लिशमन, सर विल्यम बोग : (६ नोव्हेंबर १८६५- २ जून १९२६). ब्रिटिश विकृतिवैज्ञानिक.⇨काळा आजार या रोगाला कारणीभूत असलेल्या परजीवी प्रजीवाच्या (दुसऱ्या सजीवांवर उपजीविका करणाऱ्या व एकाच कोशिकेच्या-पेशीच्या-बनलेल्या जीवाच्या) शोधाकरिता विशेष प्रसिद्ध.

लिशमन यांचा जन्म स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे झाला. ग्लासगो विद्यापीठात शिक्षण घेऊन १८८६ मध्ये एम्.डी. पदवी मिळविल्यावर ते लष्करी वैद्यकीय सेवेत दाखल झाले व भारतात १८९०- ९७ मध्ये त्यांनी नोकरी केली.  इंग्लंडला परतल्यावर नेटली येथील लष्करी वैद्यकीय शाळेत ॲल्मरोथ राइट यांचे साहाय्यक म्हणून त्यांची नेमणूक झाली. या शाळेचे मिलबँक येथे स्थलांतर झाल्यावर १९०३ मध्ये ते राइट यांच्या जागी विकृतिविज्ञानाचे प्राध्यापक झाले. १९१३ मध्ये युद्ध कार्यालयात बदली झाल्यावर तेथे त्यांनी विविध सल्लागार पदांवर काम केले व १९१९ मध्ये ते विकृतिविज्ञानाचे संचालक झाले.  लष्करी वैद्यकीय सेवेच्या महासंचालकपदावर १९२३ मध्ये त्यांची नेमणूक झाली व मृत्यूपावतो त्यांनी याच पदावर काम केले. ते पश्चिम आफ्रिकेतील पीतज्वर आयोगाचे (१९१३-१५) व वैद्यकीय संशोधन  मंडळाचे (१९१३-२३) सदस्य होते.

लिशमन यांनी रक्तातील कोशिका व प्रजीव यांच्या अभ्यासाकरिता वापरण्यात येणाऱ्या रोमॅनोव्हस्की रंजकात सुधारणा करून त्यांच्या नावाने ओळखला जाणारा रंजक १९०० मध्ये विकसित केला. हा रंजक मिथिलीन ब्ल्यू व इओसीन यांचे संयुग असून रक्तातील हिवतापाच्या प्लास्मोडियमासारख्या परजीवी प्रजीवांचे अस्तित्व ओळखण्यासाठी लवकरच त्याचा प्रमाणभूत रंजक म्हणून उपयोग करण्यात येऊ लागला. याच सुमारास या रंजकाचा उपयोग करून लिशमन यांनी काळ्या आजाराला कारणीभूत असलेल्या प्रजीवाचा (लिशमॅनिया) शोध लावला. तथापि त्यांनी हा शोध १९०३ पर्यंत प्रसिद्ध केला नाही व त्यामुळे सी. डोनोव्हन यांनी स्वतंत्रपणे हाच शोध लावल्यावर लिशमन यांना त्यांच्याबरोबर या शोधाच्या श्रेयात सहभागी व्हावे लागले. माणसात आढळणाऱ्या या प्रजीवाच्या रूपाला प्रथमत: लिशमन-डोनोव्हन पिंड आणि पुढे लिशमॅनिया डोनोव्हनाय असे नाव देण्यात आले. या प्रजीवासारख्याच इतर प्रजीवांचा समावेश असलेल्या प्रजातीला लिशमॅनिया व त्यांच्यामुळे होणाऱ्या रोगांना लिशमॅनियासिस अशी नावे देण्यात आली.

विविध लशींच्या (विशेषतः आंत्रज्वरावरील-टायफॉइड ज्वरावरील-लशींच्या) विकासामध्ये त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. राइट यांनी आंत्रज्वराच्या मृत सूक्ष्मजंतूपासून तयार केलेल्या लशीसंबंधी उद्भवलेला वाद सोडविण्यासाठी लिशमन यांना १९०४ मध्ये निमंत्रित करण्यात आले. १९०९ पावेतो त्यांनी भारतात ही लस टोचलेल्या रुग्णांत आतड्याच्या तक्रारींमुळे मृत्यू होण्याचा धोका लक्षणीय इतका कमी आढळल्याचे दाखविले (टोचलेल्या १०,३७८ रुग्णांपैकी ५ मृत्यू पावले, तर न टोचलेल्या ८,९३६ पैकी ४६ मृत्यू पावले). प्रामुख्याने या कार्यामुळे लिशमन यांनी लशीच्या प्रत्यक्ष गुणवत्तेसंबधी प्रचारात आणलेल्या सुधारणांमुळे १९१४ मध्ये मोठ्या प्रमाणावर लस टोचण्याचे धोरण अवलंबिण्यात आले. यामुळे पहिल्या महायुद्धाच्या संपूर्ण काळात ब्रिटिश लष्करात आंत्रज्वरामुळे फक्त १,१९१ मृत्यू झाले. आफ्रिकी गोचीड-वाहित पुनरावर्ती ज्वराला [⟶ पुनरावर्ती ज्वर] कारणीभूत असलेल्या बोरीलीया ड्यूटोनाय या सूक्ष्मजंतूचे जीवनचक्र लिशमन यांनी दाखवून दिले.

लिशमन यांना १९०९ साली नाइट हा किताब देण्यात आला. १९१० मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटीच्या सदस्यत्वावर त्यांची निवड झाली. पहिल्या महायुद्धातील त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ अमेरिकन सरकारने त्यांना उल्लेखनीय सेवा पदक दिले. ते लंडन येथे मृत्यू पावले. 

भालेराव, य. त्र्यं.