राँसार, प्येअरद : (११ सप्टेंबर १५२४−२७ डिसेंबर १५८५). प्रबोधनकालातील सर्वश्रेष्ठ फ्रेंच कवी. व्हांदोम ह्या प्रदेशातील ला प्वासोनेर येथे एका उमरावकुलात जन्मला. १५३६ साली फ्रान्सच्या राजघराण्याच्या सेवेत तो शिरला. फ्रान्सची राजकन्या मादलॅन हिचा विवाह स्कॉटलंडच्या पाचव्या जेम्सशी झाल्यानंतर राँसार तिच्यासह स्कॉटलंडला गेला होता. तेथून दोन वर्षांनी फ्रान्सला परतल्यानंतर राजनैतिक सेवेत त्याने प्रवेश केला परंतु नंतर आलेल्या आजारपणात त्याला अंशतः बहिरेपणा आल्यामुळे तो विचार सोडून देऊन तो साहित्य आणि विद्याभ्यास ह्यांकडे वळला. कवी आणि विद्वान झां दोरा ह्याच्याशी त्याने अध्ययन केले. राँसारने ग्रीक−लॅटिन साहित्याचा अभ्यास केला. अभिजात साहित्याच्या अभ्यासाद्वारे फ्रेंच भाषा-साहित्याला नवे वळण देऊन ते समृद्ध करण्याची प्रेरणा दोराने त्याला आणि अन्य काही कवींनी दिली आणि हे कार्य करण्यासाठी ⇨ला प्लेयाद हे कविमंडळ अस्तित्वात आले. प्लेयाद म्हणजे सप्तर्षी. राँसार, ⇨झोआकिम द्यू बेले, पाँत्सूस द त्यार, झां आंत्वान बाईफ, एत्येन जॉदेल, रेमी बॅलो आणि झाक पॅलतिए असे सात कवी त्यांत अंतर्भूत होते. पॅलतिएच्या ऐवजी झां दोराचा समावेश काही अभ्यासक प्लेयादमध्ये करतात. तथापि झां दोरा हा मुख्यतः मानवतावादी विद्वान होता. अभिजात ग्रीक-लॅटिन कवींप्रमाणे पीत्रार्क ह्या इटालियन कवीचा आदर्शही प्लेयादसमोर होता.

राँसार हा प्लेयादमधील सर्वश्रेष्ठ कवी. आरंभी त्याने उद्देशिका लिहिल्या. त्याच्या चार संग्रहाची माला ऑद (इ. शी. ओड्स) ह्या नावाने १५५० मध्ये प्रसिद्ध झाली. ह्या संग्रहातील काव्यरचनेवर ग्रीक कवी पिंडर आणि लॅटिन कवी हॉरिस ह्यांचा प्रभाव दिसून येतो. आमूर (१५५२, इं. शी. लव्ह) हा त्याचा सुनीतसंग्रह. त्यात अनुकरणात आलेली कृत्रिमता काही प्रमाणात असली, तरी उत्स्फूर्त भावाभिव्यक्तीही दिसते. १५५५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्याच्या आमूर ह्या संग्रहातील सहजसुंदर प्रेमकविता मारी नावाच्या प्रेयसीला उद्देशून रचिलेल्या आहेत. राँसारची ही सर्वश्रेष्ठ काव्यकृती मानली जाते. सॉनेपूर एलॅन (१५७८) ह्या हेलन नावाच्या स्त्रीला उद्देशून लिहिलेल्या प्रेमगीतांत औदासिन्याची छटा दिसते. इम्न (१५५५−५६) मधील कवितांत होमर, थिऑक्रिटस ह्यांसारख्या ग्रीक कवींचे संस्कार आढळतात. १८६२ साली फ्रान्समध्ये कॅथलिक व ह्यूगनॉत्स ह्यांच्यात धर्मयुद्ध उभे राहिले. राँसारने (‘ल दिस्कूर स्यूर ले मिझॅर द स तां’ आणि ‘रमाँत्रांस ओ पप्ल द फ्रांस’ ह्या दोन काव्यांतून फ्रान्समधील धर्मयुद्धाचे दुष्परिणाम वर्णिलेले आहेत आणि शांततेचे आवाहन केले आहे. ला फ्रांसिया द (१५७२) हे त्याचे महाकाव्य अपूर्ण राहिले. राष्ट्रीय महाकाव्य रचण्याच्या महत्त्वाकांक्षेतून त्याने ला फ्रांसिया द लिहावयास घेतले होते. थोर रोमन कवी व्हर्जिल ह्याच्या ईनिड ह्या महाकाव्याचे काही अनुकरण करण्याचा प्रयत्न त्यात दिसतो. राँसारच्या कवितेकडे पाहिले तर प्रेमाचे क्षण तो चिरस्मरणीय मानतो, असे दिसते. तसेच त्याच्यातील अस्सल सौंदर्यास्वादकही तीतून प्रत्ययास येतो. तथापि वार्धक्य व मृत्यू ह्यांच्याकडे अपरिहार्यपणे वाहणाऱ्या कालप्रवाहाची जाणीव त्याला आहे. त्यामुळे निसर्गात त्याला सौंदर्याच्या क्षणभंगुरतेची प्रतीके दिसतात. राँसारच्या निसर्गदत्त प्रतिभेला अभिजात साहित्याच्या सखोल व्यासंगाची जोड मिळालेली होती.

फ्रान्सचा राजा नववा चार्ल्स ह्याने राँसारला राजकवी म्हणून नेमले होते तथापि पुढे तिसऱ्या हेन्रीसच्या कारकीर्दीत ती जागा देस्पॉर्त ह्या कवीला दिली गेली. परंतु रसिकांनी मात्र राँसारला त्याच्या हयातीत कवींचा राजा मानले. सोळाव्या शतकात त्याची कीर्ती यूरोप खंडभर पसरली. सतराव्या शतकात फ्रेंच कवी फ्रांस्वा द मालेर्ब आणि अभिजातवादाला तात्त्विक बैठक देणारा निकॉला ब्वालो-देप्रेओ ह्यांनी राँसारला गौण लेखले. तथापि एकोणिसाव्या शतकातील स्वच्छंदतावादी आणि पार्नेसियन कवींनी त्याला आपला पूर्वसूरी मानले श्रेष्ठ कवी म्हणून गौरविले.

तूरजवळील सँ कॉस्मे येथे तो निधन पावला.

संदर्भ : 1. Armstrong, Elizabeth T. Ronsard and the Age of Gold, Cambridge, 1968.

2. Bishop, Morris, Ronsard, Prince of Poets, 1940, reprint 1959.

3. Kantz, Richard A. Ronsard’s French Critics, 1585-1828, 1964.

4. Satterthwaite, A. W. Spenser, Ronsard and Du Bellay, 1960, reprint 1971.

5. Silver, Isidore, Ronsard and the Hellenic Renaissance in France, 1961.

6. Stone, Donald, Jr. Ronsard’s Sonnet Cycles: A Study in Tone and Vision, 1966.

टोणगावकर , विजया