राउरकेला : भारताच्या ओरिसा राज्यातील सुंदरगढ जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर. उपनगरांसहित लोकसंख्या ३,२१,३२६ राउरकेला पोलाद नगराची लोकसंख्या २,१३,२७९ (१९८१ जनगणना). हे मुंबई – कलकत्ता या दक्षिण – पूर्व लोहमार्गावर जमशेटपूरच्या नैऋत्येस सु. १६० किमी. व सुंदरगढच्या पूर्वेस १०७ किमी. वर वसले आहे.
लोहमार्ग वाहतूक सुरू होण्यापूर्वी राउरकेला बव्हंशी अज्ञातच होते. राउरकेला – बीरमित्रपूर हा लोहमार्ग फाटा जेव्हा टाकण्यात आला, तेव्हापासून त्याला प्रसिद्धी मिळू लागली. १९५५ मध्ये सरकारी क्षेत्रातील तीन पोलाद कारखान्यांपैकी (राउरकेला, दुर्गापूर व भिलाई) पहिला पोलाद कारखाना पश्चिम जर्मनीच्या सहकार्याने जेव्हा राउरकेला येथे उभारावयाचे ठरले, तेव्हापासून राउरकेला प्रकर्षाने ख्याती पावले. पोलाद कारखान्याच्या उभारणीस ऑक्टोबर १९५६ मध्ये प्रारंभ झाला. त्यानंतर लवकरच बाजारपेठ व गाव यांची लोकसंख्येच्या दृष्टीने वाढ होत गेली. राउरकेलाचे सांप्रतचे क्षेत्र ९५·३१ चौ. किमी. असून ओरिसा राज्यातील ते सर्वांत मोठे शहर गणले जाते. खुद्द पोलादनगराचे क्षेत्र ४५·२० (जवळजवळ निम्मे) चौ. किमी. आहे.
प्रगत देशांत १९५५ –५६ च्या सुमारास पोलाद उत्पादनाच्या संदर्भात नुकत्याच विकसित झालेल्या व वापरात आणल्या गेलेल्या एल्. डी. (लिंट्स डोनाव्हिट्स) पद्धतीचा अवलंब राउरकेला कारखान्याकरिता करण्यात आला असून एल्. डी. पद्धतीने पोलाद उत्पादन करणारा हा देशातील एकमेव कारखाना आहे. तेथेच जगातील फार थोड्या अद्ययावत पोलाद कारखान्यांमध्ये असणाऱ्या हॉट रोलिंग मिल संयंत्राची यात सुविधा आहे. पोलाद उत्पादनाबरोबरच रासायनिक खतांचे उत्पादन करण्याकरिता या कारखान्यालाच खत प्रकल्प जोडण्यात आलेला आहे. अद्ययावत तंत्रवैज्ञानिक साधनांचा अवलंब करणाऱ्या फार थोड्या पोलाद कारखान्यांत राउरकेला कारखान्याची गणना होते.
कच्ची साधनसामग्री, विद्युतशक्ती आणि बाजारपेठ यांच्या उपलब्धतेच्या संदर्भात राउरकेला हे ‘न्यूनतम स्थानांतरण परिव्यय’ बिंदूवर वसलेले आहे. येथे खनिजाधारित संयंत्रांची स्थापना झाली असून दगडी कोळसा व लोहखनिज यांच्या साठाकेंद्रापासून कारखान्यापर्यंत वाहतूक सेवा असण्याचा लाभ राउरकेलास मिळाला आहे. बिहार–ओरिसा लोहखनिज पट्ट्यात अंदाजे २७,४०० लक्ष टन साठे असून हा पट्टा राउरकेलापासून सु. ३२ किमी. अंतरावर आहे. हिराकूद जलविद्युत्निर्मितीकेंद्र पोलाद कारखान्यापासून सु. १५० किमी. अंतरावर आहे. संक व कोएल या दोन नद्यांमधून कारखान्याकरिता प्रतिदिनी सु. ५,९०० लक्ष लिटर पाणी उपलब्ध होते. अधिक पाण्याची आवश्यकता पडल्यास संक नदीतच बांधलेल्या मंदीरा जलाशयातून पाणी घेता येण्याची सुविधा आहे.
राउरकेला कारखान्यात एक टन पोलाद उत्पादनासाठी सु. ६६१·७२ टन –किमी. प्रमुख कच्च्या मालाची कारखान्यापर्यंत वाहणावळ (वाहतूक) करावी लागते हेच प्रमाण भिलाई व दुर्गापूर येथील कारखान्यांसाठी अनुक्रमे १,५७१·६९ टन/किमी. आणि १,१६३·३८ टन/किमी. एवढे पडते. राउरकेला पोलाद कारखान्याला अशा तऱ्हेने देशातील इतर दोन सरकारी क्षेत्रातील पोलाद कारखान्यांपेक्षा अधिक प्रमाणात स्थाननिर्धारणीय लाभ मिळाल्याचे आढळते.
