मालव सैन्याचा सहज पाडाव केला पण गौडराज शशांकाने दगलबाजीने त्याचा खून घडवून आणला. त्याच वेळी लगेच हर्ष शशांकाचे पारिपत्य करण्यास निघाला परंतु मार्गात भेटलेल्या भण्डीने राज्यश्री बंदिवासातून सुटून विंध्यारण्यात गेल्याचे हर्षाला सांगितले. भण्डीला गौडराजावर पाठवून हर्ष आपल्या बहिणीच्या शोधार्थ विंध्यारण्यात गेला. एका बौद्ध भिक्षूच्या साहाय्याने त्याला राज्यश्री चित्तारोहण करताना सापडली. तिला सोडविल्यावर हर्षाने अशी प्रतिज्ञा केली की, दगलबाज गौडराजाचे पारिपत्य केल्यावर आपण आपल्या बहिणीसह बौद्ध भिक्षू होऊन उर्वरित आयुष्य व्यतीत करू.

बाणभट्टाच्या ⇨ कादंबरी या ग्रंथाप्रमाणेच हर्षचरित ही अपूर्ण राहिलेले आहे. हर्षचरिता त काव्यगुणांनी इतिहास गुदमरून टाकल्याचे जाणवत असले, तरी संस्कृतातील ऐतिहासिक गद्यकाव्याचा तो एक प्राचीनतम असा पहिला प्रयत्न आहे. घनदाट काव्यात्म वातावरणामुळे आणि श्लेषप्रचुर आलंकारिक शैलीमुळे त्याला ऐतिहासिक चरित्र म्हणता येणार नाही. परंतु त्याला इतिहासाचाही चांगला रंग आहे आणि त्यातील इतिहासाचे पडताळे अन्य स्वतंत्र पुराव्यांनी मिळतात. याशिवाय तत्कालीन भारतीय समाजाच्या चालीरीती, रूढी, श्रद्धा, लोकभ्रम, राजसभा, व्यवसाय, सेना-शिबिरे, शांत खेडी, मठ, नगरे, वैद्यकी, भिक्षू, वनस्पतिसृष्टी इत्यादींचे सूक्ष्म, मार्मिक अवलोकनही त्यात दिसून येते. हर्षचरिता चे हे वैशिष्ट्य लक्षणीय आहे. हर्षचरिता वर काही टीका आहेत.

संदर्भ : 1. Dasgupata, S. N. De, S. K. A History of Sanskrit Literature, Classical Period, Calcutta, 1962.

            2. Kane, P. V. Ed. The Harshacharita, 1918.

मंगरूळकर, अरविंद