लीना : सोव्हिएट रशियातील लांबीने दुसऱ्या क्रमंकाची नदी. जगातील मोठ्या नद्यांपैकी एक असून तिची लांबी सु.४,४०० किमी. व जलवाहक क्षेत्र सु. २४,९०,००० चौ. किमी. आहे. ‘ लीना’ शब्दाचा याकूत भाषेतील अर्थ मोठी नदी असा आहे. आशियाई रशियातील बैकल सरोवरच्या पश्चिसमेस १५ किमी. च्या आत बैकल पर्वतराजीच्या उतारावर सु. ९३० मी. उंचीवर बॉलशाय लीना या नावाने एका छोट्या सरोवरात उगम पावणारी ही नदी प्रथम ईशान्येकडे आणि नंतर उत्तरेकडे वाहत जाऊन अखेरीस लॅप्टेव्ह समुद्रात (आर्क्टिक महासागराचा भाग) विलीन होते. या नदीप्रवाहच्या साहाय्याने मध्य सायबीरिया व पूर्व सायबीरिया यांमधील सीमा निश्चित केली आहे.

लीना नदीच्या खोऱ्याचे सर्वसाधारणपणे प्रत्येकी सु. १,४०० किमी. चे तीन ठळक विभाग पाडता येतात. वरचा टप्पा तिच्या उगमापासून तिला उजवीकडून येऊन मिळणाऱ्या वितीमच्या संगमापर्यंतचा या भागात खननाचे काम जोराने चालू असल्याने नदी खोल, अरुंद दरीतून वाहते. दरीच्या कडा तळापासून कधीकधी ३०० मी. उचीपर्यंत लोंबताना आढळतात. उजव्या हाताच्या बैकल सरोवराकडील भागात उभट कडेदेखील आढळतात. येथे दरीची रुंदी अवघी २०० मी. आहे. उगमापासून सु. १७० किमी. अंतरापर्यंत मात्र नदीचे पात्र उथळ असून किरिंगा ही उपनदी येऊन मिळेपर्यंत अनेक खडक व मोठे उथळ भाग आढळतात. पुढे नदीच्या पाण्याची खोली वाढते. उतार मंद झाल्याने पाण्याचा वेग कमी  होतो. या भागात असलेल्या अनेक डोहांची खोली सु. १० मी. इतकी  भरते.

वितीम व अल्डान या उपनद्यांच्या दरम्यान मधल्या टप्प्यात नदीचे पाणी वाढते व त्यामुळे खोलीदेखील वाढते, विशेषतः अल्येक्मा ही उजव्या बाजूने येणारी उपनदी मिळाल्यानंतर पाण्यात लक्षणीय वाढ होते. वितीम व अल्येक्मा यांच्या दरम्यान लीना उजव्या बाजूला असलेल्या पटॉमच्या पठाराला वळसा घालते. या भागात नदीखोरे सु. ८ ते ३२ किमी. पर्यंत रुंदावते. दोन्ही बाजूंचे उतार मंद असून पायऱ्यापायऱ्यांनी बनले आहेत. त्यांवर विस्तीर्ण कुरणे व अनेक छोटी सरोवरे आढळतात. काहीशा तीव्र उतारांवर जंगले आढळतात.

मधल्या टप्यांच्या सुरुवातीच्या भागात नदीची दरी क्रमाक्रमाने रुंद होत जाते मात्र अल्येकमिन्स्कजवळ अल्येक्मा ही उजवीकडून येणारी उपनदी मिळाल्यानंतर खालच्या भागात दरीचे स्वरूप एकदम बदलते. दरी अरुंद होते व नदी दरीच्या तळाशी वाहते. या भागात चुनखडकांत अनेक कडे निर्माण झाले असून उतार तुटक आहेत. या भागाचे एकंदर स्वरूप एखाद्या उद्ध्वस्त राजवाड्यासारखे वाटते. यामुळेच हा प्रदेश प्रवासी व विशेषतः कडेकपारी चढून जाणारे साहसी लोक यांचे खास आकर्षण ठरला आहे.