जहाजनिर्मितीसाठी लागणारे पोलादी पत्रे, जस्त (वि) लेपित पत्रे, विद्युतविश्लेषित कथिलपत्रे, विद्युत्यंत्रांकरिता लागणारे सिलिकोनयुक्त पोलाद, आवडी (तमिळनाडू राज्य) येथील अवजड वाहनांच्या कारखान्यास लागणारे विशिष्ट पोलाद पत्रे इत्यादींचे उत्पादन राउरकेला कारखान्यात होते. कारखान्याची सांप्रतची उत्पादनक्षमता पोलादपिंडक १८ लक्ष टन व विक्रियोग्य पोलाद १२·२५ लक्ष टन एवढी आहे. १९८५ –८६ मध्ये कारखान्यातून कच्चे पोलाद ११.७७ लक्ष टन, विक्रीयोग्य पोलाद १०·०५ लक्ष टन आणि विक्रीयोग्य कच्चे लोखंड ३०,००० टन असे उत्पादन झाले. या पोलाद कारखान्याच्या आधुनिकीकरणास प. जर्मनी मोठ्या प्रमाणात साहाय्य करणार आहे.
राउरकेलाला रमणीय नैसर्गिक परिसर लाभला आहे. हिरव्यागार डोंगरांनी वेढलेले आणि तीन नद्यांनी वळसा घातलेले हे आधुनिक पोलादनगर मैत्री व शांतता यांचे जणू प्रतीकच भासते. डोंगररांगांमुळे राउरकेला नगर आणि पोलादनगर ही वेगळी झाली आहेत. ४५·२० चौ. किमी. क्षेत्रफळामध्ये हे पोलादनगर २० विभागांमध्ये (सेक्टर) दुहेरी ‘रिंगरोड’ या सुंदर रस्त्याच्या दोन्ही भागांवर पसरलेले आहे. शिक्षण, विपणन, मनोरंजन, वैद्यकीय सुविधा इ. मुबलक प्रमाणात पुरविल्या जातात. २० विभागांपैकी १६ विभाग पूर्ण बांधण्यात आले असून पोलादनगराच्या कर्मचाऱ्यांकरिता १८,००० वर घरे बांधण्यात आली आहेत.
शहरात इंदिरा गांधी पार्क हे अत्यंत सुशोभित उद्यान असून त्यामध्ये एक नयनरम्य सरोवर आहे. उद्यानातील निसर्गावलोकन मनोरा, प्राणिसंग्रहोद्यानातील विविध प्राणी, सरोवराला वळसा घालून धावणारी मुलांची आगगाडी या गोष्टी मुलांच्या दृष्टीने अत्यंत आकर्षक आहेत. यांशिवाय शहरात ‘इस्पात स्टेडियम’ नावाचे क्रीडागार, ४८० खाटांनी व अद्ययावत साधनसामग्रींनी सुसज्ज असे ‘इस्पात जनरल हॉस्पिटल’ हे रुग्णालय, चार महाविद्यालये, ‘सुशीलावती खोसला दयानंद अँग्लो-वेदिक महिला तंत्र नकेतन’, ‘भांजा कलाकेंद्र’ हे नृत्यप्रशिक्षण केंद्र, ‘लाइफ अँड ऱ्हिदम’ हे संगीत-नृत्य प्रशिक्षण केंद्र, ‘राउरकेला नाट्यसंघ’, ‘प्रगती उत्कल संघ’, ‘मॅक्सम्यूलर भवन’, ‘मिलानी’, ‘मित्रसंघ’, ‘संघम्’ इ. सांस्कृतिक संस्था व अनेक क्लब, एक विमानतळ, १९ विपणनकेंद्रे आहेत. राउरकेला हाउस, इस्पात गेस्ट हाउस, हिराकूद गेस्ट हाउस इ. अतिथिभवने सर्व सुविधांनी युक्त आहेत. ओरिसा लष्करी पोलिसांच्या चौथ्या पथकाचे (बटालियन) मुख्यालय राउरकेलातच असून काही हॉटेले तसेच अनेक सरकारी क्षेत्रीय बँकाची शाखाकार्यालयेही आहेत. ओरिसा राज्य शासनाने राउरकेलात उभारलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये पन्नासांवर साहाय्यकारी उद्योग आहेत.
गद्रे, वि. रा.