बातानी, अल् : (सु. ८५८-९२९). अरबी ज्योतिर्विद. अपभू बिंदूला (चंद्र पृथ्वीपासून कमाल अंतरावर असतानाचे चंद्राचे स्थान दर्शविणाऱ्या बिंदूला) गती असते, हा टॉलेमी यांच्या मताविरुद्ध असलेला शोध त्यांनी लावला. त्यांचे पूर्ण नाव अबू अब्द अल्लाह मुहंमद इब्न जबीर बिन सिनात अल्-बातानी-अल्-हारानी अस्-साबी असून अल्बातेग्नी अथवा अल्बातेमियस या नावाने त्यांचा लॅटिन ग्रंथांत उल्लेख आढळतो. त्यांचा जन्म राजघराण्यात व हारान (मेसोपोटेमिया, आता तुर्कस्तान) येथे झाला. ८७७पासून त्यांनी वेध घेण्यास सुरुवात केली. त्यांचे बहुतेक संशोधनाचे व वेध घेण्याचे कार्य राक्का (सिरिया) येथे झाले. ते तेथे ४॰ वर्षे होते. त्यामुळे त्यांना ‘अल् राक्की’ असेही म्हणत. त्यांनी दमास्कस येथून काही वेध घेतले होते. अचूक वेध घेण्याबद्दल त्यांची ख्याती होती. ८८॰-८१ या काळात त्यांनी नौकानयनास उपयुक्त अशा ताऱ्यांची एक यादी तयार केली होती. आपल्या वेधांच्या आधारे त्यांनी टॉलेमी यांच अल्माजेस्ट या ग्रंथात सुधारणा सुचविल्या होत्या. भूमितीय पद्धतीऐवजी त्रिकोणमितीचा वापर करून त्यांनी टॉलेमी यांच्या ज्योतिषशास्त्रीय गणन पद्धतीत सुधारणा केल्या. त्यांनी संपातबिंदूच्या वार्षिक चलनाचे [ ⟶ संपात चलन] मूल्य ५४.५ विकला (हल्लीचे मूल्य ५॰.२विकला) तसेच क्रांतिवृत्त (सूर्याचा भासमान गतिमार्ग) व खगोलीय विषुववृत्त यांच्यातील कोन २३° ३५’ (हल्लीचे मूल्य २३° २६’ ४५’’) एवढा काढला होता. यांवरून त्यांच्या अचूक वेधांची कल्पना येईल. तसेच त्यांनी वर्षाचा व ऋतूंचा अचूक कालावधीही काढला होता. ज्योतिषशास्त्रीय आकडेमोडीत उच्च गणिताचा वापर करून त्यांनी चंद्र व सूर्य यांच्यासंबंधी कोष्टके तयार केली होती. सूर्यग्रहण कंकणाकृती असू शकेल, हेही त्यांनी निदर्शनास आणले हाते. Zij या त्यांच्या ग्रंथात ज्योतिषशास्त्रीय कोष्टके दिलेली आहेत. या ग्रंथाचे लॅटिन (१११६) व स्पॅनिश (तेरावे शतक) भाषांत अनुवाद झाले होते. यूरोपातील ज्योतिषशास्त्रीय अध्ययनावर त्यांच्या विचारांचा प्रभाव पडला होता. Du motu stellarum या त्यांच्या ताऱ्यांच्या गतीविषयीच्या ग्रंथाचेही अनुवाद आले होते. ते समारा (इराक) येथे मृत्यू पावले.

 

मोडक, वि. वि.