खालच्या टप्प्यात लीना नदी याकूत मैदानात उतरते तिचे पात्र रुंदावते व काठावरील पूर मैदानातील कुरणे अधिक विस्तृत होतात. येथे त्याची रुंदी ६-१५ किमी. च्या दरम्यान आहे. पाणथळ कुरणांत अनेक सरोवरे व बऱ्याच भागात खाजणेही दिसून येतात. उतार अतिशय मंद असल्याने प्रवाहाची शक्ती मंदावते आणि परिणामतः नदी स्वतःच पुराच्या वेळी टाकलेल्या गाळाला भेदून जाण्यास असमर्थ ठरल्याने तिचे विभाजन होऊन शाखा तयार होतात. त्यामुळे पात्रात तात्पुरत्या स्वरूपाची अनेक बेटे व मोढे दिसून येतात. प्रवाहात मात्र पाण्याची खोली १५-२० मी. असते.

अगदी खालच्या भागात लीना खाराउलाख पर्वत व चेकॅनोव्हस्की टेकडी यांमधून वाहते. येथे दरी पुन्हा अरुंद बनते (दोन किमी.). पुढे लॅप्टेव्ह समुद्रात विलीन होतांना नदीने केलेल्या भरणकाऱ्यामुळे त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे. त्रिभुज प्रदेशाचा विस्तार सु. ३०,००० चौ. किमी. असून नदीच्या लहान-मोठ्या शाखांची संख्या सुमारे १५० इतकी आहे. ट्रफीम ही सर्वांत मोठी शाखा ७०% पाणी वाहून नेते. बायकोव व ऑलन्यॉक या इतर नाव घेण्यासारख्या शाखा होत. बायकोव शाखा सु. १०६ किमी. लांब असून ती टिक्सी उपसागरात जाण्यासाठी मार्ग उपलब्ध करते. जलवाहतुकीच्या दृष्टीने तिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अल्डान नदीच्या संगमापासून मुखापर्यंत लीना नदी जलवाहतुकीस उपयुक्त असून तिच्या पात्रातील पाण्याची खोली सु. ३ मी. भरते. छोटी जहाजे त्यात सहज वाहतूक करू शकतात. अल्डान व विल्यूई या उपनद्यांमध्येदेखील काही प्रमाणात वाहतूक होऊ शकते. हिच्या खोऱ्यात जलवाहतुकीसाठी उपयुक्त असणाऱ्या  प्रवाहांची एकूण लांबी सु. ६,००० किमी. आहे.

उन्हाळ्यात होणाऱ्या पर्जन्यवृष्टीने नदीला पूर येतात. हिवाळ्यात पाणी गोठते. वसंत ॠतूत बर्फ वितळू लागल्यानंतर वरच्या टप्प्यातील बर्फ आधी वितळल्यामुळे व खालच्या भागात ते वितळण्यास उशिरा सुरुवात होत असल्यामुळे प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. परिणामी पाणी काठावर पसरून दलदलीचे विस्तृत प्रदेश निर्माण होतात.

वरच्या टप्प्यातील बहुतेक नदीखोरे तैगा प्रकारच्या अरण्यांनी व्यापलेले असून खालच्या टप्प्यात टंड्रा प्रकारच्या वनस्पती आढळतात. खंडांतर्गत हवामान शेतीला प्रतिकूल असले, तरी या नदीखोऱ्यातील याकूत मैदानाच्या मध्यभागात सातू, ओट, गहू यांसारखी अन्नधान्ये व बटाटा यांचे पीक काढले जाते. कुरणांत पशुपालनाचा व्यवसाय चालतो. यांशिवाय मुखाजवळील भागात मासेमारीही चालते. ४०० लक्ष किवॉ. ता. वीज उत्पन्न होईल इतकी हिची क्षमता असून त्याशिवाय नदीखोऱ्यात कोळसा, नैसर्गिक वायू, टंगस्टन, प्लॅटिनम, मॉलिब्डिनम, सोने, हिरे, लोह इत्यादींचे साठे आहेत. १६३० मध्ये रशियनांनी या नदीखोऱ्याची प्रथम पाहणी केली. १८८१ मध्ये जॉर्ज डब्लू. दी लॉग या अमेरिकन संशोधकाने नदीखोऱ्याची माहिती सादर केली. याकूत्स्क, अस्यिट्रॉव्हा, झिगान्स्क व बुलुन ही जलवाहतुकीसाठी नदीवरील महत्त्वाची बंदरे असून याकूत्स्क व प्येल्यिडूई ही लाकूडकापणी केंद्रे म्हणून प्रसिद्ध आहेत.

फडके, वि. शं.